पूर्णयोगाचे अधिष्ठान – १०
ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरतो; आनंदरूपाने अवतरतो. ईश्वरी उपस्थिती म्हणून साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. ही चेतना प्राप्त होण्यासाठी अगोदर व्यक्तीने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची (opening) आस बाळगली पाहिजे.
अभीप्सा (aspiration), आवाहन (call), प्रार्थना (prayer) या सर्व गोष्टी म्हणजे एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट असते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते त्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करण्यास हरकत नाही.
दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे.
व्यक्ती यांपैकी कोणत्याही गोष्टीचे अनुसरण करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते. यापैकी जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.
विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी चालू होते.
परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)






