Tag Archive for: निश्चलता

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. जोपर्यंत व्यक्तीची पुरेशी तयारी झालेली नसते तोपर्यंत त्याची आंतरिक दालनं उघडण्यास विलंब लागतो.

जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुम्हाला जर निश्चलता जाणवत असेल आणि आंतरिक प्रकाश चमकून जात असेल तसेच, आंतरिक ऊर्मी इतकी अधिक वृद्धिंगत होऊ लागली असेल की त्यामुळे तुमची बाह्य गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होऊ लागली असेल आणि प्राणिक अडचणींमधील जोर कमी होऊ लागला असेल तर, तीच स्वयमेव एक महान प्रगती असते.

योगमार्गाचा प्रवास हा खूप दीर्घ असतो आणि प्रचंड प्रतिकाराच्या विरोधात लढा देऊन, त्या मार्गावरील इंचइंच भूमी जिंकावी लागते. आणि त्यासाठी साधकाकडे धीर आणि एक-लक्ष्यी चिकाटी असणे आवश्यक असते. तसेच, कितीही अडचणी आल्या, विलंब झाला किंवा वरकरणी अपयश येताना दिसले तरीही, त्या सगळ्यामधूनही दृढ राहू शकेल अशी श्रद्धा साधकामध्ये असणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 110)

श्रीअरविंद एकांतवासात असताना, श्रीअरविंदांचे १९२६ ते १९५० या कालावधीमध्ये एकही छायाचित्र काढण्यात आले नाही. आणि नियतीची योजना कशी असते पाहा; १९५० साली म्हणजे ज्यावर्षी श्रीअरविंदांनी देह ठेवला त्यावर्षी श्री. कार्टिअन ब्रेसन हे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आश्रमात आले होते. आश्रमात आल्यानंतर त्यांनी श्रीमाताजींना श्रीअरविंदांचे छायाचित्र घेण्याविषयी परवानगी मागितली. श्रीमाताजींनी मला बोलावून सांगितले, “मी श्री. ब्रेसन यांना छायाचित्र काढण्याची परवानगी दिली आहे. त्यांना काय लागेल ती मदत कर. त्यांना काय हवंनको ते बघ.”

श्री. ब्रेसन यांनी ‘दर्शना’चे छायाचित्र घेतले. श्रीमाताजींनी त्यांना सांगितले होते की, छायाचित्र घेताना फ्लॅशलाईटचा वापर करावयाचा नाही. बिचारे ब्रेसन! फ्लॅशलाईटशिवाय त्यांना छायाचित्र घेणे भाग पडले. त्या काळात कॅमेऱ्याच्या तितक्या प्रगत लेन्सेस नव्हत्या. ब्रेसन श्रीमाताजींना म्हणाले, “या इतक्या मंद प्रकाशात छायाचित्र घेण्याएवढे आपले तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही ह्याचे मला खरंच खूप वाईट वाटतेय. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो.”

‘दर्शना’चे छायाचित्र काढून झाल्यानंतर ‘श्रीअरविंद त्यांच्या खोलीतील नेहमीच्या खुर्चीत बसलेले आहेत’ हे छायाचित्र काढण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. श्रीअरविंद बसलेले आहेत, श्री.ब्रेसन छायाचित्र काढत आहेत, ते श्रीअरविंदांना सांगत आहेत, तुमची मान थोडी अशी करा, थोडे इकडे पाहा, थोडे तिकडे पाहा, इ. इ. आणि ह्या सर्व घटनेचा मी एकटाच साक्षीदार होतो, खूप छान अनुभव होता तो!

छायाचित्र काढून झाल्यानंतर श्री. ब्रेसन मला असे म्हणाले कि, “अजिबात हालचाल न करता किंवा दहा मिनिटांत एकदासुद्धा पापणी न हलवता छायाचित्रासाठी बसून राहिलेले असे मॉडेल मी उभ्या आयुष्यात कधी पाहिले नाही.”

लेखक – श्री. उदार
(One of Mother’s Children : pg.22 – लेखक श्री. उदार)