पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.
योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.
‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)
सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक
आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.






