Tag Archive for: चैत्य पुरुष

चैत्य पुरुष (अंतरात्मा, psychic being) जेव्हा प्रबल आणि अग्रस्थानी आलेला असतो तेव्हा तो उघडपणे मदत करतो. इतकेच नव्हे तर तो मन, प्राण आणि शारीरिक प्रकृती यांचे देखील सुशासन करू शकतो. सत्य काय आणि मिथ्या काय, ईश्वरी काय किंवा असुरी काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयीचे स्पष्ट संकेत तो देतो. एवढेच नाही तर, विरोधी शक्तींचे सर्व हल्लेसुद्धा तो परतवून लावतो.

*

‘आंतरात्मिक दृष्टिकोन (psychic attitude) बाळगण्याची खरी आवश्यकता आहे,’ हा तुमचा विचार योग्यच आहे. आंतरात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे प्रगती साधीसरळ, सहजस्वाभाविक, आनंदमय आणि सुलभ होऊ शकते. चिकाटी बाळगा, साधना सोडून देण्याचे काहीच कारण नाही. उद्भवणाऱ्या अडीअडचणींमुळे नाउमेद होऊ नका. सरतेशेवटी विजय आणि चिरस्थायी शांती निश्चित आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 339 & 340)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे व प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष, अंतरात्मा (Psychic Being) पूर्णत: खुला होईल. जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण असेल किंवा प्रेरणेमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन साधना केली जात असेल किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची ऊर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य पुरुष मुक्त होणार नाही किंवा तो जर मुक्त झालाच तर तो अंशत:च किंवा काही काळासाठीच मुक्त होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण तो प्राणिक कृतींनी झाकला गेलेला असेल. आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, साधनेमध्ये फक्त मनच पुढाकार घेत असेल आणि अंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया अंतरात्मिक रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते. शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाची किंवा मागणीची ज्यामध्ये भेसळ झालेली नाही अशी निरहंकारी आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)

जीवन जगण्याचे शास्त्र – १३

माधुर्य आणि आनंदी भावना वाढीस लागू दिली पाहिजे; कारण या गोष्टी म्हणजे तुम्ही आत्म्याप्रत, चैत्य पुरुषाप्रत जागृत झाला आहात आणि तो तुमच्या संपर्कात आहे, याची सर्वात ठळक खूण असते. विचार किंवा उच्चार किंवा आचारामधील चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका; त्या बाह्य गोष्टी असल्याप्रमाणे त्यांना तुमच्यापासून दूर लोटा. ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी प्रकाश यांचे कार्य त्यांच्यावर होईल आणि त्या चुका दूर करण्यात येतील. केंद्रवर्ती सद्वस्तु म्हणजे, तुमचा आत्मा आणि त्याच्यासोबत येणाऱ्या सर्व उच्चतर वास्तविकता यांच्यावर लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 344)

*

आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग तुम्ही त्वरेने ईश्वरी प्रकाशाच्या जवळ जाऊन पोहोचाल.

*

ईश्वराप्रति एक प्रगाढ, उत्कट आणि सातत्यपूर्ण संपूर्ण कृतज्ञता जाणवणे हा आनंदी आणि शांत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 193), (CWM 16 : 314)

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा वृद्धिंगत होऊ लागतो आणि अग्रभागी येऊन मन, प्राण, शरीर यांचे शासन करू लागतो आणि त्यांच्यात बदल घडवितो तेव्हा आणि फक्त तेव्हाच वैयक्तिक कल्पना, इच्छा, सवयी गळून पडतात. तेव्हा मग, व्यक्तीचे ईश्वराशी थेट नाते निर्माण होऊ लागते आणि ईश्वराशी असलेले निकटत्व वाढीस लागते. समग्र चेतना ईश्वराशी एकत्व पावेपर्यंत हे निकटत्व वृद्धिंगत होत राहते. जेव्हा तुम्ही चैत्याच्या, अंतरात्म्याच्या (psychic) गहनतेमध्ये प्रवेश करता, तसतशा श्रीमाताजी तुमच्या समीप आहेत अशी जाणीव तुम्हाला होऊ लागते. जेव्हा मन वा प्राण हे चैत्याच्या प्रभावाखाली येऊ लागतात तसतशी त्यांच्यामध्येसुद्धा ही जाणीव वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 360)

श्रीमाताजी आणि समीपता – १६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच तुमच्या प्रकृतीचे मुख्य सारथी बनते. आणि त्याचबरोबर इतरांविषयी एक प्रकारची सद्भावना, सुसंवाद, दयाळूपणा किंवा आत्मीयता या भावनासुद्धा उदयाला येतात.

श्रीमाताजींची बालके असणाऱ्या सर्वच जिवांशी आपल्या आत्म्याचे जे आंतरिक नाते असते त्याचा हा परिणाम असतो आणि त्यामुळे त्यामध्ये (व्यक्तीचे) वैयक्तिक असे काही नसते. या आंतरात्मिक भावनेमध्ये काही अपाय नाही, उलट ती भावना संतोष आणि सुसंवाद निर्माण करते. आंतरात्मिक भावनेमुळे अंतरात्म्याचे श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये विकसन होण्यास साहाय्य लाभते आणि त्यामुळे कार्यालाही हातभार लागतो तसेच आंतरिक जीवन वृद्धिंगत होण्यासदेखील मदत होते.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारे प्राणिक प्रेम (vital love) तेवढे नाकारले पाहिजे कारण ते प्रेम ‘ईश्वरा’प्रति करायच्या पूर्ण आत्म-निवेदनापासून (consecration) व्यक्तीला दूर नेते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)

साधना, योग आणि रूपांतरण – २६२

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये जर निष्काळजीपणा असेल तर येथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व कृतींमध्ये सचेत (conscious) होण्यास शिकलेच पाहिजे. तसे केलेत तर मग प्राणिक वृत्तीप्रवृत्ती तुम्हाला फसवू शकणार नाहीत किंवा कोणते फसवे रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. या प्राणिक वृत्तीप्रवृत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जशा आहेत तशा त्या तुम्हाला पाहता याव्यात यासाठी, तुम्ही अगदी पूर्णपणे प्रामाणिक असले पाहिजे.

तुम्ही एकदा जर चैत्य पुरुष (psychic being) खुला करू शकलात आणि तो तसाच खुला ठेवू शकलात तर, तुमच्या अंतरंगामधूनच तुम्हाला प्रत्येक पावलागणिक वास्तविक सत्य काय आहे हे दाखविणारा बोध सातत्याने मिळत राहील आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तो तुमचे रक्षण करत राहील. तुम्ही जर सतत आस बाळगलीत आणि शांती वृद्धिंगत होण्यास आणि ‘दिव्य शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव दिलात तर अशी उन्मुखता, असे खुलेपण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105)

साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)