Tag Archive for: खोटेपणा

 

व्यक्तीकडे संपूर्णपणे पारदर्शी प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे कारण आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. संपूर्णपणे प्रामाणिक अशी अवघी शंभरच माणसं या पृथ्वीवर असतील. माणसाची प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते, ती खूप जटिल आहे. मनुष्य सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी शोधत असतो.

योग हा सर्वांगाने प्रामाणिक बनण्याचा मार्ग आहे. संपूर्णत: प्रामाणिक असणे अवघड असते पण एखादी व्यक्ती किमान मानसिकरित्या तरी प्रामाणिक होऊ शकते…

दिव्य शक्ती विद्यमान आहे, पूर्वी कधीही नव्हती अशा रितीने ती आज उपस्थित आहे; पण माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे ती येथे अवतरित होण्यापासून रोखली जात आहे, त्यामुळे तिची अनुभूती येऊ शकत नाही. सर्व जगच खोटेपणामध्ये, असत्यामध्ये जगत आहे. आत्तापर्यंतचे माणसांमाणसांतील सर्व नातेसंबंध हे खोटेपणा व फसवणुकीवर आधारलेले आहेत.

राष्ट्राराष्ट्रांमधील राजनैतिक संबंधही खोटेपणावर आधारलेले आहेत. त्यांना ‘शांती हवी आहे’ असा ते एकीकडे दावा करत असतात आणि त्याचवेळी ते स्वत:ची सामरिक ताकद वाढवीत चालले आहेत. माणसांमधील व राष्ट्राराष्ट्रांमधील पारदर्शी प्रामाणिकपणामुळेच रूपांतरण झालेले जग अस्तित्वात येऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 13 : 268)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, खोटेपणाबरोबर, मिथ्यत्वाबरोबर तुमचा प्राण जी तडजोड करत आहे ती काढून टाकली पाहिजे. आणि त्याच्यावर साधे सरळ आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग त्या प्राणामध्ये शिरकाव करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल.

तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर श्रीमाताजींची पुढील सूचना चिकटवून ठेवा — “येथून पुढे, या दरवाजाच्या आतमध्ये खोटेपणाला, मिथ्यत्वाला प्रवेश नाही.” आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एका पहारेकऱ्याची नेमणूक करा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 104-105)

पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णज्ञानाचा मार्ग :

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलांत विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग नकाराचा, दूरीकरणाचा पाढा वाचीत जातो. ‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘ही इंद्रिये म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’ आणि ‘हे विचार म्हणजे देखील मी नव्हे’ असे म्हणत तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो. मात्र पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण जीवात्म्यांनी संपूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करावयाची आहे : ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम.

अस्तित्वाचा खोटेपणा : आमच्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आम्ही दूर करावे, म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल;

प्राणाचा खोटेपणा : केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आमच्या भौतिक अस्तित्वाने यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे हे आम्ही दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद व्यक्त होईल.

इंद्रियांचा खोटेपणा : भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या आधीन झाल्यामुळे आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते.

हृदयाचा खोटेपणा : वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आमच्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते.

विचारांचा खोटेपणा : अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार-नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आमच्या विचाराची खोटी संपदा असते, ही दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली थोर ज्ञानशक्ती; ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 291-292)