Posts

कर्म आराधना – ३३

‘दिव्य माते’शी तुम्ही जेव्हा पूर्णतः एकात्म पावलेले असाल, तुम्हाला आपण साधन आहोत, सेवक आहोत किंवा कार्य-कर्ते आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता जर, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा या परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. नेहमीच ती ‘दिव्य माता’ तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही ‘तिच्या’मध्ये असाल; तुमचे सारे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या कृती, तुमचा अगदी श्वासोच्छ्वास आणि तुमच्या साऱ्या हालचाली या ‘तिच्या’पासून निर्माण होत आहेत आणि त्या ‘तिच्या’च आहेत असा तुमचा सततचा, सहज आणि स्वाभाविक अनुभव असेल. तुम्ही म्हणजे तिने तिच्यामधूनच घडविलेली एक व्यक्ती आणि एक शक्ती आहात, लीलेसाठी तिने स्वतःमधूनच तुम्हाला वेगळे केले आहे आणि तरीही तुम्ही तिच्यामध्ये नेहमीच सुरक्षित आहात, तुम्ही तिच्या अस्तित्वाचाच एक भाग आहात, तिच्या चेतनेचाच एक भाग आहात, तिच्या शक्तीचाच एक भाग आहात आणि तिच्या ‘आनंदाचा’च एक भाग आहात; असे तुम्हाला जाणवेल आणि दिसेल आणि तसा तुम्हाला अनुभव येईल. जेव्हा ही स्थिती संपूर्ण असेल आणि तिच्या अतिमानसिक ऊर्जा तुम्हाला मुक्तपणे प्रवाहित करतील तेव्हा तुम्ही ईश्वरी कार्यासाठी परिपूर्ण झालेला असाल. ज्ञान, इच्छा, कृती या गोष्टी खात्रीशीर, साध्या, तेजोमय, उत्स्फूर्त, निर्दोष बनतील; त्या ‘परमेश्वरा’पासून प्रवाहित झालेल्या असतील; अशी अवस्था म्हणजे ‘शाश्वता’चा दिव्य संचार असेल.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 13]

कर्म आराधना – ३२

एक क्षण असा येईल जेव्हा तुम्हाला प्रकर्षाने जाणवू लागेल की, तुम्ही कार्य-कर्ते नसून फक्त एक साधन आहात. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका निकटचा होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, कोणती गोष्ट केली पाहिजे यासाठीचा खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल.

कालांतराने मग तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणाच देते, मार्गदर्शन करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते, तीच ते कर्म घडवून आणते; तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावतात, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे साधन बनल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनल्याची जाणीव असते; जडभौतिक विश्वामध्ये तिच्या आविष्करणाचे साचे बनल्याची जाणीव असते आणि त्याचा आनंदही असतो. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या (dependence) अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला पुन्हा, अज्ञानातील दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट ‘आनंदा’मध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकाराच्या विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवण्याची अधिकच आवश्यकता असते. आत्मदानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रह धरता कामा नये. कर्म किंवा त्याचा परिणाम यासंबंधी कोणतीही आसक्ती असता कामा नये, त्यावर कोणत्याही अटी लादता कामा नयेत, ‘शक्ती’ मिळावी यासाठी कोणताही दावा करता कामा नये, साधन बनल्याचा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार असता कामा नये. तुमच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या शक्तींच्या महानतेला, मनाच्या किंवा प्राणाच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने स्वतःच्या वैयक्तिक आणि स्वतंत्र समाधानासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता ही तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी आणि निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव हा तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 12-13]

कर्म आराधना – ३१

तुम्हाला ईश्वरी कार्याचे खरे कार्यकर्ते व्हायचे असेल तर, इच्छा-वासनांपासून आणि स्व-संबंधित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. ‘दिव्य शक्ती’ची सेवा करणे, ती ग्रहण करणे, तिने भरून जाणे आणि तिच्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे. तुमची इच्छा आणि तिची इच्छा यांच्यामध्ये कोणतेही अंतर शिल्लक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही दिव्य चेतनेमध्ये विकसित होत राहिले पाहिजे, तुमच्यामध्ये तिच्या आवेगाखेरीज अन्य कोणताही उद्देश असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म तुमच्यामध्ये शिल्लक राहता कामा नये.

तुमच्यामध्ये अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर येत नाही तोपर्यंत, तुम्ही स्वत: म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला असा एक देह आणि आत्मा आहात, की जो सारी कर्मे तिच्यासाठीच करत आहे, असा विचार तुम्ही स्वतःबद्दल केला पाहिजे. स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या ईश्वरी शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या प्रकृतीमधून काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड करता कामा नये; ‘दिव्य माते’चा आनंद आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 12-13]

कर्म आराधना – ३०

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्यवर्ती जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन अटी आवश्यक असतात –

०१) अचंचलता, समता : घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे आणि स्वतः मनाने समचित्त राहणे.

०२) असीम श्रद्धा : जे सर्वोत्कृष्ट आहे तेच घडेल ही श्रद्धा बाळगणे, पण त्याबरोबरच, व्यक्ती जर स्वतःला खरेखुरे साधन बनवू शकली तर, त्याचे फळ ‘कर्तव्यम् कर्म’ अशा स्वरूपाचे असेल. म्हणजे, ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म करण्याची आवश्यकता भासेल तसे, ते कर्म असेल.

०३) ग्रहणशीलता : ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची व तिचे अस्तित्व अनुभवण्याची व त्यामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती अनुभवण्याची ताकद म्हणजे ग्रहणशीलता. तसेच व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याची मुभा त्या ‘ईश्वरी शक्ती’ला देऊन, तिला कार्य करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय. व्यक्तीला जर या शक्तीची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला या घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. (अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबतच असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची सरमिसळ होऊ देता कामा नये.)

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 266]

कर्म आराधना – २९

वाचन आणि अभ्यास यांचा मनाच्या तयारीसाठी उपयोग होत असला तरीदेखील, ‘योगमार्गा’त प्रवेश करण्यासाठीची ती स्वयंसिद्ध उत्तम अशी माध्यमे नव्हेत. अंतरंगातून होणारे आत्मार्पण (self-dedication) हे उत्तम माध्यम असते. तुम्ही ‘श्रीमाताजी’च्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे; मन, हृदय आणि ‘संकल्प’शक्ती यांमधील प्रामाणिक आत्मनिवेदन (self consecration) ही त्यासाठीची माध्यमे आहेत. श्रीमाताजींनी दिलेले कर्म हे त्या आत्म-निवेदनासाठी नेहमीच उत्तम क्षेत्र असल्याचे मानले जाते, त्यांनी दिलेले कर्म हे त्यांनाच अर्पण करण्याच्या भावनेतून केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या माध्यमातून व्यक्तीला श्रीमाताजींच्या कार्यकारी शक्तीची आणि त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

कर्म आराधना – २८

कर्मामध्ये प्राणाचे समर्पण झाल्याची काही लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत –

सर्व जीवन आणि कार्य हे ‘श्रीमाताजीं’चे आहे याची केवळ कल्पना किंवा अभीप्सा नव्हे तर, जाणीव असणे आणि या आत्मनिवेदनामध्ये, समर्पणामध्ये व्यक्तीला प्राणिक प्रकृतीच्या उत्कट आनंदाचा अनुभव येणे. परिणामतः स्थिरचित्त समाधान आढळून येणे आणि कर्माप्रत आणि त्याच्या वैयक्तिक फळाबाबत असलेल्या अहंकारी आसक्तीचा अभाव असणे आणि त्याच वेळी कर्मामध्ये आनंद जाणवणे आणि आपल्या क्षमतांचा ईश्वरी कार्यासाठी उपयोग होतो आहे याचा अतीव आनंद होणे. आपल्या कृतींच्या पाठीशी ती ‘ईश्वरी शक्ती’ कार्यरत आहे आणि प्रत्येक क्षणाला ती मार्गदर्शन करत आहे याची जाणीव होणे.

कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा घटनेमुळे जिचा भंग होऊ शकणार नाही अशी सातत्यपूर्ण श्रद्धा असणे. अडचणी आल्याच तर, अशा व्यक्ती मनात कोणत्याही शंका उपस्थित करत नाहीत किंवा निष्क्रिय मूकसंमती देत नाहीत, तर त्यांच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, आपण प्रामाणिक आत्मनिवेदन केले तर, ‘ईश्वरी शक्ती’ अडचणी दूर करेल. या विश्वासानिशी अशा व्यक्ती त्या दिव्य शक्तीकडे अधिक प्रमाणात वळतात आणि त्यासाठी त्या शक्तीवर विसंबून राहतात. जेथे संपूर्ण श्रद्धा आणि आत्मनिवेदन असते, तेथे ‘दिव्य शक्ती’बाबत ग्रहणशीलतादेखील येते, या ग्रहणशीलतेतून व्यक्ती योग्य गोष्ट करू लागते आणि योग्य साधनं निवडते, नंतर परिस्थिती स्वतःशी जुळवून घेते आणि परिणाम दिसू लागतो.

या अवस्थेप्रत येण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे – सातत्यपूर्ण अभीप्सा, दिव्य शक्तीला आवाहन आणि तिच्याप्रत आत्मार्पण, आणि मार्गात अडथळा बनून उभ्या राहणाऱ्या स्वतःमधील आणि सभोवतालच्या सर्व गोष्टींना नकार देण्याचा संकल्प. सुरुवातीला नेहमीच अडचणी असतात आणि परिवर्तनासाठी जोवर त्यांची आवश्यकता असते तोवर त्या अडचणी राहणारच. पण त्या अडचणींना व्यक्ती एका स्थिर श्रद्धेने, संकल्पाने आणि चिकाटीने सामोरी गेली तर त्या नाहीशा होणे अपरिहार्यच असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233-234]

कर्म आराधना – २७

सहसा माणसं प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती किंवा यश किंवा पद किंवा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याच्या सुखासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे कर्म यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार त्यामध्ये यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा ‘योगमार्ग’ स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा दुसऱ्या प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे, प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे. त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते, (पण) आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये ओतण्यात आलेली प्रेरणा वा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असण्याची शक्यता असते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील (consecration) किंवा त्याच्या दृष्टिकोनातील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिच्या साध्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती उपयोगात आणेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233]

कर्म आराधना – २६

जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुंशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा अशा इच्छांविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक हेतू किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा एखादे पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. सर्व कर्मं जी जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या ‘अज्ञान’मय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नसतो.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 232]

कर्म आराधना – २५

केवळ कर्म हे उद्दिष्ट नाही; तर कर्म हे योगसाधना करण्याचे एक साधन आहे.
*
व्यक्तीने योग्य पद्धतीने आणि चेतना त्या ‘शक्ती’प्रत खुली ठेवून कर्म केलेले असेल तर असे कर्म ही साधनाच असते.
*
साधनेशिवाय योगाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. कर्म हे सुद्धा साधनेचाच एक भाग म्हणून स्वीकारले पाहिजे. पण अर्थातच, तुम्ही जेव्हा कर्म करत असता तेव्हा मात्र तुम्ही कर्माचाच विचार केला पाहिजे. ते कर्म ‘योग-चेतने’मध्ये राहून एक ‘साधन’ म्हणून, ‘ईश’स्मरणासहित कसे करायचे हे तुम्ही शिकाल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 231]

कर्म आराधना – २४

कर्म हे ‘पूर्णयोगा’चे आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही, वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा व्यक्तिनिष्ठ कल्पनांमध्ये हरवून बसाल….

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 248]