जीवन जगण्याचे शास्त्र – ११
(आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला आनंदाचा अनुभव कसा येतो, हे आपण अगोदरच्या भागात पाहिले. श्रीमाताजी पुढे म्हणतात…)
मात्र या आनंदाचा अनुभव मनुष्यमात्रांमध्ये येणे हे काहीसे अधिक कठीण असते. कारण या आनंदाचा बोध घेण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मानसिक आणि प्राणिक रचना आडव्या येतात आणि त्या हे क्षेत्र बिघडवून टाकतात. तेथे त्यांच्यामध्ये असलेला तीव्र अहंकार वस्तुंमध्ये मिसळतो आणि त्यामुळे मनुष्याच्या माध्यमातून या आनंदाशी संपर्क होणे काहीसे अधिक कठीण असते.
वनस्पती आणि प्राण्यांमध्येसुद्धा तुम्हाला या आनंदाची जाणीव होऊ शकते. पण वनस्पतींपेक्षा प्राण्यांमध्ये हा अनुभव घेणे मुळातच काहीसे अधिक कठीण असते. पानाफुलांमध्ये, झाडांमध्ये ही गोष्ट अगदी मनोरम असते. पानेफुले त्यांचा आनंद बोलून दाखवितात, व्यक्त करतात. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व परिचित वस्तुंमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या तुमच्या अवतीभोवतीच्या वस्तुंमध्ये, चेतनेची अशी एक स्थिती असते, की त्यामध्ये प्रत्येक वस्तू जशी, जिथे असते तशी ती त्या स्थितीमध्ये आनंदात असते. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवते की, तुम्ही खऱ्या आनंदाला स्पर्श केला आहे.
आणि ही गोष्ट सापेक्ष नसते. म्हणजे ती गोष्ट इतर कशावरही अवलंबून नसते. हा आनंद बाह्य परिस्थितीवर, कमीअधिक अनुकूल स्थितीवर किंवा अन्य कशावरही अवलंबून नसतो. तर येथे तुम्ही या विश्व-अस्तित्वाच्या मूलकारणाशीच सायुज्य पावलेले असता. आणि असा आनंद जेव्हा तुमच्या अनुभवास येतो तेव्हा तुमच्या शरीरातील पेशी न् पेशी त्या आनंदाने भरून जाते.
ही गोष्ट विचार करून समजावून घेण्याची नाही. येथे तुम्ही तर्क करत नाही, विश्लेषण करत नाही. ही अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये तुम्ही ती अवस्था जगत असता. आणि जेव्हा शरीराला हा अनुभव येत असतो तेव्हा तो अनुभव इतका टवटवीत असतो, तो इतका ताजा, इतका उत्स्फूर्त असतो… तो तुमच्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. तेथे आत्म-निरीक्षणाची, आत्म-विश्लेषणाची किंवा वस्तुंचे विश्लेषण करत असल्याची कोणतीही जाणीवच शिल्लक राहात नाही.
हे सारे एखाद्या आनंदलहरींच्या गाण्यासारखे असते, परंतु त्यामध्ये कोणताही उथळपणा नसतो, कोणताही आवेग नसतो; सारे काही शांत, अगदी शांत असते. ते अतिशय सूक्ष्मही असते आणि तेवढेच उत्कटदेखील असते. जेव्हा हा आनंदाचा अनुभव येतो तेव्हा जणू अखिल विश्व हे अद्भुत रितीने सुसंवादी असल्यासारखे वाटू लागते. इतकेच काय पण सामान्य मानवी चेतनेला जे कुरूप, असुखद वाटत असते, तेसुद्धा आता अद्भुत वाटू लागते. …हा खरा आनंद, सत्य आनंद, खरा परमानंद असतो. परंतु तो अनुभवण्यासाठी आधी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी मी सांगितले तसे प्रयत्न व्यक्तीने केले पाहिजेत.
परंतु आनंद मिळवणे हा हेतू ठेवून जर ते प्रयत्न केले तर, त्याचे फळ मिळण्यास वेळ लागेल; कारण त्यामध्ये अहंभावात्मक घटकाची भेसळ झालेली असेल. एखादा हेतू मनात ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मग ते अर्पण असणार नाही, त्यामध्ये एक अपेक्षा असेल, मागणी असेल आणि मग… त्याचे फळ मिळेल पण त्याला काहीसा अधिक काळ लागेल. परंतु जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, मागणी करत नाही, काही मिळावे अशी अपेक्षा बाळगत नाही, म्हणजे जेव्हा तिथे केवळ आत्म-दान व अभीप्सा असते, जेव्हा तिथे देवाणघेवाण-विरहित एक उत्स्फूर्त आवश्यकता असते, दिव्यता प्राप्त करून घ्यावी अशी निकड जेव्हा तुम्हाला जाणवते, तेव्हा तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो.
– श्रीमाताजी (CWM 09 : 22)