Tag Archive for: आज्ञाचक्र

 

व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र करणे सर्वाधिक सुकर असते किंवा व्यक्तीला ज्या केंद्रावर लक्ष एकाग्र केले असता, सर्वात जास्त परिणाम साध्य होतो त्या केंद्रावर तिने चित्त एकाग्र करण्यास हरकत नाही.

०१) हृदयचक्रावरील एकाग्रता

हृदय-चक्रावर एकाग्रता केल्यास ती एकाग्रता-शक्ती ते चक्र (heart-centre) खुले करते आणि चैत्य पुरुषाला (psychic being) झाकणारा पडदा ती अभीप्सेच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या व समर्पणाच्या शक्तीद्वारे दूर करते. ही शक्ती, मन, प्राण व शरीराचे शासन अंतराम्याने किंवा चैत्य पुरुषाने करावे यासाठी त्याला अग्रस्थानी आणते आणि मन, प्राण व शरीराला ती पूर्णपणे ईश्वराभिमुख करते, त्यांना ईश्वराप्रत खुले करते. तसेच त्यांना ईश्वराभिमुख करण्याच्या आणि खुले करण्याच्या आड जे काही येईल ते सर्व त्यांच्यामधून काढून टाकते. पूर्णयोगामध्ये यालाच ‘आंतरात्मिक किंवा चैत्य रूपांतरण’ (psychic transformation) असे संबोधले जाते.

०२) मस्तकाच्या वरच्या बाजूस असलेल्या केंद्रावर एकाग्रता

शांती, निश्चल-नीरवता आणण्यासाठी, शारीर-जाणिवेपासून आणि मन व प्राणाशी असलेल्या एकत्वापासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच उच्चतर चेतनेशी मीलन घडण्यासाठी कनिष्ठ चेतनेचा (मानसिक, प्राणिक व शारिरीक चेतना) मार्ग खुला व्हावा आणि ती चेतना ऊर्ध्वगामी व्हावी तसेच उच्चतर चेतनेच्या (आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना) शक्ती या मन, प्राण व शरीरामध्ये अवतरित व्हाव्यात म्हणून मस्तकाच्या वरच्या बाजूस (above the head) असलेल्या केंद्रावर एकाग्रता-शक्ती केंद्रित केली जाते. या गोष्टीला पूर्णयोगामध्ये ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) असे संबोधले जाते.

एखाद्या व्यक्तीने जर या प्रक्रियेपासून आरंभ केला तर, ती ऊर्ध्वस्थित शक्ती अवरोहण (descent) करताना, अगदी सर्वात खाली असलेल्या चक्रापर्यंतची सर्व चक्रं खुली करते आणि चैत्य पुरुषास अग्रस्थानी आणते. मात्र हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कनिष्ठ चेतनेच्या अडथळ्यास सामोरे जाण्याचा संघर्ष करावा लागण्याची किंवा अडचणींना तोंड द्यावे लागण्याची बरीच शक्यता असते. दिव्य कार्यामध्ये कनिष्ठ चेतनेची भेसळ होण्याची किंवा दिव्य कार्यास ती नकार देण्याची शक्यता असते. मात्र, एकदा चैत्य पुरुष सक्रिय झाला की हा संघर्ष आणि या अडचणी बऱ्याच कमी होण्याची शक्यता असते.

०३) आज्ञाचक्रावरील एकाग्रता

आज्ञाचक्रावर एकाग्रता करणे म्हणजे तेथील चक्र खुले करणे, आंतरिक मन व आंतरिक दृष्टी मुक्त करणे तसेच आंतरिक किंवा योगिक चेतना आणि तिचे अनुभव व तिच्या शक्ती मुक्त करणे. येथूनसुद्धा व्यक्ती ऊर्ध्वमुख होत खुली होऊ शकते आणि निम्नतर स्तरांवर असणाऱ्या चक्रांवर कार्य करू शकते. परंतु, या प्रक्रियेमध्ये व्यक्ती अध्यात्माविषयीच्या स्वतःच्याच मानसिक काल्पनिक रचनांमध्ये बंदिस्त होऊन राहण्याचा धोका असतो. तसे झाले तर, ती त्यातून बाहेर पडून, समग्र आध्यात्मिक अनुभूतीच्या आणि ज्ञानाच्या मोकळ्या वातावरणात न येण्याचा आणि परिणामतः अस्तित्वामध्ये व प्रकृतीमध्ये समग्र परिवर्तन न होण्याचा धोका संभवतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 307)

विचारशलाका ०९

साधक : आम्हाला ‘योगा’संबंधी काही सांगाल का?

श्रीमाताजी : ‘योग’ तुम्हाला कशासाठी हवा आहे? शक्ती प्राप्त व्हावी म्हणून? मन:शांती, शांतचित्तता लाभावी म्हणून? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून? तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात हे दर्शविण्यासाठी वरीलपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्याकरता तुम्हाला पुढील काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :

तुम्हाला ‘ईश्वरा’साठी ‘योगमार्गा’चे आचरण करावेसे वाटते का?

‘ईश्वर’ हाच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का?

म्हणजे ‘ईश्वरा’वाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची अवस्था आहे का?

तुम्हाला असे वाटते का की, ‘ईश्वर’ हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ‘ईश्वरा’विना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही?

तसे असेल तरच तुम्हाला ‘योगमार्ग’ स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

‘ईश्वरा’विषयीची तळमळ, अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत ठेवायची. आणि त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती असते एकाग्रतेची! ‘ईश्वरा’वरील एकाग्रतेची – ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, आत खोल खोल जा. तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्र आहेत – एक असते मस्तकाच्या वर (सह्स्त्रार), दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये, आज्ञाचक्र)! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात – रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या सुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 01]