Tag Archive for: अविचलता

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, कर्म करणे याला मी ‘अविचलता’ म्हणते.

*

अविचलतेमध्ये एक स्थिरशांत (calm) आणि एकाग्र एकवटलेली अशी ताकद असते, ती इतकी अविचल असते की, तिला कोणीही धक्का लावू शकत नाही. पूर्ण साक्षात्कारासाठीचा हा अनिवार्य पाया आहे.

*

तुम्ही जेव्हा अविचल असाल तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होईल की, दिव्य शक्ती, तिचे साहाय्य आणि तिचे संरक्षण हे सदोदित तुमच्या सोबत आहे.

*

तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे शांत, अविचल राहायचे आणि पूर्णतः केवळ ईश्वराभिमुख व्हायचे, मग बाकी सारे ‘त्या’च्या हाती असते.

*

अविचलता, शांती आणि निश्चल-नीरवतेच्या (silence) स्थितीमध्ये आध्यात्मिक शक्ती कार्य करते. व्यक्ती विरोधी शक्तींच्या अंमलाखाली आली की, क्षुब्ध होणे आणि उत्तेजित होणे अशा सर्व गोष्टी होतात.

*

तुम्ही अविचलतेचा शोध बाह्य परिस्थितीमध्ये घेता कामा नये, तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या अंतरंगापासून केली पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर शांती असते आणि त्या शांतीमधूनच तुमच्या समग्र अस्तित्वामध्ये एक प्रकारची स्थिरता, अविचलता येते; ती अगदी तुमच्या शरीरापर्यंत जाऊन पोहोचते. अर्थात त्यासाठी तुम्ही तिला वाव दिला पाहिजे. तुम्ही ती शांती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे; म्हणजे मग तुम्हाला हवी असलेली अविचलता, स्थिरता तुम्हाला लाभेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 135, 135, 135, 111, 137, 138)

जीवन जगण्याचे शास्त्र – १७

तुमच्या साधनेच्या दृष्टीने कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे तुमच्या मनाला कसे काय कळू शकेल किंवा मन ते कसे ठरवू शकेल बरे? अशा प्रकारच्या विचारांमध्येच जर तुमचे मन गुंतून राहिले तर आणखीनच गोंधळ उडेल. साधनेमध्ये मन हे स्थिरशांत असले पाहिजे आणि ते ईश्वराविषयीच्या अभीप्सेवर दृढ असले पाहिजे. मन स्थिरशांत असताना, खरी अनुभूती आणि खरे परिवर्तन या गोष्टी अंतरंगातून आणि वरून घडून येतील.
*
व्यक्ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर असावी यासाठी, मनाची अविचलता आणि बाह्यवर्ती प्रकृतीपासून आंतरिक पुरुषाची विलगता या गोष्टी अतिशय साहाय्यकारी, किंबहुना अत्यावश्यक असतात. जोपर्यंत व्यक्ती ही विचार-वावटळीच्या अधीन असते किंवा प्राणिक गतिविधींच्या गोंधळाच्या अधीन असते तोपर्यंत ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर राहू शकत नाही. स्वतःला त्यापासून निर्लिप्त करणे, त्यापासून मागे होणे आणि आपण या वैचारिक किंवा प्राणिक वादळांपासून स्वतंत्र, निराळे आहोत असे व्यक्तीला जाणवणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 28), (CWSA 29 : 160)

साधना, योग आणि रूपांतरण – ५७

(कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

यापैकी कोणतीच गोष्ट घडली नाही तर अशा वेळी (विचारांना) नकार देण्याची सातत्यपूर्ण सवय ही आवश्यक ठरते. येथे तुम्ही त्या विचारांशी दोन हात करता कामा नयेत किंवा त्यांच्याशी संघर्षही करता कामा नये. फक्त एक अविचल आत्म-विलगीकरण (self-separation) आणि विचारांना नकार देत राहणे आवश्यक असते. सुरुवातीला लगेच यश येते असे नाही, पण तुम्ही त्या विचारांना अनुमती देणे सातत्याने रोखून ठेवलेत, तर अखेरीस विचारांचे हे यंत्रवत गरगर फिरणे कमीकमी होत जाईल आणि नंतर ते बंद होईल. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आंतरिक अविचलता (quietude) किंवा निश्चल-नीरवता (silence) प्राप्त होईल.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता, योगिक प्रक्रियांचे परिणाम हे त्वरित दिसून येत नाहीत आणि म्हणून, परिणाम दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रक्रिया अगदी धीराने अवलंबल्या पाहिजेत. व्यक्तीची बाह्य प्रकृती (मन, प्राण आणि शरीर) खूप विरोध करत असेल तर, हे परिणाम दिसून येण्यास कधीकधी बराच कालावधी लागू शकतो.

जोपर्यंत तुम्हाला उच्चतर ‘आत्म्या’ची चेतना गवसलेली नाही किंवा तिचा अनुभवच जर तुम्हाला आलेला नाही, तर तुम्ही तुमचे मन त्या उच्चतर आत्म्यावर कसे काय स्थिर करू शकता? तुम्ही ‘आत्म्या’च्या संकल्पनेवरच लक्ष एकाग्र करू शकता किंवा मग तुम्ही ‘ईश्वरा’च्या किंवा ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर, चित्रावर किंवा भक्तीच्या भावनेवर लक्ष एकाग्र करू शकता; ‘ईश्वरा’ने किंवा ‘दिव्य माते’ने तुमच्या हृदयात प्रविष्ट व्हावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला तुम्ही आवाहन करू शकता किंवा तुमच्या शरीर, हृदय आणि मनामध्ये ‘दिव्य शक्ती’ने कार्य करावे म्हणून, तसेच तुमची चेतना मुक्त करून, तुम्हाला तिने आत्म-साक्षात्कार प्रदान करावा म्हणून, तुम्ही ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करू शकता.

तुम्ही जर ‘आत्म्या’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू इच्छित असाल तर ती संकल्पना मन आणि त्याचे विचार, प्राण आणि त्याची भावभावना, शरीर आणि त्याच्या कृती यांपासून काहीशी भिन्न असलीच पाहिजे; या सर्वापासून अलिप्त असली पाहिजे, ‘आत्मा’ म्हणजे एक ‘अस्तित्व’ किंवा ‘चेतना’ आहे अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजेत. म्हणजे आजवर मन, प्राण, शरीर यांच्या गतिविधींमध्ये मुक्तपणे समाविष्ट असूनही त्यांच्यापासून अलिप्त असणारा ‘आत्मा’ अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 303-304)