साधनेची मुळाक्षरे – ०४

प्रश्न : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “ही मुक्ती, हे पूर्णत्व, ही समग्रतासुद्धा आपण आपल्यासाठी मिळविता कामा नये तर ती आपण ईश्वरासाठी मिळविली पाहिजे.” पण आपण जी साधना करतो ती तर आपल्या स्वतःसाठीच करत असतो ना?

श्रीमाताजी : पण श्रीअरविंद येथे नेमकेपणाने तेच तर सांगत आहेत. त्या मुद्द्यावर भर देण्यासाठीच त्यांनी असे लिहिले आहे. म्हणजे, आपण जे पूर्णत्व संपादन करणार आहोत ते आपल्या वैयक्तिक आणि स्वार्थी हेतुसाठी उपयोगात आणायचे नसून, ईश्वराचे आविष्करण शक्य व्हावे म्हणून, ते ईश्वराच्या सेवेत समर्पित करायचे आहे. वैयक्तिक पूर्णत्वाच्या स्वार्थी हेतुने आपण या विकासासाठी प्रयत्नशील नसून, ‘ईश्वरी कार्य’ सिद्धीस जावे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

प्रश्न : पण आपण हे दिव्य ‘कार्य’ का करतो?

श्रीमाताजी : ईश्वराची तशी ‘इच्छा’ आहे, म्हणून आपण ते करतो. ते आपण आपल्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी करत नाही, आणि ते तसे करता कामा नये. आपण ते करतो कारण ती ईश्वरी इच्छा आहे आणि ते ईश्वरी कार्य आहे.

जोपर्यंत कोणतीही वैयक्तिक आकांक्षा किंवा इच्छाआकांक्षा, किंवा एखादी स्वार्थी इच्छा त्यामध्ये मिसळलेली असते, तेव्हा त्यातून एक प्रकारची भेसळ निर्माण होते आणि मग ती ‘ईश्वरी इच्छे’ची तंतोतंत अभिव्यक्ती राहात नाही. केवळ एकच एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे ‘ईश्वर’ ‘त्याचा संकल्प’, ‘त्याचे आविष्करण’ आणि ‘त्याची अभिव्यक्ती’! आणि त्यासाठीच व्यक्ती इथे आहे, व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ती ईश्वरच आहे. पण जोपर्यंत ‘मी’ पणाची भावना आहे, अहंभावना आहे; जोपर्यंत स्व-व्यक्तित्वाची भावना डोकावत असते, तेव्हा त्यातून असे सिद्ध होते की, व्यक्ती जशी असणे आवश्यक आहे तशी ती अजूनपर्यंत झालेली नाही. हे एका रात्रीत करणे शक्य आहे, असे मला म्हणायचे नाही पण तरीही खरंतर हेच सत्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 189-190)

साधनेची मुळाक्षरे – ०३

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल का ?

श्रीमाताजी : तुम्ही योगसाधना कशासाठी करू इच्छिता? सामर्थ्य लाभावे म्हणून? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? की मानवतेची सेवा करावयाची आहे म्हणून? परंतु, तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही. त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत – तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हाच तुमच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच, तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

साधनेची मुळाक्षरे – ०२

‘ईश्वरा’कडूनच सारे काही अस्तित्वात येते, सारे त्यातच निवास करतात, आणि (आत्ता अज्ञानामुळे झाकोळून गेलेले असले तरी) त्या ‘ईश्वरी’ सत्याकडे परतणे हेच आत्म्याचे जीवनातील ध्येय असते. स्वतःच्या परम सत्यामध्ये असलेला ‘ईश्वर’ हा केवल आणि अनंत शांती, चैतन्य, सत्, शक्ती आणि ‘आनंद’स्वरूप असतो.

*

आपण ‘ईश्वर’ जाणतो आणि ‘ईश्वर’ बनतो कारण आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आपण मूलतः ‘ईश्वर’च आहोत. सर्व शिकवण म्हणजे प्रकटीकरण (revealing) असते, सर्व निर्मिती म्हणजे उलगडत जाणे (unfolding) असते. आत्म-प्राप्ती हेच रहस्य आहे; आत्मज्ञान आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी चेतना ही त्याची साधने आणि प्रक्रिया आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 05), (CWSA 23 : 54)

श्रीअरविंदांच्या लिखाणातील आणि श्रीमाताजींच्या संभाषणांमधील निवडक उताऱ्यांच्या आधारे येथे साधनेची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामधून श्रीअरविंद व श्रीमाताजींचे समग्र साहित्य वाचण्याची इच्छा वाचकांना होईल, अशी आशा आहे. किंवा त्यातील एखाद्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे ‘एकतरी ओवी अनुभवावी’ आणि त्या तत्त्वाला आपल्या चेतनेचा एक भाग बनवावे, असा प्रयत्न साधक करू शकतील.

साधनेची मुळाक्षरे – ०१

तत्त्वतः आपल्या जीवनाचे केवळ एकच खरे कारण आहे आणि ते म्हणजे – स्वतःला जाणणे. आपण कोण आहोत, आपण येथे का आहोत आणि आपल्याला काय केले पाहिजे, हे शिकण्यासाठीच आपण येथे आहोत. आणि जर आपल्याला हे उमगले नाही, तर आपले जीवन अगदीच पोकळ ठरते – आपल्यासाठी आणि इतरांसाठीदेखील!

*

जीवनाचे एक प्रयोजन आहे. ईश्वराचा शोध घेणे आणि त्याची सेवा करणे हेच ते प्रयोजन आहे.

ईश्वर दूर कोठे नाही, तर तो आपल्यामध्येच, खोल अंतरंगात आणि भावना व विचार यांच्या वरती आहे. ईश्वरासोबत शांती आणि आश्वासकता आहे आणि सर्व अडचणींवरील तोडगादेखील आहे.

तुमच्या सगळ्या समस्या ईश्वरावर सोपवा म्हणजे तो तुम्हाला सर्व अडचणींमधून बाहेर काढेल.

*

ईश्वराचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी ऐक्य पावण्याचा आनंद हे व्यक्तिगत जीवनाचे प्रयोजन असते. व्यक्तीला जेव्हा हे उमगते तेव्हा ती व्यक्ती सर्व अडचणींवर मात करण्याच्या सामर्थ्यप्राप्तीसाठी सज्ज होते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 15-16), (CWM 14 : 05), (CWM 16 : 423)