साधनेची मुळाक्षरे – ११
श्रीअरविंद आपल्याला हे सांगण्यासाठी आले आहेत की, ‘सत्या’चा शोध घेण्यासाठी ही पृथ्वी सोडून जाण्याची आवश्यकता नाही; आपला आत्मा शोधण्यासाठी व्यक्तीने जीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; ‘ईश्वरा’शी संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीने हे जग सोडून जाण्याची किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित विश्वास बाळगण्याची आवश्यकता नाही. ‘ईश्वर’ सर्वत्र आहे, सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे, आणि तो जर गुप्त असेलच तर… त्याचे कारण आपण ‘त्या’ ला शोधण्याचे कष्टच घेत नाही.
आपण केवळ एका प्रामाणिक अभीप्सेद्वारे, आपल्या आतमध्ये असलेला कुलूपबंद दरवाजा उघडू शकतो… ती अशी एक गोष्ट असेल की जी जीवनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकेल; आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर ती असेल; ती गोष्ट आपल्या सर्व समस्या सोडवेल आणि आपल्याही नकळतपणे आपण ज्याची अभीप्सा बाळगतो त्या परिपूर्णत्वाप्रत ती आपल्याला घेऊन जाईल; ती गोष्ट आपल्याला अशा एका ‘सत्यत्वा’प्रत घेऊन जाईल की जे सत्यत्वच केवळ आपले समाधान करू शकते आणि आपल्याला चिरस्थायी असा आनंद, संतुलन, सामर्थ्य आणि जीवन प्रदान करते.
…..याचा आरंभबिंदू कोणता? तर त्यासाठी, आपल्याला ती गोष्ट मिळावी अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे, ती आपल्याला खरोखर हवी असली पाहिजे, आपल्याला तिची निकड भासली पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे अन्य कोणत्याही गोष्टीचा नाही तर, केवळ त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे. एक दिवस असा येतो, अगदी जलदगतीने येतो, जेव्हा व्यक्ती अन्य कोणताच विचार करू शकत नाही.
ही एकच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग नंतर…
मग व्यक्ती तिच्या अभीप्सेची स्पष्ट शब्दांत मांडणी करते, तिच्या अंतःकरणातून, ज्यामधून त्या निकडीची प्रामाणिकता अभिव्यक्त होईल अशी खरीखुरी प्रार्थना उदयाला येते, आणि मग… मग काय घडून येते ते व्यक्तीला दिसेलच.
काहीतरी घडून येईल. नक्कीच काहीतरी घडेल. प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगळेच रूप धारण करेल.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 374-375)