साधना, योग आणि रूपांतरण – १९६

आपल्या दृष्टीने ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) ज्यापासून आणि ज्यामध्ये या विश्वातील सर्वकाही आविष्कृत झाले आहे आणि (जरी हे आविष्करण सद्यस्थितीत अज्ञानगत असले तरीसुद्धा.) सर्व वस्तुंच्या आणि व्यक्तींच्या अंतरंगामध्ये आणि पाठीमागे असणारा ‘विश्वात्मा’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर.’

२) आपल्या अंतरंगामध्ये वसलेल्या स्वतःच्या अस्तित्वाचे ‘चैतन्य’ आणि त्याचा ‘स्वामी’ म्हणजे ‘ईश्वर’, की ज्याची आपण सेवा केली पाहिजे आणि आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला आपण शिकले पाहिजे, जेणेकरून आपण ‘अज्ञाना’मधून ‘प्रकाशा’कडे उन्नत होऊ शकू.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान व शक्ती आहे आणि त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या ‘प्रकाशा’कडे आपण उन्नत झाले पाहिजे आणि आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये आपण त्याची वास्तविकता अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सामान्य प्रकृतीमध्ये आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ म्हणजे काय हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणूकाही एक पडदाच विणतात की ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गभीर (deeper) चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि जी ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल त्या ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे

‘ईश्वरा’बद्दलच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. चेतना खुली होण्यातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच, ‘ईश्वरा’च्या सत्याचा साक्षात्कार होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

साधना, योग आणि रूपांतरण – १९३

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०९

वरून होणाऱ्या अवतरणाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या कार्याबाबत, स्वतःवर संपूर्णपणे विसंबून राहता कामा नये, ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. येथे ‘सद्गुरू’च्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिले पाहिजे. जे जे काही घडते ते ते सारे त्यांच्या विवेकावर, मध्यस्थीवर आणि त्यांच्या निर्णयावर सोपविले पाहिजे.

कारण बरेचदा असे घडते की, या अवतरणामुळे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्ती उत्तेजित होतात, उद्दीपित होतात आणि उच्चतर शक्तींमध्ये मिसळू पाहतात आणि त्यांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:कडे वळवू पाहतात. बरेचदा तर असेही घडते की, परमेश्वर किंवा दिव्य मातेचे (मायावी) रूप घेऊन, एक किंवा अनेक अ-दैवी शक्ती प्रकट होतात आणि साधकाकडून सेवेची आणि शरणागतीची मागणी करतात. साधकाने जर त्यास संमती दिली तर मग अत्यंत विघातक परिणाम घडून येतात.

खरोखरच, साधक केवळ ‘ईश्वरी’ कार्यालाच सहमती देत असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाला शरण जात असेल किंवा समर्पित होत असेल तर मग सारेकाही सुरळीत चालत राहते. ही सहमती देणे आणि सर्व अहंकारी शक्तींना किंवा अहंकाराला चुचकारणाऱ्या शक्तींना नकार देणे या गोष्टी साधनामार्गावरील संपूर्ण वाटचालीमध्ये संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करतात. पण ‘प्रकृती’चे मार्ग हे मायाजालांनी भरलेले असतात, अहंकाराचे अगणित कपटवेश असतात; ‘राक्षसी माया’, ‘काळोखाच्या शक्तीं’ची भ्रांती, असाधारणरित्या कुशल असते. येथे तर्कबुद्धीचे मार्गदर्शन पुरे पडत नाही, बरेचदा त्यातून विश्वासघात होतो. आणि कोणत्याही आकर्षक, प्रलोभनकारी हाकेनुसार वागायला प्राणिक इच्छा तर आपल्यासोबत सदैव तयारच असते. आणि म्हणूनच आम्ही ज्याला ‘समर्पण’ असे संबोधतो, त्यावर ‘पूर्णयोगा’मध्ये आम्ही इतका अधिक भर देत असतो.

हृदयचक्र पूर्णपणे खुले झाले असेल आणि जर अंतरात्मा नेहमीच नियंत्रण ठेवत असेल तर, मग काही प्रश्नच उद्भवत नाही, मग सारेकाही सुरक्षित असते. परंतु कोणत्याही क्षणी, एखाद्या कनिष्ठ आवेगामुळे अंतरात्मा झाकोळला जाऊ शकतो. काही अगदी थोडेच जण या धोक्यांपासून दूर राहू शकतात आणि ही तीच माणसं असतात की, ज्यांना ‘समर्पण’ अगदी सहजतेने साध्य होते. या अतिशय कठीण प्रयासांमध्ये, जो ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावलेला आहे किंवा जो ‘ईश्वरा’चे प्रतिनिधित्व करतो अशा व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

‘योगाची केंद्रवर्ती प्रक्रिया’ याविषयी मला नेमके काय म्हणायचे आहे याची पुरेशी स्पष्ट कल्पना येण्यासाठी तुम्हाला या लिखाणाची मदत होईल. येथे मी काहीसे विस्ताराने लिहिले आहे पण, अर्थातच, मी येथे फक्त मूलभूत गोष्टीच समाविष्ट करू शकलो आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 329-330)

साधना, योग आणि रूपांतरण – १९२

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०८

एकाग्रतेचा परिणाम सहसा अगदी त्वरेने घडून येत नाही; मात्र काही जणांमध्ये तो एकदम वेगवान आणि अचानकपणे घडून येतो; परंतु बहुतेकांना मात्र पूर्वतयारीसाठी आणि समायोजनासाठी कमीअधिक कालावधी लागतो. विशेषतः अभीप्सा आणि तपस्येद्वारे, जिथे प्रकृतीची काही प्रमाणात का होईना पण पूर्वतयारी झालेली नसते, तिथे अधिक कालावधी लागतो.

ज्ञानमार्गाची एक ‘अद्वैती’ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या मन, प्राण आणि शरीराशी असलेल्या तादात्म्याला नकार देते, ती सातत्याने असे म्हणत राहते की, “मी मन नाही”, “मी प्राण नाही”, “मी शरीर नाही.” या गोष्टींना ती स्वतःच्या खऱ्या ‘स्व’पासून अलग करून पाहते आणि कालांतराने व्यक्तीला साऱ्या मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया-प्रक्रिया आणि मन, प्राण व शरीराच्या स्वयमेव जाणिवासुद्धा बाह्य व बहिवर्ती क्रिया बनत चालल्याचे जाणवू लागते. त्याचवेळी अंतरंगामध्ये, त्यांच्यापासून निर्लिप्त अशी अलग स्वयंभू अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते, जी जाणीव वैश्विक आणि परात्पर चैतन्याच्या साक्षात्कारामध्ये खुली होते.

अशीच आणखी एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ती म्हणजे सांख्य दर्शनाची पद्धत. या पद्धतीमध्ये ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’चे विलगीकरण केले जाते. यामध्ये मनावर ‘साक्षित्वा’ची भूमिका लादली जाते म्हणजे मन, प्राण, शरीराच्या सर्व कृती या ‘मी’ आणि ‘माझे’ यांपासून वेगळ्या असतात, त्या बाह्य क्रिया बनलेल्या असतात, पण ‘प्रकृती’शी संबंधित असतात आणि ‘मी’च्या बाह्य व्यक्तित्वावर लादल्या जातात. या कोणत्याही गोष्टींनी ‘मी’ बांधला जात नाही, ‘मी’ हा त्यांपासून निर्लिप्त असतो; शांत, साक्षी ‘पुरुष’ असतो. परिणामतः व्यक्तीमध्ये एक प्रकारचे विभाजन वाढीस लागते. साधकाला स्वतःच्या अंतरंगामध्ये एका स्थिर, शांत, स्वतंत्र चेतनेच्या वाढीची जाणीव होते, ज्या चेतनेला पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शारीरिक प्रकृतीच्या खेळापासून आपण स्वतः दूरस्थ आहोत याची जाणीव होते.

सहसा जेव्हा असे घडून येते तेव्हा उच्चतर ‘चेतने’ची शांती, उच्चतर ‘शक्ती’चे कार्य अगदी त्वरेने खाली आणणे शक्य असते, आणि त्यामुळे ‘योगा’ची संपूर्ण वाटचाल वेगाने घडून येऊ शकते. परंतु बरेचदा, आवाहन (call) आणि एकाग्रतेला प्रतिसाद म्हणून ‘शक्ती’च स्वतःहून खाली अवतरित होते आणि मग, उपरोक्त गोष्टी आवश्यक असतील तर ती त्या करते आणि साहाय्यकारी व अनिवार्य अशा इतर मार्गांचा किंवा प्रक्रियांचा उपयोग करते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – १९१

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या सर्वाप्रत खुले होणे आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वाप्रत उन्मुख होणे या दोन गोष्टी येथे सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. हृदय-चक्र हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर सिद्धीचे मुख्य साधन असते. ही साधनेची मूलभूत संगती (rationale) आहे.

‘ईश्वरा’ने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे यासाठी तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे यासाठी त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिले खुलेपण (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाबदेखील यामध्ये समाविष्ट असते.

आधी मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, चेतनेचे एककेंद्रीकरण केले असता तसेच ईश्वरी ‘शांती’, ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केले असता, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगली असता दुसरी उन्मुखता घडून येते. (काही जणांबाबत आधी फक्त ‘शांती’ येते तर अन्य काही जणांबाबत, शांती व सामर्थ्य एकत्रितपणे येते.)

काही जणांना प्रथम ‘प्रकाशा’चा किंवा ’आनंदा’चा लाभ होतो किंवा मग त्यांच्यावर अचानकपणे ज्ञानाचा वर्षाव होतो. काही जणांच्या बाबतीत असे होते की, त्यांच्यामध्ये असणारी उन्मुखता ही, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या एका विशाल अनंत ‘निरवते’चे, ‘शक्ती’चे, ‘प्रकाशा’चे किंवा ‘आनंदा’चे त्यांच्यासमोर प्रकटीकरण करते. आणि नंतर एकतर त्या व्यक्ती या गोष्टींप्रत आरोहण करतात किंवा मग या गोष्टी त्या व्यक्तींच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये अवरोहण करू लागतात. तर अन्य काही जणांच्या बाबतीत एकतर आधी मस्तकामध्ये अवरोहण होते नंतर हृदयाच्या पातळीवर अवरोहण होते, नंतर नाभी आणि नंतर त्याहून खाली आणि मग संपूर्ण देहाच्या माध्यमातून अवरोहण घडून येते किंवा मग एक प्रकारची अवर्णनीय (inexplicable) उन्मुखता आढळते, तेथे शांती, प्रकाश, व्यापकता किंवा शक्ती यांच्या अवरोहणाची कोणतीही जाणीव नसते. किंवा मग तेथे वैश्विक चेतनेमध्ये क्षितिजसमांतर खुलेपणा आढळून येतो किंवा अकस्मात विशाल झालेल्या मनामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आढळतो. यापैकी जे काही घडते त्याचे स्वागत केले पाहिजे; कारण सर्वांसाठी एकच एक असा निरपवाद नियम नसतो. परंतु सुरुवातीला शांती अवतरित झाली नाही (आणि समजा नीरवता, शक्ती, प्रकाश आणि आनंद यापैकी काहीही जरी अवतरित झाले तरी), व्यक्तीने अत्यानंदाने फुलून न जाण्याची किंवा संतुलन ढळू न देण्याची काळजी घेतली पाहिजे. काहीही असले तरी, ईश्वरी शक्ती, श्रीमाताजींची शक्ती जेव्हा अवतरित होते आणि ताबा घेते तेव्हाच मुख्य प्रक्रिया घडून येते, कारण तेव्हाच चेतनेच्या सुसंघटनेला प्रारंभ होतो आणि योगाला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – १९०

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०६

जेव्हा ‘शांती’ प्रस्थापित होते तेव्हा वरून ती उच्चतर किंवा ‘दिव्य शक्ती’ आपल्यामध्ये अवतरित होऊ शकते आणि आपल्यामध्ये कार्य करू शकते. ही दिव्य शक्ती सहसा प्रथम मस्तकामध्ये अवतरित होते आणि आंतरिक मनाची चक्रं मुक्त करते, नंतर ती शांती हृदय-चक्रामध्ये प्रवेश करते आणि आंतरात्मिक आणि भावनिक अस्तित्व पूर्णपणे मुक्त करते. नंतर ती शांती नाभीचक्रामध्ये आणि अन्य प्राणिक चक्रांमध्ये अवतरित होते आणि आंतरिक प्राणास मुक्त करते. नंतर ती मूलाधार आणि त्याच्याही खाली असणाऱ्या चक्रांमध्ये प्रविष्ट होते आणि आंतरिक शारीरिक अस्तित्व मुक्त करते.

ती दिव्य शक्ती एकाचवेळी मुक्तीसाठी आणि पूर्णत्वासाठी कार्य करत असते. ती संपूर्ण प्रकृतीचा एकेक भाग हाती घेते आणि त्यावर कार्य करते, जे निर्माण करणे आवश्यक आहे ते ती निर्माण करते. ज्याचे उदात्तीकरण करणे आवश्यक आहे त्याचे ती उदात्तीकरण करते. आणि नकार देण्यायोग्य जे काही आहे त्यास ती नकार देते. ती प्रकृतीमध्ये एकसूत्रता आणि सामंजस्य निर्माण करते आणि प्रकृतीमध्ये एक नवीन लय प्रस्थापित करते. ‘अतिमानसिक’ शक्ती आणि अस्तित्व अवतरित करून घेणे हे जर साधनेचे ध्येय असेल तर, ते ध्येय साध्य करणे जोपर्यंत शक्य होत नाही तोपर्यंत, ती अधिकाधिक उच्च, उच्चतर शक्ती आणि उच्चतर प्रकृतीची श्रेणीसुद्धा अवतरित करू शकते.

या गोष्टी हृदय-चक्रामध्ये असलेल्या चैत्य पुरुषाच्या (psychic being) कार्याद्वारे तयार केल्या जातात, त्या कार्याद्वारे या गोष्टींना साहाय्य पुरविले जाते आणि त्याच्या कार्याद्वारेच त्या प्रगत होत जातात. चैत्य पुरुष जेवढा अधिक खुला असेल, अग्रभागी आलेला असेल, सक्रिय असेल तेवढेच या ‘शक्ती’चे कार्य अधिक त्वरेने, अधिक सुरक्षित आणि अधिक सुलभ होऊ शकते. हृदयामध्ये जसजसे प्रेम व भक्ती आणि समर्पण वृद्धिंगत होत जाते, तसतसे साधनेचे विकसन अधिक वेगवान आणि परिपूर्ण होत जाते. कारण ज्या वेळी अवतरण आणि रूपांतरण घडून येते तेव्हा त्यामध्ये ‘ईश्वरा’शी चढतावाढता संपर्क होणे आणि ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे हे अध्याहृतच असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)