साधना, योग आणि रूपांतरण – ३६

श्रीमाताजी : आपल्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवावी आणि सरतेशेवटी त्याच्याशी आपल्याला तादात्म्य पावता यावे यासाठी, आजवर वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती या मनोवैज्ञानिक असतात, काही धार्मिक तर काही अगदी यांत्रिकसुद्धा असतात. वास्तविक, प्रत्येक व्यक्तीने तिला सुयोग्य ठरेल अशी पद्धत स्वतः शोधली पाहिजे. आणि जर व्यक्तीकडे अतिशय उत्कट आणि दृढ अभीप्सा असेल, सातत्यपूर्ण आणि गतिमान संकल्प असेल तर, तिला या ना त्या मार्गाने ती पद्धत निश्चितपणे सापडते. बाह्यतः वाचन व अभ्यास, आणि आंतरिकरित्या एकाग्रता, ध्यान, प्रकटीकरण व अनुभूती यांच्या माध्यमातून व्यक्तीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे साहाय्य मिळतेच.

साधक : यांत्रिक, धार्मिक आणि मनोवैज्ञानिक पद्धतींमध्ये काय फरक असतो?

श्रीमाताजी : विविध धर्मांनी ज्या पद्धतींचा स्वीकार केलेला असतो त्या पद्धती म्हणजे धार्मिक पद्धती. बहुतांशी धर्म आंतरिक सत्याविषयी काही बोलत नाहीत, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे हीच एक गोष्ट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

ज्या पद्धतींमध्ये चेतनेच्या विविध स्तरांशी संबंध असतो, सर्व क्रियाकलापांमधून बाजूला होत ज्या पद्धतीमध्ये अंतरंगातील आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न केला जातो; अलिप्तता, आत्म-तन्मयता (self-abstraction), एकाग्रता, उच्चतर सद्वस्तु, सर्व बाह्य गतिविधींचा परित्याग इत्यादी गोष्टींचा समावेश असलेली आंतरिक अवस्था जाणीवपूर्वकपणे तयार करण्याचा प्रयत्न केला जातो त्या पद्धतींची गणना मनोवैज्ञानिक पद्धतीमध्ये केली जाते. विचार, भावना आणि कृती यांच्यावर कार्य करणारी पद्धत ही मनोवैज्ञानिक पद्धत असते.

पूर्णपणे यांत्रिक साधनांवर आधारित असणाऱ्या पद्धती या यांत्रिक पद्धती असतात. त्यांचा विशिष्ट प्रकारे अवलंब केला तर व्यक्तीला त्यापासून लाभ होऊ शकतो. श्वासावरील नियंत्रणाची पद्धत हे उदाहरण पाहा. ही पद्धत कमीअधिक यांत्रिकपणे कार्य करते. परंतु विवेकानंदांनी त्यांच्या शिकवणुकीत सांगितल्याप्रमाणे, या पद्धतीच्या जोडीला कधीकधी व्यक्तीने विचारांची एकाग्रता करावी किंवा एखाद्या शब्दाचा जप करावा, असे सुचविण्यात येते. काही एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तिचा उपयोग होतो पण नंतर ती पद्धत निष्प्रभ होते.

हे मानवी प्रयत्न विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी कमीअधिक प्रमाणात व्यक्तिगत स्तरावर यशस्वी झालेले आढळतात पण आजवर त्याचा कधीही सामुदायिक परिणाम साध्य झालेला नाही.

तुमच्या कृतींच्या माध्यमातून, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याखेरीज तुमच्यामधील अन्य काहीही अभिव्यक्त होणार नाही, अशा एका आंतरिक संकल्पाच्या स्थितीमध्ये राहायचे आणि सर्वकाही त्या ‘सत्या’वरच अवलंबून राहील असे करायचे; ही मनोवैज्ञानिक पद्धत अधिक कठीण पण कितीतरी अधिक परिणामकारक असते. अर्थात तुम्ही काहीच करत नसाल तर ही पद्धत सोपी आहे पण या पद्धतीमुळे स्वतःचीच फसवणूक करून घेणे देखील अधिक सोपे असते.

जेव्हा तुम्ही सर्वांपासून दूर होऊन एकटे, पूर्णपणे शांत वातावरणात ध्यानाला बसता, आणि कमीअधिक सौम्य दृष्टीने स्वतःची परीक्षा करता तेव्हा तुम्ही अशी कल्पना करू लागता की, तुम्हाला कोणत्यातरी एखाद्या अद्भुत गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात हरघडी परीक्षेला सामोरे जावे लागते, तुमच्यातील अपूर्णता, तुमच्यातील दुर्बलता, दिवसभरातून शंभरवेळा तुमच्या मनात उद्भवणाऱ्या दुरिच्छायुक्त क्षुद्र गतिविधी यांविषयी जागरुक होण्याची संधी तुम्हाला वारंवार मिळते तेव्हा मग तुमचा स्वतःविषयीचा भ्रम मावळतो आणि परिणामतः तुमचे प्रयत्न अधिक प्रामाणिक होतात.

आणि म्हणूनच आपण एखाद्या अत्यंत मनोहारी, अतिशय आरामदायी, या जगापासून खूप दूर, फक्त स्वतःच्या छोट्याशा व्यक्तित्वाकडे लक्ष देता येईल अशा निर्जन अरण्यात आश्रम काढण्याऐवजी उलट, या जीवनातील सर्व कृती हाती घ्यायच्या आणि त्यांना होता होईल तेवढे सचेत बनवायचे आणि आपले इतर माणसांशी जे संबंध असतील त्या संबंधामध्ये असतानासुद्धा आपल्या सर्व आंतरिक गतिविधींविषयी अधिक सुस्पष्टपणे जागरुक राहायचे; हे प्रयत्न आपण येथे (श्रीअरविंद आश्रमात) करत आहोत. अडीअडचणींपासून दूर पळून जाणे हा त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग कधीच होऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या शत्रूला पाठ दाखवून पळ काढलात तर तुम्ही त्याला पराजित करू शकणार नाही आणि मग तुम्हाला पराजित करण्याची आयती संधीच तुम्ही त्या शत्रूला द्याल. आणि म्हणूनच आपण हिमालयातील कोणत्या गिरीशिखरावर नाही तर येथे पाँडिचेरीमध्ये आहोत. अर्थात हिमालयातील एखादे गिरीशिखर हे अगदी आनंददायी असेल हे मला मान्य आहे, पण कदाचित ते पाँडिचेरीएवढे परिणामकारक नसेल.

– श्रीमाताजी (CWM 15 : 303-305)

साधना, योग आणि रूपांतरण – ३५

ध्यानाच्या वेळी तुम्ही तुमचे लक्ष (शरीरांतर्गत) कोणत्या भागावर केंद्रित केले आहे यावर ध्यानाचे स्वरूप अवलंबून असते.

मानसिक केंद्रं
व्यक्तीच्या प्रत्येक स्तराशी संबंधित अशी केंद्रं शरीरामध्ये असतात. (शरीरामध्ये म्हणण्यापेक्षा सूक्ष्म शरीरामध्ये असतात, असे म्हणणे अधिक योग्य होईल. अर्थात ती केंद्रं सूक्ष्म शरीरात असली तरी ती स्थूल शारीरिक देहामधील संबंधित भागांशी जोडलेली असतात.) मस्तकाच्या शिखरावर एक केंद्र असते आणि त्याच्याही वर मनाच्या अतीत असणारे किंवा उच्चतर चेतनेचे केंद्र असते. कपाळावर भ्रूमध्यामध्ये जे केंद्र असते ते विचारी, चिंतनशील मनाचे, मानसिक संकल्पाचे आणि मानसिक दर्शनाचे केंद्र असते. कंठामध्ये असणारे केंद्र हे अभिव्यक्ती करणाऱ्या किंवा बाह्याविष्करण करणाऱ्या मनाचे केंद्र असते. ही सर्व केंद्रं मानसिक केंद्रं असतात.

प्राणिक केंद्रं
(मानसिक केंद्रांच्या) खाली प्राणिक केंद्रं असतात. हृदय-केंद्र (भावनिक केंद्र), नाभी-केंद्र (गतिमान प्राण-केंद्र), नाभीखाली उदरामध्ये असणारे केंद्र हे कनिष्ठ किंवा संवेदनात्मक प्राण-केंद्र असते.

शारीरिक केंद्र
सर्वात शेवटी, मणक्याच्या तळाशी मूलाधार किंवा शारीरिक केंद्र असते.

आंतरात्मिक केंद्र
हृदयाच्या पाठीमागे आंतरात्मिक किंवा चैत्य केंद्र (psychic centre) असते. अनेक जण करतात त्याप्रमाणे व्यक्तीने जर मस्तकावर लक्ष एकाग्र केले तर ते मानसिक-आध्यात्मिक ध्यान असते, ज्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते. व्यक्तीने जर हृदयकेंद्रावर लक्ष एकाग्र केले तर ते आंतरात्मिक ध्यान असते. व्यक्ती सहसा जेथे लक्ष केंद्रित करत असते अशी ही दोन स्थानं आहेत. परंतु जे केंद्र प्रथम उन्नत होते किंवा खुले होते ते मानसिक किंवा आंतरात्मिक केंद्रच असेल असे नाही; ते भावनिक किंवा प्राणिक केंद्रसुद्धा असू शकते. ते व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. कारण व्यक्तीमध्ये खुले होण्यासाठी जे सर्वाधिक सोपे असते ते चक्र प्रथम खुले होण्याची शक्यता असते.

जर प्राणिक केंद्र खुले झाले तर ते ध्यान, चेतनेला प्राणिक स्तर आणि त्याचे अनुभव घेण्यासाठी प्रक्षेपित करण्याची शक्यता असते. परंतु तेथून व्यक्ती त्या प्राणिक अनुभवांमध्ये गुंतून न पडता, स्वतःला त्यापासून वेगळे करून, त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहू शकली – म्हणजे जणू काही ती व्यक्ती स्वतः आतमध्ये खोलवर स्थित आहे आणि तेथून स्वतःच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत आहे या पद्धतीने जर ती त्या अनुभवांकडे पाहू लागली – आणि अशा रीतीने जर ती अधिकाधिक आत वळत गेली, तर ती व्यक्ती अंतरात्म्याप्रत जाऊन पोहोचण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे, विचारांवर लक्ष एकाग्र केल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित असे अनुभव घेतल्यामुळे, व्यक्तीला मानसिक अनुभव येऊ शकतात. उदा. ‘सर्वकाही ब्रह्मच आहे’, असा विचार व्यक्ती करू शकते किंवा व्यक्ती स्वतःला विचारापासून मागे ओढून घेऊ शकते आणि बाहेरील वस्तुंकडे पाहावे त्याप्रमाणे ती स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करू शकते. आणि सरतेशेवटी व्यक्तीचा शांतीमध्ये आणि निखळ आध्यात्मिक अनुभवामध्ये प्रवेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 306-307)

साधना, योग आणि रूपांतरण – ३४

हृदयकेंद्रावर एकाग्रता केल्यामुळे अंतरात्मा खुला होतो; ती एकाग्रता करणे ही तुमची मुख्य आवश्यकता आहे.

एकाग्रता केल्यामुळे, तुम्हाला जर इतर गतिविधींचे स्वरूप समजत असेल आणि तुम्ही स्पष्टपणे त्या गतिविधींची योग्यायोग्यता ठरवू शकत असाल, म्हणजे तशी जाणीव, तसा सद्सद्विवेक तुमच्यामध्ये जागृत झाला असेल तर, तुमचा अंतरात्मा अगोदरच कार्यरत झाला आहे (असे समजावे.) कारण ज्या जाणिवेमुळे, येणाऱ्या सर्व गतिविधींबाबत एक सुस्पष्ट अंतर्दृष्टी प्राप्त होते आणि ज्या जाणिवेमुळे त्याज्य गोष्टींना नकार देणे आणि योग्य दृष्टिकोन व धारणा बाळगणे सोपे जाते अशी जाणीव ही आंतरात्मिक किंवा चैत्य जाणीव असते.

(ध्यानामध्ये) श्रीमाताजींची प्रतिमा दिसते किंवा नाही हे तितकेसे महत्त्वाचे नाही. त्या साकार रूपात दिसोत किंवा न दिसोत, मात्र सदासर्वदा त्यांच्या उपस्थितीची जाणीव होणे महत्त्वाचे असते आणि आंतरात्मिक खुलेपणातून (psychic opening ) हे नक्कीच घडून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 310)

साधना, योग आणि रूपांतरण – ३३

व्यक्तीला हृदय-केंद्रावर किंवा मस्तकाच्या वर असणाऱ्या केंद्रावर लक्ष केंद्रित करून, खुले किंवा उन्मुख व्हावे लागते.

हृदय-केंद्रावर लक्ष केंद्रित केले असता व्यक्ती ‘अंतरात्म्या’प्रत खुली होते आणि मस्तकाच्या वर असणाऱ्या केंद्रावर लक्ष केंद्रित केले असता ती उच्चतर ‘सत्या’प्रत खुली होते.

परंतु आंतरात्मिक पूर्वतयारी झाल्याशिवाय किंवा व्यक्तीचे संपूर्ण शुद्धीकरण झाल्याखेरीज ‘उच्चतर सत्याप्रत खुले होणे’ सुरक्षित नसते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 310)

साधना, योग आणि रूपांतरण – ३२

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या सर्वांप्रत आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे या दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. हृदय हे चैत्य पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर सिद्धीचे मुख्य साधन असते.

पहिली उन्मुखता
‘ईश्वरा’ने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून आणि त्याने चैत्य पुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो त्या मार्गात अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे हे देखील आवश्यक असते.

दुसरी उन्मुखता
चेतनेची एकाग्रता आधी मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर केल्याने तसेच ईश्वरी ‘शांती’, (आधी केवळ शांती, किंवा शांती व सामर्थ्य एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे जिवामध्ये अवतरण घडून यावे म्हणून त्यांना आवाहन केल्याने आणि त्याविषयी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. काही जणांना प्रथम ‘प्रकाशा’चा तर काही जणांना प्रथम ‘आनंदा’चा किंवा काही जणांना अचानकपणे होणाऱ्या ‘ज्ञानवर्षावा’चा अनुभव येतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – ३१

साधक : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जोपर्यंत तुमची चेतना उन्नत होत नाही तोपर्यंत पूर्णयोगामध्ये एकाग्रतेचे मुख्य केंद्र हे हृदय-केंद्रच असले पाहिजे.” परंतु प्रत्येकाची चेतना ही वेगवेगळ्या स्तरावर असते ना?

श्रीमाताजी : हो, ती व्यक्तिगणिक भिन्नभिन्न स्तरावर असते. मात्र असे नेहमीच सांगितले जाते की, “येथे हृदय-केंद्रावर, छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र करा. कारण याच ठिकाणी सर्वाधिक सहजतेने तुम्हाला अंतरात्म्याचा किंवा चैत्य अस्तित्वाचा (psychic) शोध लागू शकतो. येथेच तुम्ही अंतरात्म्याच्या संपर्कात येऊ शकता.” आणि म्हणूनच तसे म्हटले आहे.

साधक : चेतना उन्नत झाली तर व्यक्तीला ती कोठे आढळते ?

श्रीमाताजी : मस्तकाच्या वर, मनाच्या वर. श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, व्यक्ती जोपर्यंत मनाच्या पलीकडे, आणि सर्वस्वी उच्चतर प्रांतांमध्ये गेलेली नसते, तसेच जोपर्यंत ती मानवी चेतनेमध्ये, म्हणजे मानसिक, प्राणिक, शारीरिक चेतनेमध्येच असते तोपर्यंत व्यक्तीने अंतरात्म्याचाच शोध घेण्याच्या दृष्टीने एकाग्रता केली पाहिजे. फक्त जर तुम्ही मानवी चेतनेपासून उन्नत झाला असाल आणि मनाच्या वर असणाऱ्या, खूप वर असणाऱ्या उच्चतर प्रांतांमध्ये जाणीवपूर्वकपणे प्रवेश केला असेल तर तुम्हाला अंतरात्म्यावर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकता नसते; कारण तुम्हाला त्याचा शोध स्वाभाविकपणेच लागेल.

परंतु मानसिक चेतनेच्या वर उन्नत होणे, म्हणजे उच्चतर तार्किक, कल्पनाशील मनामध्ये उन्नत होणे असे नाही तर, सर्व मानसिक गतिविधींच्या अतीत होणे, (आणि) ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्याची सुरुवात करायची झाली तर, मन हे पूर्णपणे शांत, स्थिर असले पाहिजे, अन्यथा व्यक्ती तसे करू शकणार नाही. मन जेव्हा संपूर्ण शांतीमध्ये, परिपूर्ण अचंचलतेमध्ये प्रवेश करते, तसेच जेव्हा मन हे, वर जे काही आहे त्याचे प्रतिबिंब दाखविणारे जणू एक आरसाच बनते; तेव्हा व्यक्ती (मनाच्या वर) उन्नत होऊ शकते. परंतु जोपर्यंत मनाची चंचलता चालू असते तोपर्यंत मनाच्या अतीत जाण्याची अजिबातच आशा नसते.

पण भावभावना आणि अंतरात्मिक गोष्टी यांची तुम्ही गल्लत करता कामा नये. या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना नेहमी असे वाटते की त्यांच्यामध्ये भावभावना जागृत होत आहेत म्हणजे ते आता अंतरात्मिक प्रांतामध्ये प्रवेश करत आहेत. परंतु भावभावनांचा अंतरात्मिक गोष्टींशी काही संबंध नसतो, भावभावना या निव्वळ प्राणिक असतात. तुम्हाला म्हणायचे असेल तर फार फार तर असे म्हणता येईल की, भावभावना हा प्राणशक्तीचा सर्वात सूक्ष्म भाग असतो; पण तरीसुद्धा त्या प्राणिकच असतात. तुम्ही भावभावनांच्या माध्यमातून अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. तर अत्यंत उत्कट अभीप्सेद्वारे आणि ‘स्व’पासून अलिप्त झाल्यावर तुम्ही अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचू शकता.

– श्रीमाताजी (CWM 07 : 248-249)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०

आपले (समग्र) अस्तित्व ‘श्रीमाताजीं’नी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)

*

साधक : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे असते. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा अधिक कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे (हृदय-केंद्रावर) चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही तेथेच प्रथम चैत्य अस्तित्वाच्या (psychic) संपर्कात येता. परंतु जर का तुम्ही मस्तकामध्ये चित्त एकाग्र केलेत तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी (psychic being) एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, मस्तकाकडून हृदयाकडे जावे लागते.

तसेच तुम्ही तुमच्या ऊर्जा एकत्र करून (चित्ताची) एकाग्रता करणार असाल तर, त्या ऊर्जांचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक चांगले; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. मस्तकामधून उदित होणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 389)

साधना, योग आणि रूपांतरण – २९

‘ईश्वरा’विषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सतर्क व जीवित ठेवायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते ती एकाग्रतेची! ईश्वरी ‘संकल्प’ व ईश्वरी ‘प्रयोजन’ यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. इतरत्र दूरवर पसरलेले तुमच्या चेतनेचे सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि (हृदयामध्ये) आत बुडी मारा, आत खोल खोल जा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्रं आहेत. एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते भ्रूमध्यामध्ये! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात. रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व तळमळ, आच आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 01)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)

साधना, योग आणि रूपांतरण – २७

साधक : मानसिक उपासनेचे प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणती साधना करायची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट असते. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय (surface) असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुह्य (hidden) चेतना असते आणि तिच्यामध्ये आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते; आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे रूपांतर घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

खऱ्या चेतनेची या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त आणखी दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये असते. (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला अंतरात्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे (Psychic being) ज्ञान होते. अनावरण (unveiled) झालेला हा चैत्य पुरुष मग अग्रभागी येण्यास सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’ च्या दिशेने, ‘ईश्वरा’ च्या दिशेने वळवू लागतो, आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला आवाहन करतो. त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, ऊर्ध्वस्थित राहून आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आर्जव करतो.

‘ईश्वरा’प्रति स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि आंतरिक उन्मुखतेची व हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. आणि एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने शांत अशा मानसिक चेतनेस ऊर्ध्वाभिमुख करत मनाच्या वर असणाऱ्या सर्व गोष्टींप्रत खुले केले पाहिजे.

कालांतराने (आपली) चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः ती चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘परमानंदा’ च्या संपर्कात येऊ लागते आणि त्यामध्ये प्रवेश करू लागते आणि त्यांच्यासारखीच होऊन जाते. आणि तिला प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास येऊ लागते.

अचंचलतेसाठी आणि ऊर्ध्वस्थित ‘आत्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारासाठी मनामध्ये अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेची एकाग्रता करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये जीवन जगण्यासाठी तेथे चढून जाण्याऐवजी ती फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’ चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; तर काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते. पण हृदयकेंद्रापासून सुरुवात करणे अधिक इष्ट असते. अर्थात, जर व्यक्तीला तसे करणे शक्य असेल तर!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 06-07)