साधना, योग आणि रूपांतरण – ४१
(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)
‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.
असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.
ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.
‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.
– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)