साधना, योग आणि रूपांतरण – १४३

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आपण सध्या ‘साधना’ या मुद्द्याचा विचार करत आहोत. पूर्णयोगांतर्गत साधनेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती या त्रिमार्गाचा समन्वय अपेक्षित असतो. एवढेच नव्हे तर, पारंपरिक त्रिमार्गापेक्षाही अधिकचे असे काही त्यामध्ये समाविष्ट असते. पुन्हा त्यामध्येही म्हणजे, त्रिमार्गाच्या संदर्भातही, पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णयोगांतर्गत ज्ञानमार्ग, पारंपरिक कर्ममार्ग व पूर्णयोगांतर्गत कर्ममार्ग यांमध्ये काहीशी भिन्नता आढळते. ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये, आजवर आपण पूर्णयोगांतर्गत ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांचा विचार केला. आत्तापर्यंत ज्ञान आणि कर्ममार्गाचा आवश्यक तेवढा विचार झाल्यानंतर आपण उद्यापासून ‘भक्तिमार्गा’कडे वळणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये या तिन्ही विचारधारांचा समन्वय एकप्रकारे संत वाङ्मयात झालेला आढळतो. त्यामध्ये भक्तीचा उत्कर्ष झालेला असतो. आणि त्यामुळेच महाराष्ट्राची भूमी संतांच्या अमृत मधुर सिंचनाने, भक्तीच्या ओलाव्याने मार्दवयुक्त झालेली पाहायला मिळते. पूर्णयोगांतर्गत भक्तीसाठी आवश्यक असणारी आधारभूमी महाराष्ट्रामध्ये आपल्या संतमंडळींनी तयार करून ठेवली आहे असे आपल्याला दिसते. आता आवश्यकता आहे ती त्या मार्गावरून वाटचाल करून पुढे जाण्याची!

श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांच्या माध्यमातून आपण भक्ती म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, भक्तिमार्गाची गुणवैशिष्ट्ये कोणती, भक्ताच्या आंतरिक जीवनाचे बारकावे या साऱ्याचा विचार येथून पुढे करणार आहोत. गतकाळाच्या आधारभूमीवर ठामपणे पावले रोवून, पण त्याचे कोणतेही ओझे मनावर न बाळगता, एका स्वच्छ भावनेने आपण या विषयाकडे वळू या आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी या संदर्भात काय सांगतात ते जाणून घेऊ या.

वाचकांना ‘पूर्णयोगांतर्गत भक्ती’ हा भाग समजावून घेण्यामध्ये स्वारस्य वाटेल अशी आशा वाटते.

संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १४२

मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत. मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी उन्नत होत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मनुष्याचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व पावणे हाच ‘पूर्णयोगाचा आधार’ असणे आवश्यक असते.

कर्म ही जीवनातील पहिली शक्ती आहे. प्रकृती ही या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्यं मनुष्यामध्ये सचेत (conscious) होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते. म्हणून मनुष्याने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले, की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि निश्चितपणे दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे; तो आरंभ-बिंदू आहे.

मनुष्यातील संकल्पशक्ती जेव्हा ईश्वरी संकल्पशक्तीशी मेळविली जाते आणि जिवाची समग्र कर्मं एका ‘ईश्वरा’तूनच उदित होऊ लागतात, तसेच ती ‘ईश्वरा’भिमुख झालेली असतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते. परंतु, कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये होते. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून ज्ञानामध्ये परिसमाप्त होते. ‘सर्वं कर्माखिलं ज्ञाने परिसमाप्यते.’

आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये आपण ‘ईश्वरा’शी ऐक्य पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी एकत्व पावतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी आपण एकत्व पावतो. या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम व भक्ती होय. ज्या ‘ईश्वरा’च्या उदरात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, त्या ‘ईश्वरा’शी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते. त्या ‘ईश्वरा’मुळे आपले अस्तित्व आहे, आणि त्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, त्याच्यासाठीच जगायचे असते हे सरतेशेवटी आपल्याला उमगते.

आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून जेव्हा आपण कर्मापासून प्रारंभ करतो तेव्हा, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545)

साधना, योग आणि रूपांतरण – १४१

(कर्मव्यवहार करत असताना, वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. तेव्हा कर्मामधील सुसंवादपूर्ण वातावरणासाठी आणि पर्यायाने कार्यसिद्धीसाठी कधीकधी स्वतःच्या स्वभावालाही मुरड घालावी लागते, त्याला वळण लावावे लागते हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

नेहमीच दोन्हीही बाजूंनी काही ना काही दोष असतात आणि मग त्याचे पर्यवसान हे विसंवादामध्ये होत असते.

तुमच्या बाजूचा विचार करता… इतरांचे अतिशय कठोर मूल्यमापन करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. तुम्ही इतरांचे दोष, उणिवा, त्यांची दुबळी बाजू पाहण्यात जेवढे तत्पर असता, तेवढ्या त्यांच्या चांगल्या बाजू पाहण्याबाबत तत्पर नसता आणि त्यांच्या दोषांवर मात्र जास्त भर देता. तुमची ही प्रवृत्ती कर्मव्यवहार करताना, इतरांबद्दल जो एक सहृदयतेचा दृष्टिकोन असणे आवश्यक असतो तो बाळगण्यापासून तुम्हाला अटकाव करते आणि त्यामुळे तुम्ही कठोर आणि छिद्रान्वेषी दृष्टीचे आहात असे मत तुमच्याविषयी तयार होते. आणि त्यामुळे, तुम्हाला विरोध करण्याची आणि तुमच्या विरोधात बंड करण्याची वृत्ती इतरांमध्ये निर्माण होते. वास्तविक तसे त्यांच्या मनातदेखील नसते पण त्यांच्या अवचेतनेच्या (subconscient) माध्यमातून तशी कृती घडून येते आणि मग सर्व प्रकारची विसंवादी स्पंदनं निर्माण होत राहतात.

इतरांमध्ये काय चांगले आहे त्यावरच नेहमी आपले लक्ष केंद्रित करून, त्याचा (कार्यासाठी) उपयोग करून घ्यायचा आणि त्यांच्या चुका, त्यांचे दोष आणि त्यांच्या उणिवा कौशल्याने हाताळायच्या हा उत्तम मार्ग असतो. यासाठी ठामपणा आणि शिस्तीच्या पालनात कसूर करण्याची गरज नसते. तसेच जेथे आवश्यक आहे तेथे कठोरपणानेही वागता आले पाहिजे. परंतु हा कठोरपणा क्वचितच असला पाहिजे आणि तो तुमचा स्थायी भाव आहे असा इतरांचा समज होता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 279-280)

साधना, योग आणि रूपांतरण – १४०

मी तुम्हाला ही गोष्ट यापूर्वीदेखील सांगितलेली आहे की, कोणतेही काम असो, अभ्यास असो किंवा योगामधील आंतरिक प्रगती असो, या सर्व बाबतीत, तुम्हाला जर परिपूर्णत्व हवे असेल तर त्यासाठी एकच समान गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे, मनाची अविचलता (quietude), ‘दिव्य शक्ती’विषयी जागरुकता, तिच्याप्रति उन्मुखता आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करण्यास दिलेला वाव.

परिपूर्णत्वाचे ध्येय बाळगणे हे योग्य आहे, मात्र (ते प्राप्त व्हावे म्हणून) मन अस्वस्थ राहणे हा काही ते ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग असू शकत नाही. सतत तुमच्या अपूर्णतेचा विचार करत राहणे आणि काय करू, कसे करू हा विचार सतत करत बसणे हा देखील त्याचा मार्ग नाही. अविचल, स्वस्थ राहा, स्वतःला खुले करा, आणि चेतनेच्या विकसनाला वाव द्या, ‘दिव्य शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी तिला आवाहन करा. जसजशी ही प्रक्रिया वाढत राहील आणि ती ‘दिव्य शक्ती’ तुमच्यामध्ये कार्य करू लागेल, तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या अपूर्णतेचीच जाणीव होईल असे नाही तर, त्या अपूर्णतेमधून बाहेर काढणाऱ्या प्रक्रियेची जाणीव देखील तुम्हाला होईल. तसे झाले की मग, तुम्ही फक्त त्या प्रक्रियेचे अनुसरण करायचे आहे. (अर्थात हे सारे एका झटक्यात होईल असे नव्हे, तर हे टप्प्याटप्प्याने घडून येईल.)

तुम्ही जर अति-दीर्घकाळ किंवा अस्वस्थपणे एखादे काम करून, स्वतःला शिणवलेत तर त्यामुळे तुमची मज्जातंतूगत प्रणाली विचलित होते आणि दुर्बल होते. त्याचबरोबर तुमची प्राणिक-शारीरिक प्रणालीसुद्धा दुर्बल होते आणि मग ती स्वतःला चुकीच्या शक्तींच्या कृतीच्या हाती सोपविते. स्थिर-सातत्यपूर्ण प्रगती करायची असेल तर शांतपणे कार्यरत रहाणे हा योग्य मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 143)

साधना, योग आणि रूपांतरण – १३८

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार चालू ठेवा. अस्वस्थपणे, हे नाही तर ते, असे सारखे काहीतरी करत राहणे हा थकवा दूर करण्याचा उपाय नव्हे. जेव्हा शीणल्याची, दमल्याची जाणीव होते तेव्हा अंतरंगामध्ये आणि बाह्यतःसुद्धा अविचल, स्वस्थ (quiet) राहणे गरजेचे असते. (वास्तविक) नेहमीच तुमच्या सभोवार एक प्रकारची शक्ती असते, तिला तुम्ही आवाहन करू शकता आणि ती शक्ती शीण, थकवा यासारख्या गोष्टी पळवून लावू शकते, परंतु ती शक्ती ग्रहण करण्यासाठी, अविचल कसे राहायचे हे तुम्ही शिकले पाहिजे.

*

अतिश्रम करणे चुकीचे असते कारण कालांतराने त्याचे परिणाम दिसून येतात. तुमच्यापाशी जर ऊर्जा असेल तर, ती सर्वच्या सर्व खर्च करता कामा नये. शरीरप्रणालीची कायम स्वरूपाची (permanent) ताकद वाढविण्यासाठी म्हणून त्यातील काही ऊर्जा साठवून ठेवली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 274)

साधना, योग आणि रूपांतरण – १३७

एक संकल्पना अशी आहे की, अगदी सामान्य जीवनामध्ये, व्यक्ती जे जे काही करत असते त्याचे श्रेय तिचा अहंकार घेत असला तरी, (वास्तविक) व्यक्ती ही ‘वैश्विक ऊर्जे’च्या हातातील केवळ एक साधन असते.

योगामध्ये अशी संकल्पना आहे की, योग्य रीतीने (ग्रहणशील, उन्मुख स्थितीत) अक्रिय (passive) राहिल्यामुळे, व्यक्ती स्वतःच्या सीमित ‘स्व’पेक्षा अधिक महान अशा एखाद्या गोष्टीप्रत खुली होते आणि ती अवस्था साध्य करण्यासाठीच प्रयत्न उपयुक्त ठरतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 108)

साधना, योग आणि रूपांतरण – १३६

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमाद्वारे बाह्य जीवनव्यवहारामध्ये कार्य करता यावे यासाठी तुमच्यामध्ये खालील तीन गोष्टी असणे आवश्यक असते.

०१) ‘अविचलता, समता’ – म्हणजे घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त व दृढ ठेवणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टिकोनातून पाहूनसुद्धा स्वतः समचित्त राहणे.

०२) ‘निरतिशय श्रद्धा’ – म्हणजे जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल अशी श्रद्धा बाळगणे, पण त्याचबरोबर, व्यक्ती जर स्वतःला (ईश्वराचे) खरेखुरे साधन बनवू शकली तर, ‘कर्तव्यम् कर्म’ हे त्याचे आपल्याला मिळालेले फळ असेल अशी श्रद्धा त्या व्यक्तीने बाळगणे. ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या त्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म केले पाहिजे असे जाणवते ते कर्म म्हणजे ‘कर्तव्यम् कर्म.’

०३) ‘ग्रहणशीलता’ – ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची आणि त्यामध्ये त्या शक्तीची व श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवण्याची ताकद व्यक्तीमध्ये असणे तसेच, व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला व कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य ‘ईश्वरी शक्ती’ला करू देणे म्हणजे ग्रहणशीलता.

व्यक्तीला जर या ‘शक्ती’ची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबत असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची भेसळ होऊ देता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266)

साधना, योग आणि रूपांतरण – १३५

एखादी कृती योग्य आहे की अयोग्य याविषयी तुम्ही सजग होऊ इच्छित असाल आणि तशी आस बाळगत असाल तर, ती गोष्ट खालील मार्गांपैकी कोणत्या तरी एका मार्गाने घडून येते –

१) तुमच्या हालचालींकडे साक्षित्वाने पाहण्याची एक क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते किंवा तशी सवय तुम्हाला लागते, ज्यामुळे तुम्ही, तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणाऱ्या आवेगाकडे आणि त्याच्या स्वरूपाकडेसुद्धा पाहू शकता.

२) तुमच्यामध्ये एखादा चुकीचा विचार किंवा तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणारा एखादा चुकीचा आवेग किंवा भावना निर्माण झाली की, लगेचच, जिला बेचैनी, अस्वस्थता जाणवते अशा प्रकारची एक चेतना तुमच्यामध्ये उदयास येऊ शकते.

३) जेव्हा तुम्ही एखादी चुकीची कृती करण्यास उद्युक्त होणार असता तेव्हा, तत्क्षणी तुमच्या अंतरंगातील कोणीतरी तुम्हाला सावध करते आणि ती कृती करण्यापासून तुम्हाला परावृत्त करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 260-261)

साधना, योग आणि रूपांतरण – १३४

(कर्म करत असताना कधी एकदम उल्हसित, उत्साही वाटते तर कधी शांत वाटते, हे असे का होत असावे असे एका साधकाने विचारले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

कर्म करत असताना, तुमच्या ज्या मनोवस्था असतात त्या दोन मनोवस्थांच्या (moods) परिणामांमध्ये फरक दिसून येतो; याचे कारण असे की, पहिली मनोवस्था ही प्राणिक हर्षोल्हासाची (vital joy) आहे, तर दुसरी मनोवस्था ही आंतरात्मिक शांतीची (psychic quiet) आहे. प्राणिक हर्षोल्हास हा सामान्य मानवी जीवनात जरी अतिशय साहाय्यकारी असला तरी तो काहीसा उत्तेजित, अधीर असतो आणि अस्थिर पायावर उभा असल्यामुळे चंचल असतो. आणि म्हणूनच तो लवकर थकून जातो आणि पुढे टिकून राहू शकत नाही.

प्राणिक हर्षोल्हासाची जागा निश्चल, स्थिर अशा आंतरात्मिक आनंदाने घेतली गेली पाहिजे आणि त्याचवेळी मन व प्राण हे अतिशय निर्मळ आणि अत्यंत शांतिपूर्ण असले पाहिजेत. जेव्हा व्यक्ती या आधारावर कर्म करते तेव्हा ती, श्रीमाताजींच्या शक्तीच्या संपर्कात येते आणि त्यामुळे सर्वकाही आनंदमय आणि सुकर होते; आणि मग थकवा येत नाही किंवा नैराश्यही येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – १३३

तुम्ही कर्म करत असतानाच फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, त्याचा विचार आधीही करू नका किंवा ते कर्म पूर्ण झाल्यानंतरही करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत फिरू देऊ नका. कारण ते कर्म भूतकाळाचा भाग झालेले असते आणि त्याचा पुनःपुन्हा विचार करणे हा शक्तीचा अपव्यय असतो. जे कर्म करायचे आहे त्यासंबंधी अटकळ बांधण्यामध्ये तुमच्या मनाला उगाच आधीपासूनच शीणवू नका. मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग असतात, या सवयी टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत असते; परंतु शारीर-मनाने त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण असते. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ त्या कर्माच्या वेळी त्याकडे लक्ष पुरवेल. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याची कृती करू द्यायची हे जर तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर तुमचा ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. खरंतर, अतिमानसिक क्रियेने (तुमच्या) शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती करण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 287)