साधना, योग आणि रूपांतरण – ९७

मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणारी शक्ती ही अतिमानसिक ‘शक्ती’ असते. ‘सच्चिदानंद’ चेतना – (विशुद्ध सत्-चित्-आनंद) जी सर्वच गोष्टींना निःपक्षपातीपणे आधार पुरवीत असते ती शक्ती रूपांतरण घडवीत नाही. परंतु ‘सच्चिदानंदा’ची अनुभूती आल्यानंतरच (बऱ्याच नंतरच्या टप्प्यावर) अतिमानसाप्रत आरोहण (ascent) आणि अतिमानसाचे अवरोहण (descent) शक्य होते. त्यासाठी प्रथम तुम्ही मानसिक, प्राणिक आणि शारीरिक रचनांच्या सर्वसामान्य मर्यादांपासून मुक्त झाले पाहिजे आणि मग ‘सच्चिदानंद’ शांती, स्थिरता, विशुद्धता आणि व्यापकता यांच्या अनुभूतीमुळे तुम्हाला ही मुक्ती लाभते.

शून्यावस्थेत (blank) निघून जाणे याच्याशी अतिमानसाचा काहीही संबंध नसतो. ‘मन’ आपल्या स्वतःच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जात असताना आणि ते करण्यासाठी नकारात्मक व अचंचलतेचा मार्ग अनुसरत असताना, ते महाशून्यापर्यंत जाऊन पोहोचते. ‘मन’ हे अज्ञानी असल्यामुळे, परम’सत्या’मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला स्वतःचा निरास करावा लागतो, अथवा किमानपक्षी, तसे त्याला वाटते. मात्र अतिमानस हेच ‘सत्य-चेतना’ आणि ‘दिव्य-ज्ञान’ असल्यामुळे, परम ‘सत्या’मध्ये प्रवेश करण्यासाठी अतिमानसाला स्वतःचा निरास करावा लागत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 136)

साधना, योग आणि रूपांतरण – ९६

‘ईश्वरा’चा वैयक्तिक साक्षात्कार हा कधी ‘साकार’ असू शकतो तर कधी तो ‘निराकार’ असू शकतो. ‘निराकार’ साक्षात्कारात, चैतन्यमय ‘दिव्य पुरुषा’ ची ‘उपस्थिती’ सर्वत्र अनुभवास येते. तर ‘साकार’ साक्षात्कारामध्ये, उपासना ज्याला समर्पित केली जाते ‘त्या’च्या प्रतिमेनिशी तो साक्षात्कार होत असतो. भक्तासाठी किंवा साधकासाठी ‘ईश्वर’ नेहमीच स्वतःला सगुणसाकार रूपात आविष्कृत करू शकतो. तुम्ही ज्या रूपामध्ये त्याची उपासना करता किंवा ज्या रूपामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करता त्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडते किंवा तुमच्या आराधनेचे उद्दिष्ट असलेल्या ‘दिव्य व्यक्तिमत्त्वा’ला सुयोग्य असणाऱ्या अशा एखाद्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडू शकते.

‘ईश्वर’ कसा आविष्कृत होईल हे अनेकविध गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यामध्ये इतकी विविधता असल्यामुळे कोणत्याही एकाच नियमामध्ये ते बसविता येत नाही. कधीकधी हृदयामध्ये तर कधी अन्य एखाद्या चक्रामध्ये साकार रूपातील ईश्वराचे दर्शन होऊ शकते, कधीकधी ईश्वर वर राहून तेथून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, अशा प्रकारे दर्शन घडू शकते. तर कधीकधी ‘ईश्वरा’चे दर्शन बाहेरच्या बाजूस, म्हणजे तुमच्या समोर जणू एखादी देहधारी व्यक्ती असावी तशा रूपात घडू शकते.

त्याचा फायदा असा की त्यामुळे तुमचा त्याच्याशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो आणि तुम्हाला त्याचे नित्य मार्गदर्शन लाभू शकते. किंवा तुम्हाला जर अंतरंगामध्ये त्याचे दर्शन झाले किंवा त्याचा अनुभव आला तर, तुम्हाला त्याच्या नित्य ‘उपस्थिती’चा अगदी सशक्त आणि सघन साक्षात्कार होतो. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या आराधनेच्या आणि उपासनेच्या विशुद्धतेची पक्की खात्री असली पाहिजे. कारण देहधारी नातेसंबंधाच्या प्रकाराचा एक तोटाही असतो. तो असा की, इतर ‘शक्ती’ त्या रूपाचे सोंग घेऊ शकतात आणि त्याच्या आवाजाची, त्याच्या मार्गदर्शनाची नक्कल करू शकतात आणि जर त्याला रचलेल्या प्रतिमेची जोड दिली गेली (की जी खरी नसते,) तर त्याला अधिकच बळ मिळते. अनेक जणांची यामुळे दिशाभूल झालेली आहे. असे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये अभिमान, प्रौढी आणि इच्छावासना प्रबळ होती. त्यामुळे त्यांच्यापासून अतिशय सूक्ष्म असा आंतरात्मिक अनुभव हिरावून घेण्यात आला, तो अनुभव मनोमय नव्हता. अशा वेळी एका क्षणात (तुम्हाला दिसलेल्या) श्रीमाताजींच्या प्रकाशाला या दिशाभूलीचे किंवा त्रुटींचे वळण लागू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 135-136)

साधना, योग आणि रूपांतरण – ९५

पूर्वीच्या प्रचलित योगमार्गांद्वारे जे आत्मशोध घेण्यासाठी प्रयत्नरत असतात ते स्वतःला मन, प्राण आणि शरीर यांपासून वेगळे करतात आणि त्या गोष्टींपासून वेगळे राहून, आत्म्याचा साक्षात्कार करून घेतात. मन, प्राण आणि शरीर यांना परस्परांपासून अलग करणे हे अगदीच सोपे असते, त्यासाठी अतिमानसाची गरज नाही. ते सर्वसाधारण योगमार्गांद्वारे केले गेले आहे. म्हणजे ते योग अक्षम आहेत किंवा या गोष्टी ते करू शकत नाहीत, असे नाही. ते या गोष्टी अतिशय परिपूर्ण रितीने करू शकतात. पण पूर्वीचे योगमार्ग आणि पूर्णयोग यामध्ये हा फरक आहे की, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर पूर्वीचे योगमार्ग निर्वाण-स्थितीकडे किंवा कोणत्यातरी स्वर्गाकडे जातात आणि जीवनाचा त्याग करतात, परंतु पूर्णयोग मात्र जीवनाचा त्याग करत नाही.

आत्म्याप्रत पोहोचण्यासाठी अतिमानसाची आवश्यकता नसते, तर या पार्थिव अस्तित्वाचे आणि जीवनाचे रूपांतरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. व्यक्तीने प्रथम आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे. तेव्हाच तिला अतिमानसाचा साक्षात्कार होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 305)

साधना, योग आणि रूपांतरण – ९४

अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी जाणीवपूर्वक, सचेत रितीने एकत्व पावणे आणि प्रकृतीचे रूपांतरण करणे हे पूर्णयोगाचे ध्येय आहे.

सर्वसाधारण योगमार्ग ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या अलक्षण (featureless) स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याच्या माध्यमातून ऊर्ध्वमुख होत, ते ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात.

मनाच्या अतीत होणे आणि ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये, म्हणजे जे केवळ अचल, निर्गुण (static) नाही, तर जे गतिशील, सगुणदेखील (dynamic) आहे अशा सत्यामध्ये प्रविष्ट होणे आणि त्या ‘सत्या’मध्ये स्वतःचे समग्र अस्तित्व उन्नत करणे, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 412)

साधना, योग आणि रूपांतरण – ९३

“व्यक्तीने नेहमी तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे.”

म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, तुम्हाला आलेल्या अनुभवाचे स्वरूप कोणतेही असले, त्याचे सामर्थ्य किंवा त्याची अद्भुतता कितीही असली तरी, त्या अनुभवाचा तुमच्यावर वरचष्मा असता कामा नये. म्हणजे त्यामुळे तुमचा तोल ढळता कामा नये आणि तुमच्या योग्य आणि स्थिरशांत दृष्टिकोनाबरोबर असलेला तुमचा संपर्कही ढळता कामा नये. म्हणजे, त्याने तुमच्या समग्र अस्तित्वाचे नियंत्रण करता कामा नये. इतके तुम्ही त्याच्या आधीन होता कामा नये.

म्हणजे असे की, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक बलवान असलेल्या एखाद्या शक्तीच्या किंवा चेतनेच्या संपर्कात येता तेव्हा, या चेतनेचे किंवा त्या शक्तीचे तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व चालवू देण्याऐवजी, तुम्ही स्वतःला नेहमी याची आठवण करून दिली पाहिजे की, शेकडो-हजारो अनुभवांमधील हा केवळ एक अनुभव आहे आणि परिणामी, त्याचे स्वरूप परिपूर्ण नाही, तर ते सापेक्ष आहे. (त्यामुळे) आलेला अनुभव कितीही सुंदर असला तरी, तुम्हाला त्याहूनही सुंदर असे अनुभव येऊ शकतात आणि आलेही पाहिजेत. तो अनुभव कितीही अपवादात्मक असेना का, त्याहूनही अधिक उत्कृष्ट अनुभव असतात. तुम्हाला आलेला तो अनुभव कितीही उच्च असेना का, तुम्ही भविष्यामध्ये नेहमीच त्याहून अधिक उच्चतर अनुभवाप्रत पोहोचू शकता. आणि अशा प्रकारे, त्याचा अहंकार होऊ न देता, तो अनुभव म्हणजे विकसनाच्या साखळीतील एक अनुभव आहे, या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि एक निरामय शारीरिक संतुलन कायम ठेवू शकता. आणि त्यामुळे सामान्य जीवनाबरोबर असलेली सापेक्षतेची जाणीवही तुम्ही गमावत नाही. तुम्ही अशा प्रकारे वागलात, तर मग कोणताही धोका असत नाही. हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत असते त्याला तसे करणे नेहमीच अगदी सोपे वाटते, परंतु हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत नसते त्याला ते काहीसे अवघड वाटू शकते. हे करण्याचा एक मार्ग आहे.

ईश्वरी कृपा म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. त्या कृपेप्रति संपूर्ण आत्मदान ही जी संकल्पना आहे ती कधीही विस्मरणात जाता कामा नये. तुम्ही जेव्हा स्वतःला ईश्वराप्रति देऊ करता, तुम्ही जेव्हा समर्पित होता; सर्वातीत, सर्व निर्मितीच्या अतीत असणाऱ्या त्या ईश्वराच्या हाती जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे सोपविता, आणि त्या अनुभवापासून काही वैयक्तिक लाभ मिळवू पाहण्याऐवजी, तुम्ही ईश्वरी कृपेला तो अनुभव अर्पण करता आणि तो अनुभव हा ईश्वराकडून आलेला आहे आणि त्याचे फल तुम्ही त्यालाच परत केले पाहिजे हे जाणता तेव्हा, तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित असता.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कोणतीही महत्त्वाकांक्षा नको, प्रौढी नको, किंवा अभिमानदेखील नको. तुमच्यापाशी प्रामाणिक आत्मदान, प्रामाणिक विनम्रता असेल तर तुम्ही सर्व संकटांपासून सुरक्षित असता. “व्यक्तीने तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे” असे मी जेव्हा म्हणते तेव्हा मला हा अर्थ अभिप्रेत असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 277-278)

साधना, योग आणि रूपांतरण – ९२

साधक : समाधी-अवस्था ही प्रगतीची खूण आहे का?

श्रीमाताजी : ही अतिशय उच्च अवस्था आहे असे प्राचीन काळी मानले जात असे. एवढेच नव्हे तर, ती महान साक्षात्काराची खूण आहे, असे समजले जात असे. आणि त्यामुळे जे कोणी योगसाधना करू इच्छित असत ते नेहमीच या अवस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असत. या अवस्थेसंबंधी आजवर सर्व तऱ्हेच्या अद्भुत गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ज्याला जे वाटेल ते त्याने सांगावे असा काहीसा प्रकार याबाबतीत आढळतो कारण समाधीतून बाहेर आल्यावर व्यक्तीला काहीच आठवत नसते. जे जे कोणी या अवस्थेमध्ये प्रविष्ट झाले होते त्यांच्याबाबतीत त्या अवस्थेमध्ये नेमके काय घडले होते हे काही ते सांगू शकत नसत. आणि त्यामुळे व्यक्तीला जे वाटते ते ती सांगू शकते.

मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, सर्व तथाकथित आध्यात्मिक साहित्यामध्ये या समाधी अवस्थेसंबंधी अनेक अद्भुत गोष्टी सांगितलेल्या असायच्या आणि त्या नेहमीच माझ्या वाचनात यायच्या आणि मला तर तशा प्रकारचा अनुभव कधीच आलेला नव्हता. आणि त्यामुळे ही काही कमतरता आहे की काय असे मला वाटायचे.

आणि मी जेव्हा येथे (पाँडिचेरीला) आले, तेव्हा श्रीअरविंदांना मी ज्या शंका विचारल्या होत्या त्यातील ही एक शंका होती. मी त्यांना विचारले होते, “ज्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर (त्या स्थितीतून परत आल्यावर) व्यक्तीला कशाचेच स्मरण राहत नाही अशा अवस्थेबद्दल तुमचे काय मत आहे? म्हणजे व्यक्ती आनंदमय वाटेल अशा एका स्थितीमध्ये प्रवेश करते परंतु जेव्हा ती त्या स्थितीमधून बाहेर येते तेव्हा तिथे काय घडले ते तिला काहीच माहीत नसते.’’

मी काय म्हणू इच्छित आहे, हे त्यांनी जाणले आणि मग ते म्हणाले, “ही चेतनाविहीनता (unconsciousness) आहे.”

मी (आश्चर्याने) विचारले, “काय?” आणि म्हणाले, “अधिक खुलासेवार सांगाल का?”

ते मला सांगू लागले की, “जेव्हा व्यक्ती स्वतःच्या सचेत अस्तित्वाच्या बाहेर जाते तेव्हा, ज्याला ‘समाधी’ असे म्हटले जाते त्या समाधी अवस्थेमध्ये ती प्रवेश करते आणि तेव्हा व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या पूर्णतः चेतनाविहीन असलेल्या एका भागामध्ये प्रवेश करते. किंवा अशा एका प्रांतामध्ये ती प्रवेश करते की तेथील चेतनेशी संबंधित असणारी चेतना तिच्यापाशी नसते. म्हणजे तिच्या चेतनेचे जे क्षेत्र असते त्या क्षेत्राच्या ती पलीकडे जाते आणि जेथे ती सचेत राहू शकत नाही अशा एका प्रांतात प्रवेश करते. तेव्हा ती व्यक्ती अवैयक्तिक (impersonal) स्थितीमध्ये असते, म्हणजे ती व्यक्ती चेतनाविहीन अशा एका अवस्थेत जाते आणि म्हणूनच, साहजिकपणे, तिला तेथील काहीच आठवत नाही, कारण तेव्हा ती कशाविषयीही सचेत नसते.”

हे ऐकल्यावर मी काहीशी आश्वस्त (reassured) झाले आणि त्यांना म्हणाले, “परंतु हा असा अनुभव मला कधीच आलेला नाही.”

ते म्हणाले, “मलाही असा अनुभव कधी आलेला नाही!”

आणि तेव्हापासून, लोकं जेव्हा मला समाधीविषयी विचारतात तेव्हा मी त्यांना सांगते की, “तुम्ही तुमचे आंतरिक व्यक्तित्व विकसित करा म्हणजे मग तुम्ही याच प्रांतांमध्ये पूर्ण जाणिवपूर्वकपणे, सचेत रीतीने प्रवेश करू शकाल. आणि उच्चतर प्रांतांशी सायुज्य झाल्याचा आनंद तुम्हाला अनुभवास येईल आणि तेव्हा तुमची चेतनाही तुम्ही गमावलेली नसेल तसेच अनुभूतीऐवजी हाती शून्य घेऊन तुम्ही परतलेले नसाल.” समाधी ही प्रगतीची खूण आहे का, असे विचारणाऱ्या व्यक्तीस माझे हे उत्तर आहे.

समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट न होतादेखील, व्यक्ती जेथे चेतनाविहीनता नावाला सुद्धा शिल्लक नसते, अशा प्रांतात जाऊ शकते तेव्हा ती प्रगतीची खूण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 274-275)

साधना, योग आणि रूपांतरण – ९१

(अनुभव आणि साक्षात्कार या दोन्हीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा असे दिसते तेव्हा श्रीअरविंद यांनी त्यास दिलेले हे उत्तर…)

योगमार्गामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे अनुभव, अनुभूती (experiences) आणि साक्षात्कार (realizations) हे दोन प्रकार असतात. ‘ईश्वरा’चे मूलभूत सत्य, ‘उच्चतर’ किंवा ‘दिव्य प्रकृती’, जगत-चेतना आणि तिच्या विविध शक्तींची लीला, स्वतःचा आत्मा व खरी प्रकृती आणि वस्तुमात्रांची आंतरिक प्रकृती या गोष्टी चेतनेमध्ये ग्रहण करणे आणि त्यांची तेथे प्रस्थापना करणे म्हणजे साक्षात्कार! जोपर्यंत या सर्व गोष्टी तुमच्या आंतरिक जीवनाचा आणि अस्तित्वाचा एक भाग बनत नाहीत तोपर्यंत या सर्व गोष्टींची शक्ती तुमच्यामध्ये वृद्धिंगत होत राहते. उदाहरणार्थ, ‘ईश्वरी उपस्थिती’चा साक्षात्कार, उच्चतर ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘आनंद’ यांचे चेतनेमध्ये अवरोहण (descent) आणि अधिवसन (settling), त्यांचे चेतनेमध्ये चालणारे कार्य, ईश्वरी किंवा आध्यात्मिक प्रेमाचा साक्षात्कार, स्वतःच्या चैत्य पुरुषाचे होणारे प्रत्यक्षबोधन (perception), स्वतःच्या खऱ्या मनोमय पुरुषाचा, खऱ्या प्राणमय पुरुषाचा, खऱ्या अन्नमय पुरुषाचा शोध, अधिमानसिक किंवा अतिमानसिक चेतनेचा साक्षात्कार, या सर्व गोष्टींचे आपल्याशी असलेले जे नाते आहे त्याची आपल्या सद्यस्थितीतील गौण प्रकृतीला होणारी सुस्पष्ट जाणीव आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन व्हावे म्हणून त्यावर चाललेले त्यांचे कार्य. (अर्थातच ही यादी अजून कितीही वाढविता येण्यासारखी आहे.)

या गोष्टी जेव्हा वीजेप्रमाणे क्षणभर चमकून जातात, झपाट्याने येतात आणि निघून जातात किंवा अवचित पावसाची सर येऊन जावी तशा येऊन जातात तेव्हा या गोष्टींना बरेचदा ‘अनुभव’ असे संबोधले जाते. जेव्हा या गोष्टी अतिशय सकारात्मक असतात किंवा वारंवार घडतात किंवा सातत्याने घडतात किंवा त्या स्वाभाविक बनलेल्या असतात तेव्हाच त्यांचा ‘पूर्ण साक्षात्कार’ झाला, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 38)

साधना, योग आणि रूपांतरण – ९०

तुम्ही बाह्यवर्ती व्यक्तित्वाबद्दल जे म्हणत आहात ते योग्य आहे. तुमच्या आंतरिक प्रकृतीच्या अंतरंगामध्ये जे आहे तेच तुमच्या बाह्य व्यक्तित्वाद्वारे आविष्कृत झाले पाहिजे आणि (त्यानुसार) त्याच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रकृतीचे अनुभव आले पाहिजेत आणि मग, त्यांच्याद्वारे आंतरिक प्रकृतीची शक्ती वृद्धिंगत होते. आंतरिक प्रकृती बाह्यवर्ती व्यक्तित्वावर पूर्णतः प्रभाव टाकू शकेल आणि त्याचा ताबा घेऊ शकेल, अशी स्थिती येईपर्यंत ती वृद्धिंगत होत राहते. आंतरिक चेतना विकसित न होताच, बाह्यवर्ती चेतनेमध्ये पूर्णतः परिवर्तन घडविणे हे खूपच अवघड असते. आणि म्हणूनच हे आंतरिक अनुभव आंतरिक चेतनेच्या विकसनाची तयारी करत राहतात.

(आपल्यामध्ये) एक आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शारीर-चेतना असते; ती बाह्यवर्ती चेतनेपेक्षा अधिक सहजतेने ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेचे ग्रहण करू शकते तसेच ती स्वतःला चैत्य पुरुषाशी सुसंवादी करू शकते. असे घडून येते तेव्हा बाह्यवर्ती प्रकृती म्हणजे आपण स्वतः नसून, ती पृष्ठभागावरील केवळ एक किनार आहे असे तुम्हाला जाणवू लागते आणि मग बाह्यवर्ती प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतरण करणे अधिक सोपे होते. बाह्यवर्ती प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही त्यामुळे ज्या तथ्याला बाधा येऊ शकत नाही, ते तथ्य असे की, तुम्ही आता अंतरंगामध्ये जागृत झाला आहात, श्रीमाताजींची शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तुम्ही त्यांचे खरे बालक असल्याने, तुम्ही सर्व प्रकारे त्यांचे परिपूर्ण बालक होऊन राहणार आहात हे निश्चित आहे. तुम्ही तुमचे विचार आणि तुमची श्रद्धा समग्रतया श्रीमाताजींवर एकाग्र करा म्हणजे मग तुम्ही साऱ्यातून सुरक्षितपणे पार होऊ शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 211)

साधना, योग आणि रूपांतरण – ८९

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये, स्वतःचे (म्हणजे तुमच्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या विविध घटकांचे) एकीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखुरत (disperse) राहिलात, आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्याप्रत खुली आहे अशा गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही सतत वावरत राहाल. अंतरंगामध्ये जीवन जगायला शिका. नेहमी अंतरंगात राहून कृती करायला आणि श्रीमाताजींशी सतत आंतरिक संपर्क ठेवायला शिका. ही गोष्ट नेहमी आणि पूर्णांशाने करणे सुरुवातीला काहीसे कठीण वाटू शकेल, परंतु तुम्ही जर तसे चिकाटीने करत राहिलात तर ते करता येणे शक्य असते, आणि असे केले तरच, व्यक्तीला योगमार्गात सिद्धी मिळविणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 227)

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)