साधना, योग आणि रूपांतरण – १०७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

…कर्म करत असताना ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे तुमचे कामातील लक्ष विचलित होते, मात्र ज्याला तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही झाली केवळ एक पहिली प्रक्रिया; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘दिव्य उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला होऊ शकली असेल, किंवा श्रीमाताजींची शक्तीच कर्म करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली असेल तर मग, कर्म करत असताना ईश-स्मरणाऐवजी, आपोआप ईश्वराशी नित्य एकत्व पावण्यास तसेच योग-साक्षात्कारास सुरुवात झाली आहे असे समजा.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०६

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक असतात. एखादी व्यक्ती ध्यानाला शांतपणे बसलेली असते तेव्हा ‘ईश्वरा’चे स्मरण राखणे आणि ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव ठेवणे हे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि ईश-स्मरण या गोष्टी टप्प्याटप्यानेच यायला हव्यात, त्या एकदम एकाचवेळी साध्य होतील अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही.

ते दोन मार्गांनी घडते पहिला मार्ग म्हणजे, तुम्ही श्रीमाताजींचे स्मरण ठेवण्याचा आणि तुम्ही जेव्हा काहीतरी काम करत असता तेव्हा प्रत्येक वेळी ते कर्म अर्पण करण्याचा अभ्यास केलात (म्हणजे कर्म करत असताना सर्वकाळ असे नव्हे, पण, कर्मारंभी किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा असा अभ्यास केला) तर मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीला सवयीची होऊन जाते.

दुसरा मार्ग म्हणजे, ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते. ही चेतना एकाएकी किंवा अचानकपणे चिरस्थायी होत नाही तर ती, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची तुम्हाला जाणीव होऊ लागते. प्रथमतः कर्म करत असताना तुम्हाला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच तुम्हाला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून तुमच्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू तुमच्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी तुम्हाला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच श्रीमाताजींचे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी तुम्हाला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा खऱ्या चेतनेसह कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 259)

साधना, योग आणि रूपांतरण – १०५

श्रीमाताजींसाठी जे कोणी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या योग्य चेतनेची तयारी त्या कर्मामधूनच होत जाते. अगदी ते ध्यानाला बसले नाहीत किंवा त्यांनी कोणती एखादी योगसाधना केली नाही तरीही त्यांच्या चेतनेची तयारी होत असते.

ध्यान कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कर्म करत असताना तसेच सदासर्वकाळ प्रामाणिक असाल आणि जर तुम्ही श्रीमाताजींप्रति उन्मुख राहाल तर जे गरजेचे आहे ते आपोआप घडून येईल.

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म हे एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०४

मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, साधना म्हणून करण्यात आलेले कर्म – करण्यात आलेले कर्म म्हणजे ‘ईश्वरा’कडून आलेला ऊर्जेचा प्रवाह या भूमिकेतून केलेले कर्म, पुन्हा त्या ‘ईश्वरा’ला अर्पण करणे किंवा ‘ईश्वरा’साठी केलेले कर्म किंवा भक्तिभावाने केलेले कर्म हे साधनेचे एक प्रभावी माध्यम असते आणि अशा प्रकारचे कर्म हे विशेषतः पूर्णयोगामध्ये आवश्यक असते. कर्म, भक्ती आणि ध्यान हे योगाचे तीन आधार असतात. तुम्ही या तिन्ही आधारांच्या साहाय्याने योग करू शकता किंवा दोन किंवा एका आधाराच्या साहाय्यानेही योग करू शकता. ज्याला रुढ अर्थाने ‘ध्यान’ असे म्हटले जाते तसे ध्यान करणे काही जणांना जमत नाही, परंतु अशी माणसं कर्माच्या किंवा भक्तीच्या द्वारे किंवा कर्म आणि भक्ती या दोहोंच्या एकत्रित माध्यमातून प्रगती करून घेतात. कर्म आणि भक्ती यांच्याद्वारे चेतनेचा विकास होतो आणि सरतेशेवटी त्या चेतनेमध्ये सहजस्वाभाविक ध्यान आणि साक्षात्कार शक्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 209)

साधना, योग आणि रूपांतरण – १०३

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला तुम्ही ‘ध्यान’ म्हणता? खरी चेतना अवतरित करण्यासाठी तिला आवाहन करण्याची ही केवळ एक पद्धत आहे. खऱ्या चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, हीच गोष्ट फक्त महत्त्वाची असते आणि जर ते अवतरण कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, तर ते अधिक चांगले! ध्यान हे केवळ एक साधन आहे, उपकरण आहे. चालताना, बोलताना, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी योग-प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

साधना, योग आणि रूपांतरण – १०२

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते. ध्यान किंवा निदिध्यासन हा एक साधन आहे मात्र केवळ एक साधन, भक्ती हे दुसरे एक साधन आहे, तर कर्म हे आणखी एक साधन आहे. साक्षात्काराच्या दिशेने अवलंबण्यात आलेले पहिले साधन म्हणून योग्यांकडून ‘चित्तशुद्धीची साधना’ केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या निश्चलतेची, अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी सांगतो, ते यापेक्षाही काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ निदिध्यासनाने (contemplation) साध्य होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते, कर्मामधील योग अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – १०१

आजपर्यंत आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, एकाग्रतेच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणारे अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी मात करता येते, समाधी – अवस्था म्हणजे काय, पारंपरिक योगमार्गातील समाधी आणि पूर्णयोगांतर्गत समाधी यामधील फरक, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय इत्यादी विविध गोष्टी, त्यांचे बारकावे समजावून घेतले.

ध्यानाच्या मार्गाने उन्नत होत होत, समाधी-अवस्थेपर्यंत पोहोचणे हा साधनेचा केवळ एक मार्ग झाला. तो महत्त्वाचा असला तरी एकमेव नाही. पूर्णयोगांतर्गत साधना ही फक्त ध्यानापुरती सीमित नाही. तर ध्यानावस्थेत प्राप्त झालेली शांती, प्रेम, प्रकाश, ज्ञान, आनंद या साऱ्या गोष्टी बाह्य व्यवहारामध्येही उतरविणे येथे अभिप्रेत असते. आणि येथेच महत्त्वाची भूमिका असते ती कर्माची!

ध्यानासाठी दिवसाकाठी आपण किती वेळ देऊ शकतो ? फारफार तर तास-दोन तास. पण उरलेला सर्व वेळ आपण काही ना काही कर्म करत असतो. दैनंदिन व्यवहार करत असतो, उपजीविकेसाठी कामकाज करत असतो. ते करत असताना आपली वृत्ती कशी असते, आपली भूमिका कशी असते, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो, कर्मफलाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो, या व यासारख्या गोष्टींवरच कर्म हे ‘कर्मबंधन’ ठरणार की त्याचे पर्यवसान ‘कर्मयोगा’ मध्ये होणार हे अवलंबून असते.

पूर्णयोगामध्ये तर कर्माला विशेषच महत्त्व दिलेले आढळते. कारण या पार्थिव जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये रूपांतरण घडविणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने, पूर्णयोगाच्या प्रकाशात, एक साधनामार्ग या दृष्टिकोनातून ‘कर्म-व्यवहारा’कडे पाहण्याचा प्रयत्न आपण येथून पुढच्या भागांमध्ये करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १००

पूर्णयोगाचा जो साधक ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबतो तो त्यानंतर मात्र ‘पूर्णयोगाचा साधक’ असू शकत नाही. ‘अवैयक्तिक, निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत ‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत् चित् – आनंदा’चा साक्षात्कार असतो, ज्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. हा साक्षात्कार ‘निर्वाणा’ कडे घेऊन जातो. आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही जरी एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो जरी एक महत्त्वाचा भाग असला तरी समग्र ज्ञानाचा तो केवळ प्रारंभ असतो, सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

साधना, योग आणि रूपांतरण – ९९

ज्या विस्तीर्णतेमध्ये, नितांत स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये जीवन व्यतीत करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु ‘ईश्वर’-साक्षात्काराची आणि जिवाचे उच्चतर किंवा दिव्य ‘चेतने’मध्ये वृद्धिंगत होत जाणे, ज्याला आम्ही पूर्णयोगामध्ये ‘रूपांतरण’ असे संबोधतो त्याची, ही केवळ पहिली पायरी असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

साधना, योग आणि रूपांतरण – ९८

‘अधिमानस’ (overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मानसिक पातळ्यांवर (बुद्धेः परत:) ‘आत्म’साक्षात्कार झालेला आहे पण त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झालेला नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्याचा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार होऊ शकतो आणि व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट होऊ लागतो.

‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे मानसिक कृतींचा निरास होणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक ‘निश्चल-नीरवता’ लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक ‘निश्चल-नीरवता’ तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून निश्चलच राहते, साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि मग भलेही ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो, या कृतीच्या अंमलबजावणीसाठी, आवश्यक असणाऱ्या सर्व चालना, प्रेरणा ‘आत्म्या’च्या या मूलभूत शांतीला आणि स्थिरतेला बाधा न आणता, उच्चतर स्त्रोताकडून व्यक्तीला मिळत राहतात.

‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था वर वर्णन केलेल्या अवस्थांपेक्षाही अधिक उच्च स्तरावरील असतात. परंतु तुम्हाला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तुम्हाला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची आणि हृदयाची पूर्ण कृती तुमच्याकडून होत असली पाहिजे; चैत्य जागृती, बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, आधाराचे शुद्धीकरण आणि त्याचे संपूर्ण उन्मीलन झालेले असले पाहिजे.

‘अधिमानस’, ‘अतिमानस’ या उच्चकोटीच्या गोष्टींचा आत्ताच विचार करू नका. तर मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)