साधना, योग आणि रूपांतरण – ११७

(कर्म हे साधनेचा भाग कसा होऊ शकते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

व्यक्तीने कर्मामध्ये अधिकाधिक गढून जाण्याचा आणि परिणामतः स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कर्म आपण ‘ईश्वरा’ला अर्पण करत आहोत या भावनेने केले पाहिजे; अगदी निरलसपणे, विपुल प्रमाणात, स्वत:ला पूर्णपणे विसरून, स्वत:मधील सर्व काही देऊ करण्याच्या भावनेने केले पाहिजे. व्यक्तीने स्वत:बद्दल विचार न करता, फक्त करत असलेल्या कर्माचाच विचार केला पाहिजे.

…तुम्हाला जर एखादी गोष्ट उत्तम रीतीने करायची असेल, मग ती कोणतीही का असेना, एखादा खेळ खेळणे, पुस्तक लिहिणे, चित्र काढणे, गायनवादन करणे किंवा अगदी एखादी शर्यत जिंकणे अशी ती कोणतीही गोष्ट असू शकते. ती जर तुम्हाला उत्तम रीतीने करायची असेल तर तुम्ही ती गोष्टच बनले पाहिजे; ते कर्म करताना स्वतःकडे पाहणारी तुमच्यातील ती क्षुद्र व्यक्ती शिल्लक राहता कामा नये. कारण व्यक्ती जर कर्म करताना स्वत:कडे पाहू लागली… तर ती व्यक्ती अजूनही अहंकारामध्ये गुंतलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. व्यक्ती जे कर्म करत आहे ते कर्मच जर ती झाली, तर ती एक मोठी प्रगती ठरते.

कर्म करताना अगदी बारीकसारीक गोष्टींमध्येही व्यक्तीने असे करायला शिकले पाहिजे. एक मजेशीर उदाहरण पाहा : समजा, तुम्हाला एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी ओतायचे असेल; तर तेव्हा तुम्ही एकाग्र होता (एक शिस्त, एक प्रकारचा व्यायाम म्हणून तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे.) जोपर्यंत ज्या बाटलीत पाणी भरायचे असते ती बाटली तुम्ही असता, ज्या बाटलीतून पाणी भरायचे ती बाटलीही तुम्ही असता आणि ती पाणी ओतण्याची प्रक्रियाही तुम्हीच असता, जोपर्यंत तुम्ही केवळ तेच असता तोवर सगळे काही नीट चालू असते. पण चुकून तुम्ही एक क्षणभर जरी विचार केलात : ”अरे वा! पाणी न सांडता भरलं जातंय, अरे मला जमतंय की!” त्याच क्षणी पाणी सांडतं. (कारण असा कोणताही विचार येताक्षणी व्यक्ती त्या कर्मापासून विभक्त झालेली असते.) प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी सर्वच गोष्टींमध्ये हे असेच घडते.

आणि म्हणूनच, कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 04 : 362)

साधना, योग आणि रूपांतरण – ११६

तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला अडचणी येताना दिसतात. उदाहरणार्थ, तुम्ही करत असलेले भरतकाम, तयार करत असता त्या लँपशेड्स इ. गोष्टी खरोखरच नेहमी उत्तम असतात आणि तरीही तुम्ही सतत असाच विचार करत राहता की, “हे काम चांगले झाले नाहीये, ते चुकीचे झाले,” आणि असा विचार करत राहिल्यानेच तुम्ही गोंधळात पडता आणि सारेकाही बिघडते. साहजिकपणेच मग तुम्ही सतत चुका करत राहता; आणि तुम्ही जेव्हा साध्यासरळपणे व आत्मविश्वासाने काम करता तेव्हापेक्षा, जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हा अधिक चुका करता.

कर्म असो की साधना असो धीमेपणाने वाटचाल करत राहणे अधिक बरे! ‘शक्ती’ला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे आणि तिला तिचे कार्य योग्य रीतीने करता यावे म्हणून, स्वतःला त्रास करून न घेता किंवा पदोपदी सतत अस्वस्थपणे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न उपस्थित न करता, तुम्ही तुमचे कर्म सर्वोत्तम रीतीने केले पाहिजे. तुम्ही जर ते दोष सतत उगाळत राहिला नाहीत तर, जे कोणते दोष असतील ते यथावकाश निघून जातील; कारण सातत्याने त्या दोषांचा विचार करत राहिल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होत आहे. तसेच, वास्तविक जी कायमच तेथे समानत्वाने असते त्या ‘शक्ती’प्रत खुले होण्याच्या तुमच्या क्षमतेवरील तुमचा विश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच त्या ‘शक्ती’च्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये अनावश्यक अडथळे निर्माण करत आहात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 284)

साधना, योग आणि रूपांतरण – ११५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला अजून जरी सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका. कोणतेही काम करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे आणि त्याला ते अर्पण करणे आणि ते संपल्यावर (‘ईश्वरा’प्रति) कृतज्ञता व्यक्त करणे हे (तुमच्या) सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा काम करत असताना मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवावे.

…लोकं काम करताना जेव्हा सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते स्मरण त्यांच्या मनाच्या मागे असते. किंवा त्यांच्यामध्ये एकाच वेळी दोन विचारांची किंवा दोन चेतनांची एक क्षमता हळूहळू निर्माण झालेली असते. त्यापैकी एक चेतना पृष्ठभागी राहून कर्म करत असते आणि दुसरी चेतना साक्षी असते व स्मरण ठेवत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग राहिलेला होता. अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआप घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्यासरळ सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही.

कर्म करण्यासाठी महत्तर ‘शक्ती’ला आवाहन करत, अभीप्सा बाळगणे आणि आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की, जिच्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही लोकांना जरी त्यासाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयत्नांनीच करण्यापेक्षा, (आपल्या) अंतःस्थित असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’द्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे हे साधनेचे महान रहस्य आहे.

मनाद्वारे केलेले प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही. मात्र, तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या मनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तसे करणे अध्यात्मामध्ये निपुण असणाऱ्यांना शक्य असते, पण इतरांना मात्र फार कष्टदायक ठरते.

…धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्येच आवश्यक असतात. बलवंतांसाठी सामर्थ्य हे ठीक आहे परंतु अभीप्सा आणि तिला ‘ईश्वरी कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे सर्वस्वी दंतकथा (myths) आहेत, असे नाही; तर या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 214-215)

साधना, योग आणि रूपांतरण – ११४

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच नेहमी कृती करण्यास तुम्ही शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.
*
योगसाधनेमुळे चेतना विकसित झाली असेल तर, व्यक्ती अभीप्साही बाळगू शकते आणि त्याच वेळी कामाकडेही लक्ष पुरवू शकते आणि त्याच वेळी इतर अनेक गोष्टीही करू शकते.
*
कामामध्ये व्यग्र असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कामामध्ये व्यग्र असतानादेखील असतानाच या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 254), (CWSA 29 : 256), (CWSA 29 : 258-259)

साधना, योग आणि रूपांतरण – ११३

माणसं सहसा प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती वा यश किंवा पद वा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याचा आनंद मिळावा यासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि त्यामध्ये ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे ‘कर्म’ यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा योगमार्ग स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा इतर प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे. प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे, त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते. आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये लावण्यात आलेला जोर किंवा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असू शकते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील किंवा त्याच्या प्रवृत्तीतील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिचे साध्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती यांचा उपयोग करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 233)

साधना, योग आणि रूपांतरण – ११२

चेतनेमधील उन्मुखतेप्रमाणेच कर्मामध्येही उन्मुखता असते. ध्यानाच्या वेळी तुमच्या चेतनेमध्ये जी ‘शक्ती’ कार्य करत असते आणि तुम्ही जेव्हा तिच्याप्रत उन्मुख, खुले होता तेव्हा ती ज्याप्रमाणे शंकांचे आणि गोंधळाचे ढग दूर पळवून लावते अगदी त्याचप्रमाणे ती ‘शक्ती’ तुमच्या कृतीदेखील हाती घेऊ शकते. आणि त्याद्वारे ती तुम्हाला तुमच्यामधील दोषांची जाणीवच करून देऊ शकते असे नाही तर, काय केले पाहिजे यासंबंधी तुम्हाला ती सतर्क बनवू शकते आणि ते करण्यासाठी तुमच्या मनाला आणि हातांना ती मार्गदर्शन करू शकते. तुम्ही कर्म करत असताना तिच्याप्रत उन्मुख, खुले राहाल तर तुम्हाला या मार्गदर्शनाची अधिकाधिक जाणीव होऊ लागेल. आणि एवढेच नव्हे तर नंतर तुम्हाला, तुमच्या सर्व कृतींच्याच पाठीमागे कार्यरत असलेल्या ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ची जाणीव होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 262)

साधना, योग आणि रूपांतरण – १११

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा-वासना यांच्यावर मात करण्याची आणि संपूर्ण समर्पण प्राप्त करून घेण्याची केवळ साधने असतात. जोपर्यंत व्यक्ती यशप्राप्तीवर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि हे असे आहे, हे दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजयाची शक्ती प्राप्त करून घेऊ नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नसते; ग्रहण करण्याची शक्ती आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची शक्ती आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपशयाने खचून न जाता केले पाहिजे.
*
कर्माचा एक मोठा उपयोग असा असतो की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांसमोर उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या नजरेतून निसटण्याची शक्यता असते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधना-प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात जास्त प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 241-242), (CWSA 29 : 241), (CWSA 32 : 256-257)

साधना, योग आणि रूपांतरण – ११०

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत. जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, किंबहुना त्यामानाने खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

*

कुटुंब, समाज, देश या गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत; या गोष्टी म्हणजे अहम् चे व्यापक रूप आहेत. कुटुंब, समाज, देश या उद्दिष्टांसाठी कार्य करावे असा ‘ईश्वरी आदेश’ मिळाला असल्याची जर व्यक्तीला जाणीव असेल किंवा (ते कार्य करत असताना) व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये कार्य करणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’ची जाणीव असेल तरच ती व्यक्ती कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’साठी कार्य करत आहे, असे म्हणू शकते. अन्यथा, देश वगैरे गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’च आहेत, ही केवळ मनाची एक कल्पना असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216), (CWSA 28 : 438)

साधना, योग आणि रूपांतरण – १०९

जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुविना, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणताही गर्व न बाळगता किंवा असभ्य हेकेखोरपणा न करता केले जाते किंवा कोणत्याही पदासाठी वा प्रतिष्ठेसाठी दावा न करता जे कर्म केले जाते; जे कर्म केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’नेच केले जाते, केवळ तेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. जे जे कर्म अहंभावात्मक वृत्तीने केले जाते ते, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भले कितीही चांगले असू दे, पण योगसाधना करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्या कर्माचा काहीच उपयोग नसतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 232)

साधना, योग आणि रूपांतरण – १०८

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. इच्छा किंवा अहंकार विरहित कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ला अर्पण म्हणून केलेले कर्म; दिव्य मातेचे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि सर्व कर्म तिने हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, अशा प्रकारे केलेले कर्म म्हणजे योग्य वृत्तीने केलेले कर्म होय. त्यामुळे ‘दिव्य माते’ची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व तुम्हाला फक्त आंतरिक नीरवतेमध्येच जाणवू शकेल असे नाही तर, कर्म करत असताना देखील ते जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 226)