समर्पण – ४१

सत्त्वगुणाचा धोका तेव्हा असतो जेव्हा साधक त्याच्या तर्कबुद्धीच्या एकांगी निष्कर्षाला चिकटून राहतो, किंवा साधनेच्या एखाद्या विशिष्ट क्रियेला, योगामधील एखाद्या विशिष्ट सिद्धीच्या आनंदाला चिकटून बसतो; कदाचित शुद्धतेच्या जाणिवेशी किंवा कोणतीतरी एखादी विशिष्ट शक्ती प्राप्त झाल्यामुळे किंवा ईश्वराशी संपर्क झाल्याच्या आनंदाशी किंवा मुक्तीच्या जाणिवेशी, मुमुक्षत्वाच्या जाणिवेशी, कोणत्यातरी एकाच गोष्टीशी बद्ध होतो आणि मग त्याला दुसरे काहीच नको असते. हे लक्षात ठेवा की, योग हा तुमच्या स्वतःसाठी नसतो, कारण या गोष्टी, जरी त्या सिद्धीचा एक भाग असला तरीदेखील त्या सिद्धीचे उद्दिष्ट असू शकत नाहीत; कारण ईश्वरावर कोणताही हक्क सांगणार नाही आणि त्याच्याकडून जे काही मिळेल ते मी मुक्तपणे स्वीकारीन असा निश्चय तुम्हीच सुरुवातीला केलेला असतो. आनंदाच्या बाबतीत सांगायचे तर, जर ईश्वराची इच्छा असेल तर निःस्वार्थी जीव हा अगदी ईश्वराच्या उपस्थितीचा आनंददेखील सोडून देईल. तुम्ही सर्वोच्च सात्विक अहंकारापासूनदेखील मुक्त असले पाहिजे; मुक्तीच्या इच्छेपासून, मुमुक्षुत्वाच्या सूक्ष्म अज्ञानापासूनदेखील तुम्ही मुक्त असले पाहिजे आणि सर्व प्रकारचे सुख व आनंद या गोष्टी अनासक्तीने स्वीकारल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही गीतेमधील पूर्ण पुरुष किंवा सिद्ध बनाल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 85)

समर्पण – ४०

तमोगुणाचा धोका दुहेरी असतो, प्रथमतः जेव्हा पुरुष त्याच्यामधील तमसाशी स्वतःला एकात्म समजतो आणि असा विचार करू लागतो की, ”मी दुर्बल आहे, पापी आहे, दुःखीकष्टी आहे, अज्ञानी आहे, मी कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही, या अमुक माणसापेक्षा मी गौण आहे, त्या तमुक माणसापेक्षा मी गौण आहे, मी अधम आहे, माझ्याद्वारे तो देव तरी काय करणार?” जणू काही जी व्यक्ती देवाचे साधन असते तिच्या क्षमतांमुळे किंवा अक्षमतांमुळे देवावरच मर्यादा पडतात आणि जणू काही, ‘मूकं करोति वाचालम् पंगुम् लंघयते गिरीम्’ हे वचनच खरे नाही. आणि दुसरा धोका हा त्या वेळी उद्भवतो की, जेव्हा साधक नकारार्थी शांतीमधून प्रचंड आराम, एक प्रकारची सुटका अनुभवतो आणि त्याला जणूकाही सर्व त्रासांपासून सुटका झाल्याचा अनुभव येतो आणि ती शांती प्राप्त झाल्यामुळे, तो जीवनाकडे आणि कर्माकडे पाठ फिरवितो आणि त्या शांतीला व निष्क्रियतेच्या सुखाला चिकटून बसतो. हे कायम ध्यानात ठेवा की, तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात आणि ती दिव्य शक्ती तुमच्या माध्यमातून कार्य करत असते; ईश्वराच्या सर्वसमर्थतेच्या आणि त्याच्या लीलेतील आनंदाच्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचा. लोकसंग्रहार्थ कार्य करण्याची आज्ञा त्याने अर्जुनाला दिली, हे विश्व एकत्र राखावे यासाठी त्याने आज्ञा दिली कारण त्याला हे विश्व पुन्हा प्रकृतीमध्ये बुडून जावे असे वाटत नाही, “जर मी कार्य केले नाही तर या विश्वावर तमोमयतेचे साम्राज्य पसरेल आणि ते प्रकृतीमध्ये बुडून जाईल” यामुळे तो ईश्वर जसे कार्य करत राहतो तसेच तुम्हीही कार्य करत रहावे या गोष्टीवर तो भर देतो. निष्क्रियतेशी बद्ध होऊन राहणे म्हणजे आपल्या कृती या ईश्वराला नव्हे तर, तामसिक अहंकाराला देऊ करणे होय.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 84-85)

समर्पण – ३९

महान आणि संपूर्ण मुक्तीसाठी तुम्ही निस्पृह, निर्द्वंद्व आणि निरहंकारी असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अभिलाषा असता कामा नये, तुम्ही त्यांच्या लोभाने ओढले जाता कामा नये; द्वंद्वांचे
जे सगळे संस्कार असतात त्यापासून तुम्ही मुक्त असला पाहिजेत, आणि तुम्ही अहंकारापासून मुक्त असला पाहिजेत; कारण ह्या तीन गोष्टी म्हणजे आत्म-समर्पणाचे प्रमुख शत्रू असतात.

*

ज्या साधकाने आत्मसमर्पणाचा संकल्प केलेला आहे पण पूर्ण आत्मसमर्पण ज्याला अजूनपर्यंत साध्य झालेले नाही अशा साधकाबाबत अहंकाराच्या पायावर उभे राहून गुणांचे जे कार्य चालू असते, त्याचे त्याचे विशिष्ट असे धोके संभवतात. रजोगुणाचा धोका तेव्हा असतो जेव्हा, गर्वाने घाला घातलेला साधक असा विचार करतो की, “मी खूप मोठा साधक आहे, मी इतक्या पुढे निघून गेलेलो आहे, मी ईश्वराच्या हातातील एक महान साधन आहे,” किंवा अशाच कल्पना तो करत राहतो किंवा तो जेव्हा एखादे कार्य हे ईश्वरी कार्य आहे असे मानून त्याच्याशी स्वतःला जोडून घेतो, तो त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो आणि त्याने स्वतःलाच इतका त्रास करून घेतो की जणू काही खुद्द ईश्वरापेक्षादेखील त्यालाच या ईश्वरी कार्यामध्ये अधिक रस आहे आणि जणू काही तो ईश्वरापेक्षा ते कार्य चांगल्या रीतीने करू शकतो. बरेचजण, जे सदासर्वकाळ या राजसिक अहंकाराच्या भावनेतून कार्य करत असतात, ते स्वतःला असे समजावत राहतात की, ईश्वर त्यांच्या माध्यमातून कार्य करत आहे आणि त्या कार्यामध्ये त्यांचा स्वतःचा असा काही भाग नाही. असे होते याचे कारण असे की ते संपूर्ण व्यवस्था आणि जीवन आत्मसमर्पणाच्या संकल्पनेने भरून जाण्याची वाट न पाहता, ते समर्पणाच्या केवळ बौद्धिक मान्यतेवरच समाधानी झालेले असतात. अस्तित्वाच्या इतर घटकांमध्येदेखील ईश्वराचे नित्य स्मरण आणि वैयक्तिक अधीरतेचा (स्पृहा) परित्याग या गोष्टी आवश्यक असतात; ईश्वर, आत्मज्ञानाच्या पूर्ण प्रकाशाने आत्म-वंचनेच्या साऱ्या संभाव्य शक्यता जोवर नाहीशा करून टाकत नाही तोपर्यंत आपल्या आंतरिक हालचालींचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 82-83), (CWSA 13 : 84)

समर्पण – ३८

मांजराचे पिलू हे त्याच्या आईला घट्ट धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला घट्ट धरून ठेवलेले असते; त्यामुळे त्याला कोणतीच भीती नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला काहीच करावे लागत नाही. कारण आईने त्याला घट्ट धरावे म्हणून त्याने फक्त ‘मा मा’ असा आकांत केलेला असतो. जर तुम्ही हा समर्पणाचा मार्ग पूर्णत: आणि प्रामाणिकपणाने आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही.

*

‘मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीचे अनुकरण करा,’ हे सांगणे खूप सोपे आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घ्या. एकदा का मांजराच्या पिल्लाची वृत्ती धारण केली की मग कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करायला नकोत, असे तुम्ही समजता कामा नये. कारण मनुष्य हा काही मांजरीचे पिल्लू असू शकत नाही.

…मानवी मनाचे अद्भुत कार्य नेहमीच चालू असते; या मनाला निरीक्षण करणे, टिका करणे, विश्लेषण करणे, शंका उपस्थित करणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी खूप आवडत असतात. …परंतु मांजराचे पिल्लू मात्र विचार करत बसत नाही. ते विचारादी गोष्टींपासून मुक्त असते आणि त्यामुळे त्याला तसे वागणे खूप सोपे असते.

तुम्ही कोणताही मार्ग अनुसरा, परंतु जोपर्यंत ईश्वराशी तादात्म्य होत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच असते. त्या तादात्म्याच्या क्षणी मात्र, जीर्ण वस्त्रं गळून पडावीत त्याप्रमाणे सारे प्रयास गळून पडतात, तुम्ही जणू काही एक वेगळीच व्यक्ती बनता : एकेकाळी जे तुम्हाला अशक्यप्राय वाटत असे, ते आता तुम्हाला शक्य होते आणि ते केवळ शक्यच होते असे नाही, तर ते तुमच्यासाठी अपरिहार्य बनते, कारण तुम्ही त्याविना इतर काही करूच शकत नाही.

तुम्ही सतर्क, शांत राहिले पाहिजे, आणि आंतरिक प्रेरणेची प्रतीक्षा केली पाहिजे; बाह्य प्रतिक्रियांमधून तुम्ही कोणतीही कृती करता कामा नये; सातत्याने, नियमितपणे, वरून येणाऱ्या प्रकाशाद्वारेच तुमचे संचालन झाले पाहिजे. त्याच प्रकाशाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन तुम्ही कृती केली पाहिजे, इतर कोणत्याही प्रेरणेने नाही.

…कोणताही प्रतिप्रश्न न करता, कोणतीही शंका उपस्थित न करता, तुम्ही आंतरिक निश्चिततेने कृती केली पाहिजे कारण आता तो निर्णय हा तुमच्याकडून आलेला नसतो, तर तो वरून आलेला असतो. ही गोष्ट एखाद्याच्या बाबतीत लवकर घडेल किंवा दुसऱ्या एखाद्याला मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल – ते त्या त्या व्यक्तीच्या पूर्वतयारीवर, तसेच इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही आस बाळगली पाहिजे आणि ती आस चिकाटीने बाळगली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा धैर्य खचू देता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 05) (CWM 04 : 94-95)

समर्पण – ३७

दोन शक्यता असतात, पहिली म्हणजे व्यक्तिगत प्रयत्नाच्या आधारे शुद्धिकरण, जिला बराच दीर्घ कालावधी लागतो आणि दुसरी शक्यता म्हणजे दिव्यकृपेचा थेट हस्तक्षेप, साधारणत: हिची क्रिया अधिक जलद असते. ह्या दुसऱ्या शक्यतेसाठी संपूर्ण समर्पणाची आणि आत्मदानाची आवश्यकता असते. आणि त्यासाठीही पुन्हा सर्वसाधारणपणे आवश्यकता असते ती बऱ्यापैकी अचंचल राहू शकेल अशा मनाची. असे मन की जे प्रत्येक पावलागणिक त्या दिव्य शक्तीवर सर्वस्वी निष्ठा ठेवीत, तिला साहाय्यभूत होत, दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देईल. अन्यथा ते निश्चल आणि शांत राहील. ही दुसरी स्थिती ही श्रीरामकृष्णांनी वर्णिलेल्या मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीशी साधर्म्य दर्शविते. ती प्राप्त करून घेण्यास कठीण (दुष्प्राप्य) आहे. ज्यांना ज्यांना ते स्वतः जे काही करतात त्यामध्ये, विचार व इच्छा यांची खूप जोरकस हालचाल व क्रिया करण्याची सवय असते, त्यांना मनाची क्रिया स्तब्ध करणे आणि मानसिक पातळीवरील आत्मदानाची अचंचल शांतता आत्मसात करणे, हे खूप कठीण वाटते. ह्याचा अर्थ असा होत नाही की, ते योग करू शकत नाहीत किंवा ते आत्मदानाप्रत येऊ शकत नाहीत, फक्त एवढेच की, शुद्धीकरण आणि आत्मदान ह्या गोष्टी साध्य व्हावयाला त्यांना अधिक कालावधी लागतो, तसेच अशा व्यक्तीकडे सबुरी, अविचल चिकाटी आणि साध्य गाठण्याचा संकल्प असणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 83)

समर्पण – ३६

उद्भवणाऱ्या साऱ्या अडीअडचणी या खुद्द प्रकृतीमध्येच असतील तर, त्यांनी पृष्ठभागावर यावे आणि स्वतःला आविष्कृत करावे हे अटळ आहे. समर्पण ही काही सोपी गोष्ट नाही, त्याला प्रकृतीच्या एका मोठ्या भागाकडून विरोध केला जातो. जर मनाने समर्पणाची इच्छा धरली तर, हे सारे आंतरिक अडथळे येऊन स्वतःचे अस्तित्व दाखविणार हे उघडच आहे; अशा वेळी साधकाने त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त केले पाहिजे, त्याने त्याच्या प्रकृतीतून या अडथळ्यांना दूर लोटले पाहिजे आणि त्यावर मात केली पाहिजे. याला पुष्कळ काळदेखील लागू शकेल पण हे केलेच पाहिजे. व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमध्येच समर्पणाला विरोध असतो आणि या विरोधाची साथ बाह्य अडथळ्यांना मिळते.

या विरोधाची अशी साथ जर त्या बाह्य अडथळ्यांना मिळाली नाही तर मग मात्र ते बाह्य अडथळे आंतरिक समर्पण रोखू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)

समर्पण – ३५

प्रश्न : समर्पण करण्यासाठी आपल्या प्रकृतीमधील अवज्ञाकारी भागांचे मन कसे वळवायचे?

श्रीमाताजी : त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, एखाद्या अजाण बालकाबाबत व्यक्ती जसे करते, त्याप्रमाणे सर्व मार्गांचा अवलंब करा – चित्रं, स्पष्टीकरणं, प्रतीकं यांचा वापर करा. व्यक्तित्वाच्या इतर भागांसोबत सुमेळ आणि ऐक्याची आवश्यकता काय आहे हे त्यांना समजावून सांगा; त्यांना तर्काने पटवून द्या, त्यांना त्यांच्या कृतींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय धीराने वागा; एकच गोष्ट पुन्हापुन्हा करण्याचा कंटाळा करू नका, थकू नका.

प्रश्न : या कार्यामध्ये मनाची काही मदत होऊ शकते का?

श्रीमाताजी : हो, जर मनाचा एखादा भाग हा पूर्ण प्रकाशित झालेला असेल, जर तो चैत्य प्रकाशाप्रत समर्पित झालेला असेल आणि जर त्याला सत्याची जाणीव झालेली असेल तर असे मन हे खूपच साहाय्यकारी ठरू शकते, असे मन गोष्टींचे खऱ्या अर्थाने स्पष्टीकरण करू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 182-183)

समर्पण – ३४

देवावर श्रद्धा, विश्वास, दिव्य शक्तीप्रत आत्मदान आणि समर्पण या आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत. पण देवावरील विश्वास हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती, दुर्बलता, निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये. दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे; तो नकार आणि अथक अभीप्सा यांच्या सोबत त्या विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे. ईश्वराप्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांना, कनिष्ठ आंदोलनांना शरण जाण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराला शरण जाण्याचे किंवा ईश्वराचे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींना शरण जाण्याचे एक कारण, एक बुरखा, एक निमित्त बनता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 87)

समर्पण – ३३

मनाने आपल्या मतांचा, कल्पनांचा, पसंती-नापसंतीचा, प्राणाने त्याच्या इच्छावासनांचा व आवेगांचा, शरीराने त्याच्या सवयीच्या कृतींचा, अहंभावात्मक जीवनाचा आग्रह धरता कामा नये; समर्पणासाठी हे आवश्यक असते कारण अशा प्रकारचे सारे आग्रह हे समर्पणाच्या विरोधी असतात. सर्व प्रकारचे अहंकार आणि स्व-इच्छा यांचा समूळ त्याग केला पाहिजे आणि फक्त दिव्य शक्तीनेच आपले नियंत्रण करावे म्हणून व्यक्तीने प्रयत्नशील असले पाहिजे. चैत्याच्या उमलण्याशिवाय संपूर्ण समर्पण शक्य नाही.

*

समर्पण हे समग्र असले पाहिजे. काहीही हातचे राखून ठेवता कामा नये, कोणती इच्छा नको, कोणतीही मागणी नको, कोणते मत नको, किंवा हे असे असलेच पाहिजे, हे असे असता कामा नये, हे असे असावे किंवा ते तसे नसावे, अशी कोणती कल्पनाही नको… हृदय सर्व इच्छांपासून शुद्ध असले पाहिजे, बुद्धी सर्व प्रकारच्या स्व-इच्छेपासून परिशुद्ध असली पाहिजे, प्रत्येक द्वंद्वाचा त्याग केला पाहिजे, अखिल दृश्य आणि अदृश्य विश्व हे गुप्त प्रज्ञेची, शक्तीची आणि आनंदाची परमोच्च अभिव्यक्ती आहे, हे ओळखता आले पाहिजे आणि दिव्य प्रेम, सामर्थ्य व परिपूर्ण ईश्वरी बुद्धिमत्ता यांना त्यांचे कार्य करता यावे आणि त्यांना ईश्वरी लीलेची परिपूर्ती करता यावी म्हणून वाहनचालकाच्या हाती असलेल्या निष्क्रिय इंजिनाप्रमाणे, समग्र अस्तित्व हे त्यांना देऊ करता आले पाहिजे. ईश्वर आपल्याला जे अंतिमतः प्रदान करू इच्छितो तो परिपूर्ण आनंद आपल्याला मिळावा, ती परिपूर्ण शांती व ज्ञान आपल्याला मिळावे आणि दिव्य जीवनाचे परिपूर्ण आचरण आपल्याला करता यावे म्हणून अहंकाराला हद्दपार केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 76), (CWSA 13 : 73-74)

समर्पण – ३२

आंतरिक प्रयत्न आणि संघर्ष यांचा कमीअधिक दीर्घ असा कालावधी असतो की ज्यामध्ये, व्यक्तिगत इच्छेने अंधकाराला आणि कनिष्ठ प्रकृतीच्या विकृतींना नकार दिला पाहिजे आणि निर्धारपूर्वक किंवा जोरकसपणे स्वतःला दिव्य प्रकाशाच्या बाजूला ठेवले पाहिजे. सर्व मानसिक ऊर्जा, हृदयाच्या भावना, प्राणिक इच्छावासना, तसेचअगदी शारीर अस्तित्वाला देखील योग्य दृष्टिकोन स्वीकारण्यास भाग पाडले पाहिजे किंवा या साऱ्यांनी योग्य प्रभावाला प्रतिसाद द्यावा आणि त्या प्रभावाचा स्वीकार करावा यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. तेव्हाच, म्हणजे जेव्हा हे खऱ्या अर्थाने केले जाईल तेव्हाच, कनिष्ठाचे उच्चतर प्रकृतीप्रत केलेले समर्पण सिद्ध होईल…

-श्रीअरविंद
(CWSA 23 : 60)