श्रीमती सविता हिंदोचा नावाच्या एक साधिका तेव्हा केनियामध्ये राहत असत. त्यांच्या घरी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांचे काही साधक एकत्र जमले होते. त्यांनी प्रार्थना, ध्यान आणि वाचन सुरु केले. तेव्हा ते श्रीअरविंदांच्या ‘सावित्री’ या महाकाव्यातील उताऱ्याचे वाचन करत होते.

सविता म्हणतात, “मी भारावून गेले होते आणि मला असे जाणवू लागले की, मला ते काव्य समजावे म्हणून खुद्द माताजीच मला ते वाचून दाखवत आहेत…” आणि ह्या अनुभवानंतर पुढे एके दिवशी हिंदोचा यांनी सर्वसामान्य जीवन मागे सोडून द्यावयाचे असा निश्चय केला. आणि मग सुरु झाली प्रार्थनांची मालिका!

श्रीमाताजींना भेटण्यासाठी त्या व्याकुळ झाल्या. त्यांची खात्री पटली की, संपत्ती, कुटुंब, भौतिक आनंद, समृद्धी ह्या कशाकशातूनच दिव्य शांती आणि समाधान त्यांना मिळू शकणार नाही, आणि मग एक दिवस त्या आश्रमात येऊन दाखल झाल्या. श्रीमाताजींनी त्यांना हुता (सर्वस्व-दान केलेली) असे नाव दिले.

आश्रमात राहू लागल्यावर त्यांनी एकदा श्रीमाताजींना विचारले, “मी कोणत्या वेळी प्रार्थना करू म्हणजे मी तुमच्या सोबत प्रार्थना करू शकेन?” तेव्हा श्रीमाताजींनी त्यांना उत्तर दिले,

“प्रार्थना किंवा ध्यानासाठी माझी ठरावीक अशी कोणती वेळ नाही. वरवर पाहता हा देह काहीतरी काम करताना दिसत असला तरी मी दिवसरात्र सातत्याने परमपुरुषाला आवाहन करत असते. या असत्यमय जगामध्ये ते परमसत्य आणि ह्या बेबनावाने भरलेल्या जगामध्ये परमप्रेम आविष्कृत व्हावे म्हणून प्रार्थना करत असते. तेव्हा तुला जेव्हा प्रार्थना करावीशी वाटेल तेव्हा तू कर; तुला आढळेल की, तुझी प्रार्थना माझ्यासमवेतच झालेली आहे.”

– आधार : (On The Mother by K.R.Srinivasa lyengar)

क्रांतिकारक श्री अरविंद घोष यांच्या जीवनातील ही कहाणी.

ब्रिटिशविरोधी कारवाईमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून त्यांना दि. ०२ मे १९०८ रोजी अटक करण्यात आली. अलिपूरच्या तुरुंगात त्यांना एक वर्षभर राहावे लागणार होते. बळजबरीच्या ह्या एकांतवासामध्ये, दिवस घालविण्यासाठी कोणतेच साधन तेव्हा त्यांच्या हाताशी नव्हते. बाहेर असताना एक क्षणही न दवडता, अखंड कार्यरत असणारे अरविंद घोष, स्थानबद्ध झाल्यावर एकदम निर्माण झालेल्या पोकळीने मात्र काहीसे अस्वस्थ झाले होते.

काही दिवस अशा रीतीने अस्वस्थतेमध्ये घालविल्यानंतर, एके दिवशी दुपारी ते विचार करत बसले असताना, विचारांचा ओघ अनिर्बंधपणे वाहू लागला आणि त्यांना जाणीव झाली की, हे विचार अनियंत्रितपणे, असुसंगत रीतीने येऊन आदळत आहेत. हे प्रमाण इतके वाढले की, त्यांना वाटू लागले की, मनाची नियंत्रणक्षमताच जणू नाहीशी झाली आहे. आता भ्रमिष्टच होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली.

श्रीअरविंद म्हणतात, “माझी बुद्धी गमावण्यापासून माझे रक्षण कर, अशी मी त्यावेळी अगदी उत्कटतेने, आर्ततेने ईश्वराची प्रार्थना केली, त्याची करूणा भाकली. त्याच क्षणी माझ्या सर्वांगावरून एक अतिशय हळूवार, थंडगार झुळूक वाहत गेली, माझे भणाणलेले मस्तक विश्रांत पावले. एखादे तान्हे मूल जसे त्याच्या आईच्या कुशीत निश्चित, निर्धास्तपणे झोपी जावे, तसा मी देखील मग विश्वमातेच्या कुशीत निर्धास्तपणे झोपी गेलो.

संपूर्ण जीवननाट्याकडे एखाद्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून कसे पाहावयाचे हेच माझ्या बुद्धिला या प्रसंगातून त्या ईश्वराने शिकविले होते. त्या दिवसापासून कारावासातील माझे सर्व त्रास संपूनच गेले.

या प्रसंगामधून मला प्रार्थनेची परिणामकारकता आणि प्रार्थनेची असामान्य शक्ती ह्यांची जाणीव झाली.”

-आधार : (Tales of Prison Life)

श्रीअरविंद भारतात आल्यानंतर, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. ‘इंदुप्रकाश’मध्ये त्यावर टीका करणारी “New Lamps for Old” ही लेखमाला त्यांनी लिहिली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते; त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे!

तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्या. महादेव गोविंद रानडे यांनी “असे जहाल लिखाण लिहू नये,”असे संपादकांना सांगितले. तसे प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा श्रीअरविंदांनी राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. तरीही शासनाची त्यांच्यावर वक्र दृष्टी राहिलीच.

‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये श्रीअरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. श्रीअरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले, तेव्हा ते स्वतःच पोलिसांना शरण गेले.

या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले श्रीअरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लो.टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे, ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि.०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात रवीन्द्रनाथ टागोरांनी श्रीअरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली.

श्रीअरविंदांच्या विरुद्ध कोणताही आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे पुढे, त्यांची निर्दोष सुटका झाली. तेव्हा रवीन्द्रनाथ टागोर त्यांना भेटण्यास गेले आणि चेष्टेत म्हणाले, “काय हे? तुम्ही तर आम्हाला फसविलेत.”

तेव्हा श्रीअरविंद हसून म्हणाले, “तुम्हाला त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.” आणि खरोखर, पुढे लवकरच म्हणजे ०२ मे १९०८ मध्ये श्रीअरविंदांना परत अटक करण्यात आली.

(Sri Aurobindo-a biography and a history by K.R.Srinivasa Iyengar)

श्रीमाताजी मुलांना गोष्टी सांगतानाचे छायाचित्र

 

 

जुनून नावाचे कोणी एक महात्मा होऊन गेले. त्यांच्याकडे खूप विद्यार्थी दीक्षा घेण्यासाठी येत असत. एके दिवशी युसूफ हुसेन नावाचा कोणी एक जण त्यांच्याकडे आला. त्या महात्म्याने युसूफला चार वर्षे आपल्या गुरुकुलात ठेवून घेतले.

एके दिवशी महात्म्याने विचारले,”तू इथे का आला आहेस?”

क्षणाचाही विलंब न लावता युसूफ म्हणाला, “तुमच्याकडून ज्ञानदीक्षा मिळावी म्हणून.”

महात्मा जुनूनने एक छोटीशी सुंदर डबी युसूफच्या हाती दिली आणि त्याला सांगितले, “ही डबी घेऊन जा आणि नीला नदीच्या किनाऱ्यावर माझा एक मित्र राहतो त्याला अशीच्या अशी नेऊन दे. तेथून तू परत आलास की, मी तुला शिकवण देईन.” युसूफ तातडीने निघाला.

दुपारी विसावा घ्यावा म्हणून तो एका झाडाखाली थांबला. त्याचे लक्ष त्या सुंदर डबीकडे गेले. तो विचार करू लागला,’ह्या डबीत काय असेल? उघडून पाहायला काय हरकत आहे.’

तो डबी उघडणार इतक्यात त्याच्या मनात विचार आला, ‘गुरुजींनी डबी जशीच्या तशी न्यावयास सांगितली आहे, ती उघडणे बरोबर नाही.’

परत थोड्या वेळाने त्याला वाटले, ‘एक क्षणभरच उघडून बघू आणि नंतर परत होती तशी ती बंद करून ठेवू’

…त्याने डबी उघडली आणि झटक्यात बंदही केली. पण तेवढ्या वेळात त्या डबीतील उंदीर बाहेर पळाला होता. त्याने त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ !

तो तसाच त्या महात्म्याच्या मित्राकडे जाऊन पोहोचला. ती डबी युसूफने त्यांच्या हाती दिली. ते देखील संत होते. त्यांनी झाला प्रकार ओळखला. ते युसूफला म्हणाले, “म्हणजे असे घडले तर, आता काही तुला जुनून शिकवण देणार नाही, परमज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे तर मनावर खूप संयम हवा. तुझ्याविषयी जुनूनला शंका वाटली म्हणूनच तुला त्याने माझ्याकडे पाठविलेले दिसते. तुझ्या गुरुकडे परत जा.”

…खजील होऊन युसूफ गुरुकडे परतला. तेव्हा ते म्हणाले, “तू एक अनमोल संधी गमावली आहेस. मी साधा एक उंदीर तुला सांभाळायला दिला होता, तो सुद्धा तू नीट सांभाळू शकला नाहीस. मग तू परमज्ञान, दिव्य सत्य कसे सांभाळशील? जा, मनावर संयम मिळवण्याचा प्रयत्न कर आणि मग परत ये.”

युसूफ नंतर खरोखर स्वत:वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. वर्षानुवर्षे गेली. त्याची स्वत:ची जेव्हा खात्री पटली तेव्हा, तो परत महात्मा जुनून यांच्याकडे आला. युसूफचे बदललेले रूप पाहून तेही प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला ज्ञानदीक्षा दिली. कालांतराने युसूफ इस्लाममधील एक महान संत बनले.

– श्रीमाताजी

(CWM 09 : 67-71)