(मातृमंदिराच्या पायाचा चिरा बसवतांना माताजींनी दिलेला संदेश)

“दिव्यत्वाप्रत ऑरोविलची जी अभीप्सा आहे त्या अभीप्सेचे मातृमंदिर हे जिवंत प्रतीक ठरो.”

*

मातृमंदिर हे ऑरोविलचा आत्मा असेल.

जेवढ्या लवकर हा आत्मा येथे विराजमान होईल तेवढे ते प्रत्येकासाठी आणि विशेषेकरुन ऑरोविलवासीयांसाठी अधिक श्रेयस्कर राहील.

*

मानवाच्या पूर्णत्वप्राप्तीच्या अभीप्सेला, भगवंताने दिलेल्या प्रत्युत्तराचे प्रतीक बनणे ही मातृमंदिराची मनिषा आहे.

भगवंताशी झालेले ऐक्य, प्रगमनशील मानवी ऐक्याच्या रूपात अभिव्यक्त होत राहील.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 223-224)

ऑरोविलच्या व्याख्येतच ‘सौहार्दपूर्ण वातावरण’ अंतर्भूत आहे; अशा वातावरणाचे साम्राज्य येथे प्रस्थापित होण्यासाठी पहिले पाऊल हे आहे की, ज्याने त्याने आपल्या स्वत:मध्येच संघर्ष आणि गैरसमजांचे कारण शोधले पाहिजे.

संघर्ष आणि गैरसमज ह्याची कारणे नेहमीच दोन्ही बाजूंनी असतात आणि इतरांकडून कशाची अपेक्षा करण्यापूर्वी, प्रत्येकाने स्वत:मधील त्या कारणांचे निर्मूलन करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावयास हवेत.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 201)

श्रीअरविंदांच्या क्रांतदर्शी दृष्टीला जे दर्शन झाले होते त्याला मूर्त रूप देण्याचे कार्य श्रीमाताजींवर सोपविण्यात आले होते. नवचेतनेला अभिव्यक्त करणाऱ्या आणि तिला मूर्त रूप देणाऱ्या एका नवीन जगताच्या, एका नव्या मानवतेच्या, एका नवीन समाजाच्या निर्मितीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. मूलत:च हा एक असा सामूहिक आदर्श आहे की, जो सामूहिक प्रयत्नांसाठी साद घालत आहे; जेणेकरून मानवी पूर्णत्व सर्वांगाने प्रत्यक्षात येईल.

श्रीमाताजींनी केलेली आश्रमाची स्थापना व त्याची उभारणी हे या ध्येयपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते. मानववंशाच्या सामूहिक जीवनात, शरीर आणि अंतरात्मा, प्रकृती आणि पुरुष, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यात सुमेळ प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा पाया व्यापक करू पाहणारा ऑरोविल हा प्रकल्प होय. ते अधिक बाह्य असे पुढचे पाऊल होय.

*

युनेस्कोसाठी संदेश

अतिमानसिक वास्तवाचे आगमन पृथ्वीवर त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविलची निर्मिती आहे.

जग जसे असावयास हवे तसे ते नाही असे ज्यांना वाटते, त्या सर्वांच्या सहकार्याचे येथे स्वागत आहे.

प्रत्येकाला हे माहीत असायलाच हवे की, त्याला मृत्युपंथाला लागणाऱ्या जुन्यापुराण्या जगामध्ये सहयोगी व्हावयाचे आहे का जन्मण्याच्या तयारीत असणाऱ्या नूतन अशा, अधिक चांगल्या जगतासाठी कार्य करावयाचे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 204), (CWM 13 : 215)

आश्रम ही मध्यवर्ती चेतना आहे, तर ऑरोविल ही अनेक बाह्य अभिव्यक्तींपैकी एक आहे. दोन्ही ठिकाणी दिव्यत्वासाठीच कर्म केले जाते.

आश्रमवासीयांना त्यांचे त्यांचे कार्य असते आणि ते इतके कार्यव्याप्त आहेत की त्यातील बहुतेकांकडे ऑरोविलला देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असलाच पाहिजे; कोणत्याही सुयोग्य संघटनेसाठी (Organisation) ही बाब अनिवार्य आहे.

*

प्रश्न : आश्रमाचा आदर्श आणि ऑरोविलचा आदर्श यामध्ये मूलत: कोणता फरक आहे?

श्रीमाताजी : दोहोंमध्ये भविष्यकाळासंबंधीच्या आणि ईश्वरसेवेविषयीच्या दृष्टिकोनात कोणताही मूलभूत फरक नाही.

पण असे समजले जाते की, आश्रमातील लोकांनी त्यांचे जीवन योगासाठी समर्पित केलेले असते; तर ऑरोविलवासी होण्याच्या प्रवेशपात्रतेसाठी, व्यक्तीमध्ये मानवतेच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयोग करण्याचा शुभ संकल्प असणे एवढीच गोष्ट पुरेशी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 205), (CWM 13 : 203-04)

०१) प्रश्न : ऑरोविलच्या निर्मितीसाठी कोणी पुढाकार घेतला आहे?
श्रीमाताजी : परमेश्वराने.

०२) प्रश्न : ऑरोविलच्या अर्थसाहाय्यामध्ये कोणाचा सहभाग आहे?
श्रीमाताजी : परमेश्वराचा.

०३) प्रश्न : एखाद्या व्यक्तीला ऑरोविलमध्ये राहावयाचे असेल तर त्यासाठी त्याच्याकडून काय अपेक्षित आहे?
श्रीमाताजी : सर्वोच्च पूर्णता गाठण्याचा प्रयत्न करणे.

०४) प्रश्न : एखाद्याला ऑरोविलमध्ये राहवयाचे असेल तर तो योगभ्यासाचा विद्यार्थी असलाच पाहिजे का?
श्रीमाताजी : अखिल जीवनच योग आहे. त्यामुळे हा सर्वोच्च योग आचरल्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही.

०५) प्रश्न : ऑरोविलमध्ये आश्रमाची भूमिका काय असेल?
श्रीमाताजी : परमेश्वराची जशी इच्छा असेल तशी.

०६) प्रश्न : ऑरोविलमध्ये शिबिरादिंसाठी मैदान असेल का?
श्रीमाताजी : सर्व गोष्टी जशा व जेव्हा असावयास पाहिजेत तशा व तेव्हा त्या असतील.

०७) प्रश्न : ऑरोविलमध्ये कौटुंबिक जीवन चालू राहील काय?
श्रीमाताजी : एखादी व्यक्ती जर त्या गोष्टीच्या अतीत गेलेली नसेल तर.

०८) प्रश्न : ऑरोविलमध्ये एखादी व्यक्ती स्वत:च्या धर्माचे पालन करू शकेल काय?
श्रीमाताजी : एखादा जर त्या गोष्टीच्या अतीत गेलेला नसेल तर.

०९) प्रश्न : ऑरोविलमध्ये एखादा नास्तिकमताचा असू शकेल काय?
श्रीमाताजी : एखादा जर त्या गोष्टीच्या अतीत गेलेला नसेल तर.

१०) प्रश्न : ऑरोविलमध्ये सामाजिक जीवन असेल काय?
श्रीमाताजी : जर एखादा त्या गोष्टीच्या अतीत गेलेला नसेल तर.

११) प्रश्न : ऑरोविलमध्ये अनिवार्य असे सामूहिक उपक्रम असतील का?
श्रीमाताजी : येथे काहीही सक्तीचे असणार नाही.

१२) प्रश्न : ऑरोविलमध्ये पैशांचा विनियोग केला जाईल काय?
श्रीमाताजी : नाही. ऑरोविलचे आर्थिक व्यवहार फक्त बाह्य जगाबरोबरच असतील.

१३) प्रश्न : ऑरोविलमध्ये कामाची व्यवस्था आणि त्याची विभागणी कशी केली जाईल?
श्रीमाताजी : पैसा हा यापुढे सर्वोच्च अधिपती असणार नाही. व्यक्तीची भौतिक संपदा आणि त्याचे सामाजिक स्थान यापेक्षादेखील व्यक्तीचे व्यक्ती म्हणून जे मूल्य आहे त्याला कितीतरी अधिक प्रमाणात महत्त्व मिळेल. येथे काम करणे हे व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचे साधन नसेल तर समस्त समूहाची सेवा करता करताच, कर्म हे त्या व्यक्तीच्या आत्माविष्काराचा एक मार्ग बनेल, आणि त्या व्यक्तीचा विचार करता, हे कर्म त्याच्यामधील सुप्त क्षमता आणि संभाव्यता यांच्या विकसनाचा मार्ग बनेल, ते प्रत्येक व्यक्तीस त्याच्या त्याच्या कृतीचे क्षेत्र आणि उदरनिर्वाहाचे साधन पुरवेल.

१४) प्रश्न : ऑरोविलमधील रहिवाशांचे बाह्य जगाशी कशाप्रकारचे संबंध असतील?
श्रीमाताजी : प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ऑरोविलच्या रहिवाशांपैकी प्रत्येक व्यक्तीचे बाह्य जगाशी असणारे संबंध हे त्या व्यक्तीची वैयक्तिक अभीप्सा आणि त्या व्यक्तीचे ऑरोविलमध्ये असणारे कार्य यानुसार असतील.

१५) प्रश्न : ऑरोविलमधील जमीनजुमला आणि इमारती, बांधकामे ही कोणाच्या मालकीची असतील?
श्रीमाताजी : परमेश्वराच्या मालकीची.

– श्रीमाताजी
(CWM13 : 188 -190)

तुमची लौकिक जीवने, तुमच्या ऐहिक आवडीनिवडी यांचा मेळ घालणे, जीवनातील अडीअडचणी, यशापयश, ह्या साऱ्यांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी दोघांनी सहचर बनणे – हा विवाहसंस्थेचा खरा पाया आहे पण हे एवढेच पुरेसे नाही ह्याची तुम्हाला जाणीव आहेच.

दोघांच्या संवेदना एकसारख्या असणे, दोघांची सौंदर्यविषयक अभिरुची सारखीच असणे, त्याचा एकत्रित आस्वाद घेणे, दोघांना एकसमान गोष्टी भावणे, परस्परांनी परस्परांच्या माध्यमातून व परस्परांसाठी जीवन जगणे हे उत्तम आहे, ते आवश्यकही आहे परंतु ते पुरेसे नाही.

गहनतर अशा भावनांमध्ये एकत्व असणे, जीवनाच्या सर्व आघांतामध्येदेखील परस्परांबद्दलची न डळमळणारी आपुलकी व तोच हळुवारपणा, संवेदनशीलता कायम राखणे, दुःखनिराशा, क्षोभ यांसारख्या क्षणीदेखील एकमेकांच्या सोबत असणे, कायमच आणि प्रत्येक प्रसंगांमध्ये आनंदी, अगदी आनंदी, एकत्र असणे; प्रत्येकच परिस्थितीत परस्परांविषयी समचित्त, शांत आणि आनंदी असणे – हे सारे चांगले आहे, चांगलेच आहे, आवश्यकही आहे परंतु ते पुरेसे नाही.

या सगळ्याच्या पलीकडे, जन्म, देश, भोवताल, शिक्षण या परिस्थितीपासून सर्वस्वी स्वतंत्र, त्यांच्या अतीत, एक चिरंतन प्रकाश, आपल्या अस्तित्वाचे परमोच्च सत्य, आपल्या अंतरंगांत खोलवर, केंद्रस्थानी, तसेच आपल्या अस्तित्वाच्या शिखरावर विराजमान असते. हे परमोच्च सत्यच आपल्या आध्यात्मिक विकासाचे उगमस्थान आहे, कारण आहे आणि स्वामी आहे. तेच आपल्या जीवनांना चिरस्थायी अशी दिशा देत असते; ह्याच सत्याकडून आपली नियती ठरवली जाते; ह्या सत्यचेतनेच्या ठायीच आपण एकत्व पावावयास हवे. अभीप्सा आणि आरोहण यांबाबतीतही परस्परांत एकत्व असणे, आध्यात्मिक मार्गावर दोघांनी समान गतीने वाटचाल करणे, हे चिरस्थायी अशा एकत्वाचे गुपीत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 236-37)

ऑरोविलमधील अन्नाविषयीची संकल्पना स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात : काही गोष्टी खरोखरच रोचक असतात; सर्वप्रथम, उदाहरणादाखल, मला असे वाटते की, ऑरोविलमध्ये प्रत्येक देशाचा त्याचा त्याचा एक मंडप असेल, आणि त्या मंडपात त्या त्या देशाचे खाद्यपदार्थ असतील – जसे की, जपानी लोकांना वाटले तर ते त्यांच्या मंडपात जपानी पद्धतीचे खाणे खाऊ शकतील. तसेच तेथे भविष्यकालीन अन्नाविषयी संशोधन करण्याचाही काही प्रयत्न केला जाईल.

पचनाची संपूर्ण प्रक्रियाच तुमच्यामध्ये एक प्रकारचे जडत्व आणते – त्यामध्ये व्यक्तीचा खूप वेळ व अधिक शक्ती खर्ची पडते – तुम्हाला असे काही द्यावयास हवे की जे त्वरित पचेल, पचायला हलके असेल. ज्याप्रमाणे सध्या काही गोष्टी तयार केल्या जात आहेत. उदाहरणार्थ, विविध पदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणांत पोषक द्रव्ये आढळतात, आणि ती थोडीशी पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी खूप जास्त प्रमाणांत अन्नाचे सेवन करावे लागते. पण आता रसायनशास्त्र खूप प्रगत झाले असल्याने तीच गोष्ट साध्यासोप्या रीतीने बनू शकते. ते आता जीवनसत्वांच्या (Vitamins) आणि प्रथिनांच्या (Proteins) गोळ्या तयार करत आहेत की ज्या थेटपणे पचू शकतात. खरंतर हे आधीच घडावयास हवे होते.

पण लोकांना हे आवडत नाही कारण त्यांना खाण्यामध्येच जास्त आनंद मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही खाण्यात आनंद घेईनासे होता, तेव्हाही तुम्हाला पोषकद्रव्यांची गरज असतेच व तुम्हाला वेळही दवडायचा नसतो. खाण्यात, पचविण्यात आणि अशा इतरही अनेक गोष्टीत प्रचंड वेळ खर्च होतो. म्हणून ऑरोविलमध्ये मला एक प्रायोगिक स्वयंपाकघर हवे आहे, संशोधन करण्यासाठी एक प्रकारची पाकशास्त्राची प्रयोगशाळा !

– श्रीमाताजी
(CWM 13 : 263)

प्रश्न : धर्मसंकल्पनेचा संबंध बरेचदा भगवंताच्या शोधाशी जोडला जातो. फक्त ह्याच संदर्भात धर्म जाणून घ्यावा काय? वस्तुस्थिती पाहता, आजकाल धर्माची इतरही रूपे अस्तित्वात आहेत ना?

श्रीमाताजी : विश्वातील किंवा जगतातील एखादी संकल्पना जेव्हा एकमेवाद्वितीय सत्य या स्वरूपात प्रस्तुत केली जाते तेव्हा तिला आपण ‘धर्म’ असे नाव देतो. त्यावर व्यक्तीने निरपवादपणे श्रद्धा ठेवलीच पाहिजे अशी अपेक्षा असते, कारण बहुतेक वेळी असे सत्य हे जणूकाही ईश्वराच्या दर्शनाचाच परिणाम आहे अशा रीतीने घोषित केले जाते.

बहुतेक धर्म ईश्वराच्या अस्तित्वाला पुष्टी देतात आणि त्याची आज्ञा पाळण्यासाठी नियमही घालून देतात. पण काही धर्म असेही असतात की, जे ईश्वर ही संकल्पना मानत नाहीत. अशा काही सामाजिक – राजकीय संघटनादेखील असतात, ज्या एखाद्या आदर्शाच्या किंवा प्रांताच्या नावाखाली चालतात व त्यांचे अनुशासन पाळावे म्हणून धर्मासारखाच अधिकार सांगतात. तसा त्यांचा दावा असतो.

सत्यशोधन आणि त्याप्रत पोहोचणे यागोष्टी आपापल्या मार्गाने मुक्तपणे अनुसरता येणे हा प्रत्येक मनुष्याचा अधिकारच आहे. परंतु प्रत्येकाला हे ठाऊक असायला हवे की, त्याचा स्वत:चा शोध हा केवळ त्याच्यासाठी चांगला आहे आणि तो त्याने इतरांवर लादता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207)

इत:पर कोणतीही व्यक्तिगत मालमत्ता न बाळगल्यामुळे येणारी मुक्ती आणि आनंद काय असतो तो जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी, ऑरोविल हे आदर्श स्थान आहे.

(CWM 13 : 202)

*

ऑरोविलमध्ये व्यक्ती सुखसोयी आणि इच्छातृप्ती या गोष्टींसाठी येत नाही; चेतनेचा विकास करण्यासाठी तसेच ज्या परमसत्याचा साक्षात्कार करून घ्यावयाचा आहे, त्या परमसत्याला समर्पित होण्यासाठी ती येत असते. ऑरोविलच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्यासाठी नि:स्वार्थीपणा ही पहिली आवश्यक अट आहे.

(CWM 13 : 197)

आपण सुव्यवस्था, सुमेळ, सौंदर्य… आणि सामुदायिक अभीप्सा यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे – तूर्तास तरी ह्या गोष्टी इथे नाहीत. इतरांकडून जशा वागण्याची आपण अपेक्षा बाळगतो त्याचे उदाहरण आपण स्वत: घालून देणे, हे आपले संयोजक या नात्याने कर्तव्य आहे. आपण वैयक्तिक प्रतिक्रियांच्या वर उठले पाहिजे. दिव्य संकल्पाशी अनन्यभावे आपला सूर जुळवून घेत, आपण त्या दिव्य इच्छेचे सालस उपकरण बनून राहिले पाहिजे. आपण निर्व्यक्तिक असले पाहिजे; कोणत्याही व्यक्तिगत प्रतिक्रियेविना असले पाहिजे.

आपण सर्वांगाने प्रांजळ असले पाहिजे. भगवंत जे इच्छितो, तसेच होवो. जर आपण तसे होऊ शकलो तर, आपण जसे असायला हवे तसे असू, आणि आपल्याला तेच तर बनायचे आहे. उर्वरित सर्व गोष्टी, सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करूया.

हे सोपे नाही हेही मी जाणते, पण आपण इथे सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलो नाही; साधे सोपे जीवन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी सारे जग आहे. ऑरोविलमध्ये येणे ह्याचा अर्थ सहजसोप्या, आरामशीर जीवनाकडे वळणे नव्हे, ह्याची जाणीव लोकांना व्हावी, हे मला अभिप्रेत आहे. ‘ऑरोविलमध्ये येणे’ ह्याचा अर्थ प्रगतीसाठी भगीरथप्रयत्नांना सिद्ध होणे हा होय. आणि ह्याच्याशी जुळवून घेण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनी सोडून जावे.

लोकांना हे माहीत असावे की, ऑरोविलमध्ये येणे म्हणजे प्रगती करण्यासाठी जणु अतिमानवीय प्रयत्न करणे होय.

आपल्या वृत्तीच्या आणि प्रयत्नाच्या मन:पूर्वकतेमुळे, प्रामाणिकतेमुळे खरा फरक पडतो. लोकांना ही जाणीव असावी की, अप्रामाणिकता व मिथ्यत्वाला इथे थारा नाही – ह्यांचे येथे काही चालत नाही….

आपण इथे अतिमानवतेची तयारी करण्यासाठी आहोत, खुशालचेंडू जीवन जगण्यासाठी किंवा पुन्हा आपल्या वासनाविकारांच्या गर्ततेत जाण्यासाठी नव्हे, नक्कीच नाही.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple, April 4, 1972)