साधक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान बालकदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलामध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण सत्य हे त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेदित होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते. मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये (psychic) असणारी दिव्यत्वाची ‘उपस्थिती’. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती. आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेऊ लागतात, तेव्हापासून या चैत्य पुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात. तुम्ही जर अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये काय चालू आहे याविषयी सांगू शकाल…

डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – लहान मुले इतकी खरी असतात, ती जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर, खूप दूरवर निघून गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते, असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी [CWM 04 : 26-27]

हे परमेश्वरा, अस्तित्वाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, सर्व कृतींमध्ये, सर्व वस्तुंमध्ये, सर्व जगतांमध्ये व्यक्ती तुला (ईश्वराला) भेटू शकते, तुझ्याशी एकत्व पावू शकते कारण, तू सर्वत्र, सदोदित विद्यमान आहेस. एखादी व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या एखाद्या कृतीद्वारे तुझ्याप्रत पोहोचलेली असते किंवा या ब्रह्मांडातील एखाद्या जगतामध्ये तुला भेटलेली असते आणि ती व्यक्ती म्हणते, “मला तो परमेश्वर गवसला.” आणि मग अशी व्यक्ती अधिक शोध घ्यायचा थांबवते; त्या व्यक्तीला असे वाटते की, जणू ती मानवी संभाव्यतांच्या शिखरावरच जाऊन पोहोचली आहे. पण असे समजणे ही केवढी मोठी चूक आहे.

सर्व स्थितीमध्ये, सर्व प्रकारांमध्ये, सर्व वस्तुमात्रांमध्ये, सर्व जगतांमध्ये, सर्व घटकांमध्ये आम्ही तुझा शोध घेतला पाहिजे आणि तुझ्याशी एकत्व पावले पाहिजे आणि त्यामधून, एखादाही घटक जरी बाजूला राहून गेला, मग भले तो कितीका लहान असेना, तर मग ते सायुज्य पूर्ण होऊ शकणार नाही, मग तो साक्षात्कार परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून तुझा शोध लागणे ही अनंत अशा शिडीवरील केवळ एक सुरुवातीची पायरी आहे.

हे मधुर स्वामी, सार्वभौम रूप-परिवर्तनकारा, सर्व प्रकारच्या दुर्लक्षाची, निष्काळजीपणाची, सर्व आळशी निरुत्साहाची परिसमाप्ती कर, आमच्या सर्व ऊर्जा तू एकत्रित कर, आणि त्यांचे दुर्दम्य, अजय अशा संकल्पशक्तीमध्ये परिवर्तन कर.

हे प्रकाशा, प्रेमा, अनिर्वचनीय शक्तिरूपा, तू त्यांच्यामध्ये शिरून त्यांचे रूपांतर करावेस म्हणून, सर्व अणुरेणू तुझ्याप्रत आकांत करत आहेत.

सर्वांना सायुज्यतेचा परम आनंद प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 200)

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १२

ईश्वर स्वत:बरोबर परिपूर्ण स्थिरता आणि शांती घेऊन येत असतो. हे खरे आहे की, भक्तांचा एक विशिष्ट असा वर्ग स्वत:चे एक वेगळेच चित्र निर्माण करतो; ते उड्या मारतात, रडतात, हसतात, गातात. त्यांचे म्हणणे असे असते की, ह्या साऱ्या गोष्टी ते भक्तिच्या आवेशात करत असतात. पण वास्तविक ही मंडळी दिव्यत्वामध्ये वास करत नसतात तर ते बहुतांश प्रमाणात प्राणिक जगतामध्ये जगत असतात….

तुमच्यापाशी सशक्त देह आणि सुदृढ स्नायू असले पाहिजेत. तुमच्या बाह्य अस्तित्वामध्येदेखील समत्वाचा भक्कम पाया असलाच पाहिजे. तुमच्यापाशी जर असा भक्कम पाया असेल तर, तुम्ही अंतरंगामध्ये भावनांचे विश्व सामावून घेऊ शकाल आणि तरीही तुम्ही कोणताही आक्रोश करणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावावेग व्यक्त करू शकत नाही, परंतु तुम्ही तो सुंदर रीतीने, सुसंवादी पद्धतीने व्यक्त करू शकता. रडणे, आरडाओरडा करणे किंवा नाचणे-उडणे या नेहमीच दुर्बलतेच्या खुणा असतात; मग ही दुर्बलता प्राणिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक प्रकृतीची असेल; पण स्तर कोणताही असला तरी सर्वच स्तरावर या कृती म्हणजे स्व-संतुष्टतेच्या कृती असतात. जी व्यक्ती नाचते, उड्या मारते, आरडाओरडा करते त्या व्यक्तीला असे वाटत असते की, तिचा हा आवेग काहीतरी असामान्य आहे. अशावेळी खरेतर त्या व्यक्तीची प्राणिक प्रकृती त्यामध्ये आनंद घेत असते.

जर तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुमचे नाहीतर तुमचे तुकडे तुकडे होऊन जातील. काही लोकांनी असे विचारले, ”ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे उत्तर, ”अजून तुम्ही तयार नाही,” हे आहे. सद्वस्तुच्या अवतरणाचा एखादा अल्पसा थेंब जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आरडाओरडा करायला लावत असेल तर, जर संपूर्ण सद्वस्तुच खाली अवतरली तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे देह, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नाही त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचा अर्थ असा की, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका तर, शांती आणि स्थिरता धारण करून वाट पाहा.” याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. परंतु ज्यांच्याकडे असा आवश्यक पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही उलट सांगतो की, अभीप्सा बाळगा आणि खेचून घ्या. कारण अशा व्यक्तीच ते ग्रहण करू शकतील आणि तरीही ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या त्या शक्तींमुळे त्या विचलित होणार नाहीत.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 10-11)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ११

ईश्वरी इच्छा आपल्याकडून केव्हा कार्य करवून घेत आहे, हे आपल्याला कसे कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ईश्वरी इच्छा ओळखणे अवघड नसते. ती निर्विवाद असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ईश्वरी इच्छेच्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही जर अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर मग तुम्ही खूपच अस्वस्थ होता. तुमच्या अस्वस्थतेसाठी तुम्ही काही भौतिक कारणे देऊ पाहाल आणि त्या मार्गावर तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः तुम्ही सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत राहता आणि तरीही तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि तुम्ही थांबलात व तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळेल आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतील. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशीही अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबता आणि त्या अस्वस्थतेचे कारण शोधू लागता तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा, हे जे काही चालले आहे त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे ? शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो.

…एखादी गोष्ट ईश्वराकडून आलेली आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकते. तुम्हाला मोकळे वाटते, तुम्ही स्वस्थ असता, तुम्ही शांत असता. पण जेव्हा काहीतरी स्वत:हून तुमच्या समोर येते आणि तुम्ही त्यावर झडप घालता आणि ओरडता, “हां, शेवटी मला जे हवे होते ते मला मिळालेच,” तेव्हा तुम्ही नक्की ओळखले पाहिजे की, हे ईश्वराकडून आलेले नाही. समत्व-वृत्ती ही ईश्वराशी एकत्व आणि सायुज्यता साधण्याची एक अत्यावश्यक अट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-10)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०९

(महत्त्वाकांक्षा आणि अप्रामाणिकपणा या धोक्यांचा विचार आपण काल केला, आता आणखी एक धोका विचारात घेऊ.)

आणखी एक धोका असतो. तो धोका लैंगिक आवेगांबाबत असतो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये योग तुम्हाला अगदी उघडावागडा करतो आणि तुमच्यामध्ये सुप्त असलेले सारे आवेग आणि इच्छावासना बाहेर काढतो. कोणत्याही गोष्टी लपवायच्या नाहीत किंवा तशाच बाजूला सोडून द्यायच्या नाहीत हे तुम्ही शिकायला हवे. तुम्ही त्यांना सामोरे गेले पाहिजे आणि जिंकले पाहिजे आणि त्यांची पुनर्घडण केली पाहिजे.

योगाचा पहिला परिणाम असा होतो की, मानसिक नियंत्रण सुटते आणि सुप्तपणे पडून असलेल्या साऱ्या वासना अचानकपणे मोकाट सुटतात आणि त्या वर उफाळून येतात आणि व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावर त्या आक्रमण करतात. जोपर्यंत मानसिक नियंत्रणाची जागा ईश्वरी नियंत्रणाने घेतली जात नाही तोपर्यंत एक संक्रमणकाळ असतो की, जेव्हा तुमची प्रामाणिकता आणि तुमचे समर्पण यांचा कस लागतो. लोक लैंगिक आवेगासारख्या आवेगांची खूप जास्त प्रमाणात दखल घेतात आणि सहसा त्यामुळेच या आवेगांना बळ मिळते. लोक त्या आवेगांचा खूप जोरदार प्रतिकार करतात आणि जबरदस्तीने त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाबून ठेवतात. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार कराल आणि म्हणाल, ”मला ही गोष्ट नको आहे, मला ही गोष्ट नको आहे,” तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही त्याने बांधले जाता. तुम्ही काय केले पाहिजे ? तर ती गोष्ट शक्यतो तुमच्यापासून दूर ठेवा, तुमचा त्या गोष्टीशी असलेला संबंध तोडा, तिची शक्य तेवढी कमीत कमी दखल घ्या आणि जरी तुमच्या मनात त्या गोष्टीचा विचार आलाच तरीही नि:संग राहा आणि त्यांच्याबाबत निश्चिंत राहा.

योगाच्या दबावामुळे जे आवेग आणि इच्छावासना पृष्ठभागावर येतील, त्या जणू काही तुम्हाला परक्या आहेत किंवा त्या बाह्य जगाशी संबंधित आहेत असे समजून, अनासक्त वृत्तीने आणि शांत चित्ताने त्यांना सामोरे जा. त्या ईश्वरार्पण केल्या पाहिजेत म्हणजे मग ईश्वर त्यांना आपल्या हाती घेईल आणि त्यांच्यात रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसं आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.

म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील.

त्यांच्या लेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील.

त्यांच्या लेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.

…जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशाच व्यक्ती येथे आम्हाला हव्या आहेत.

इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 351-352)