आपण हे आधीच पाहिले आहे की, एका नवीन प्रजातीचा उदय ही नेहमीच या पृथ्वीवर एका नवीन तत्त्वाच्या, चेतनेच्या एका नवीन पातळीच्या, एका नव्या शक्तीच्या वा सामर्थ्याच्या आविष्करणाची घोषणा असते. पण त्याच वेळी, ही नवी प्रजाती, जेव्हा आजवर आविष्कृत न झालेली शक्ती वा चेतना प्राप्त करून घेते, तेव्हा ती तिच्या अगदी लगतच्या आधीच्या प्रजातीची वैशिष्ट्ये म्हणून गणल्या जाणाऱ्या एक वा अनेक निपुणता, सिद्धी, संपदा (perfections) गमावून बसण्याची शक्यता असते.

उदाहरणादाखल, प्रकृतीच्या विकसनाची अगदी अलीकडची पायरी पाहू. मनुष्य आणि त्याच्या निकटचा पूर्ववर्ती असणारा वानर ह्यामधील लक्षणीय फरक कोणते आहेत? आपल्याला माकडांमध्ये पूर्णत्वाच्या जवळ जाणारी शारीरिक क्षमता आणि प्राणशक्ती आढळून येते; त्या निपुणतेचा नव्या प्रजातीमध्ये (माणसामध्ये) त्याग करावा लागला आहे. माणसामध्ये, आता झाडांवर ते सरासरा चढणे नाही, डोंगरदऱ्यांमधून केलेल्या कसरती नाहीत, या कड्यावरून त्या कड्यावर मारलेल्या उड्या नाहीत; पण त्या बदल्यात त्याला बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, समन्वयाची, निर्मितीची शक्ती लाभलेली आहे. माणसाच्या आगमनाबरोबर या पृथ्वीवर मनाच्या, बुद्धीच्या जीवनाचा उदय झाला.

माकडामध्ये ज्याप्रमाणे मानसिक क्षमता सुप्तावस्थेत असतात त्याप्रमाणेच, मनुष्य हा मूलत: मनोमय जीव असल्यामुळे, जर त्याच्या शक्यता मनोमयापाशीच विराम न पावता, त्याला स्वत:मध्ये मनोमय जीवनाच्या पलीकडची इतर विश्वं, इतर क्षमता, चेतनेच्या इतर पातळ्या प्रतीत होत असतील तर, ते दुसरे तिसरे काही नसून भवितव्याचे आश्वासन असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 162-163)

प्रश्न : तुम्ही येथे असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो,” पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते..

श्रीमाताजी : हो पूर्णपणे, ईश्वरी कृपा कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते कसे वितळून जाईल तसे होते.

मी आत्ता तेच सांगत होते. जर तुमच्याकडे पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे ‘काहीतरी’ खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते.

म्हटले तर, एक अगदी साधे उदाहरण देता येईल; पण त्यामुळे तुम्हाला मुद्दा नीट समजेल. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तीने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तीच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तीने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतीवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तीच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणाचा जीव दगावत नाही.

येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तीचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)

कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो.

ज्यामुळे शरीरात समतोलपणा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची वाढ होण्यास मदत होईल अशाच रीतीने सर्व शारीरिक क्रियांची आखणी केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, कामवासनेच्या उपभोगासकट सर्व प्रकारच्या सुखतृष्णेपासून व्यक्तीने दूर राहिले पाहिजे. कारण कामोपभोगाची प्रत्येक क्रिया म्हणजे मृत्यूकडे नेणारे एक पाऊल आहे. आणि म्हणूनच फार फार प्राचीन काळापासून सर्व पवित्र आणि गुप्त संप्रदायांत, अमरत्वाच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रत्येक साधकाला कामवासना-तृप्तीस पूर्ण बंदी असे. कारण अशा कामतृप्तीच्या मागोमाग कमी-अधिक अचेतनेचा काळ येतो, या स्थितीत सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रभावांना द्वार खुले होते आणि मनुष्याची जाणीव खाली उतरते.

तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर अतिमानसिक जीवन जगण्याच्या इच्छेने स्वत:ची तयारी करावयाची असेल, तर त्याने सुखोपभोगासाठी, एवढेच नव्हे, तर आराम म्हणून किंवा ताण कमी करण्याच्या निमित्ताने सुद्धा आपली जाणीव ढिसाळपणा व निश्चेतनतेपर्यंत कधीच खाली घसरू देता कमा नये. व्यक्तीने शक्ती आणि प्रकाश यामध्येच विश्रांती मिळविली पाहिजे, अंधकार किंवा दुर्बलता यांत नव्हे.

म्हणूनच प्रगतीची आस बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ब्रह्मचर्यत्वाचे व्रत असले पाहिजे; पण विशेषत: ज्यांना स्वत:ला अतिमानसिक शक्तीच्या आविष्कारासाठी तयार करावयाचे असेल, त्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याची जागा संपूर्ण परिवर्जनाने (abstinence) घेतली पाहिजे. हे परिवर्जन बळजबरीने व दमनाने नव्हे तर, एक प्रकारच्या आंतरिक किमयेमुळे साध्य झाले पाहिजे. सर्वसाधारणपणे प्रजननार्थ केलेल्या कृतीमध्ये ज्या शक्ती उपयोगात येतात त्या शक्तींचे, विकास आणि संपूर्ण रूपांतरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शक्तींमध्ये रूपांतर झाल्याचा परिणाम म्हणून ही आंतरिक किमया उदयास येते. हे तर उघडच आहे की, हा परिणाम संपूर्ण व खरोखरीच हितकारी होण्यासाठी मानसिक, प्राणिक जाणिवेतून इतकेच नव्हे तर, शारीरिक इच्छेतूनही सर्व कामप्रवृत्ती व कामेच्छा समूळ नष्ट व्हायला पाहिजेत. सर्व आमूलाग्र व चिरस्थायी रूपांतरण हे आतून बहिर्गामी दिशेने अग्रेसर होते त्यामुळे कोणतेही बाह्य रूपांतरण हे वरील प्रक्रियेचा स्वाभाविक व जवळजवळ अटळ असा परिणाम असते.

मानववंश जसा आहे तसाच चिरस्थायी राखण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, त्या मागणीपुढे मान तुकवून, तिचे हे साध्य यशस्वी व्हावे म्हणून, हा देह प्रकृतीला देऊ करावयाचा का; एका नूतन वंशाच्या निर्मितीच्या दिशेने टाकावयाचे पाऊल बनण्यासाठी, ह्या देहाची तयारी करावयाची ही निर्णायक निवड करावयास हवी. कारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणे शक्य नाहीत; व्यक्तीला भूतकालीन मानववंशाचा एक भाग बनून राहावयाचे आहे की, भावीकाळातील अतिमानववंशाशी संबंधित व्हावयाचे आहे, हे व्यक्तीने प्रत्येक क्षणी ठरवावयाचे आहे.

– श्रीमाताजी

आंतरिक सत्याविषयी सजग होणे

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी

मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबत खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता. ही खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे.

त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली.

प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, ”ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”

जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत, अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 157-158)

जर का कोणी ईश्वरावर प्रेम करेल तर हळूहळू, या प्रेमाच्या प्रयत्नातून ती व्यक्ती अधिकाधिक ईश्वरसदृश होऊ लागते. आणि नंतर ती त्या दिव्य प्रेमाशीच एकरूप होते तेव्हा, तिला दिव्य प्रेम काय असते ह्याची जाण येते.
*
समग्र जीवन ईश्वराभिमुख झालेले, ईश्वराप्रत समर्पित झालेले, ईश्वराच्या सेवेमध्ये रममाण झालेले असणे म्हणजेच कणाकणाने, क्रमश: ईश्वराची अभिव्यक्ती होत जाणे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 106)

सत्यशोधन आणि त्याप्रत पोहोचणे या गोष्टी आपापल्या मार्गाने मुक्तपणे अनुसरता येणे, हा प्रत्येक मनुष्याचा अधिकारच आहे. परंतु प्रत्येकाला हे ठाऊक असावयास हवे की, त्याला लागलेला शोध हा केवळ त्याच्यासाठीच उचित आहे आणि तो त्याने इतरांवर लादता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207)

जोपर्यंत धर्म अस्तित्वात राहतील तोपर्यंत समतोल राखण्यासाठी नास्तिकतावाद अपरिहार्य आहे. नंतर मात्र धार्मिकता आणि नास्तिकता या दोहोंनी निवृत्त होऊन सत्याचा प्रामाणिक आणि निरपेक्षपणे शोध घेण्यासाठी आणि या शोधाच्या उद्दिष्टाला पूर्ण समर्पण करण्यासाठी जागा करून देणे आवश्यक आहे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 284)

वस्तुत: खरंतर जी एकमेव शोकात्म गोष्ट आहे आणि तरीही ज्याची मनुष्याला खंत वाटत नाही, ती गोष्ट म्हणजे स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये त्याला आलेले अपयश ! स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये पूर्णतया त्याचे मार्गदर्शन न लाभणे, हीच खरोखर एकमेव शोकात्म गोष्ट आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन जगल्याशिवाय मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.

आणि खरे महाकाव्य, खरे वैभव जर कोणते असेल तर, ते म्हणजे स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 277)

प्रश्न : “आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये, असे काहीतरी असते की जे कळत-नकळतपणे, नेहमीच ईश्वराची आस बाळगत असते, म्हणून तो ईश्वर हाच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे.” असे येथे म्हटले आहे. आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आस बाळगून असणारी ही गोष्ट कोणती?

श्रीमाताजी : तो आपल्या अस्तित्वाचा एक भाग असतो, परंतु तो प्रत्येकाच्या बाबतीत सारखाच नसतो. तो प्रत्येक व्यक्तीमधील असा एक घटक असतो की, जो उपजतपणे चैत्याच्या प्रभावासाठी खुला असतो. प्रत्येकामध्ये नेहमीच असा एक घटक असतो – काहीकाही वेळा चैत्य खरोखरच खूप झाकलेले असते, आपण त्याविषयी अजिबात जागृत नसतो – आपल्यातील तो घटक मात्र चैत्याकडे वळलेला असतो आणि त्याचा प्रभाव स्वीकारत असतो. हा घटक, आपली बाह्य जाणीव आणि चैत्य जाणीव यांच्यामधील मध्यस्थ असतो.

हा घटक प्रत्येकाच्या बाबतीत एकच असतो असे नाही तर, प्रत्येक व्यक्तिगणिक तो भिन्न असतो. व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये असा एक घटक असतो की, ज्याच्या माध्यमातून ती व्यक्ती चैत्याला स्पर्श करू शकते आणि त्या माध्यमातून ती चैत्य प्रभाव स्वीकारू शकते. ते व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीनुसार ही गोष्ट वेगवेगळी असते, परंतु प्रत्येकामध्ये असा एक घटक असतोच असतो.

तुम्हाला असे सुद्धा जाणवू शकते की, काही ठरावीक गोष्टी अशा असतात की, ज्या तुम्हाला एकदम पुढे रेटतात, तुमचे उन्नयन करण्यास त्या मदत करतात, कोणत्या तरी अधिक महान अशा एखाद्या गोष्टीकडचा दरवाजा त्या जणू उघडून देतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात, पण ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. व्यक्तीमधील तो एक असा घटक असतो की, जो इतर घटकांपेक्षा अधिक उत्सुक असतो. त्या घटकाला अधिक हुरुप असतो.

येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ही अशी एक ‘उत्साहवर्धक क्षमता’ असते की जी, व्यक्तीला तिच्या कमीअधिक जडतेमधून बाहेर काढते आणि ज्यामुळे ती व्यक्ती प्रभावित झाली होती त्या गोष्टीमध्ये कमीअधिक प्रमाणात पूर्णपणे झोकून देण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, कलाकाराला त्याची कला किंवा शास्त्रज्ञाला त्याचे विज्ञान जसे प्रवृत्त करते त्याप्रमाणे…. आणि साधारणत:, जी व्यक्ती काही निर्मिती करते, काही घडवते तिच्यामध्ये हे अशा प्रकारचे खुलेपण असते, एका असामान्य क्षमतेसाठी ती व्यक्ती खुली असते, ज्यामुळे तिच्यामध्ये एक हुरुप येतो. जेव्हा अशी निर्मितीक्षमता सक्रिय होते तेव्हा व्यक्तीमधील कोणतीतरी एक गोष्ट जागृत होते आणि त्यामुळे ज्या गोष्टीची निर्मिती चालू आहे त्यामध्ये, त्या व्यक्तीचे समग्र व्यक्तित्वच सहभागी होते. ही झाली पहिली गोष्ट.

आणि असे काही जण असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे दडून असलेले जे आश्चर्य आहे असे त्यांना वाटते त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत कृपा किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.

मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते काही फार शिकलेले होते असेही नाही, त्यांची मनं ही अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची भावना होती, त्या भावनेमुळेच ते सर्व काही द्यायला तयार असत, त्या भावनेपोटीच त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत. अशा व्यक्तींबाबत, अगदी नेहमी, सातत्याने हा चैत्य संपर्क होत असे.. ते जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत – अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोडे जरी सजग असत तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, त्यांना साहाय्य मिळाल्याचे जाणवत असे.

‘उत्साहवर्धक क्षमता’ आणि ‘कृतज्ञतेची भावना’ ह्या दोन गोष्टी व्यक्तींची तयारी करून घेत असतात. ही किंवा ती गोष्ट घेऊन व्यक्ती जन्माला येते आणि थोडेसे जरी कष्ट घेतले तर ती गोष्ट हळूहळू वृद्धिंगत होते, विकसित होत जाते. म्हणजे, तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढते अशी तुमच्यामधील उत्साहवर्धक क्षमता ही एक गोष्ट किंवा दुसरी गोष्ट म्हणजे, अशी उदारहृदयी कृतज्ञता, की ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षुद्र अशा अहंकारातून बाहेर पडून, कृतज्ञतेने समर्पित होऊ पाहता अशी कृतज्ञतेची उदारता!

स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ईश्वराच्या संपर्कात येण्यासाठीच्या या अतिशय शक्तिशाली तरफा आहेत. ह्या गोष्टी चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून काम करतात.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 417-19)