नवीन प्रजातीचा उदय
आपण हे आधीच पाहिले आहे की, एका नवीन प्रजातीचा उदय ही नेहमीच या पृथ्वीवर एका नवीन तत्त्वाच्या, चेतनेच्या एका नवीन पातळीच्या, एका नव्या शक्तीच्या वा सामर्थ्याच्या आविष्करणाची घोषणा असते. पण त्याच वेळी, ही नवी प्रजाती, जेव्हा आजवर आविष्कृत न झालेली शक्ती वा चेतना प्राप्त करून घेते, तेव्हा ती तिच्या अगदी लगतच्या आधीच्या प्रजातीची वैशिष्ट्ये म्हणून गणल्या जाणाऱ्या एक वा अनेक निपुणता, सिद्धी, संपदा (perfections) गमावून बसण्याची शक्यता असते.
उदाहरणादाखल, प्रकृतीच्या विकसनाची अगदी अलीकडची पायरी पाहू. मनुष्य आणि त्याच्या निकटचा पूर्ववर्ती असणारा वानर ह्यामधील लक्षणीय फरक कोणते आहेत? आपल्याला माकडांमध्ये पूर्णत्वाच्या जवळ जाणारी शारीरिक क्षमता आणि प्राणशक्ती आढळून येते; त्या निपुणतेचा नव्या प्रजातीमध्ये (माणसामध्ये) त्याग करावा लागला आहे. माणसामध्ये, आता झाडांवर ते सरासरा चढणे नाही, डोंगरदऱ्यांमधून केलेल्या कसरती नाहीत, या कड्यावरून त्या कड्यावर मारलेल्या उड्या नाहीत; पण त्या बदल्यात त्याला बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, समन्वयाची, निर्मितीची शक्ती लाभलेली आहे. माणसाच्या आगमनाबरोबर या पृथ्वीवर मनाच्या, बुद्धीच्या जीवनाचा उदय झाला.
माकडामध्ये ज्याप्रमाणे मानसिक क्षमता सुप्तावस्थेत असतात त्याप्रमाणेच, मनुष्य हा मूलत: मनोमय जीव असल्यामुळे, जर त्याच्या शक्यता मनोमयापाशीच विराम न पावता, त्याला स्वत:मध्ये मनोमय जीवनाच्या पलीकडची इतर विश्वं, इतर क्षमता, चेतनेच्या इतर पातळ्या प्रतीत होत असतील तर, ते दुसरे तिसरे काही नसून भवितव्याचे आश्वासन असते.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 162-163)
- चैत्य पुरुष म्हणजे काय? - September 14, 2026
- तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व - September 13, 2026
- दिव्य अस्तित्वाचा शोध - September 11, 2026






