श्रीमाताजी आणि समीपता – ०८

साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि सत्य असल्याचे म्हणता येईल? त्यांच्याशी असणारे आत्मत्वाचे नाते (soul relation) हेच एकमेव खरे नाते आहे, असे म्हणता येईल का? आणि आत्मत्वाचे नाते म्हणजे काय? मला ते कसे ओळखता येईल?

श्रीअरविंद : आंतरिक (आत्मत्वाचे) नाते म्हणजे व्यक्तीला श्रीमाताजींच्या अस्तित्वाची जाणीव असणे. अशी व्यक्ती सदोदित त्यांच्याकडे अभिमुख असते. त्यांची शक्ती आपल्याला संचालित करत आहे, त्यांची शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहे, साहाय्य करत आहे याची व्यक्तीला जाणीव असते. अशी व्यक्ती श्रीमाताजींच्या प्रेमभक्तीने आकंठ भारलेली असते. अशी व्यक्ती त्यांच्या भौतिकदृष्ट्या जवळ असो किंवा नसो, तिला त्यांच्या समीपतेची जाणीव असते. व्यक्तीला आपले मन श्रीमाताजींच्या मनाच्या समीप असल्याचे, आपला प्राण हा श्रीमाताजींच्या प्राणाशी सुमेळ राखत असल्याचे, आपली शारीरिक चेतना त्यांच्या चेतनेने परिपूर्ण असल्याचे जाणवेपर्यंत मन, प्राण आणि आंतरिक शरीराच्या बाबतीत या नात्याचा विकास होत राहतो. आंतरिक एकत्वाचे हे सारे घटक असतात, त्यामुळे (अशा प्रकारचे असलेले) हे एकत्व केवळ आत्म्यामध्ये, जिवामध्येच असते असे नाही, तर ते प्रकृतीमध्येही असते. असे आंतरिक नाते घनिष्ठ असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453-454)

श्रीमाताजी आणि समीपता – ०७

भौतिकदृष्ट्या ज्या व्यक्ती श्रीमाताजींच्या निकट आहेत केवळ त्याच व्यक्ती त्यांना जवळच्या आहेत असे नव्हे; तर ज्या व्यक्ती श्रीमाताजींप्रति खुल्या असतात, आंतरिक अस्तित्वातून त्यांच्याजवळ असतात, श्रीमाताजींच्या इच्छेशी एकरूप झालेल्या असतात, त्या व्यक्ती श्रीमाताजींची खरी लेकरे असतात आणि ती श्रीमाताजींना अधिक जवळची असतात.

*

साधक : कधीकधी मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मी ‘माँ – माँ – माँ’ असे म्हणत असतो. आणि मग सारे काही निःस्तब्ध होते आणि मला माझ्या अंतरंगामध्ये आणि बाहेरही एक प्रकारच्या महान शांतीचा अनुभव येतो. अगदी अवतीभोवतीच्या वातावरणामधूनसुद्धा मला ‘माँ – माँ – माँ’ असे ऐकू येते. हे खरे आहे का? की, हा केवळ एक प्रतिध्वनी आहे?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगामध्ये येणारा हा अनुभव जसा तुमच्या चेतनेचा एक भाग असतो अगदी त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या अवतीभोवती निर्माण केलेले वातावरण हाही तुमच्या चेतनेचाच भाग असतो. जेव्हा तुम्ही श्रीमाताजींचे नामस्मरण करत असता, तेव्हा त्याचा प्रतिध्वनी तुमच्या चेतनेमध्ये म्हणजे, तुमच्या अंतरंगामध्ये तसेच तुमच्या बाहेरदेखील उमटायला सुरूवात होते. त्यामुळे तुम्हाला हा जो अनुभव आला तो खरा अनुभव आहे आणि तो चांगला अनुभव आहे.

*

साधक : माताजी, माझ्यामध्ये हजारो अपूर्णता असल्या तरीदेखील एक गोष्ट मात्र माझ्या मनात दृढ झाली आहे ती म्हणजे – तुम्ही माझी मायमाऊली आहात आणि मी तुमच्या हृदयातून जन्माला आलो आहे. गेल्या सहा वर्षांत हे एकच सत्य माझ्या प्रचितीस आले आहे. निदान ही गोष्ट जाणवण्याइतपत का होईना, पण मी पात्र ठरलो म्हणून मी तुमच्याप्रति कृतज्ञ आहे.
श्रीअरविंद : येऊ घातलेल्या सत्यांसाठी हे अत्युत्तम असे अधिष्ठान आहे; कारण ती सत्यं या अधिष्ठानाचा परिणाम म्हणूनच उदयाला यायची आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 496, 478-479, 478)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

(एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा आणून द्यायच्या ही तुमची शंका आहे. श्रीमाताजींना या गोष्टींचा त्रास होईल किंवा त्या या गोष्टींना क्षुल्लक मानतील असे तुम्हाला का वाटते? सर्व जीवन योगमय करायचे असेल तर, येथे क्षुल्लक किंवा बिनमहत्त्वाचे असे काही कसे काय असू शकेल?

तुमच्या कृतीची आणि स्वयं-विकासाची कोणतीही गोष्ट सुयोग्य वृत्तीने त्यांच्यासमोर मांडणे म्हणजे ती गोष्ट श्रीमाताजींच्या संरक्षणछत्राखाली नेण्यासारखी आहे; रूपांतरणासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्या शक्तीकिरणांमध्ये, ‘सत्या’च्या प्रकाशात नेण्यासारखी आहे. कारण श्रीमाताजींच्या नजरेला जे आणून देण्यात आलेले असते त्या गोष्टीवर त्यांचे शक्तीकिरण लगेचच कार्य करू लागतात. तुमचा अंतरात्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने वापरलेले ते एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.

आणखी एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की, तुम्ही जर तुमच्या कोणत्याही भागाच्या वृत्ती-प्रवृत्ती श्रीमाताजींनी पाहाव्यात म्हणून त्यांच्या नजरेसमोर ठेवून, श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले केलेत तर, त्यातूनच स्वयमेव त्यांच्याबरोबरचे तुमचे एक नाते तयार होते आणि त्यातून एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते. त्यांचे सर्व साधकांबरोबर जे एक सर्वसाधारण, मूक नाते असते किंवा श्रीमाताजींनी आपल्यामध्ये कार्य करावे अशी कोणतीही विनवणी व्यक्तीने केलेली नसतानाचे त्या व्यक्तीचे श्रीमाताजींशी जे नाते असते (not directly invited action) त्यापेक्षा हे जवळीकीचे नाते काहीसे निराळे असते.

अर्थातच, हे सारे केव्हा घडून येऊ शकते? अशा प्रकारच्या खुलेपणासाठी तुम्ही तयार झाले आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जसेच्या तसे अगदी उघडपणे श्रीमाताजींसमोर ठेवण्यासाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हाच हे घडून येऊ शकते. जेव्हा ही गोष्ट अंतरंगातून उमलून येते आणि जेव्हा ती उत्स्फूर्त, खरीखुरी असते तेव्हाच ती फलदायी ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 449)

श्रीमाताजी आणि समीपता – ०५

(एका साधिकेला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजी इतर सर्वांची त्यांच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात आणि फक्त माझीच त्यांना काळजी नाही,” हा तुमचा स्वतःबद्दलचा विचार ही स्पष्टपणे एक निराधार कल्पना आहे आणि त्याला कोणताही ठोस आधार नाही. त्या इतरांवर जेवढे प्रेम करतात तेवढेच प्रेम त्या तुमच्यावरही करतात, त्या इतरांची जशी आणि जितकी काळजी करतात तेवढीच आणि तितकीच काळजी त्या तुमचीही घेतात; किंबहुना काकणभर अधिकच!

मी एक पाहिले आहे की, अशा प्रकारच्या कल्पना नेहमीच साधक, साधिकांच्या मनात येत असतात. (परंतु श्रीमाताजी सर्वांवर सारखेच प्रेम करतात.) (विशेषतः साधिकांच्या मनात) जेव्हा त्या निराश होतात किंवा बाहेरच्या कोणाच्या सूचना त्या ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात असे विचार यायला लागतात. …परंतु जेव्हा चैत्य पुरुष (psychic being) जागृत असतो, तेव्हा हे विचार, ही निराशा, या चुकीच्या कल्पना नाहीशा होणे अपरिहार्यच असते. त्यामुळे तुम्हाला हे जे काही वाटत आहे ते निराशा आणि त्या निराशेतून येणाऱ्या चुकीच्या सूचनांमुळे वाटत आहे… तुमचे आंतरिक अस्तित्व (inner being), तुमचा अंतरात्मा जसजसा अधिकाधिक अग्रभागी येईल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टींबरोबरच या (भ्रांत) कल्पनासुद्धा नाहीशा होतील; कारण तुमच्यामध्ये वसणाऱ्या आत्म्याला हे माहीत आहे की, तो श्रीमाताजींवर प्रेम करतो आणि श्रीमाताजी तुमच्यावर प्रेम करतात; मन आणि प्राणिक प्रकृतीला फसवू शकणाऱ्या बाह्य सूचनांनी आत्मा अंध होऊ शकत नाही.

त्यामुळे, केवळ निराशेमधून किंवा बाह्य सूचनांमधून जे विचार निर्माण झाले आहेत, अशा निराधार असणाऱ्या विचारांमध्ये गुंतून पडू नका. तुमच्यातील चैत्य पुरुषास अधिक विकसित होऊ द्या आणि श्रीमाताजींच्या शक्तीस तुमच्यामध्ये कार्य करू द्या. श्रीमाताजींचे आणि तुमच्या आत्म्याचे आई व मुलाचे नाते आहे. हे नाते स्वतःहूनच तुम्हाला तुमच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शारीर-चेतनेमध्येही त्याची जाणीव करून देईल. जोपर्यंत हे नाते तुमच्या समग्र चेतनेचे अधिष्ठान बनत नाही आणि त्यावर तुमची समग्र साधना स्थिर व सुरक्षित होत नाही, तोपर्यंत हे नाते तुम्हाला त्याची जाणीव करून देत राहील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 454-455)

श्रीमाताजी आणि समीपता – ०४

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

‘आई आणि मूल’ यांच्यातील ‘प्रेम’ याचा अर्थ फक्त आईनेच मुलावर प्रेम केले पाहिजे असा होत नाही तर, मुलानेसुद्धा आईवर प्रेम केले पाहिजे आणि तिची आज्ञा पाळली पाहिजे असा होतो. तुम्हाला ‘श्रीमाताजीं’चे खरे बालक व्हायचे आहे, पण त्यासाठी प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे तर ती म्हणजे, तुम्ही स्वतःला त्यांच्या हाती सोपविले पाहिजे; म्हणजे मग त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्या इच्छेनुसार आचरण केले पाहिजे आणि त्या इच्छेकडे दुर्लक्ष करता कामा नये किंवा श्रीमाताजींच्या विरोधात बंडही पुकारता कामा नये. तुम्हाला हे सारे व्यवस्थित माहीत असूनसुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का करत आहात?

बालकाचा प्राण ज्याची मागणी करतो (म्हणजे त्याच्या प्राणिक इच्छावासना ज्याची मागणी करतात), त्या मागणीची पूर्तता न करणे, हा सुजाण मातेच्या प्रेमाचाच एक भाग असतो; कारण तिला हे माहीत असते की, बालकाच्या प्राणाची ती मागणी पुरविणे हे त्याच्यासाठी अतिशय वाईट ठरू शकते.

(मथितार्थ असा की) तुमच्या प्राणावेगाच्या आज्ञा पाळू नका, तर तुम्हाला झालेल्या खऱ्या बोधाचे अनुसरण करा आणि स्वतःला ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेचे माध्यम बनवा. कारण तुम्ही तुमच्या खऱ्या अस्तित्वामध्ये उन्नत व्हावे हीच श्रीमाताजींची नेहमी इच्छा असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

श्रीमाताजी आणि समीपता – ०३

साधक : प्रत्येकाला जे काही आवश्यक असते ते श्रीमाताजी त्याला देत असतात. एखाद्या व्यक्तीला अमुक एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती स्वीकारण्याची त्याची क्षमतादेखील आहे अशा व्यक्तीला श्रीमाताजी त्या गोष्टीपासून कधीही वंचित ठेवत नाहीत. आम्ही मात्र असे आहोत की त्या जे देतात, ते ग्रहण करण्याची आमची तयारी नसते.

श्रीअरविंद : हो, श्रीमाताजी (त्यांच्या लेकरांना) देण्यासाठी नेहमीच राजी असतात आणि त्या जे देऊ इच्छितात ते जर लेकरांनी ग्रहण केले तर, तसा आनंद श्रीमाताजींना अन्य कोणत्याच गोष्टींनी मिळत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)

श्रीमाताजी आणि समीपता – ०२

साधक : श्रीमाताजींबरोबरचे आमचे खरे नाते कोणते? माता आणि बालक हेच नाते खरे ना?

श्रीअरविंद : एखादे बालक मातेवर ज्याप्रमाणे संपूर्णतया, प्रामाणिकपणे आणि साध्यासुध्या विश्वासाने, प्रेमाने विसंबून असते तेच नाते हे श्रीमाताजींबरोबर असलेले खरे नाते होय.

*

तुम्ही श्रीमाताजींचे बालक आहात आणि मातेचे तिच्या बालकांवर अतोनात प्रेम असते आणि त्यांच्या प्रकृतीमधील दोष ती धीराने सहन करत राहते. श्रीमाताजींचे खरेखुरे बालक होण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यामध्ये आहे, पण तुमचे बाह्य मन व्यर्थपणे किरकोळ गोष्टींमध्ये गुंतलेले राहते आणि बरेचदा उगाचच तुम्ही त्या गोष्टींचा बाऊ करत बसता. श्रीमाताजींचे दर्शन तुम्ही फक्त स्वप्नातच घेता कामा नये तर, त्यांना तुमच्यासमवेत आणि तुमच्या अंतरंगात सदासर्वकाळ पाहण्याचा आणि त्यांचे अस्तित्व अनुभवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सोपे जाईल. कारण त्या तेथे (तुमच्या अंतरंगात) राहून तुमच्यासाठी ती गोष्ट करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 448, 452-453)

श्रीमाताजी आणि समीपता – ०१

नमस्कार,

कालपर्यंत आपण ‘पूर्णयोगांतर्गत ध्यान’ या मालिकेद्वारे श्रीमाताजींनी प्रतिपादित केलेल्या काही ध्यानपद्धती विचारात घेतल्या. पूर्णयोगाचा गाभा म्हणजे ईश्वरी शक्तीप्रत, श्रीमाताजींप्रत खुले होणे हा आहे, असे श्रीअरविंद यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

बरेचदा असे होते की, आपल्यामधील एक भाग, (अंतरात्मा) श्रीमाताजी या ‘ईश्वरी शक्ती’ आहेत असे मान्य करण्यास तयार असतो, परंतु केवळ भौतिक गोष्टींमध्येच अडकलेले आपण, त्यांच्या रुप-वेश-भाषा इत्यादी बाह्य गोष्टींकडे बघत राहतो आणि त्या ‘ईश्वरी शक्ती’ असल्याचे मान्य करण्यास राजी होत नाही. हे असे होते तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामध्ये आले आहे. ते लिहितात, “तुमच्यामधील आत्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने (vital) उपयोगात आणलेले एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.’’ आणि हा साधनेतील मोठाच अडथळा असतो.

तसे होऊ नये आणि श्रीमाताजी किंवा ईश्वरी शक्तीप्रत आपण खुले राहावे, त्यांच्याशी आपली आंतरिक जवळीक निर्माण होणे कसे व का महत्त्वाचे आहे, आपल्या साधनेच्या दृष्टीने त्याचे काय मोल आहे, श्रीमाताजींशी समीपता कशी साध्य होईल, या सर्व गोष्टींमधील बारकावे श्रीअरविंद यांनी वेळोवेळी साधकांना सांगितले आहेत. त्यातील निवडक भाग उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘श्रीमाताजी आणि समीपता’ या मालिकेद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. वाचकांना साधनेसाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास वाटतो.

धन्यवाद.
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक