तंत्रमार्ग व पूर्णयोग - साम्यभेद

 

आम्ही जी समन्वयपद्धती स्वीकारली आहे, त्यामध्ये तंत्रपद्धतीहून वेगळे तत्त्व आहे; योगाच्या शक्यतांचा विचार वेगळ्या तऱ्हेने करून, हे वेगळे तत्त्व आम्ही उपयोगात आणले आहे. तंत्राचे समन्वयाचे साध्य गाठावयास आम्ही वेदांताच्या पद्धतीपासून प्रारंभ केला आहे. तंत्रपद्धतीत शक्ति ही सर्वाधिक महत्त्वाची मानतात, आत्मा गाठावयास शक्तीचा गुरुकिल्लीसारखा उपयोग करतात; आमच्या समन्वयांत आत्मा हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे; शक्ति उन्नत करावयाचे रहस्य आत्म्याच्या ठिकाणी आम्हाला सापडते.

तंत्रपद्धती तळातून आपल्या कार्याला सुरुवात करते; शिखराकडे ती चढत जाते, व या चढण्यासाठी पायऱ्यांची शिडी करते; ही पद्धती आरंभाला शक्ति (कुंडलिनी) जागृत करण्यावर भर देते, जागृत शक्तीने शरीराच्या नाडीचक्रांतून क्रमश: वर चढावे, ही सहा चक्रे उघडावी यावर जोर देते; ही चक्रे उघडणे म्हणजे आत्म्याच्या शक्तीचे प्रांत क्रमश: खुले करणे असते.

पूर्ण योगामध्ये इतर योगांच्या सामान्य साध्यांत भर घातली जाते. सर्व योगांचे सामायिक साध्य आत्म्याची मुक्ति हे आहे; मानवी आत्मा जो स्वाभाविक अज्ञानात आणि मर्यादित क्षेत्रात पडला आहे, त्याची त्यातून मुक्ति व्हावी, त्याला आध्यात्मिक अस्तित्व लाभावे, त्याची त्याच्या उच्चतम आत्म्याशी अर्थात ईश्वराशी एकता व्हावी, हे सर्व योगांचे सामायिक साध्य आहे; पण त्या योगांमध्ये हे साध्य आरंभीची एक पायरी म्हणून नव्हे तर, ते एकमेव अंतिम साध्य आहे असे मानतात; त्या योगांत आध्यात्मिक अस्तित्वाचा भोग नसतोच असे नाही – तो असतो; पण त्याचे स्वरूप, मानवी व वैयक्तिक अस्तित्वाचे शांत आत्मिक अस्तित्वात विलीन होणे, हे असते किंवा दुसऱ्या उच्च लोकांत आध्यात्मिक भोग भोगणे, हे असते.

तंत्रपद्धती मुक्ति हे आपले अंतिम साध्य मानते; परंतु हे एकच साध्य तिला नसते – तिच्या मार्गात दुसरे एक साध्य तिला असते; आध्यात्मिक शक्ति, प्रकाश, आनंद हा मानवी अस्तित्वांत पूर्णत्वाने यावा व पूर्णत्वाने भोगला जावा हे तिचे मार्गातील साध्य असते; या पद्धतीत परमश्रेष्ठ अनुभूतीचे ओझरते दर्शनहि सापडते : मुक्ति आणि विश्वगत कर्म व आनंद यांचा संयोग या परमश्रेष्ठ अनुभूतीत प्रतीत होतो; या संयोगाला विरोधी आणि या संयोगाशी विसंवादी असणाऱ्या सर्व गोष्टींवर अंतिम विजय साधक मिळवू शकतो, या गोष्टीचे तंत्रपद्धतीला ओझरते दर्शन झाले आहे.

आमच्या आध्यात्मिक शक्यतांसंबंधी ही विशाल दृष्टि घेऊन, आम्ही आमच्या योगाला आरंभ करतो; या दृष्टीत आणखी एका गोष्टीची आम्ही भर घालतो; ही भर घालण्याने, आमच्या योगाला अधिक पूर्ण सार्थकता आणली जाते. ही भर अशी की, आम्ही मानवाचा आत्मा केवळ व्यक्तिभूत, केवळ सर्वातीताशी एकता साधण्यासाठी योग-प्रवास करणारा केवळ व्यक्तिभूत आत्मा आहे, असे मानीत नसून तो विश्वात्मा देखील आहे, सर्व जीवात्म्यांतील ईश्वराशी व सर्व प्रकृतीशी एकता साधण्याचे सामर्थ्य असलेला विश्वव्यापी आत्मा देखील आहे, असे मानतो आणि या विस्तृत दृष्टीला अनुरूप व्यवहाराचा पूर्ण पाठिंबा देतो.

मानवी आत्म्याची वैयक्तिक मुक्ति, आध्यात्मिक अस्तित्व, जाणीव (चेतना), आनंद या बाबतीत ईश्वराशी या आत्म्याची वैयक्तिक एकता (एकरूपता) हे ह्या पूर्ण-योगाचे पहिले साध्य नेहमीच असावे लागते.

योगाचे दुसरे साध्य मुक्त आत्म्याने मुक्तपणे ईश्वराच्या विश्वात्मक एकतेचा भोग घेणे हे असते;

पण या दुसऱ्या साध्यांतून तिसरे एक साध्य निघते ते हे की, ईश्वराच्या द्वारा सर्व जीवांशी जी एकता, त्या एकतेला व्यावहारिक रूप देणे; अर्थात ईश्वराचे मानवतेच्या संबंधांत जे आध्यात्मिक साध्य आहे, त्या साध्याच्या संबंधात सह-अनुभूतिपूर्वक ईश्वराचे सहकारी होणे.

वैयक्तिक योग येथपर्यंत आला म्हणजे, त्याची वैयक्तिकता, विभक्तता निघून जाते, आणि तो सामूहिक योगाचा एक भाग होतो; या सामूहिक योगाचे साध्य मानवजातीचे दिव्य प्रकृतीमध्ये उत्थापन करणे हे असते.

मुक्त वैयक्तिक आत्मा ईश्वराशी आत्मत: व प्रकृतितः एकरूप झाला म्हणजे त्याचे प्राकृतिक अस्तित्व मानवजातीच्या आत्मपूर्णत्वाचे साधन बनते – या साधनाच्या बळावर मानवजातीत ईश्वराची दिव्यता पूर्णपणे बहरू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-614)

तंत्रमार्गातील समन्वय

तंत्रशास्त्र जी साधना उपयोगात आणते ती स्वरूपतः समन्वयात्मक साधना आहे. हे एक महान विश्वव्यापी सत्य आहे की, अस्तित्वाला दोन ध्रुवटोके आहेत आणि या ध्रुवटोकांची मौलिक एकता, हे अस्तित्वाचे रहस्य आहे.

ब्रह्म आणि शक्ति, आत्मा आणि प्रकृति ही ती दोन ध्रुवटोके होत; प्रकृति ही आत्म्याची शक्ति आहे, किंवा असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल की, आत्मा शक्तिदृष्टीने प्रकृति हे नाव धारण करतो, प्रकृति या नावाने ओळखला जातो; हे महान सत्य तंत्रशास्त्राने उपयोगात आणले आहे.

तांत्रिक पद्धतीत मानवाच्या प्रकृतीला उन्नत करून, तिला आत्म्याच्या व्यक्त शक्तीचे रूप देणे हे साध्य असते; तंत्र हे मानवाची संपूर्ण प्रकृति हातात घेऊन तिचे आध्यात्मिक रूपान्तरण करू पाहते.

तंत्राच्या साधन-संभारात हठयोगाची जोरदार प्रक्रिया आहे; नाडीचक्रे उघडणे, कुंडलिनी शक्ति जागृत करून ब्रह्माच्या दिशेने या चक्रांतून तिची यात्रा घडवणे ही हठयोगाची प्रक्रिया विशेषेकरून आहे; त्यात राजयोगाची सूक्ष्म शुद्धीकरण, ध्यान, एकाग्रता ही प्रक्रिया आहे; तसेच इच्छाशक्तीचा आधार, भक्तीची प्रेरकशक्ति, ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली यांचा आपल्या कार्याला गति देण्यासाठी तंत्रशास्त्र उपयोग करते. याप्रमाणे तंत्र-साधना हठादि सर्व योगांच्या भिन्न भिन्न शक्ति आपल्या कार्यासाठी एकत्र करते, परिणामकारक रीतीने एकत्र करते;

परंतु येथेच ती थांबत नाहीं; आणखी दोन दिशांनी तंत्र आपली समन्वयी प्रवृत्ति प्रकट करते; ते सामान्य योगपद्धतीत दोन गोष्टींची भर घालते; मानवी व्यवहाराच्या प्रेरक हेतूंना, मानवी गुणांना व वासनांना तंत्र हातांत घेते व त्यांना कठोर शिस्त लावून, आत्म्याच्या शासनाखाली त्यांनी वागावे अशी व्यवस्था ते प्रथम करते व नंतर ते दिव्य आध्यात्मिक पातळीवर त्यांना घेऊन जाते, त्यांना दिव्य, आध्यात्मिक रूप देते, ही एक गोष्ट.

दुसरी गोष्ट ही की, आपल्या योगसाध्यांत केवळ मुक्तीचा अंतर्भाव न करता भुक्तीचाहि अंतर्भाव ते करते; तंत्रेतर योगपद्धती मुक्ति हे आपले एकमेव साध्य मानतात; भुक्ति म्हणजे आत्मशक्तीने जगाचा उपभोग घेणे हे तंत्रेतर योगांना साध्य म्हणून मान्य नाही. त्यांना साध्याकडे जाताजाता मार्गात उपभोग घेणे, अंशत: प्रसंगाने उपभोग घेणे मान्य आहे. एकंदरीने तंत्राची योग-पद्धति इतर पद्धतींहून व्यापक आहे, धैर्यशाली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 611-612)

योगांची चढती शिडी

 

भारतांत अद्यापहि ज्या प्रमुख योगशाखा प्रचलित आहेत त्यांच्या विशिष्ट संकीर्ण प्रक्रिया बाजूस ठेवून त्यांच्या केंद्रवर्ती तत्त्वावर जर आम्ही जोर दिला, तर त्यांची एक चढती शिडी होते असे आम्हांस दिसते. या शिडीची अगदी खालची पायरी शरीर आहे, आणि वैयक्तिक आत्मा व विश्वातीत विश्वरूप आत्मा यांचा प्रत्यक्ष संबंध घडविणारा योग ही या शिडीची सर्वात वरची पायरी आहे.

हठयोग हा शरीर व प्राणकार्ये ही पूर्णत्व आणि साक्षात्काराची साधने म्हणून पसंत करतो; स्थूल शरीर हे हठयोगाचे कार्यक्षेत्र आहे. राजयोग हा भिन्न अंगांनी युक्त असलेले आपले मनोमय अस्तित्व उत्थापन-साधन म्हणून निवडतो; तो सूक्ष्म शरीरावर आपले लक्ष केंद्रित करतो.

कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हा त्रिमार्ग मनोमय पुरुषाची इच्छाशक्ति, हृदय (भावनाशक्ति) किंवा बुद्धिशक्ति घेऊन आरंभ करतो, आणि या शक्तींचे रूपांतर घडवून मोक्षद सत्य (liberating Truth), आनंद व अनंतता या आध्यात्मिक जीवनाच्या अंगभूत गोष्टी प्राप्त करून घेतो. व्यक्तिशरीरांतील मानवी-पुरुष (आत्मा) आणि प्रत्येक शरीरांत राहणारा सर्व नामरूपांच्या अतीत असणारा दिव्य-पुरुष (आत्मा) यांजमध्ये प्रत्यक्ष व्यवहार घडविणे ही या त्रिमार्गाची पद्धत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 33)

प्रथम आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो की, भारतात आजही एक विलक्षण योगपद्धती अस्तित्वात आहे. ही पद्धती स्वभावत: समन्वयात्मक आहे. तथापि ही योगपद्धती एक स्वतंत्र योगच आहे; ती इतर योगपद्धतींचा काही समन्वय नाही. ही विलक्षण योगपद्धती म्हणजे तंत्रपद्धती होय. तंत्रमार्गात काही घटना घडून आल्याने, जे तांत्रिक नाहीत त्यांना तंत्रमार्ग निंद्य वाटू लागला आहे.

…तथापि तंत्रपद्धतीचे मूळ पाहता, ती एक महान प्रभावी पद्धती होती, तिचा पाया निदान अंशत: खऱ्या कल्पनांचा बनवलेला होता. तंत्राची दक्षिण (उजवा) आणि वाम (डावा) या मार्गात जी विभागणी केली होती, तिच्या मुळाशी देखील विशिष्ट खोल प्रतीती होती. प्राचीन प्रतीक-शास्त्रानुसार दक्षिण-मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग व वाम-मार्ग म्हणजे आनंदमार्ग होय. दक्षिणमार्गामध्ये मानवातील प्रकृती स्वत:च्या ऊर्जा, स्वत:चे घटक आणि क्षमता यांचे शक्तिसामर्थ्य आणि त्यांचा व्यवहारातील वापर यामध्ये सारासारविवेकाद्वारे भेद करून, स्वत:ची मुक्तता करून घेते तर वाममार्गामध्ये मानवातील प्रकृती त्याच सर्व गोष्टींचा ‘आनंदमय’ रीतीने स्वीकार करून, स्वत:ची मुक्तता करून घेते.

याप्रमाणे मुळात तंत्रपद्धतींतील दक्षिणमार्ग व वाममार्ग निर्दोष असले तरी, कालांतराने त्यांची तत्त्वे अस्पष्ट झाली, त्यांची प्रतीके विकृत झाली व त्यांचा अध:पात घडून आला.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 42-43)

प्रत्येक मानवी कर्म ईश्वराच्या इच्छेला समर्पित करावे हे साध्य कर्ममार्ग मानवाच्या समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आमच्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू आम्ही सर्वथा टाकून द्यावा, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म आम्ही करू नये, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म आम्ही करू नये या व्रतापासून होतो. या त्यागाच्या व्रताने कर्ममार्ग हा आमचे मन व आमची इच्छा शुद्ध करू शकतो; या शुद्धिकरणाचा परिणाम म्हणून आम्हाला सहजच ही जाणीव होऊ लागते की, महान विश्वशक्ती हीच आमच्या सर्व कर्मांची खरी कर्ती आहे; आणि या शक्तीचा स्वामी ईश्वर हा या कर्माचा खरा स्वामी व नेता आहे; व्यक्ती हा केवळ एक मुखवटा आहे; व्यक्ती ही सबब आहे; या शक्तीचे ती एक साधन आहे. किंवा अधिक सकारात्मकपणे सांगावयाचे झाले तर व्यक्ती हे कर्माचे व सांसारिक संबंधाचे जाणीवयुक्त केंद्र आहे असे वर्णन करता येईल. कर्मयोगी कर्माची निवड व त्याची दिशा अधिकाधिक जाणीवपुर:सर ईश्वराच्या इच्छेवर आणि विश्वशक्तीवर सोपवितो. आमचे कर्म व आमच्या कर्माची फळे शेवटी ईश्वराला व त्याच्या विश्वशक्तीला समर्पण करण्यात येतात. आमचा आत्मा दृश्यांच्या कैदेत असतो तो मुक्त व्हावा; आमचा आत्मा प्रापंचिक व्यापारांच्या प्रतिक्रियांच्या बंधनात असतो, तो त्या बंधनातून मुक्त व्हावा हा या समर्पणाच्या मागचा हेतू असतो. भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांच्याप्रमाणे कर्ममार्गही नामरूपात्मक अस्तित्वातून मुक्त होऊन परमात्म्यांत विलीन होण्यासाठी वापरला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 09-10)

आमच्या हृदयांत गुप्त असलेला आंतरिक मार्गदर्शक, जगद्गुरू हा पूर्णयोगाचा श्रेष्ठ मार्गदर्शक आणि गुरु आहे. हा आंतरिक जगद्गुरू आपल्या ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाने आमचा अंधकार नाहीसा करतो; हा प्रकाश आमच्या ठिकाणी, या आंतरिक जगद्गुरूच्या वाढत्या वैभवाच्या आत्माविष्काराचे रूप घेतो. हा गुरु आमच्या ठिकाणी क्रमाक्रमाने त्याचे स्वाभाविक स्वातंत्र्य, आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि अमृतत्व अधिकाधिक प्रमाणात व्यक्त करतो. तो आपले स्वतःचे दिव्य उदाहरण आमच्या मानवी पातळीच्या वरती आमचे साध्य म्हणून ठेवतो; त्याचे ध्यान आमची कनिष्ठ प्रकृती करते, आणि अंतिमत: ती ज्याचे ध्यान करते त्याची जणू प्रतिमूर्तीच बनून जाते. तो स्वत:चे अस्तित्व आणि त्याचा प्रभाव आमच्यामध्ये ओतून, विश्वात्मक ईश्वराशी आणि विश्वातीत ईश्वराशी एकरूपता प्राप्त करून देण्याची क्षमता आमच्या ठायीं निर्माण करतो.

या आंतरिक गुरुची कार्यरीती, कार्यपद्धती कोणती असते? तर त्याला कोणतीच एकच एक पद्धती नसते; व सर्व पद्धती ह्या त्याच्याच आहेत हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

प्रकृतीत ज्या उच्चतम प्रक्रियांची व व्यापारांची पात्रता असेल, त्या प्रक्रियांचे व व्यापारांचे स्वाभाविक संघटन ही त्या गुरूची कार्यपद्धती आहे. क्षुद्रांत क्षुद्र तपशिलाच्या गोष्टी, अगदी महत्त्वशून्य दिसणाच्या क्रिया आणि सर्वात मोठ्या गोष्टी व क्रिया यांच्याकडे या पद्धतीत सारख्याच काळजीने, सारख्याच बारकाईने लक्ष दिले जाते आणि या सर्वांना शेवटी प्रकाशाच्या क्षेत्रात उचलून घेऊन त्यांचे परिवर्तन घडवून आणण्यात येते. कारण ह्या आंतरिक गुरुच्या योगामध्ये उपयोगात येऊ शकणार नाही इतकी कोणतीच गोष्ट क्षुल्लक नाही व मिळवण्यासाठी धडपडावे एवढी कोणतीच गोष्ट मोठीदेखील नाही. जो ईश्वराचा सेवक आणि शिष्य आहे, त्याला गर्व वाहण्याचे, मी मी म्हणण्याचे काहीच कारण नसते; कारण त्याच्यासाठी सर्व काही करण्याची व्यवस्था वरून होत असते. त्याचप्रमाणे या सेवक शिष्याला स्वतःच्या वैयक्तिक दोषांमुळे, स्वतःच्या प्रकृतीतील अडचणींमुळे निराश होण्याचा अधिकार नसतो, कारण त्याच्या ठिकाणी कार्य करणारी शक्ति ही अ-वैयक्तिक (Impersonal) किंवा अति-वैयक्तिक (Superpersonal) आणि अनंत (Infinite) अशी असते.

आमच्या अंतरंगातील गुरू ज्या पद्धतीचा वापर करतो त्याच पद्धतीचा वापर यथाशक्य पूर्णयोगाचा गुरू करत राहील. अर्थात शिष्याची प्रकृती पाहून त्या प्रकृतीला धरूनच पूर्णयोगाचा गुरु त्याला मार्गदर्शन करीत जाईल.

गुरूला तीन साधने उपलब्ध असतात. शिष्याला शिकवण देणे, आपले उदाहरण शिष्यासमोर ठेवणे, आपला मूक प्रभाव शिष्यावर पडेल असे करणे. गुरूने आपली अस्मिता, आपली मते शिष्यावर लादावी, शिष्याने आपले मन मोकळे ठेवून गुरु देईल ते, त्यांत विचार न करतां मान्य करून साठवावे, असा भलता मार्ग शहाणा गुरु सांगणार नाही; तो शिष्याच्या मनात केवळ बीज टाकील, विचाराचे उत्पादनक्षम असे खात्रीचे बीज टाकील आणि शिष्याच्या मनातील ईश्वर त्या बीजाची जोपासना करील अशी श्रद्धा ठेवील. शहाणा गुरु पाठ देण्यापेक्षा, शिष्याच्या आंतरिक शक्ति जागृत करण्याकडे अधिक लक्ष देईल. शिष्याच्या आंतरिक शक्ति, आंतरिक अनुभव स्वाभाविक प्रक्रियेने, मोकळ्या वातावरणात वाढावे असा प्रयत्न करील. तो शिष्याला एखादी कार्यपद्धति शिकवताना हे स्पष्ट करील की, ही पद्धति त्याला एक उपयुक्त उपाय म्हणून, उपयुक्त साधन म्हणून शिकवलेली आहे; तीच उपयोगांत आणली पाहिजे, ती उपयोगात आणलीच पाहिजे असे कोणतेहि बंधन त्याजवर नाहीं; तिला त्याने शिरोधार्य आचारसूत्राचे, ठाम दिनचर्येचे स्वरूप देऊ नये.

शहाणा गुरु या गोष्टीची काळजी घेईल की, शिष्याने त्याला शिकवलेल्या साधनाला मर्यादा घालणाऱ्या भिंतीचे स्वरूप देऊ नये. त्याला शिकवलेली प्रक्रिया त्याने यांत्रिक बनवून ठेवू नये. शहाण्या गुरूचे काम इतकेच राहील की, त्याने शिष्याच्या अंत:करणात दिव्य प्रकाश जागवावा, दिव्य शक्ति तेथे क्रियाशील होईल असे करावे; तो स्वत: या दिव्य प्रकाशाचा व दिव्य शक्तीचा केवळ वाहक असतो, त्यांना वाहून नेणारे केवळ शरीर असतो, त्यांच्या हातातले एक साहाय्यक साधन असतो.

गुरूने दिलेल्या पाठापेक्षा गुरूचे उदाहरण अधिक सामर्थ्यशाली असते; पण, बाह्य कृतीच्या उदाहरणाला किंवा वैयक्तिक शीलाच्या उदाहरणाला फार महत्त्व नसते. या उदाहरणांनाहि त्यांचे स्थान असते, उपयोग असतो; परंतु दुसऱ्याच्या ठिकाणी सर्वात जास्त अभीप्सा उत्तेजित करणारी मध्यवर्ति गोष्ट म्हणजे गुरूच्या ठिकाणी असलेला दिव्य साक्षात्कार, जो त्याचे सर्व जीवन, त्याची आंतरिक अवस्था व त्याच्या सर्व क्रिया नियंत्रित करतो. हा सार्वत्रिक सारभूत घटकाच्या स्वरूपाचा असतो; त्याहून दुसरे सर्व, गुरूच्या वैयक्तिक अस्मितेचा व उपाधीचा (Circumstance) भाग असतो. गुरूच्या अंतरीचा हा क्रियाशील साक्षात्कार साधक-शिष्याच्या अंतरंगाला प्रतीत व्हावयास हवा; साधक-शिष्याने आपल्या प्रकृतीनुसार हा साक्षात्कार स्वत:च्या ठिकाणी निर्माण करून अनुभवावयास हवा; गुरूच्या बाह्य वर्तनाचे अनुकरण करण्याच्या भानगडींत शिष्याने पडू नये; हे अनुकरण शिष्याच्या ठिकाणी सुयोग्य स्वाभाविक फलनिष्पत्ति करण्याऐवजी त्याच्या ठिकाणची निर्माणशक्ति शून्यवत् करील, असाच संभव अधिक आहे.

गुरूच्या उदाहरणाहून त्याच्या अस्मितेचा मूक प्रभाव हा अधिक महत्त्वाचा, सामर्थ्यवान् असतो. गुरूचा शिष्यावर बाह्यवर्ती अधिकार जो असतो त्याला आम्ही प्रभाव म्हणत नाही; गुरूच्या संपर्कात जे सामर्थ्य असते, त्याच्या केवळ उपस्थितीचे जे सामर्थ्य असते, त्याचा आत्मा दुसऱ्याच्या आत्म्याच्या निकट असल्याने त्या दुसऱ्या आत्म्यात, शब्दाचा उपयोग न करता, गुरु आपली अस्मिता व आपली आध्यात्मिक संपत्ति ज्या आपल्या मूक सामर्थ्याच्या बळावर ओततो त्या बळाला ‘प्रभाव’ असे नाव आम्ही देतो. गुरूचे हे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. श्रेष्ठ गुरु हा तितकासा पाठ देणारा गुरु नसतो; तो आपल्या भोवतालच्या सर्व ग्रहणशील साधकांमध्ये आपल्या केवळ उपस्थितीने दिव्य जाणीव ओतणारा आणि या दिव्य जाणिवेचीं घटकभूत तत्त्वे, प्रकाश, सामर्थ्य, शुद्धता आणि आनंद ओतणारा असतो.

पूर्णयोगाच्या गुरूचे आणखी एक लक्षण हे असेल की, तो आपल्या गुरुपणाची बढाई मारणार नाहीं; कारण त्याच्या ठिकाणीं सामान्य मानवाचा पोकळ डौल आणि वृथा आत्मगौरव करण्याची भावना असणार नाही. जर त्याला काही काम असेल तर, त्याची भावना अशी असेल की, ते काम ईश्वराने त्याजकडे सोपविलेले काम आहे; तो केवळ ईश्वराच्या इच्छेचा वाहक आहे, पात्र आहे, प्रतिनिधि आहे. आपल्या मानव बंधूंना मदत करणारा मानव, बालांचा नायक (नेता) असलेला एक बाल, अनेक दीप उजळणारा एक दीप, आत्म्यांना जागे करणारा एक जागृत आत्मा आहे असे तो मानील, आणि तो उच्चतम अवस्थेतील असेल तर तो ईश्वराची एक विशिष्ट शक्ति वा रूप असेल आणि तो स्वत:कडे ईश्वराच्या इतर शक्तींना येण्यासाठी हाक देणारा असेल.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 61-62)

भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या भोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा व्यक्तिरूपात विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यतः भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे या भूमिकेतून पाहिले जाते; आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या लीलेच्या शेवटच्या अंकामध्ये, जीवाचा मानवी जीवनात प्रवेश होतो.

मानवी जीवनाच्या सर्व भावनामय स्वाभाविक संबंधांचा उपयोग करून, सर्वप्रेमी, सर्वसुंदर, सर्वानंदी ईश्वराच्या संपर्काचा आनंद भोगावयाचा; सांसारिक नश्वर नात्यांतील भावनासुख टाकून द्यावयाचे हे भक्तियोगाचे तत्त्व आहे. या योगात पूजा व ध्यान हे केवळ साधन आहे; ईश्वराशी नाते जोडता यावे व ईश्वराशी जोडलेल्या नात्याची उत्कटता वाढावी यासाठीच केवळ या योगात पूजा व ध्यान यांचा उपयोग करण्यात येत असतो. हा योग भावनात्मक संबंधांचा उपयोग करण्यात अत्यंत उदार आहे. इतका की, ईश्वराशी शत्रुत्व किंवा विरोध ही भावना ही तीव्र उतावळ्या प्रेमाची भ्रष्टरूपातील भावना आहे असे हा योग मानतो आणि ही विरोधी भावना देखील साक्षात्काराला व मोक्षाला साधन म्हणून उपयोगी पडू शकते असे या योगाचे म्हणणे आहे. सर्वसाधारणत: ह्या भक्तिमार्गाकडे पाहता असे दिसते कि, तो या मार्गातील साधकांना ज्ञानमार्गातील साधाकांप्रमाणेच जगाच्या संसारापासून दूर नेणारा ठरतो; भक्तियोगानुसार, भक्त सर्वातीत, विश्वातीत अशा ईश्वरांत विलीन होतो.

परंतु भक्तिमार्गातहि संसारत्याग करून ईश्वरात विलीन होणे हा परिणाम टाळता येणे शक्य असते. या मार्गात हा परिणाम टाळणारी एक व्यवस्थाही आहे, ती अशी की, दिव्य प्रेम हे ईश्वर आणि साधकाचा आत्मा या नात्यातच प्रकट व्हावे, असा निर्बध नसून; त्याचा व्याप याहूनहि अधिक असतो –

परमात्म्याचे प्रेम व आनंद यांचा समान साक्षात्कार झालेले ईश्वराचे जे भक्त असतात त्यांचा एक मेळा बनतो व या मेळ्यातील भक्तांनी एकमेकांवर दिव्य प्रेम करावें, एकमेकांनी एकमेकांची पूजा करावी असा भक्तिमार्गाचा कटाक्ष असतो.

भक्तिमार्गात आणखीहि एक याहूनहि अधिक व्यापक अशी संसार-त्याग-विरोधी व्यवस्था आहे. भक्ताचा साक्षात्कार असा असतो की, केवळ सर्व प्राण्यात, मानवात व पशूतच नव्हे, तर सर्व रूपधारी वस्तूंत व निर्जिवांतहि भक्ताच्या प्रेमाचा दिव्य विषय असणारा ईश्वर उपस्थित आहे.
भक्तियोगाचे हे व्यापक दर्शन मानवी भावना, संवेदना, सौंदर्यप्रतीति यांचे एकंदर क्षेत्र उन्नत करून त्याला दिव्य पातळीवर नेऊ शकते, या क्षेत्रात सर्वत्र आध्यात्मिकता भरू शकते, हे आपण समजू शकतो आणि मानवता सर्व विश्वभर प्रेम आणि आनंद यांजकडे वाटचाल करण्याचा जो जागतिक परिश्रम करीत आहे तो योग्यच आहे असे भक्तियोगाच्या वरील फळावरून आपण म्हणू शकतो.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 39)

ज्ञानमार्ग हा, परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’कडे, वाटचाल करतो, सारासारविवेकाकडे वाटचाल करतो. ज्ञानमार्ग आमच्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या घटकांपैकी प्रत्येक घटक घेऊन, अमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, तमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, (नेति, नेति) याप्रमाणे प्रत्येक घटकाची आत्म्याशी एकरूपता नाकारतो व त्या सर्वांना आत्म्यापासून दूर करून, हे घटक प्रकृतीचे घटक आहेत, नामरूपात्मक प्रकृतीचे घटक आहेत, मायेची – नामरूपात्मक जाणिवेची निर्मिती आहे असे म्हणतो; त्यांना आत्म्यापासून निराळे करून एका सर्वसामान्य वर्गात घालतो; प्रकृति, माया असे सर्वसामान्य नाव देतो.

याप्रमाणे ज्ञानमार्गी साधक शुद्ध एकमेव परमश्रेष्ठ आत्म्याशी आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. हा आत्मा अविकारी, अविनाशी असून त्याच्या लक्षणांत कसलेही रूप, कसलीही घटना येत नाही. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यतः नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम समजून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत जगाच्या संसारात येत नाही.

तथापि, हें कैवल्य, केवल पूर्णत्व हा ज्ञानमार्गाचा एकमेव अथवा अटळ परिणाम नाही. साधक वैयक्तिक ध्येयाकडे कमी लक्ष देऊन मानवतेच्या हिताकडे, सर्वभूतांच्या हिताकडे अधिक लक्ष देत असेल, तर ज्ञानमार्गानें तो विश्वातीत तत्त्वात विलीन होऊ शकत असला तरी, आपल्या पराक्रमानें तो विश्वाचा संसार ईश्वराकरतां जिंकून घेईल. परमात्मा केवळ आपल्या स्वत:च्या अस्तित्वातच नव्हे, तर सर्व जीवाजीवांत आहे, तसेच जगाच्या नामरूपात्मक घटना ईश्वरी जाणिवेच्याच लीला आहेत, त्या या जाणिवेच्या खऱ्या स्वरूपाला सर्वस्वी परकीय नाहीत ही अनुभूति मात्र साधकाला मिळाली असली पाहिजे.

या अनुभूतीच्या बळावर ज्ञानाचे सर्व प्रकार, मग ते कितीहि लौकिक असोत, ते हातांत घेऊन त्यांना ईश्वरी जाणिवेच्या व्यापारांचे रूप देता येईल; आणि ज्ञानाचा एकमेव अद्वितीय विषय स्व-रूपाने कसा आहे व त्याच्या आकारांच्या व प्रतीकांच्या लीलेत कसा दिसतो हीहि अनुभूती येईल. ज्ञानमार्गाची या प्रकारची वाटचाल मानवी बुद्धीचे व प्रतीतीचे सर्व क्षेत्र उंचावून दिव्य करू शकेल, आध्यात्मिकता-संपन्न करू शकेल; आणि मानवता ज्ञानासाठी विश्वभर जो अतीव परिश्रम घेत आहे तो योग्यच आहे असे त्यायोगे ठरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 38)

राजयोगात सर्वप्रथम जी क्रिया हाती घेण्यात येते ती अवधानपूर्वक, काळजीपूर्वक आत्मशासन करण्याची क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडी-पुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी मन व हृदय पवित्र, आनंदमय व विचक्षण बनते.

हे जे आतापर्यंत वर्णन केले ते राजयोगातील केवळ पहिले पाऊल होय. यानंतर साधकाने मनाचे आणि इंद्रियांचे सामान्य व्यापार अगदी शांत करावयाचे असतात; असे केले म्हणजेच साधकाचा आत्मा जाणिवेच्या उच्चतर स्तरांवर चढून जाण्यास मोकळा होतो आणि पूर्ण-स्वातंत्र्य व पूर्ण आत्म-प्रभुत्व यासाठी लागणारा पाया त्याला लाभतो. सामान्य मनाला नाडीसंघाच्या व शरीराच्या प्रतिक्रियांच्या आधीन राहावे लागते आणि त्यामुळे या मनाचे अनेक दोष व उणिवा उत्पन्न होतात, ही गोष्ट राजयोग विसरत नाही. हे दोष व उणिवा घालविण्यासाठी हठयोगातील आसन व प्राणायाम यांचा उपयोग राजयोग करतो; मात्र आसनांचे अनेक गुंतागुंतीचे प्रकार हठयोगात असतात, ते राजयोग बाजूला ठेवतो आणि त्याच्या स्वत:च्या साध्याला पुरेसा उपयोगी असा एकच सर्वात सोपा व परिणामकारक असा आसनाचा प्रकार तो घेतो. प्राणायामाचाही असाच एक सर्वात सोपा व परिणामकारक प्रकार तो घेतो. याप्रमाणे हठयोगाची गुंतागुंत व अवजडपणा राजयोग टाळतो; आणि त्याच्या प्रभावी, शीघ्र परिणामकारी प्रक्रियांचा उपयोग करून शरीर व प्राणक्रिया यांजवर ताबा मिळवतो आणि कुंडलिनी जागृत करतो – कुंडलिनी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून झोप घेत पडलेली शक्तिसर्पिणी; या सर्पिणीत सुप्त अशी सामान्यातीत शक्ति असते. कुंडलिनीची जागृती केल्यानंतर राजयोग हा चळवळ्या, चंचल मनाला पूर्ण शांत करून उच्चतर पातळीवर नेण्याचे कार्य करतो; याकरता तो क्रमाक्रमाने मानसिक शक्ती अधिकाधिक एकाग्र करीत जातो; या क्रमवार एकाग्रतेचा शेवट समाधीत होतो.

समाधी ही, मनाला त्याच्या मर्यादित जागृत व्यापारांपासून परावृत्त होऊन, अधिक मोकळ्या व अधिक उन्नत अशा जाणिवेच्या अवस्थांमध्ये जाण्याची शक्ति देते; या समाधि-शक्तीमुळे राजयोग एकाच वेळी दोन कार्यं साधतो. बाह्य जाणिवेच्या गोंधळापासून मुक्त अशी शुद्ध मानसिक क्रिया करून, मनाच्या पातळीवरून तो राजयोगी उच्चतर अतिमानसिक पातळीवर जातो; या पातळीवर व्यक्तीचा आत्मा आपल्या खऱ्या आध्यात्मिक अस्तित्वात प्रविष्ट होतो: हें एक कार्य; दुसरें कार्य : जाणिवेचा जो कोणता विषय असेल, त्या विषयावर जाणिवेची अनिर्बध एकाग्रता करण्याची शक्ति समाधीमुळे राजयोग्याला प्राप्त होते. आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आद्य विश्वशक्तीचे कार्य वरीलप्रमाणे चालते; जगावर दिव्य क्रिया घडते ती वरील पद्धतीने घडते.

राजयोगी हा समाधिस्थितीत उच्चतम विश्वातीत ज्ञान व अनुभव यांचा भोक्ता असतोच; त्याला वरील अनिर्बध एकाग्रतेने कोणत्याहि विषयावर आपली जाणीव वापरण्याची शक्ति मिळाली म्हणजे तो या शक्तीचा वापर करून, जागृत अवस्थेत त्याला हवे ते वस्तुविषयक ज्ञान मिळवू शकतो; तसेच वास्तव जगांत हवे ते प्रभुत्व, अर्थात् जगाला उपयुक्त व आवश्यक असे प्रभुत्व गाजवू शकतो.

राजयोगाची प्राचीन पद्धति ही, केवळ स्व-राज्य हे राजयोगाचे साध्य मानीत नव्हती, तर साम्राज्य हे पण त्याचे साध्य मानीत होती. स्व-राज्य म्हणजे आत्म्याचे स्वत:वरचे राज्य, स्वत:च्या क्षेत्रांतील सर्व अवस्था व व्यापार याजवर आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेचा पूर्ण ताबा असणे. साम्राज्य म्हणजे आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेने, तिच्या बाह्य व्यापारांवर आणि परिसरावर सुद्धां हुकमत चालविणे.

प्राणशक्ति व शरीर यांजवर हठयोग आपलें कार्य करतो, शारीरिक जीवन आणि या जीवनाच्या शक्ति पूर्णत्वास नेणे, त्यांना अतिनैसर्गिक सामर्थ्य येईल असे करणे हे आपले साध्य मानतो; तसेच हे साध्य साधून तो मानसिक जीवनाच्या क्षेत्रात पाऊल टाकतो; त्याप्रमाणे राजयोग मनाशी आपला व्यवहार करतो व मानसिक जीवनाच्या शक्तींत, अतिनैसर्गिक पूर्णत्व व व्यापकत्व आणण्याचे साध्य स्वत:समोर ठेवतो; आणि त्यापुढे पाऊल टाकून, आध्यात्मिक अस्तित्वाच्या क्षेत्रांत तो प्रवेश करतो.

हे सर्व ठीक – परंतु राजयोगांत हा दोष आहे कीं, समाधीच्या अनैसर्गिक अवस्थांवर तो प्रमाणाबाहेर भर देतो. राजयोगाच्या या दोषामुळे, मर्यादेमुळे, राजयोगी भौतिक जीवनापासून काहीसा दूर राहतो; हे भौतिक जीवन आमच्या सर्व जीवनाचा पाया असते, आणि आम्ही मानसिक व आध्यात्मिक गोष्टी ज्या मिळवतो, त्या शेवटी आम्हाला भौतिक जीवनाच्या क्षेत्रांत आणावयाच्या असतात. राजयोगांत आध्यात्मिक जीवन समाधिस्थितीशी फारच निगडित असते, हा त्याचा विशेष दोष आहे.

आध्यात्मिक जीवन आणि या जीवनाचे अनुभव जागृतीच्या अवस्थेत आणि आमच्या सामान्य व्यवहारात पूर्णतया उपयोगात आणावे, पूर्णतया कार्यकारी करावे, हा आमचा उद्देश आहे. परंतु राजयोगांत आध्यात्मिक जीवन आमचे सर्व अस्तित्व व्यापण्यासाठी खाली उतरत नाही, ते आमच्या सामान्य अनुभवांच्या पाठीमागे राहते, दुय्यम भूमिका घेते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 36)

हठयोगाच्या मुख्य प्रक्रिया आसन व प्राणायाम या आहेत. हठयोगात अनेक आसने किंवा शरीराच्या निश्चल बैठका आहेत; या आसनांच्या द्वारा हठयोग प्रथम शरीराची चंचलता दूर करतो : शरीरात विश्वव्यापी प्राणशक्ती-सागरातून ज्या प्राणशक्ती ओतल्या जात असतात, त्या प्राणशक्ती, काहीतरी क्रिया व हालचाली करून निकालात न काढता, शरीरात राखून ठेवण्याची शरीराची असमर्थता या चंचलतेने व्यक्त होत असते; ही चंचलता प्रथम हठयोग अनेक आसनांचा उपयोग करून दूर करीत असतो; परिणामतः हठयोग शरीराला असामान्य आरोग्य देतो, जोर देतो, लवचिकपणा देतो; तसेच, ज्या सवयींमुळे शरीराला, सामान्य भौतिक प्रकृतीच्या ताब्यात व तिच्या स्वाभाविक व्यापारांच्या मर्यादित परिघामध्ये राहावे लागते, त्या सवयींपासून शरीराला मुक्त करण्यासाठी हठयोग प्रयत्नशील असतो. गुरुत्वाकर्षण-शक्तीवरसुद्धा विजय मिळविण्यापर्यंत, ह्या शरीरजयाची मजल जाऊ शकते अशी समजूत हठयोगाच्या प्राचीन परंपरेत कायमच प्रचलित असलेली दिसते.

विविध दुय्यम व सूक्ष्म प्रक्रियांद्वारा हठयोगी शरीरशुद्धी, नाडीशुद्धी करतो. शरीरातील नाना प्रकारचा मल, नाड्यांतील नाना प्रकारची घाण ही प्राणाच्या प्रवाहाला अवरूद्ध करते, म्हणून ती दूर करणे इष्ट असते; श्वास आणि उच्छवास या श्वसनक्रिया काही नियमांनुसार करणे म्हणजेच प्राणायामाच्या क्रिया होत; या क्रिया हठयोगाची फार महत्त्वाची साधने आहेत.

प्राणायाम म्हणजे श्वसनावर किंवा प्राणशक्तीवर नियंत्रण मिळविणे; प्राणशक्तीचे शरीरातील प्रमुख कार्य म्हणजे श्वसन होय. हठयोगाला प्राणायाम दोन तऱ्हांनी उपयोगी पडणारा आहे. त्याचा पहिला उपयोग : शरीराचे पूर्णत्व तो पूर्ण करतो. भौतिक प्रकृतीच्या पुष्कळशा सामान्य गरजा पुरविण्याच्या कामातून प्राणशक्ती मोकळी केली जाते; परिणामतः भक्कम आरोग्य, चिर तारुण्य आणि पुष्कळदा असामान्य दीर्घ आयुष्य हठयोग्याला प्राप्त होते.

त्याचा दुसरा उपयोग : प्राणायाम प्राणकोशातील ‘कुंडलिनी’ (वेटोळे घालून पडलेली प्रसुप्त प्राणक्रियासर्पिणी) जागी करतो आणि या कुंडलिनीच्या द्वारा हठयोग्याला, सामान्य मानवी जीवनात अशक्य असणाऱ्या अशा असामान्य शक्ती, असामान्य अनुभूतिक्षेत्रे व असामान्य जाणीव-क्षेत्रे खुली करून देतो; तसेच त्याला उपजतपणेच प्राप्त असणाऱ्या सामान्य शक्तीही अधिक तीव्र, जोरकस करतो…….

……हठयोगाचे परिणाम याप्रमाणे नजरेत भरणारे असतात; आणि सामान्य व भौतिक मनाला ते सहजच फार ओढ लावतात. तथापि हठयोगाचा प्रचंड खटाटोप करून शेवटीं आम्हाला जें प्राप्त होते ते एव्हढे मोलाचे आहे काय ? असा प्रश्न आमच्या पुढे येतो.

हठयोग भौतिक प्रकृतीचे साध्य साधून देतो. केवळ भौतिक जीवन तो दीर्घ काळ टिकवतो, तो या जीवनाचे पूर्णत्व पराकोटीला पोहोचवितो, भौतिक जीवन भोगावयाची शक्ति तो एक प्रकारे असामान्य दर्जाची करतो; हे सर्व खरें – पण या योगाचा एक दोष हा आहे की, त्याच्या कष्टमय अवघड प्रक्रिया योग्याचा इतका वेळ व इतकी शक्ति खातात, आणि सामान्य मानवी संसारापासून योग्याला इतकें पूर्णपणे तोडून टाकतात की, या योगाचीं फळे जगाच्या संसाराला उपयोगी पडतील असे करणे हठयोग्याला अगदीं अव्यवहार्य होते किंवा फारच थोड्या प्रमाणांत व्यवहार्य होते.

हठयोगाने मिळणाच्या सिद्धि राजयोगाने व तंत्रामार्गानेहि मिळू शकतात व या दुसऱ्या पद्धतीत कष्ट कमी पडतात, सिद्धि राखण्याच्या अटीहि हठयोगांतील अटींहून सौम्य असतात. हठयोगाने प्राप्त होणाच्या भौतिक सिद्धि म्हणजे खूप वाढलेली प्राणशक्ति, दीर्घ तारुण्य, सुदृढ प्रकृति व दीर्घ आयुर्मान या होत – परंतु या सिद्धि, सामान्य मानवी जीवनापासून अलग राहून, जगाच्या सामान्य व्यवहारांत यांची भर न टाकतां हठयोग्याने कृपणाप्रमाणे एकट्याने भोगावयाच्या असल्याने, एका दृष्टीने कुचकामी ठरतात. एकंदरीत, हठयोगाला मोठी मोठी फळे येतात, परंतु या फळांसाठी किंमत फारच मोजावी लागते आणि शेवटी, या फळांचा उपयोग मानवी समाजाला जवळजवळ काहीच होत नाहीं.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 34)

*

(एका साधकाला दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग)
हठ्योगाच्या पद्धतीचा आम्ही आमच्या साधनेमध्ये समावेश करत नाही. या पद्धतीचा उपयोग जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने करणार असाल तर, ती पद्धत साधनेपेक्षा स्वतंत्र म्हणूनच, तुमच्या स्वत:च्या निवडीने, उपयोगात आणली गेली पाहिजे.