मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच ‘धर्मग्रंथां’मध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, “जे कोणी तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतात त्यांच्याबाबतीत तुम्ही अत्यंत कृतज्ञ असलेच पाहिजेत आणि त्याच्या साथसंगतीची तुम्ही इच्छा बाळगलीच पाहिजे.”

…एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला एखादा अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल. “अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुमच्या प्रगतीच्या आड येत होती ती आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्यायोग्य नाही असे साधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तीही त्याच्या ठायी असते. दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर खेचून काढलेल्या मलिनतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

एक वृद्धत्व असे असते की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे असते ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता. ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रग्रल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू होतो.

असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या अर्थाने पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात. तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण राहता. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी [CWM 03 : 238]

(साधकाने कोणती वृत्ती बाळगावी याचे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग हा माकडाच्या पिल्लाचा आहे. हा मार्ग वैयक्तिक प्रयत्नांवर आधारित आहे. तर दुसरा मार्ग हा मांजराच्या पिल्लाचा मार्ग. हा समर्पणाचा मार्ग आहे. त्याचा संदर्भ येथे देण्यात आला आहे.)

‘मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीचे अनुकरण करा,’ हे सांगणे खूप सोपे आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घ्या. एकदा का मांजराच्या पिल्लाची वृत्ती धारण केली की मग कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करायला नकोत, असे तुम्ही समजता कामा नये. कारण मनुष्य हा काही मांजरीचे पिल्लू असू शकत नाही. तुमच्यामध्ये असे अगणित घटक असतात की, ज्यांना फक्त स्वतःवरच विश्वास ठेवण्याची सवय झालेली असते, त्यांना त्यांचे स्वतःचे काम करायचे असते. (मांजराच्या पिल्लाप्रमाणे) स्वतःला सर्व परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’वर सोपवून देण्याहून अधिक अवघड असते ते याच घटकांवर नियंत्रण ठेवणे! ते खूपच अवघड असते.

मानवी मनाचे अद्भुत कार्य नेहमीच चालू असते; या मनाला निरीक्षण करणे, टिका करणे, विश्लेषण करणे, शंका उपस्थित करणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, उदाहरणार्थ “हे असे केले तर बरे होईल का?” “तसे केले तर अधिक बरे होईल ना?” इ. इ. गोष्टी खूप आवडत असतात. आणि मग हे असे चालूच राहते, अशावेळी मग तो मांजराच्या पिल्लाचा दृष्टिकोन कुठे जातो? परंतु मांजराचे पिल्लू मात्र विचार करत बसत नाही. ते विचारादी गोष्टींपासून मुक्त असते आणि त्यामुळे त्याला तसे वागणे खूप सोपे असते.

तुम्ही कोणताही मार्ग अनुसरा, परंतु जोपर्यंत तुम्ही ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच असते. त्या तादात्म्याच्या क्षणी मात्र, जीर्ण वस्त्रं गळून पडावीत त्याप्रमाणे सारे प्रयास गळून पडतात, तुम्ही जणू काही एक वेगळीच व्यक्ती बनता. एकेकाळी जे तुम्हाला अशक्यप्राय वाटत असे, ते आता तुम्हाला शक्य होते आणि ते केवळ शक्यच होते असे नाही, तर ते तुमच्यासाठी अपरिहार्य बनते, कारण तुम्ही त्याविना इतर काही करूच शकत नाही. तुम्ही सतर्क, शांत राहिले पाहिजे, आणि आंतरिक प्रेरणेची प्रतीक्षा केली पाहिजे; बाह्य प्रतिक्रियांमधून तुम्ही कोणतीही कृती करता कामा नये; सातत्याने, नियमितपणे, ‘वरून येणाऱ्या’ प्रकाशाद्वारेच तुमचे संचालन झाले पाहिजे. इतर कोणत्याही प्रेरणेने कृती न करता, तुम्ही केवळ त्याच प्रकाशाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन कृती केली पाहिजे. विचार करायचा नाही, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, “मी हे करू की ते करू ?” असे विचारायचे नाही, तर केवळ जाणून घ्यायचे, पाहायचे आणि ऐकायचे. कोणताही प्रतिप्रश्न न करता, कोणतीही शंका उपस्थित न करता, तुम्ही आंतरिक विश्वासाने कृती केली पाहिजे कारण, आता तो निर्णय हा तुमच्याकडून आलेला नसतो, तर तो ‘वरून आलेला’ असतो. ही गोष्ट एखाद्याच्या बाबतीत लवकर घडेल किंवा दुसऱ्या एखाद्याला मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल – ते त्या त्या व्यक्तीच्या पूर्वतयारीवर, तसेच इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तोपर्यंत तुम्ही आस बाळगली पाहिजे आणि ती आस चिकाटीने बाळगली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा धैर्य खचू देता कामा नये. कदाचित हजाराव्या वेळी तुम्हाला परिणाम झालेला आढळून येईल हे जाणून, गरज पडली तर एकच गोष्ट हजार वेळादेखील पुन्हा पुन्हा केली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 94-95]

‘योगा’चे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. तेथे तुम्ही पूर्णत: स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताकदीनिशी सुरुवात करता. तेथे तुम्ही जे उन्नत होता, जे काही साध्य करून घेता, ते सारे तुमच्या शक्तीच्या प्रमाणात असते. पण तेथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा का तुमचे पतन झाले तर, तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाता, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो.

दुसरा मार्ग ‘समर्पणाचा’, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे. पण या मार्गाबाबत पाश्चात्त्य लोकांना अडचण जाणवते. त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टीला घाबरायला आणि त्या टाळायला त्यांना शिकविण्यात आलेले असते. जणू त्यांच्या आईच्या दुधातूनच त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव पाजण्यात आलेली असते. आणि समर्पणात तर हे सर्व काही सोडून देणे अभिप्रेत असते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, रामकृष्ण (परमहंस) म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर ‘माकडाच्या पिल्लाचा’, अन्यथा, ‘मांजराच्या पिल्लाचा’ मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, त्याने तिला घट्ट पकडलेच पाहिजे; नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते; त्यामुळे त्याला कसलेच भय नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला स्वत:ला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला धरून ठेवावे म्हणून त्याने फक्त ‘मा’ ‘मा’ असा आकांत करायचा असतो.

तुम्ही जर हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर ‘योगसाधने’ला प्रारंभच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार शक्यता असू शकते पण ‘ईश्वरा’सोबत वागत असताना मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही.

तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच तुमचा ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 04-05]

जीवनाचा आणि ‘योगा’चा योग्य विचार केला असता, असे दिसून येते की, सर्व जीवन म्हणजे ‘योग’च आहे. मग ते जाणीवपूर्वक असो किंवा अर्ध-जाणीवपूर्वक असो. मनुष्यामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाच्या द्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. आणि या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि ‘विश्वा’मध्ये अंशत: आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत ‘अस्तित्वा’शी व्यक्तिगत मानवाचे ऐक्य, ही होय.

जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या मागे आपण दृष्टी टाकली तर, असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे ‘प्रकृती’चा एक महान ‘योग’ आहे. ही प्रकृती जाणीवपूर्वक किंवा अर्धजाणीवपूर्वक, स्वत:चे पूर्णत्व गाठावयाच्या प्रयत्नामध्ये आहे; स्वतःमधील विविध शक्ती सारख्या वाढत्या प्रमाणात प्रकट करीत, प्रकृती स्वतःचे पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. या ‘योगा’च्या आधारे, प्रकृती तिच्या दिव्य सत्य स्वरूपाशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा, म्हणून प्रकृतीने मानव या आपल्या विचारशील घटकाद्वारे, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त योजनाबद्ध व्यवस्थेचा, या ‘पृथ्वी’वर प्रथमच वापर केला आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, “योग हे व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये असताना, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे साधन आहे.”

– श्रीअरविंद [CWSA 23 : 06]

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्धाचा सारांश – चेतना जडामध्ये गर्भित असते. जडामध्ये सुप्त स्वरूपामध्ये असलेली ही चेतना उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे विमुक्त केली जाते.)

(उत्तरार्ध) – भाग ०१

प्राण ही चेतनेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे; मन ही दुसरी पायरी आहे; पण उत्क्रांती मनापाशी संपत नाही; तर त्याहून अधिक महान अशा आध्यात्मिक (spiritual) आणि अतिमानसिक (supramental) चेतनेमध्ये विमुक्त होण्याची ती वाट पाहत राहते. ‘अतिमानसा’चे विकसन आणि सचेतन जीवामध्ये ‘आत्म्या’चे प्राबल्य हे निश्चितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे. तसे झाले तरच, वस्तुजातामध्ये अंतर्हित (involved) असणारे ‘दिव्यत्व’ पूर्णत: बहरून येईल आणि जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल.

परंतु ‘प्रकृती’कडून उत्क्रांतीची या आधीची पावले, वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली; मनुष्यामध्ये मात्र, त्याच्या (मन, प्राण, देह) या आधारामध्ये, जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यास ‘प्रकृती’ समर्थ ठरली आहे. तथापि, मनुष्यामध्ये असलेल्या मानसिक इच्छाशक्तीद्वारेच हे संपूर्णत: घडून येईल असे संभवनीय नाही, कारण मन हे एका ठरावीक बिंदूपर्यंतच जाऊ शकते आणि त्यानंतर ते एका वर्तुळातच फिरत राहते. ज्यामुळे मन उच्चतर तत्त्वात बदलून जाईल असे वळण चेतनेला देणे आवश्यक आहे; असे एक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. ती पद्धत प्राचीन काळातील मानसिक तपस्येच्या आणि ‘योगाभ्यासा’च्या माध्यमातून शोधून काढणे गरजेचे आहे. प्राचीन काळी, जगापासून स्वत:ला दूर राखणे आणि ‘स्व’च्या किंवा ‘आत्म्या’च्या उच्चतर चेतनेमध्ये स्वत:चा विलय करून घेणे या मार्गाने हे प्रयत्न झाले आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्ध) जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे ‘अस्तित्वाची आणि चेतनेची’ एक ‘वास्तविकता’ आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या प्राचीन शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ ‘आत्म्या’मध्ये आणि ‘चैतन्या’मध्ये एकात्म असतात पण ‘चेतने’च्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी आणि मन, प्राण, देह यांतील ‘वास्तविकते’विषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक साधनेद्वारे हा विभक्त ‘चेतने’चा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी, स्वत:मधील व सर्वांमधील ‘दिव्यत्वा’विषयी जागृत होणे शक्य आहे.

श्रीअरविंदांची शिकवण असे सांगते की, ‘सद्वस्तु’ (One Being) आणि ‘चेतना’ (Consciousness) ही ‘जडभौतिका’मध्ये अंतर्हित (involved) आहे. उत्क्रांती (Evolution) ही अशी पद्धती आहे की, जिच्याद्वारे ही सद्वस्तु स्वत:ला मुक्त करवून घेते; जे अचेतन भासते त्यामध्येसुद्धा चेतना प्रकट होते आणि एकदा का ती प्रकट झाली की, उच्च उच्चतर वाढण्याकडे आणि त्याच वेळी जास्तीत जास्त पूर्णत्वाकडे विकसित होण्यासाठी व विस्तारण्यासाठी ती स्वत:ला प्रवृत्त करते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित.

प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी [CWM 12 : 116]

‘कर्म’ आणि ‘साधना’ यांमध्ये विरोध नसतो. योग्य वृत्तीने केलेले कर्म हीच स्वयमेव साधना असते. ध्यान हाच काही साधनेचा एकमेव मार्ग नाही. कर्म हाही एक मार्ग आहे; प्रेम, भक्ती आणि समर्पण हेही साधनेचे इतर मार्ग आहेत.

*

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश हा ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचा असतो. ध्यानामुळे हे शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे ‘कर्म’ हे येथे मूलभूत महत्त्वाचे ठरते. मात्र ते योग्य चेतनेमध्ये आणि योग्य वृत्तीने केले पाहिजे आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेही साध्य होतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 209, 221]