विचारशलाका ११

साधक : अनुभवाची नकारात्मक बाजू (Negative Side). आणि सकारात्मक बाजू (Positive Side). म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुमच्यामध्ये निश्चितपणे काही दोष आहेत, ते तुम्हालादेखील माहीत आहेत, जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. ते दोष घालविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे ही झाली (अनुभवाची) नकारात्मक बाजू (Negative Side).

काही बाबी वास्तवात उतरविण्यासाठी, काही बाबतीत त्यामध्ये तुमचे स्वत:चे असणे, काही बाबतीत तुम्ही स्वत:ला घडविणे तसेच काही गुण तुम्ही तुमच्या अंगी बाणवणे गरजेचे असते. तेव्हा ही झाली (अनुभवाची) रचनात्मक बाजू म्हणजे सकारात्मक बाजू (Positive Side).

तुमच्यात एक दोष आहे, उदाहरणार्थ, खरे न बोलण्याची सवय. आता, खरे न बोलणे व खरे न बघणे, ही जी खोटेपणाची सवय आहे, ती सवय घालविण्याचा प्रयत्न करून, तसेच तुमच्या चेतनेतील खोटेपणाचा अस्वीकार करून, तुम्ही त्या सवयीविरुद्ध लढा देता. ही गोष्ट करण्यासाठी, तुम्ही फक्त सत्यच बोलण्याची सवय तुमच्या अंगी बाणवली पाहिजे. आणि त्यासाठी, सत्य काय ते समजावून घेण्याची व नेहमी सत्यच सांगण्याची सवय तुम्ही अंगी बाणवली पाहिजे. तुम्ही दोषांना नकार देता, ती झाली नकारात्मक बाजू. तुम्ही गुण अंगी बाणवता, ही दुसरी बाजू म्हणजे सकारात्मक बाजू; हे असे आहे.

हे प्रत्येक बाबतीतच असे आहे. उदाहरणार्थ, तुमच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी तुम्हाला एक प्रकारच्या बंडखोरीची – अज्ञानी, दुराग्रही, अस्फुटशा बंडखोरीची अशी एक खोड असते; की ती सवय, जे काही वरून येते त्याला नकार देते. तेव्हा या सवयीच्या विरोधात लढा देणे, तिला अभिव्यक्त होण्यापासून रोखणे, आणि तुमच्या प्रकृतीतून तिला हद्दपार करणे ही झाली नकारात्मक बाजू. आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मकतेने समर्पणवृत्ती, समजूतदारपणा, आत्म-निवेदन, आत्म-दान, आणि दिव्य शक्तींशी पूर्णत: सहकार्य करण्याची भावना या बाबींचा अंगीकार केला पाहिजे. ही झाली सकारात्मक बाजू. समजले? त्याप्रमाणेच – जे लोक खूप रागीट असतात… जे खूप चिडतात, अचानक रागाचा उद्रेक होणे ही ज्यांची सवयच असते… त्यापैकी कोणी एखादा त्या सवयीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, रागावणे नाकारतो, स्वत:मध्ये असणाऱ्या रागाच्या उर्मींना झुगारून देतो; मात्र या साऱ्याची जागा अविचल शांतीने, परिपूर्ण सहनशक्तीने, दुसऱ्यांची भूमिका समजून घेण्याच्या वृत्तीने, सुस्पष्ट आणि स्थिरचित्त दृष्टीने, प्रशांत अशा निर्णयाने घेतली गेली पाहिजे, ही झाली सकारात्मक बाजू.

– श्रीमाताजी [CWM 07 : 202-203]

विचारशलाका १०

साधक : आम्ही आमची चेतना विशाल कशी करावी?

श्रीमाताजी : चेतना विशाल करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी विशाल गोष्टीशी तादात्म्य पावणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, चेतना यामध्ये तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची चेतना तुम्ही काहीशी विशाल करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो सर्व बाजूंनी किती दूर, दूरवर पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग असतो की, तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजवीकडे नाही, डावीकडे नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… असा विचार तुम्ही केलात, तर तुम्हाला असे जाणवू लागते की, आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणतीच मर्यादा नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची चेतना तुम्ही काहीशी विशाल करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने विशाल होण्यात यशस्वी होतात.

– श्रीमाताजी [CWM 06 : 344-345]

विचारशलाका ०९

साधक : आम्हाला ‘योगा’संबंधी काही सांगाल का?

श्रीमाताजी : ‘योग’ तुम्हाला कशासाठी हवा आहे? शक्ती प्राप्त व्हावी म्हणून? मन:शांती, शांतचित्तता लाभावी म्हणून? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून? तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात हे दर्शविण्यासाठी वरीलपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्याकरता तुम्हाला पुढील काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :

तुम्हाला ‘ईश्वरा’साठी ‘योगमार्गा’चे आचरण करावेसे वाटते का?

‘ईश्वर’ हाच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का?

म्हणजे ‘ईश्वरा’वाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची अवस्था आहे का?

तुम्हाला असे वाटते का की, ‘ईश्वर’ हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ‘ईश्वरा’विना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही?

तसे असेल तरच तुम्हाला ‘योगमार्ग’ स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

‘ईश्वरा’विषयीची तळमळ, अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत ठेवायची. आणि त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती असते एकाग्रतेची! ‘ईश्वरा’वरील एकाग्रतेची – ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, आत खोल खोल जा. तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्र आहेत – एक असते मस्तकाच्या वर (सह्स्त्रार), दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये, आज्ञाचक्र)! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात – रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या सुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 01]

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]

विचारशलाका ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे, या दोन गोष्टी (साधनेमध्ये) सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. कारण हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात. चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते.

‘ईश्वरा’ने आमच्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आमच्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो, त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते.

मस्तकामध्ये (आणि नंतर मस्तकाच्या वर) चेतनेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. (प्रथम फक्त शांती, किंवा शक्ती व शांती एकत्रितपणे) अशा ईश्वरी ‘शांती’चे, आणि ईश्वरी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे व्यक्तित्वामध्ये अवतरण घडून यावे यासाठी आवाहन केल्याने, आणि तशी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता (opening) घडून येते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 327-328]

विचारशलाका ०६

श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, “प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. ‘अतिमानस’ ही अट्टाहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.”

साधक : “एखाद्या गोष्टीला खाली खेचून आणणे’’ ही अनेकांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसांना घाई असते आणि त्यांना ताबडतोब फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, ते जणूकाही ‘अतिमानस’ खाली उतरवीत आहेत – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व (vital individuality) खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: ते त्यांना मूर्ख बनविते. बहुतेक वेळा म्हणजे, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हे असेच घडते. एखादे छोटेसे व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकचकीत, दिखाऊ असा खेळ उभा करते. मग तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला ‘खाली खेचले’ होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “अरे, हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

तुम्हाला जेव्हा खरोखरच खऱ्या ‘ईश्वरी प्रकाशा’चा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्याच्याशी जेव्हा तुमचा संपर्क निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ आणि प्राणिक प्रकाश यामधील फरक ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो जणू काही रंगमंचावरील प्रकाशाचा कृत्रिम खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरजण त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ पाहिलेला असतो, त्या ‘सत्या’शी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्या कृत्रिम प्रकाशाकडे फक्त पाहता आणि हसता. (तो कृत्रिम प्रकाश) ही फसवणूक असते, पण ती फसवणूक आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महा-रंगमंच असतो — तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ म्हणजे काय हे माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन ते जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला हे नको आहे.” जेव्हा तुम्ही ‘खेचून आणता’, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते… लाखातूनच एखाद्या वेळीच असे घडते की, एखाद्याने खरोखरच ‘सद्वस्तु’ खाली आणलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, त्याची तयारी झालेली होती. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचून आणता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे काहीतरी असे, ते त्या सद्वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती ‘सद्वस्तु’ नसते.

एखादी गोष्ट खाली खेचून आणणे ही नेहमीच अहंमन्य प्रक्रिया असते. ते आकांक्षेचे विकृत रूप असते. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे अथवा आत्म-दान समाविष्ट असते तर खेचून आणण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना, ती अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नसतो, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार असतो.

– श्रीमाताजी [CWM 11 : 23]

विचारशलाका – ०५

साधक : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आम्ही बाळगली पाहिजे का?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक सचेत, अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे, असे मला वाटते. कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून, कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक हालचालींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते. आध्यात्मिक अनुभव हे वस्तुत: केवळ ‘अनुभवासाठी अनुभव’ अशा पद्धतीने येता कामा नयेत तर, ते सहजस्फूर्तपणे आले पाहिजेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून आले पाहिजेत.

*

आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो. तुम्हाला जर ‘ईश्वर’ भेटला तर तो तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. (आलेल्या अनुभवाचे वर्णन, ‘कोणी येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले’ असे करतो तर ‘कोणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले’ असे करतो, हा असा फरक पडतो.) कारण, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांतील मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो तो तुमच्या ‘आंतरिक चेतनेमध्ये’ आणि तो शब्दांकित केला जातो तुमच्या ‘बाह्य चेतनेमध्ये’! तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित केला जातो. केवळ एकच सत्य, एकच सद्वस्तु अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ती सद्वस्तु ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे मात्र अनंत आहेत.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432], [CWM 03 : 17]

विचारशलाका – ०४

व्यक्ती जर ‘ईश्वरा’प्रति विश्वासाने आणि खात्रीपूर्वक आत्मदान करेल तर ‘ईश्वरा’कडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल; आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मदान जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ‘ईश्वरा’चा संपर्क आणि त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची सक्रियता कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 69]

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]

विचारशलाका – ०२

‘योग’ हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त चेतनेकडून आंतरिक आणि सत्य चेतनेप्रत घेऊन जाण्यात येते आणि त्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून आपण वस्तुमात्रांमागील ‘सत्या’शी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचतो.

योग-चेतना (Yogic Consciousness) बाह्य व्यक्त विश्वाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करते, असे नाही तर उलट, ती त्या विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्य अनुभवही घेत नाही तर ती आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात परिवर्तन घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा ‘कायदा’ लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञानी’ कायद्याच्या जागी ईश्वरी ‘संकल्प’ आणि ‘ज्ञाना’चा नियम प्रस्थापित करते.

चेतनेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327]