विचारशलाका ४१

 

भाग – ०३

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

तुम्हाला नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले असतात पण आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी (Psychic being) क्षणभरापुरता आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेला मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करायचे असते – हा असा एक क्षण असतो की, जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करायची हे दाखवून देतो….

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच चेतना उदयास येते. व्यक्तीच्या ऐकण्यात काहीतरी येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेल्या प्रयासाची उत्कटता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी ‘खरी चेतना’ काय याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो. (क्रमश: …)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका ४०

 

भाग – ०२

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता याचे मार्गदर्शन करणारा जो धागा होता, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांना स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या सत्याचा शोध लागणार हे ज्यांच्याबाबतीत निर्धारित झालेले असते, त्यांच्या जीवनात एखादा तरी असा क्षण असतो की, जेव्हा ते पहिल्यासारखे राहत नाहीत, वीज चमकून जावी तसा तो क्षण असतो, पण तो तेवढा एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे (चेतनेचे परिवर्तन घडविणाऱ्या मार्गाकडे) उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश केलाच पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या त्या अवस्थेला उजाळा देण्यासाठी तुम्ही अथक चिकाटीने, सातत्याने आणि अविरत स्थिरपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे. म्हणजे मग ती अवस्था तुम्हाला अधिक खऱ्याखुऱ्या, अधिक समग्र अशा एका अवस्थेकडे घेऊन जाईल. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका ३९

 

भाग – ०१

 

साधक : व्यक्तीने स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन कसे करायचे?

श्रीमाताजी : अर्थातच याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आणि बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे त्या मार्गाचा संकेत आपल्याला मिळून जातो. तो मार्ग गवसण्याची पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत काहीशी वेगवेगळी असते.

उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य चेतनेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. माणसं, वस्तू परिस्थिती यांच्या वरवरच्या बाह्यवर्ती भागाशी तिचा संपर्क असतो आणि कधीतरी अचानक या ना त्या कारणाने – मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत हे कारण वेगळे असते – तुमची चेतना वर उचलली जाते; आणि वस्तुमात्रांकडे त्यांच्याच पातळीवरून म्हणजे क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी, तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या अगणित गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्यांच्याकडे समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी, त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून न पाहता, आणि प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत न बसता, तुम्ही त्या सर्व गोष्टींमध्ये जणू एकत्व आहे या दृष्टीने आणि खूप उंचावरून पाहता.

हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येतो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे चेतनेमध्ये अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर जाते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक निरवतेमध्ये, आंतरिक स्थिरतेमध्ये, वस्तुमात्रांच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्रांचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे अगदी अंतरंगातून आकलन होते, एक सखोल जाणीव होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. आणि मग, वरकरणी कितीही बाह्य रुपं असली तरी त्या बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव त्या व्यक्तीला होते.

किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो काळ आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये व्यक्ती प्रवेश करते. हे अनुभव तुमच्या आयुष्यात अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतदेखील नाही ते का आणि कसे आले…

इतरही अनेक मार्ग असतात, अनेक अनुभव असतात. ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार वेगवेगळे असतात, पण, एका क्षणाच्या, निमिषार्धातील या एखाद्या अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 402-404]

विचारशलाका ३८

 

(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)

 

समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.  ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.

दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]

विचारशलाका ३७

 

परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची प्रत्यक्ष चेतना ही तिच्या सद्यस्थितीतील सवयी व कक्षा यांच्या पलीकडे वृद्धिंगत करणे; तिला प्रशिक्षण देणे, तिला ‘दिव्य प्रकाशा’च्या दिशेने खुली करणे, तिच्यामध्ये ‘दिव्य प्रकाशा’ला त्याचे कार्य मुक्तपणे आणि परिपूर्णपणे करू देणे.

परंतु तो ‘दिव्य प्रकाश’ तेव्हाच त्याचे कार्य परिपूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व लालसा आणि भीती यांपासून मुक्त झालेले असता; जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही मानसिक पूर्वग्रह नसतात; कोणत्याही प्राणिक आवडीनिवडी नसतात; तुम्हाला बंधनात पाडणारी किंवा गढूळ करणारी कोणतीही शारीरिक भयशंकितता नसते किंवा विचलित करणारे कसले आकर्षणही नसते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 101]

विचारशलाका ३६

 

सर्वसाधारणपणे आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती दिव्य शक्ती आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल. ‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे – त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 07-08]

विचारशलाका ३५

स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य या दोन घटकांनी ‘चेतना’ बनलेली असते.

जाणीव ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही योग्य चेतना राखून वस्तुंबाबत जाणीव बाळगली पाहिजे; योग्य प्रकारे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे. पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर चेतना प्रभावी ठरण्यासाठी संकल्प आणि शक्ती असणे आवश्यक आहे.

कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, मात्र तसा बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जाणिवेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरायची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.

तुम्ही आंतरात्मिक चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असण्याचा उपयोग असा असतो की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ला आवाहन करू शकता.

पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना बरेचदा वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामधील मनाची व प्राणाची जाणीव, त्यांची इच्छा, त्यांची शक्ती या गोष्टी परस्परांहून विभक्त असतात आणि अपूर्ण असतात; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते निर्णायकदेखील नसते. केवळ अतिमानसामध्येच (supermind) ‘जाणीव’, ‘संकल्प’, ‘शक्ती’ या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक परिणामकारक असतात.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 24-25]

विचारशलाका ३४

आळस आणि निष्क्रियता यांचा परिणाम म्हणजे तमस, तामसिकता. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा खरी ‘चेतना’प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 13 : 212]

विचारशलाका ३३

 

चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांच्याविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथेच असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथेच असते.

*

चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी ठेवू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिसादच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते. चेतना म्हणजे फक्त ‘चित’ नाही, तर ती ‘चित्शक्ती’देखील असते.

चेतना आणि मन या गोष्टी अभिन्न आहेत, असे सहसा मानले जाते; पण मानसिक चेतना ही अशी एक निव्वळ मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा त्याची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.

मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन (unconscious), अधोमानसिक (submental) किंवा अधिमानसिक (overmental), अतिमानसिक (supramental) अशा वाटतात.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 15-16]

विचारशलाका ३२

 

मूलत: सर्व प्रकारचे योग म्हणजे आपली चेतना उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे होय. असे केल्याने आपली चेतना ही, आपल्या सामान्य चेतनेच्या आणि आपल्या सामान्य ‘प्रकृती’च्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी सक्षम होऊ शकेल.

आपल्या आंतरिक सखोलतेशी, आपल्या वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी ‘संपर्क साधणे’ म्हणजे योग. त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्तित्वांप्रत, त्यांच्या हालचालीबाबत ‘खुले असणे’ किंवा आपल्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा ‘स्वीकार करणे’ म्हणजे योग; किंवा योग म्हणजे उत्तुंगतेप्रत आरोहण असते, आणि आपल्या कक्षांच्या अतीत असणाऱ्या व्यापकतेमध्ये, आंतरिक सखोलतेमध्ये ‘प्रवेश करणे’ असते. ज्यामुळे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्या आत्म्याचे सुशासन आपल्या बाह्य अस्तित्वावरदेखील चालू लागेल.

आपण ज्या ‘सद्वस्तु’चा शोध घेऊ इच्छितो ती आपल्या पृष्ठभागावर नसते किंवा जर ती ‘सद्वस्तू’ तिथे असलीच तर ती अवगुंठित (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या चेतनेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर चेतनाच तेथे पोहोचू शकते, त्या ‘सद्वस्तु’ला स्पर्श करू शकते, त्या ‘सद्वस्तु’चे ज्ञान करून घेऊ शकते आणि त्या ‘सद्वस्तु’ला प्राप्त करून घेऊ शकते. आपण आपल्या सामान्य चेतनेच्या आतमध्ये, तेथे काय आहे हे शोधण्यासाठी, बुडी मारली तरी त्या ‘सद्वस्तु’च्या केवळ अंशभागामध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327-328]