अमृतवर्षा १८

सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतूने म्हणजेच, हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; तसेच आजवर त्याला जे सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार होतो; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.

दीर्घ ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही.

त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून आता काहीच लपून राहू शकत नाही.

अगदी कोणत्याही त्रुटी, अज्ञान या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो त्याला कोणत्याही त्रुटींचा त्रास होत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”त्रुटी म्हणजे जीवनाचा सत्याच्या दिशेने चाललेला पहिलावहिला प्रयत्न असतो.”

अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 28]

अमृतवर्षा १७

(स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वत:चे निरीक्षण कसे करावे याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

सबंध दिवसातील तुमच्या गतीविधी, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यायची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्या प्रकाशयुक्त भागासमोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजे अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

….या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे की नाही? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही असे केल्यानंतर हा खेळ संपलेला असतो.

मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यायच्या राहिलेल्या असतात. मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. (इतकी सुधारणा आता तुमच्यामध्ये झालेली असते.)

– श्रीमाताजी [CWM 04 : 38-39]

अमृतवर्षा १६

(पूर्णत्वप्राप्तीची पहिली पायरी म्हणजे स्वत:चे निरीक्षण करणे. हे निरीक्षण कसे करावे यासंबंधी श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

आपल्यामधील आंतरिक क्रियांचा, गतीविधींचा कोठे व कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो. तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्यासारखे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी तुमचे मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिकच असावी लागते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 38]

अमृतवर्षा १५

 

पूर्णत्वप्राप्तीसाठीची पहिली पायरी म्हणजे आपल्या स्वत:विषयी, आपल्या अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांविषयी व त्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कार्यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे कळू शकेल.

…(आपल्या अस्तित्वाच्या) या क्रियांचे, गतीविधींचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना आपल्या उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, त्याने दिलेला निर्णय मानण्याची आपण प्रामाणिक इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील निर्णयक्षमतेला असे वळण लावण्याची आपण आशा बाळगू शकू, की जी कधीच चुकणार नाही.

श्रीमाताजी [CWM 12 : 03]

चेतना व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती छोटी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय होणार आहात ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

तुम्हाला जर अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

 

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

अमृतवर्षा १३

 

(आपल्याला ज्या शक्ती, क्षमता लाभलेल्या असतात त्यांचा यथोचित उपयोग कसा करावा, यासंबंधी श्रीमाताजी येथे सांगत आहेत. आपण जेवढे प्रदान करतो तेवढ्या प्रमाणातच आपण ग्रहण करू शकतो, हे तत्त्व बौद्धिक क्षमता, प्रेम आणि यांसारख्या गोष्टींबाबतही लागू पडते असे त्या सांगत आहेत.)

आपण जलवाहिन्यांप्रमाणे (channels) असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी, त्या जलवाहिन्यांपाशी जे पाणी आलेले असते ते प्रवाहित करण्यास आपण वाव दिला नाही तर ते साचून राहते व अवरुद्ध (block) होते; आणि पुढेपुढे तर त्यांच्यापाशी ते पाणीच येईनासे होते. एवढेच नव्हे, तर ते जमा झालेले पाणीही खराब होऊन जाते. (जलप्रवाहाप्रमाणे असणारा) प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ जर आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपले छोटेसे व्यक्तित्व त्या महान वैश्विक प्रवाहाशी कसे जोडून घ्यायचे हे जर आपल्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 102]

अमृतवर्षा १२

तुम्हाला जर साधना करायची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच जे काम केवळ स्वत:साठीच केलेले नाही अशा कामासाठी दिला पाहिजे. …तुम्हाला जर साधनेला सुरुवात करायची असेल तर मग अशा वेळी तुमचा स्वत:चा असा कोणताही स्वार्थ ज्यामध्ये नाही अशी कोणतीतरी गोष्ट तुम्ही केली पाहिजे. थोडे का होईना पण नि:स्वार्थी वृत्तीने व्यक्तीने काहीतरी केले पाहिजे. कारण जर एखादी व्यक्ती स्वत:मध्येच मग्न राहत असेल तर ती जणूकाही एखाद्या कोशात बंदिस्त झाल्याप्रमाणे होते आणि तेव्हा ती वैश्विक शक्तींना खुली होऊ शकत नाही. मात्र एखादी लहानशी नि:स्वार्थी कृती, अहंकारविरहित एखादी छोटीशी कृती ही व्यक्तीच्या क्षुद्र व अतिशय खुज्या अशा व्यक्तिमत्त्वापलीकडील काही वेगळ्या अशा गोष्टींसाठीची दालने व्यक्तीला खुली करून देते.

व्यक्ती सहसा स्वत:ला एका कोशात बंदिस्त करून घेते आणि जेव्हा तिला एखादा धक्का बसतो किंवा काही संघर्ष होतो तेव्हाच त्या व्यक्तीला इतर कोशांची जाणीव होते. परंतु सर्वांच्यामध्ये प्रवाहित असलेल्या एका महान शक्तीची जाणीव होणे, मानवी जीवनाच्या व विश्वातील प्रत्येक जिवाच्या परस्परावलंबी स्वरूपाची जाणीव होणे ही एक दुर्मिळ बाब आहे आणि साधनेतील अपरिहार्य अशा अवस्थांपैकी ही एक अवस्था आहे.

– श्रीमाताजी (CWM 06 : 153)

अमृतवर्षा ११

 

प्रश्न : योगसाधना करण्याची पात्रता अंगी येण्यासाठी व्यक्तीने काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झाले पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेल्या भागाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अचेतनेमुळे आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अचेतनेमुळेच प्रकृतीमध्ये काही परिवर्तन किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अचेतनेच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही सजग झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतू व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत.

अशा रीतीने एकदा का तुम्ही जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या आणि तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की मग जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 02]

अमृतवर्षा १०

 

धीर धरा! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका;  तो आशेचा आणि दिलासादायक संदेश असतो. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा!

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी [CWM 02 : 44]

अमृतवर्षा ०९

सर्वकाही सर्वांचे आहे. ‘एखादी गोष्ट माझी आहे’ असे म्हणणे वा तसा विचार करणे म्हणजे विलगता, विभाजन निर्माण करण्यासारखे आहे, मात्र वास्तवात असे विभाजन नसतेच. सर्वकाही सर्वांचे आहे, आपण ज्यापासून बनलो आहोत ते मूलद्रव्यदेखील सर्वांचे आहे. क्रमश: होत जाणाऱ्या वाटचालीमधील एका टप्प्यावर, ज्या अणुरेणूंच्या समुदायापासून आपली संरचना झालेली आहे, आणि ज्यांच्यापासून उद्या एक वेगळीच संरचना तयार होणार आहे, ते अणुरेणू, ते मूलद्रव्यसुद्धा सर्वांचे आहे.

काही लोकांकडे पुष्कळशी भौतिक साधनसंपत्ती असते, हे खरे आहे. परंतु वैश्विक कायद्याशी सुसंगत राहायचे असेल तर त्यांनी स्वत:ला, ‘आपण त्या संपत्तीचे विश्वस्त आहोत, राखणदार आहोत’, असे मानले पाहिजे. सर्वांच्या हितासाठी त्याचा विनियोग करावा या हेतूने, त्या संपत्तीची व्यवस्था लावण्यासाठी त्यांच्याकडे ती संपत्ती विश्वासाने सोपविण्यात आलेली असतेहे त्यांना माहीत असले पाहिजे.

“एखादी कल्पना ही माझी आहे” असे जे म्हणतात आणि इतरांना त्याचा लाभ घेऊ देण्याची परवानगी देणे म्हणजे आपण फार मोठा परोपकार करत आहेत असा ज्यांचा विचार असतो, ते मूर्ख असतात. कल्पनांचे हे विश्वही सर्वांचे आहे आणि बौद्धिक शक्ती हीदेखील वैश्विक शक्ती आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 103]