विचार शलाका – ०४

भारतीय धर्माने व्यक्तीला सुप्रस्थापित, सुसंशोधित, बहुशाखीय आणि नित्य विस्तीर्ण होत जाणारा असा ज्ञानाचा तसेच आध्यात्मिक वा धार्मिक साधनेचा मार्ग दाखवून दिला.

त्या उच्च पायऱ्यांवर जाण्याची ज्यांची तयारी झालेली नाही त्यांच्याकरिता, भारतीय धर्माने व्यक्तीजीवन व समाजगत जीवन यासंबंधातील व्यवस्था घालून दिली, व्यक्तिगत शिस्त व सामाजिक शिस्त, व्यक्तिगत वर्तन व समाजगत वर्तन या संबंधात एक आराखडा पुरवला; मानसिक, नैतिक व प्राणिक संवर्धनाची चौकट पुरवली. ही व्यवस्था, आराखडा, चौकट मान्य करून कोणीही आपल्या मर्यादेत, आपल्या प्रकृतीला धरून असे वागू शकतो की, अंतत: श्रेष्ठ अस्तित्वात व जीवनात प्रविष्ट होण्याची त्याची तयारी होते.

हिंदूधर्माने…जीवनाचा कोणताही भाग धार्मिक व आध्यात्मिक जीवनाला परका मानला नाही व ठेवला नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 181)

विचार शलाका – ०३

प्राचीन भारतीय सभ्यता चार मानवी हितसंबंधाच्या पायावर स्पष्टपणे उभी केलेली होती – १) वासना आणि भोग २) मन व शरीर यांची भौतिक व आर्थिक उद्दिष्टे व गरजा ३) नैतिक वर्तन व वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा योग्य नियम ४) आध्यात्मिक मुक्ती; म्हणजेच काम, अर्थ, धर्म, मोक्ष.

संस्कृतीचे व समाजसंघटनेचे हे कार्य होते की, त्यांनी नेतृत्व करून, मानवाच्या या हितसंबंधांना आधार देऊन, मानवाचे समाधान करावे आणि या हितसंबंधांची रूपे व हेतु यांचा शक्यतो समन्वय करावा. क्वचित काही अपवाद सोडता, मानवाच्या वरील तीन ऐहिक हेतूंचे समाधान अगोदर, आणि इतर हेतूचा विचार नंतर, अशी व्यवस्था अभिप्रेत होती; अगोदर जीवनाची पूर्णता आणि नंतर जीवनाला मागे टाकून पलीकडे जाणे, अशी व्यवस्था अभिप्रेत होती.

कुटुंबाचे ऋण, समाजाचे ऋण व देवांचे ऋण ही तीन ऋणे फेडण्यात कसूर न व्हावी असा संस्कृतीचा आदेश होता. पृथ्वीचे देणे पृथ्वीला दिले पाहिजे, सापेक्ष जीवनाला त्याची लीला करू दिली पाहिजे. या जीवनाच्या पलीकडे निरपेक्ष केवलाची शांती आहे, पृथ्वीच्या पलीकडे स्वर्गाचे वैभव आहे, म्हणून पृथ्वी व सापेक्ष जीवन यांजकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा संस्कृतीचा आदेश होता. सर्वांनी गुहेत, मठात जावे असा प्रचार या संस्कृतीत मुळीच नव्हता.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 125)

विचार शलाका – ०२

आपण जेव्हा कधी प्रथमत: युरोपीयन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या प्रकाशाद्वारे स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, विश्व उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची सर्व गोळाबेरीज म्हणजे ‘अपराविद्या’ होय पण त्याहून अधिक उच्च अशी एक ‘विद्या’ आहे, महान असे ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो तेव्हा आपण अशा कल्पनेत असतो की आपणच सर्व काही करीत आहोत आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम आणि सर्वशक्तिमान असावी असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा भ्रमाचा आणि ‘माये’चा दृष्टिकोन आहे. एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरात वसलेल्या ‘ईश्वरा’ची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर केवळ बुद्धीच सर्वोच्च आहे असे तो पुन्हा कधीच मान्य करू शकणार नाही. तेथे एक उच्चतर ध्वनी असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. ईश्वराचा अधिवास हा हृदयात असतो. ‘ईश्वर’ मेंदूमार्फत कार्य करतो पण मेंदू हे त्याचे केवळ एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते ते सर्वप्रथम हृदयाला ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदूच्या पलीकडे हृदयापर्यंत जाऊ शकतो तोच ‘शाश्वता’ची वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 891-892)

विचार शलाका – ०१

विचारांना आकार, रूप (form) असते आणि त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिगत जीवन असते. ते त्यांच्या रचयित्यापासून स्वतंत्र असते. ते विचार त्या रचयित्याकडूनच या विश्वामध्ये प्रवाहित करण्यात आलेले असतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून ते विचार या विश्वामध्ये फिरत राहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, तेव्हा तुमचा तो विचार आकाररूप धारण करतो आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि जेव्हा तुमच्या विचारासोबत एखादी इच्छा जोडलेली असते तेव्हा, तो विचाररूपी आकार (thought-form) तुमच्यामधून बाहेर पडून, ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.

उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्याकडे यावी असे वाटत असते, तशी तुमची तीव्र इच्छा असते आणि त्यासोबत, म्हणजे तुम्ही हे जे काही मानसिक रूप तयार केलेले असते त्याच्या सोबत एक प्राणिक आवेगयुक्त अशी इच्छा असते; मग तुम्ही अशी कल्पना करता की, “जर ती व्यक्ती आली तर असे असे घडेल किंवा तसे घडेल.” मात्र कालांतराने तुम्ही ती कल्पना करणे सोडून देता. परंतु तुम्हाला हे माहीत नसते की, तुम्ही जरी विसरून गेलात तरीही त्या विचाराचे अस्तित्व तसेच कायम शिल्लक राहिलेले असते. कारण तो विचार-आकार अजूनही तसाच कायम असतो, तो तसाच कार्यरत असतो, तुमच्यापासून तो स्वतंत्र झालेला असतो आणि त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी फार मोठी शक्ती असावी लागते. आता तो त्या व्यक्तीच्या वातावरणात त्या व्यक्तीला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीमध्ये तुमच्याकडे येण्याची इच्छा निर्माण करतो. आणि जर का तुमच्या विचार-आकारामध्ये पुरेशी इच्छाशक्ती असेल, जर तुम्ही त्याची सुव्यवस्थित रचना केलेली असेल तर, तो विचार स्वतः प्रत्यक्षीभूत होतोच होतो. परंतु रचनेचा काळ आणि ती प्रत्यक्षात येण्याचा काळ यामध्ये काही विशिष्ट अंतर असते. आणि जर दरम्यानच्या काळात तुमचे मन इतर गोष्टींनी व्याप्त झाले तर, असे घडते की तुमच्या या विस्मृत विचारांची परिपूर्ती झालेली असते, तुम्हाला स्वतःलाच आता त्याची आठवण नसते की एकेकाळी तुम्हीच त्या विचाराला खतपाणी दिले होते आणि तुम्हालाच आता जाण नसते की तुम्हीच या कृतीला उद्युक्त केले होते आणि तीच कृती आता तुमच्या समोर उभी ठाकली आहे. आणि असे बरेचदा घडते की, जेव्हा प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो तेव्हा तुमची ती इच्छा नाहीशी झालेली असते किंवा तुम्हाला त्याची पर्वा नसते.

अशी बरीच माणसं असतात की ज्यांच्याकडे अशी रचना करण्याची खूप प्रबळ शक्ती असते आणि नेहमीच त्यांच्या रचना वास्तवात आलेल्या त्यांना पाहावयास मिळतात. पण त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध असे मानसिक आणि प्राणिक अस्तित्व नसल्याने, आत्ता त्यांना एक गोष्ट हवीशी वाटते तर नंतर दुसरीच एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि मग अशा या विविध किंवा विरोधी रचना आणि त्यांचे परिणाम एकमेकांवर आदळतात, त्यांचा परस्परांशी झगडा होतो. आणि मग अशा लोकांना आश्चर्य वाटू लागते की ते एवढे गोंधळाने आणि विसंवादाने भरलेले जीवन का जगत आहेत! परंतु त्यांना हे समजत नसते की, ते त्यांचे स्वतःचेच विचार होते. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या इच्छांनीच त्यांच्याभोवती तशी परिस्थिती घडवली आहे आणि ती परिस्थिती आता त्यांना विसंगत, परस्परविरोधी वाटत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवन हे असह्य कोटीचे झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 50-51)