विचार शलाका – १८

चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.

*

‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)

विचार शलाका – १७

आपला आदर्श वास्तवात उतरविण्यासाठी म्हणून ज्यांना स्वत:च्या क्षणभंगुर असणाऱ्या अशा संपूर्ण अस्तित्वाचा पुरेपूर लाभ करून घ्यायचा आहे त्यांनी सद्य घडीस स्वत:कडे असलेल्या समाधानाचा त्याग कसा करायचा हे जाणून घेणे ही एक मोठी कला आहे.

यशस्वी व्यक्तींच्या अनेकविध श्रेणी असतात. त्यांच्या आदर्शाच्या कमीअधिक व्यापकतेवर, उदात्ततेवर, जटिलतेवर, शुद्धतेवर, प्रकाशमानतेनुसार त्या श्रेणी ठरतात. एखादी व्यक्ती भंगारमालाच्या व्यवसायात ‘यशस्वी’ होईल तर, एखादी व्यक्ती या विश्वाचा स्वामी म्हणून ‘यशस्वी’ होईल किंवा एखादी व्यक्ती सिद्ध तपस्वी म्हणून ‘यशस्वी’ होईल; ही उदाहरणे अगदी वेगवेगळ्या पातळीवरची असली तरी, या तिन्ही उदाहरणांबाबत, व्यक्तीचे स्वत:वर कितपत समग्रपणे आणि कितपत ठोस प्रभुत्व आहे यावर ते ‘यश’ अवलंबून असते.

…ज्या व्यक्तीच्या इच्छांची परिपूर्ती पूर्णतया झालेली आहे, ज्या व्यक्तीने तिला स्वत:ला जे प्राप्त करून घ्यावयाचे होते ते साध्य केलेले आहे अशी व्यक्ती आणि एखादी अशी व्यक्ती की जिला काहीच साध्य झालेले नाही अशा टोकाच्या दोन व्यक्तींच्या दरम्यान अपरिमित असे मधले टप्पे असतात. ही व्याप्ती खरोखर खूपच जटिल असते कारण केवळ आदर्शाच्या प्राप्तीमध्येच फरक असतो असे नाही तर, खुद्द आदर्शाच्या प्रतवारीमध्ये देखील खूप फरक असतो. काही आकांक्षा या अगदी वैयक्तिक आवडीनिवडी, अगदी भौतिक, भावनिक वा बौद्धिक आवडीनिवडी अशाप्रकारच्या असतात; तर काही अधिक व्यापक, सामूहिक वा उच्चतर ध्येय गाठणे अशा प्रकारच्या असतात आणि काही तर अगदी अतिमानवी म्हणता येतील अशा असतात. म्हणजे अशा की, शाश्वत ‘सत्य’, शाश्वत ‘चेतना’ आणि शाश्वत ‘शांती’ यांच्या भव्यतेमुळे जी शिखरे खुली होतात ती कवळण्याची त्यांची अभीप्सा असते. व्यक्तीने जे ध्येय निवडले आहे त्याच्या व्यापकतेच्या आणि त्याच्या खोलीच्या प्रमाणात व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि परित्यागाची ताकद असणार, हे सहज समजण्यासारखे आहे. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे त्याग, त्यांचे स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला, व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्यागाची आणि आत्मनियंत्रणाची एकत्रित ताकद ह्यांचा परिपूर्ण असा समतोल फारच क्वचित आढळून येतो.

अगदी खालच्या स्तरापासून ते अगदी परमोच्च स्तरापर्यंत पाहिले तरीही फारच कमी वेळेला असा समतोल साधलेला आढळून येतो.

जेव्हा व्यक्तीच्या घडणीमध्ये अशा प्रकारचा परिपूर्ण समतोल आढळून येतो तेव्हा अशी व्यक्ती, या पार्थिव अस्तित्वाचा शक्य तेवढा पुरेपूर लाभ करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 121-122)

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

विचार शलाका – १५

आपल्या आणि सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाच्या ‘दिव्य सत्या’शी एकत्व, हे ‘पूर्णयोगा’चे एक अत्यावश्यक उद्दिष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे; आपण हे कायम स्मरणात ठेवावयास हवे की, आपण आपला हा योग अतिमानसाच्या प्राप्तीसाठी, अंगीकारलेला नाही, तर तो आपण ‘ईश्वरा’साठी अंगीकारलेला आहे. आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, ते त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या महानतेसाठी नव्हे; तर दिव्य सत्याशी आपले एकत्व हे अधिक समग्र आणि परिपूर्ण व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. ते दिव्य सत्य संवेदित व्हावे, ते आत्मसात करता यावे, त्याच्या सर्वोच्च तीव्रतांनिशी आणि त्याच्या सर्वाधिक व्यापकतांनिशी, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक शक्य असलेल्या मार्गानिशी ते क्रियाशील करता यावे; आपल्या प्रकृतीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये, प्रत्येक वळणावाकणावर तसेच तिच्या विश्रांत स्थितीमध्ये सुद्धा ते दिव्य सत्य क्रियाशील करता यावे, म्हणून आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. अतिमानवतेच्या महाकाय भव्यतेप्रत, ईश्वरी सामर्थ्याप्रत आणि महानतेप्रत आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाच्या व्यापकतेच्या आत्म-परिपूर्तीप्रत पोहोचणे, हे अतिमानस योगाचे उद्दिष्ट आहे; असा विचार करण्यास कित्येक जण प्रवृत्त होतील. पण असा विचार करणे म्हणजे विपर्यास करण्यासारखे आहे. ही विपर्यस्त आणि घातक संकल्पना आहे. घातक यासाठी की, त्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या राजसिक प्राणिक मनाची महत्त्वाकांक्षा आणि गर्व, अभिमान वाढीस लागण्याची शक्यता असते आणि जर त्याच्या अतीत जाता आले नाही आणि त्यावर मात करता आली नाही तर, त्यातून आध्यात्मिक पतनाचा हमखास धोका संभवतो. ही संकल्पना विपर्यस्त एवढ्याचसाठी आहे ; कारण ती अहंजन्य संकल्पना आहे आणि अतिमानसिक परिवर्तनाची पहिली अटच मुळी अहंकारापासून मुक्ती ही आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 280)

विचार शलाका – १४

सूर्याच्या ओढीने शेकडो प्रकारची वळणे घेत घेत, फक्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून झगडणाऱ्या अगणित वृक्षवेली असलेले जंगल तुम्ही कधी पाहिले नाहीयेत का? भौतिकातील अभीप्सेची भावना, ती आस, ती स्पंदनं, सूर्यप्रकाशाबद्दल असलेली ओढ ती हीच होय. माणसांपेक्षा वनस्पतींच्या शारीर-अस्तित्वामध्ये ती अभीप्सा अधिक असते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे प्रकाशपूजाच असते. अर्थातच येथे ‘प्रकाश’ हे ‘ईश्वरा’चे भौतिक प्रतीक आहे आणि भौतिक परिस्थितीमध्ये, सूर्याद्वारे, ‘परम-चेतना’ दर्शविली जाते. वनस्पतींना दृष्टी नसूनसुद्धा, त्यांच्या स्वत:च्या अगदी सहजस्वाभाविक पद्धतीने ती भावना अगदी स्पष्टपणाने जाणवून जाते. तुम्हाला त्यांच्या भावनांविषयी सजग कसे व्हायचे हे जर माहीत असेल तर तुम्हाला कळेल की, त्यांची अभीप्सा किती उत्कट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 132)

विचार शलाका – १३

खऱ्या शिक्षणाबाबत पहिले तत्त्व हे आहे की, काहीही शिकविता येत नाही. शिक्षक हे प्रशिक्षक किंवा काम करवून घेणारे नसतात, ते साहाय्यक आणि मार्गदर्शक असतात. त्यांनी सुचवायचे असते; लादायचे नसते. ते खरंतर, विद्यार्थ्याच्या मनाला प्रशिक्षण देत नाहीत, तर ज्ञानाची साधने परिपूर्ण कशी करावीत हे फक्त ते विद्यार्थ्याला दाखवून देतात आणि या प्रक्रियेमध्ये त्याला प्रोत्साहन देतात. ते विद्यार्थ्याला ज्ञान प्रदान करत नाहीत, तर ज्ञान स्वत:च कसे प्राप्त करून घ्यायचे हे त्याला दाखवितात. ते विद्यार्थ्याच्या अंतरंगातील ज्ञान बाहेर काढत नाहीत तर, ते ज्ञान कोठे आहे हे फक्त दाखवून देतात आणि ते पृष्ठभागी आणण्याची सवय कशी लावता येईल, हे विद्यार्थ्याला दाखवतात.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 384)

विचार शलाका – १२

‘पूर्णयोगा’मध्ये केवळ ‘देवा’चा साक्षात्कारच अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे. तसेच, जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते. हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची तयारी असल्याची खात्री पटल्याशिवाय, व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ११

‘योगा’च्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण ‘पूर्णयोग’ इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे केवळ अशांसाठीच ‘पूर्णयोग’ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – १०

‘पूर्णयोग’ अत्यंत उन्नत आणि अत्यंत अवघड अशा आध्यात्मिक साध्याकडे घेऊन जाणारा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे.

व्यक्तीकडे या योगासाठी आवश्यक अशी क्षमता असल्याचा पुरेसा आधार असेल किंवा त्या व्यक्तीला दुर्दम्य अशी हाक आली असेल तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो.

केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर ती केवळ या योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक अटींपैकी एक अट आहे

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ०७

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये ‘प्रकृती’ने मनुष्यजात घडवली. मनुष्यसुद्धा तशीच एक प्रयोगशाळा असू शकतो. त्या प्रयोगशाळेत दिव्य जीव म्हणून आत्म्याला प्रकट करण्याची, तसेच एक दिव्य प्रकृती विकसित करण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)