विचार शलाका – ०४

धैर्यवान बना आणि स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या क्षुद्र अहंकाराला सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व खिन्न होता. स्वत:ला विसरणे हाच सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे.

*

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्याद्वारे उगवता सूर्य जी शिकवण, जो संदेश पृथ्वीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण असतो; तो दिलासादायक संदेश असतो. अशी कोणतीच रात्र नाही की जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते….

– श्रीमाताजी [CWM 16 : 175], [CWM 02 : 44]

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्नीपरीक्षा यांना शांत मनाने, अत्यंत धैर्याने आणि ‘ईश्वरी शक्ती’वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे, हाच ‘पूर्णयोगा’मधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 111]

मी नेहमी उर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे ‘सौंदर्य’, ‘शांती’, ‘प्रकाश’ आहेत, ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी आस बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा. खाली, या जगातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.

– श्रीमाताजी [CWM 13 : 68]

जगाच्या डोळ्यांसमोर भारतामध्ये ‘राष्ट्र’उभारणीचे कार्य अत्यंत वेगाने, अगदी स्पष्टपणे, घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणली गेलेली सामग्री यांमधील वेगळेपण पाहू शकत आहेत. हे राष्ट्र म्हणजे ‘प्रकृती’च्या कार्यशाळेतील कच्च्या मालापासून तयार झालेला नवीन वंश नाही किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. …आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल; कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि असा विश्वास बाळगतो की, यश मिळण्याची खात्री आहेच कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे. ….कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, आम्ही त्यामुळे नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहू. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.. आमचा असा विश्वास आहे की, ‘ईश्वर’ आमच्या सोबत आहे आणि त्या श्रद्धेमुळे आम्ही जिंकू. आमचा असा विश्वास आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आपल्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 23-24]

कृतज्ञता – १७

(श्रीमाताजी येथे ‘धम्मपदा’तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.)

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्या व्यक्तीविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची तुम्ही इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे धम्मपदामध्ये तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे, असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकपणा, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे जे काही तुमच्यामध्ये सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे तुम्हाला वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण आजवर जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती, ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्यास योग्य नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती असते, उपलब्धी असते. जणू काही नुकत्याच बाहेर घालवून दिलेल्या धूसरतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

तुम्ही जर योगसाधना करत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट आपल्यात असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीही ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण असते; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो.

अमुक एक गोष्ट असता कामा नये, हे तुम्हाला ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्यात राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमच्या प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते…

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला असतो, त्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 220-221)

विचार शलाका – ३३

 

“खरोखर, ‘ईश्वर’च साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहिला नाहीत तर, तुमच्या साऱ्या चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा ‘ईश्वर’च असतो.”

 

श्रीमाताजींचे हे विधान इ. स. १९६१ मध्ये जेव्हा प्रथम प्रकाशित झाले तेव्हा, या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणाल्या की, ”व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचे तिच्या जीवनात काही परिणाम होतातच, ते ‘कर्म’ संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’ कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची शक्ती असते; पण यासाठी व्यक्तीने त्याच त्या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनंत काळ करत राहील आणि ‘ईश्वरी कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनंत काळ करत राहील, असे व्यक्तीने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नसते.

 

भूतकाळ पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो; त्याचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही इतका तो विशुद्ध केला जाऊ शकतो; परंतु व्यक्तीने तिची भूतकालीन अवस्था पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढता कामा नये, या एकाच अटीवर हे होऊ शकते; तुम्ही स्वत: तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनंत काळ निर्माण करत राहता कामा नये.”

 

– श्रीमाताजी

(CWM 09 : 58)

विचार शलाका – ३२

 

प्राथमिक स्तरावर, दुःखभोग म्हणजे आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपल्याला कळावे म्हणून ‘प्रकृती’ने केलेली सूचना असते; आणि सुखोपभोग म्हणजे, आपण ज्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे त्यासाठी ‘प्रकृती’ने ठेवलेले प्रलोभन असते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 13 : 373)

विचार शलाका – ३१

 

व्यक्ती जोवर ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तीच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आपण ज्याला ‘नियती’ म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या ऊर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा व त्यांच्या भावी परिणामांचा निर्णय करत असतात त्यांचा, तसेच व्यक्तीची सद्यकालीन स्थिती या साऱ्याचा तो परिणाम असतो.

 

पण व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करते त्याच क्षणी, या जुन्या पूर्वनिर्धारित नियतीची पिछेहाट व्हायला सुरुवात होते. आणि तिथे एका नवीनच घटकाचा म्हणजे ‘ईश्वरी कृपे’चा, ‘कर्म-शक्ती’पेक्षा भिन्न असणाऱ्या उच्चतर ‘ईश्वरी शक्ती’च्या साहाय्याचा प्रवेश होतो; ही कृपा साधकाला त्याच्या प्रकृतीच्या सद्यकालीन संभाव्यतांच्या पलीकडे उचलून घेऊ शकते. अशा वेळी, त्या जिवाची आध्यात्मिक नियती म्हणजे ईश्वरी निवड असते, जी भविष्याबद्दल आश्वस्त करते. या मार्गावरील चढउतार आणि ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ, एवढीच काय ती शंका असते. इथेच, भूतकालीन प्रकृतीच्या दुर्बलतांशी खेळणाऱ्या विरोधी शक्ती, प्रगतीची गती रोखण्यासाठी आणि प्रगतीची परिपूर्ती पुढे ढकलण्यासाठी आटापिटा करत असतात. जे अपयशी ठरतात ते या प्राणिक शक्तींच्या हल्ल्यांमुळे अपयशी ठरतात असे नव्हे, तर ते स्वतः विरोधी ‘शक्तीं’च्या बाजूने होतात आणि आध्यात्मिक सिद्धींपेक्षा ते प्राणिक आकांक्षेला किंवा इच्छेला (आकांक्षा, फुशारकी, लोभ इ. गोष्टींना) अधिक प्राधान्य देतात, हे त्यामागचे कारण आहे.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 509-510)

विचार शलाका – ३०

 

व्यक्ती जोपर्यंत सामान्य मानवी चेतनेमधून बाहेर पडून, तिच्या खऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे, जेथे सर्व बंध मुक्त होतात अशा उच्चतर आध्यात्मिक चेतनेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत ‘कर्मा’च्या परिणामांचे बंधन शिल्लक असते. शांतीबाबत सांगायचे तर, ‘ईश्वरा’वर पूर्ण भरवसा आणि ‘ईश्वरी संकल्पा’प्रत समर्पण यातून ती प्राप्त होऊ शकते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 520)

विचार शलाका – २९

रूपांतरणाचा योग (पूर्णयोग) हा सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. व्यक्तीला जर का असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे, आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दु:खे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी हरकत नाही ते तितकेसे महत्त्वाचे नाही. “मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी जर व्यक्तीची अवस्था असेल तर मात्र गोष्ट निराळी.

 

अन्यथा मी म्हणेन, “चांगले वागा, सुखी असा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे.” चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होतात ती अपवादात्मक अशी परिस्थिती होती हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग चेतनेचा काही अंश, तिचा प्रकाश, तिचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल. आणि ते खूप चांगले असेल. पण, एकदा का तुम्ही योगमार्गावर पाऊल ठेवलेत की, तुमचा निर्णय वज्रकठोर असला पाहिजे आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी तुम्ही थेट ध्येयाकडे वाटचाल केलीच पाहिजे.

 

– श्रीमाताजी

(CWM 07 : 200)