भारत – एक दर्शन १९
हिंदुधर्मामध्ये, ‘अनंता’च्या संकल्पनेखालोखाल जर मुख्य स्थान कोणाला मिळाले असेल तर ते ‘धर्मा’च्या संकल्पनेला आहे; आत्म्याखालोखाल धर्म हा त्याच्या जीवनाचा पाया असतो. अशी कोणतीच नीतिकल्पना नाही की जिच्यावर हिंदुधर्माने भर दिलेला नाही. प्रत्येक नीतिकल्पना हिंदुधर्माने आदर्श स्वरूपात आणि आदेशात्मक पद्धतीने मांडली आहे. या धर्माने शिकवणुक, आदेश, बोधकथा, कलाकृती, रचनात्मक उदाहरणे यांच्या साहाय्याने नीतिकल्पना लागू केल्या आहेत. सत्य, मानसन्मान, निष्ठा, इमान, धैर्य, पावित्र्य, प्रेम, सहनशीलता, आत्मत्याग, अहिंसा, क्षमा, करुणा, सौजन्य, परोपकार या हिंदुधर्मामधील सार्वत्रिक नीतिकल्पना आहेत, हिंदुधर्माच्या दृष्टिकोनातून या नीतिकल्पना म्हणजेच सुयोग्य मानवी जीवनाचे मूलद्रव्य, मनुष्यधर्माचा गाभा आहेत.
बौद्धधर्मामध्ये उच्च व उदात्त नीती आहे. जैन धर्मामध्ये आत्मजयाचे कठोर ध्येय आहे. हिंदुधर्मामध्ये धर्माच्या सर्वांगाची जी भव्य उदाहरणे आहेत ती कोणत्याही धर्मातील किंवा कोणत्याही प्रणालीमधील नैतिक शिकवणीपेक्षा आणि नैतिक आचरणापेक्षा काकणभरदेखील कमी नाहीत. किंबहुना ही उदाहरणे सर्वोच्च श्रेणी प्राप्त करतात. आणि इतर धर्मांहून त्यांचा परिणाम सर्वात प्रभावशाली शक्ती म्हणून झाला आहे. प्राचीन काळी या गुणांचे आचरण मोठ्या प्रमाणात होत होते हे सिद्ध करणारे आंतरिक आणि बाह्य असे पुष्कळ पुरावे आहेत.
…भारतीय आध्यात्मिक साधकांना सुपरिचित असणारा एक नियम पाश्चात्त्य टिकाकारांना कदाचित माहीत नसावा किंवा त्याचा अर्थ त्यांच्या लक्षात आला नसावा. तो नियम असा की, दिव्य ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम मन व जीवन शुद्ध, सात्विक असणे आवश्यक असते; भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की, “दुष्कर्म करणाऱ्यांना मी गवसत नाही.” पाश्चात्त्य टिकाकार हेही जाणून घेण्यात असमर्थ ठरले की, भारतीयांच्या विचारसरणीनुसार, सत्याचे ज्ञान होणे म्हणजे बुद्धीने सत्य ओळखणे किंवा बुद्धीने सत्याला मान्यता देणे असे नसून, सत्याचे ज्ञान होणे म्हणजे त्या आत्म-सत्यानुसार नवीन चेतना जागृत होणे व नवीन जीवन जगणे.
पाश्चिमात्य मनासाठी नीती ही बहुतांशरित्या बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; पण भारतीय मनासाठी वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे फक्त एक साधन आहे, आणि ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमावली, काही आदेश कधीकधी जरूर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक किंवा नैतिक शुद्धीवर. वर्तन, कृती ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे येथे सांगितले जाते; येथे “तुम्ही हिंसा करू नका” असे जोरदारपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण याहून अधिक ठामपणे एका आदेशावर भर दिला जातो की, “तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नका.‘’ कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.
आणखी एक गोष्ट म्हणजे हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. युरोपीय बुद्धीला ही शहाणीव (wisdom) पचविणे जड जाते. ‘अहिंसा परमो धर्मः’ – अहिंसा हा हिंदुधर्मातील सर्वात श्रेष्ठ नियम आहे – तथापि योद्ध्यासाठी भौतिक (शारीरिक) अहिंसा हा नियम ठेवलेला नाही; मात्र न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजविषयी योद्ध्याने दया, दाक्षिण्य व सन्मानबुद्धी दाखवलीच पाहिजे अशी हिंदुधर्म त्याच्याकडून आग्रहपूर्वक अपेक्षा बाळगतो. अशा प्रकारे सर्वांना एकच एक निरपवाद नियम लावण्यात जी अव्यावहारिकता असते ती हा धर्म टाळतो.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 148-149]