प्रामाणिकपणा – ०४

पूर्णतः प्रामाणिक असणे म्हणजे फक्त आणि फक्त दिव्य ‘सत्या’चीच इच्छा बाळगणे; ‘दिव्य माते’प्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व इच्छा-वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ‘ईश्वरा’लाच अर्पण करणे आणि हे कार्य ‘ईश्वरा’ने दिलेले आहे हे जाणून, कोणताही अहंकार आड येऊ न देता, कार्य करणे; हाच ‘दिव्य जीवना’चा पाया आहे. व्यक्ती एकाएकी एकदम पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगत असेल आणि ‘ईश्वरी शक्ती’ने साहाय्य करावे म्हणून अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने नेहमी तिचा धावा करत असेल, तर अशी व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत जाते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 51]

प्रामाणिकपणा – ०२

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व भागांनी ‘ईश्वरा’प्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक आहे – म्हणजे असे की, एखाद्या भागाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे अंग मात्र त्याला नकार देते किंवा बंड करते, असे असता कामा नये.

अभीप्सेमध्ये प्रामाणिकता असणे याचा अर्थ, ‘ईश्वरा’साठीच ‘ईश्वर’ हवा असणे, प्रसिद्धी अथवा नावलौकिक अथवा प्रतिष्ठा अथवा शक्ती किंवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठी नव्हे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65]

प्रामाणिकपणा – ०१

आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा!
प्रामाणिकपणा हा केंद्रीय ‘दिव्य संकल्पा’च्या भोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65]