…कर्म हे पूर्णयोगाचे आवश्यक अंग आहे. तुम्ही कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा वैयक्तिक कल्पनांमध्ये गमावून बसाल…

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 248)

असे एक प्रेम असते की, ज्यामध्ये भावना या चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ईश्वराभिमुख झालेल्या असतात. हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते; पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तसे करण्यास जर तुम्ही सक्षम असाल तर, तेव्हा तो प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असतो.

श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

…आजवर जे काही केले आहे त्याच्या तुलनेत, अजूनही जे करायचे बाकी आहे त्याच्या सापेक्षतेची जाण असणे तसेच, ईश्वराच्या कृपेशिवाय व्यक्तीच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही, याची जाणीव असणे म्हणजे ‘आध्यात्मिक विनम्रता’.

-श्रीअरविंद
(CWSA 28 : 432)

… (ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या गोष्टींचा) स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी किंवा स्वार्थासाठी दुरूपयोग करता कामा नये; अभिमान नसावा, प्रौढी नसावी, उच्चतेची भावना नसावी, ईश्वराचे साधन असल्याचा कोणताही दावा किंवा अहंकारदेखील नसावा; तर ज्या कोणत्या मार्गाने, प्रकृतिजन्य सहज व शुद्ध आंतरात्मिक साधन कसे बनता येईल की ज्यामुळे ते ईश्वराच्या सेवेसाठी सुपात्र बनेल, याविषयी व्यक्तीने जागरूक असले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)

जे काही तुम्ही केले पाहिजे त्यावरच लक्ष केंद्रित करा आणि असंबंधित व्यस्ततांमुळे किंवा अन्य कोणत्याही प्रभावामुळे, स्वतःला या किंवा त्या मार्गावर भरकटू देऊ नका…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 350)

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा व्यक्ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा हीच व्यक्तीची पहिली चूक असते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, हालअपेष्टांचे हेच प्रमुख कारण आहे.

–श्रीमाताजी (CWM 17 : 370)

व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्ती असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला बांधून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

तुम्ही कोण होतात त्याचा विचार करू नका, तर तुम्ही जे बनण्याची आस बाळगून आहात त्याचाच विचार करा; तुम्ही जे साध्य करू इच्छिता त्यामध्येच पूर्णतः राहा. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 03:84)

सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करता यावी म्हणून ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी, सर्व परिस्थितीमध्ये साहाय्य करत असते.
*
‘परमेश्वरा’ची शक्ती अनंत आहे, आपली श्रद्धाच कमी पडते.
*
‘ईश्वरा’चे साहाय्य असेल तर अशक्य असे काहीच नाही.

– श्रीमाताजी (CWM 14:86-90)

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात याने व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, केवळ ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 14:279)