जीवन जगण्याचे शास्त्र – २७
प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे” अशा शब्दांतच ती अभीप्सा शब्दबद्ध होत नाही तर, “जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती मला शक्य तितक्या चांगल्या रितीने करता येऊ दे,” अशा शब्दात ती अभीप्सा अगदी सहजस्वाभाविक रितीने अभिव्यक्त होते.
सर्वोत्तम गोष्ट कोणती आणि ती कशी करायची हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला माहीत असतेच असे नाही. परंतु सर्वोत्तम शक्य गोष्ट करण्याच्या दृष्टीने, तुम्ही तुमचा संकल्प ईश्वराच्या हाती सोपवू शकता. त्याचे आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील.
ही गोष्ट चेतनेसहित (with consciousness), प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने करा. तसे केलेत तर एकेका पल्ल्यामध्ये तुम्ही अफाट प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळून येईल. तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाच्या पूर्ण ताकदीनिशी अगदी अंतःकरणपूर्वक, तळमळीने केल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणी जे सर्वोत्तम शक्य आहे, तेच केले पाहिजे. इतर काय करतात हा तुमच्या चिंतेचा विषय असता कामा नये. “तो ‘क्ष’ हे असे करत नाही, तर तो तसे करतो,” “तो ‘य’ असे करतो, पण त्याने तसे करता कामा नये,” हे असे कधीही म्हणू नका. कारण ती गोष्ट तुमच्याशी निगडित नाही.
तुम्हाला या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्दिष्टानिशी एक देह देऊन पाठविण्यात आले आहे. तो शक्य तेवढा सचेत बनविणे, तो ईश्वराचे सर्वाधिक परिपूर्ण आणि सर्वाधिक सचेत साधन बनविणे या हेतुने तुम्हाला देह देण्यात आला आहे. ईश्वराने तुम्हाला मानसिक, प्राणिक, शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रमाणात काही द्रव्यं देऊ केली आहेत. तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, ती द्रव्यं तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असतात. तसेच तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, तिला साजेशी अशीच परिस्थिती तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असते. आणि म्हणून “माझे जीवन अगदी असह्य आहे, जगातील सर्वात दुःखी जीवन माझ्या वाट्याला आले आहे,” असे जे कोणी म्हणतात, ते मूढ असतात. प्रत्येकाला त्याच्या विकासासाठी यथायोग्य असे जीवन देण्यात आलेले असते, त्याच्या संपूर्ण विकसनासाठी जे अनुभव त्याला उपयुक्त ठरतात, तेच अनुभव त्याला प्रदान करण्यात आलेले असतात आणि त्याच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या त्याच्या संपूर्ण साक्षात्कारासाठी साहाय्यकारी ठरतील अशाच असतात.
– श्रीमाताजी (CWM 04 : 117-118)