(डिसेंबर १९०९)

‘आपली माता’ ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे पूर्ण आणि जवळून दर्शन घेण्यामध्ये अक्षम ठरले आहेत. रणजितसिंग किंवा गुरु गोविंद सिंग ह्यांना भारतमातेऐवजी ‘पंचनद्यां’च्या ‘भूमाते’चेच दर्शन झाले. शिवाजीमहाराज किंवा बाजीराव पेशवे यांना भारतमातेऐवजी, ‘हिंदूंची माता’ या स्वरूपात तिचे दर्शन झाले. इतर महाराष्ट्रीय मुत्सद्द्यांनी फक्त ‘महाराष्ट्रातील लोकांची माता’ या स्वरूपातच तिच्याकडे पाहिले. वंगभंगाच्या काळामध्ये, आम्हाला ‘बंगाल-माते’च्या स्वरूपात तिचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले, ते एकात्मतेचे दर्शन होते आणि त्यामुळे बंगालची भावी एकात्मता आणि प्रगती सुनिश्चित आहे. पण ‘भारतमाते’ची एकात्म प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीची उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, एक सखी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदैवी (undivine) असा भ्रम होती. खरंच ती आमची माता नव्हती. पण त्याहीवेळी, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत होती. ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदु-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ म्हणून देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता, किंवा हिंदु राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 225-226)

(इसवी सन : १९०७-१९०८)

राष्ट्र म्हणजे काय? आम्ही पाश्चात्त्य देशांमधील शाळांमध्ये शिकलो आहोत आणि स्वत:च्या सखोल संकल्पना, अधिक सत्य असणारी वाणी विसरून पाश्चात्त्यांची भाषा, त्यांचे विचार यांचे अनुकरण करावयास शिकलो आहोत. पाश्चात्त्यांच्या लेखी, राष्ट्र म्हणजे देश, अमुक एवढ्या जमिनीवर वास्तव्य करणारी काही लाख माणसं, की जी एकच भाषा बोलतात, त्यांनी निवडलेल्या एकाच नियामक सत्तेशी एकनिष्ठ राहत, एकसारखेच राजकीय जीवन जगत राहतात. परंतु, भारताची राष्ट्रीयतेची कल्पना अधिक सत्य आणि अधिक सघन असावयास हवी.

आपल्या पूर्वजांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना वस्तुमात्रांचा एक स्थूल देह दिसला, त्याच्या आत असणाऱ्या सूक्ष्म देहाचा शोध त्यांना लागला, त्याच्याही पलीकडे जात, त्याच्याही पलीकडे अजून एका अधिक खोलवर दडून असलेल्या आणि तिसऱ्या देहाच्याही आतमध्ये असलेला, जीवनाचा आणि त्याच्या रूपाचा ‘स्रोत’ सदासाठी, अचल आणि अविनाशी अशा स्वरूपात तेथे स्थित आहे असे त्यांना आढळून आले. जे व्यक्तित्वाबाबत सत्य आहे तीच गोष्ट सामान्यत: आणि वैश्विक स्तरावर देखील सत्य आहे. जे माणसाबाबत सत्य आहे अगदी तेच राष्ट्राबाबतही सत्य आहे.

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समुहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह होय. हे दोन्ही देह स्थूल आहेत, ‘माते’चे ते भौतिक आविष्करण असते. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो, विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, परिपूर्ती, सभ्यता आणि संस्कृती ह्या साऱ्या साऱ्यांतून राष्ट्राचे ‘सूक्ष्म शरीर’ आकाराला येते. मातेच्या जीवनाचा हा भागही असा असतो, जो साध्या डोळ्यांनी देखील दिसतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यामधून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, जी त्या राष्ट्राला इतरांपासून वैशिष्ट्यपूर्ण बनवते. ‘माते’चे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्त्रोत’ आहे, जो अमर्त्य, अचल असा आहे; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वास करणाऱ्या ‘एका’चे ते आविष्करण असते, आपण सर्व जण त्याचीच बालकं आहोत.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1115-1116)

इसवी सन १९१४. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या नियतकालिकामध्ये, पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या श्री. अरविंद घोष यांच्या ‘आर्य’ मासिकाविषयीचे निवेदन आले होते, आणि ते निवेदन तेव्हा नवयुवक असलेल्या अंबालाल पुराणी यांच्या वाचनात आले. त्यांनी त्याची वर्गणी भरली. तत्पूर्वी बडोद्याच्या ‘दांडिया बाजार’ येथे झालेली लोकाग्रणी असलेल्या श्री. अरविंद घोष यांची व्याख्याने त्यांनी ऐकलेली होती. पुराणी तत्कालीन स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेले होते. गुजराथमध्ये कार्यरत असणाऱ्या त्यांच्या एका छोट्या गटाने भारताची स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कार्याला सुरुवातही केलेली होती. भारताचे स्वातंत्र्य हे अंतिम साध्य नसून, भारताच्या सांस्कृतिक आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणारी ती पूर्वअट आहे, असे अंबालाल पुराणी यांचे विचार होते. त्यामुळे स्वामी श्रद्धानंद, पंडित मदन मोहन मालवीय, रविन्द्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या सगळ्या नेत्यांच्या तुलनेत त्यांना श्री. अरविंद घोष यांचे विचार अधिक तर्कशुद्ध आणि अधिक समाधानकारक वाटले. श्री. अरविंद घोष यांच्या विचारांशी पुराणी यांना एक आत्मीय जवळीक जाणवू लागली. आणि त्यांच्याच परवानगीने इ. स. १९१६ साली ‘आर्य’मधील लिखाणाचे श्री. पुराणी यांनी गुजराथीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. इ. स. १९०७ साली सुरत काँग्रेसच्या निमित्ताने झालेल्या भेटीत पुराणी यांच्या बंधुना श्री. अरविंद घोष यांनी क्रांतिकार्याची काही योजना सांगितली होती. ती प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची एकदा परवानगी घ्यावी, अशी आवश्यकता अंबालाल पुराणी यांना जाणवली.

डिसेंबर १९१८ साली श्रीअरविंद यांना भेटण्यासाठी म्हणून, पुराणी ‘आर्य’ मासिकाच्या कार्यालयात जाऊन पोहोचले. श्रीअरविंदांचे वास्तव्य तेव्हा तेथेच होते. पुराणी सकाळी आठ वाजता तेथे पोहोचले आणि भेटीची वेळ ठरली होती दुपारी तीनची.

*

(श्री. अंबालाल पुराणी स्वत: या भेटीची साद्यंत हकिकत येथे सांगत आहेत…)

मी जेव्हा श्रीअरविंदांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते वरच्या मजल्यावर असलेल्या व्हरांड्यामध्ये बसलेले होते. त्यांच्या समोर एक छोटे टेबल होते आणि त्या पाठीमागे असलेल्या एका लाकडी खुर्चीमध्ये ते बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्याभोवती एक आध्यात्मिक आभा पसरलेली मला जाणवली. त्यांची दृष्टी अंतःकरणाचा ठाव घेणारी होती. आधी झालेल्या पत्रव्यवहाराच्या निमित्ताने ते मला ओळखत होते. बडोद्यामध्ये माझ्या भावासोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आठवणही मी त्यांना करून दिली. ती भेट ते विसरले नव्हते. मी त्यांना असे सांगितले की, आता आमचा गट क्रांतिकार्यासाठी सुसज्ज झालेला आहे. (आम्हाला संघटित होण्यासाठी अकरा वर्षांचा कालावधी लागला होता.) श्रीअरविंद काही काळ स्तब्ध राहिले. नंतर त्यांनी मला माझ्या साधनेसंबधी काही प्रश्न विचारले. त्यांना मी काय करतो, ते सांगितले आणि म्हणालो की, “साधना वगैरे सगळे ठीक आहे. परंतु जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत माझ्या चित्ताची एकाग्रता होणे कठीण आहे.”

श्रीअरविंद म्हणाले, “भारत स्वतंत्र होण्यासाठी कदाचित क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही, असे दिसते.”

“पण त्याशिवाय ब्रिटिश सरकार भारतातून कसे निघून जाईल?” मी त्यांना विचारले.

“तो एक वेगळाच प्रश्न आहे. पण कोणत्याही क्रांतिकारक कृतीची आवश्यकता न भासता भारत स्वतंत्र झाला तर? मग तुम्हाला तुमची योजना प्रत्यक्षात आणण्याची गरजच काय? तेव्हा तुम्ही आता आपले लक्ष योगसाधनेवर केंद्रित केलेले बरे,” ते म्हणाले.

“भारतभूमीच्या धमन्यांमध्येच साधना आहे. त्यामुळे, मला असे वाटते की, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा, हजारो लोक योगसाधनेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतील. परंतु आजच्या घडीला या जगामध्ये, सत्याविषयी किंवा आध्यात्मिकतेविषयी, आमच्यासारख्या गुलामांकडून कोण ऐकून घेईल?” मी विचारले.

ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळवायचेच आहे हे भारताने अगोदरच निर्धारित केले आहे आणि त्या उद्दिष्टाप्रत कार्य करण्यासाठी आवश्यक ती नेतेमंडळी आणि कार्यकर्ते भारताला निश्चितपणे मिळतील. परंतु योगाची हाक काही प्रत्येकालाच येत नाही. तेव्हा, तुम्हाला जर ती हाक आलेली आहे, तर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करणे बरे नाही का? आणि याउपरही तुम्हाला जर क्रांतिकारक कृतिकार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर, तुम्ही तो खुशाल हाती घ्या, पण मी मात्र त्याला संमती देणार नाही.”

तेव्हा मी म्हणालो की, “पण आमच्या क्रांतिकारक चळवळीचा प्रारंभ तुम्हीच करून दिला होतात, आणि त्यामागची प्रेरणादेखील तुमचीच होती. तर मग आता त्याची अंमलबजावणी करतेवेळी मात्र त्याला संमती देण्यास तुम्ही नकार का बरे देत आहात?”

“कारण एकेकाळी मी तसे कार्य केलेले आहे आणि मला त्यातल्या अडचणींची चांगली कल्पना आहे. आदर्शवादाने भारावून जाऊन, उत्साहाच्या भरात, तरुण मुले या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येतात. परंतु या गोष्टी दीर्घकाळ टिकून राहात नाहीत. शिस्तीचे पालन करणे आणि त्यात निभाव लागणे हे अतिशय कठीण होऊन बसते. एकाच संघटनेमध्ये छोटेछोटे गट निर्माण होतात, त्यांच्यामध्ये गटबाजी सुरु होते, इतकेच काय पण माणसांमध्येसुद्धा आपापसात शत्रुत्व वाढीस लागते. नेतृत्वासाठी स्पर्धा सुरु होते. आणि अशा या संघटनांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सरकारचे काही हस्तक बेमालूमपणे मिसळून गेलेले असतात. आणि त्यामुळे अशा चळवळी प्रभावीरीतीने कार्य करू शकत नाहीत. कधीकधी त्या इतक्या हीन पातळीवर उतरतात की त्यांच्यामध्ये पैशावरूनसुद्धा भांडणे सुरु होतात”, ते शांतपणाने म्हणाले.

“पण समजा, साधनेचे महत्त्व हे काकणभर अधिक आहे, असे मी मान्य केले आणि मी त्यावर लक्ष केंद्रित करायचे असे अगदी बुद्धिपूर्वक ठरविले तरी, आता माझी अडचण अशी आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी काहीतरी केलेच पाहिजे, असे मला खूप तीव्रपणे वाटते आहे. या विचारांनी गेले अडीच वर्षे मला सुखाची झोपसुद्धा लागलेली नाही. तसाच जोरकस प्रयत्न केला तरच मी शांत राहू शकेन, असे मला वाटते. भारताच्या स्वातंत्र्यावरच माझे सारे लक्ष खिळलेले आहे. आणि ते मिळाल्याशिवाय मला झोप लागणेसुद्धा अवघड आहे.” असे मी सांगितले.

श्रीअरविंद दोन ते तीन मिनिटे स्तब्ध राहिले. ती दोनतीन मिनिटे मला खूप मोठी वाटली. नंतर ते म्हणाले, ” भारत स्वतंत्र होईल अशी खात्री तुम्हाला समजा कोणी दिली तर?”

“पण अशी खात्री कोण देऊ शकेल?” मला माझ्या स्वतःच्याच प्रश्नामध्ये शंकेचा आणि आव्हानाचा सूर जाणवला.

परत ते दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध राहिले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, “समजा मी तुम्हाला तशी खात्री दिली तर?”

मी एक क्षणभर थांबलो आणि माझ्या मनाशीच विचार करून म्हटले, “तुम्ही खात्री दिलीत, तर मग मात्र मी ते मान्य करेन.”

अत्यंत गंभीरपणे ते उद्गारले, “तर मग, भारत स्वतंत्र होईल अशी खात्री मी तुम्हाला देतो.”

माझे काम झाले होते – माझा पाँडिचेरीच्या भेटीचा हेतू सफल झाला होता. माझा वैयक्तिक प्रश्न आणि आमच्या गटाची समस्या अशा रीतीने सुटली होती. त्यानंतर बडोद्यातील परिचितांविषयी काही गप्पागोष्टी झाल्या.

आता माझी निरोप घेण्याची वेळ आली. पुन्हा एकदा माझ्या मनात भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीचा प्रश्न उफाळून आला. निघण्यासाठी मी जेव्हा उठलो तेव्हा तो प्रश्न मला मनात तसाच दाबून ठेवता आला नाही – कारण माझ्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न होता, “भारत स्वतंत्र होईल अशी खरंच तुम्हाला खात्री आहे?” मी पुन्हा एकदा त्यांना विचारले. माझ्या स्वतःच्याच या प्रश्नाचा खरा गर्भितार्थ मला तत्क्षणी तरी जाणवला नव्हता. वास्तविक, त्यांनी मला खात्री दिली होती आणि तरीसुद्धा माझ्या मनातील शंकांचे पूर्णतः निरसन झाले नव्हते, मला वचन हवे होते.

श्रीअरविंदांची चर्या अतिशय गंभीर झाली. खिडकीमधून पलीकडे दिसणाऱ्या आकाशामध्ये दूरवर त्यांची नजर खिळली. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि समोरच्या टेबलावर अत्यंत ठाशीवपणाने आपली मूठ काहीशी आपटत ते म्हणाले, “माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा, उद्याच्या उगवत्या सूर्याइतकेच भारताचे स्वातंत्र्य निश्चित आहे. तसा ईश्वरी आदेश अगोदरच निघालेला आहे. – आता तो प्रत्यक्षात उतरायला फार काळ लागणार नाही.”

मी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.

आगगाडीमध्ये परतीच्या प्रवासात असताना, सुमारे दोन-अडीच वर्षानंतर प्रथमच मला अगदी निवांत झोप लागली. माझ्या मनामध्ये त्या दृश्याने आयुष्यभरासाठी घर केले. ते चित्र असे – एका छोट्या टेबलापाशी आम्ही दोघे उभे आहोत, माझा कळकळीचा प्रश्न, त्यांची ती ऊर्ध्वाभिमुख खिळलेली नजर, आणि त्यांचा तो धीरगंभीर पण ठाम असा आवाज, ज्यामध्ये जगाला हादरवण्याची ताकद होती, आणि त्या टेबलावर घट्ट आवळलेली त्यांची ती मूठ, जी ईश्वरी सत्यावरील त्यांच्या आत्म-विश्वासाची निदर्शक अशी खूण होती.

संपूर्ण जगभरामध्ये कलियुग असेल, लोहयुग असेल पण भारतमातेचे हे सद्भाग्य आहे की, तिची मुले सत्यज्ञानी आहेत, आणि त्यांची त्या सत्यावर अविचल श्रद्धा आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राण पणाला लावण्याचीदेखील त्यांची तयारी असते. आणि मला वाटते, या महत्त्वपूर्ण गोष्टीमध्येच भारताचे आणि संपूर्ण विश्वाचे दिव्य सद्भाग्य सामावलेले आहे!

(Evening talks : 16-19)

*

वाचक मित्रांनो, हा प्रसंग घडला आहे इ. स. १९१८ मध्ये; म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी साधारण एकोणतीस वर्षं आधी आणि याला म्हणतात, ‘क्रांतदर्शित्व’.
स्वातंत्र्यसैनिक बनू पाहणाऱ्या अंबालाल पुराणी यांचे येथे मन-परिवर्तन झाले आणि पुढे ते आयुष्यभर श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी बनून, अंधाराशी झुंज देणाऱ्या प्रकाश-सेनेचे सैनिक बनले.

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि श्रीअरविंद यांची १५० वी जयंती या सुवर्ण-मुहूर्तावर उद्यापासून आपण – ‘क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला भारत’ – ही मालिका सुरु करत आहोत.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.