कर्म आराधना – १५

कौशल्यपूर्ण हात, स्वच्छ दृष्टी, एकाग्र अवधान, अथक चिकाटी या गोष्टी व्यक्तीपाशी असताना व्यक्ती जे काही करेल ते उत्कृष्टच असेल.
*
कौशल्यपूर्ण हात, काटेकोर काळजी, टिकून राहणारे अवधान या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती ‘जडभौतिका’ला ‘चैतन्या’च्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 308)

कर्म आराधना – १४

एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.
*
एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच अर्धवट सोडून द्यायचे आणि पुन्हा एखादे नवीन कार्य करायला लागायचे, ही काही तितकीशी हितकर सवय नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 306)

कर्म आराधना – १३

कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे.
*
कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही खरी आध्यात्मिकता.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 305-306)

कर्म आराधना – १२

‘ईश्वरी शक्ती’प्रत स्वतःला अधिकाधिक खुले करा म्हणजे मग तुमचे कर्म हळूहळू परिपूर्णत्वाच्या दिशेने प्रगत होत राहील.
*
‘ईश्वरा’च्या कार्याचे एक परिपूर्ण साधन बनण्यासाठी आपण सातत्याने आस बाळगूया.
*
कर्मातील परिपूर्णत्व हाच तुमचा आदर्श असला पाहिजे, असे झाले तर तुम्ही ‘ईश्वरा’चे सच्चे साधन बनाल याविषयी खात्री बाळगा.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 304)

कर्म आराधना – ११

प्रश्न : साधना आणि मनाच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

श्रीमाताजी : १) कर्म हे साधना म्हणून करा. तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी तुम्ही जे कर्म केले असेल, ते ‘ईश्वरा’ला अर्पण करा आणि कर्मफल ‘ईश्वरा’वर सोपवा.

२) तुमचा मेंदू शक्य तेवढा शांत ठेवून, तुमच्या मस्तकाच्या ऊर्ध्वदिशेस सचेत होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर यामध्ये यशस्वी झालात आणि त्याच अवस्थेमध्ये कर्म केलेत तर, ते कर्म परिपूर्ण होईल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 301)

कर्म आराधना – ०९

प्रार्थना केल्याप्रमाणे आपण कर्म करूया, कारण खरोखरच, कर्म ही शरीराने केलेली ‘ईश्वरा’ची सर्वोत्तम प्रार्थनाच असते.
*
‘ईश्वरा’साठी कर्म करणे ही, देहाद्वारे केलेली प्रार्थनाच असते.
*
व्यक्ती ध्यानाच्या माध्यमातून प्रगत होऊ शकते, परंतु व्यक्तीला सोपविण्यात आलेले कर्म, तिने योग्य वृत्तीने केले तर त्याद्वारे व्यक्ती दसपटीने अधिक प्रगत होऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 299)

कर्म आराधना – ०८

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, ज्याप्रमाणे आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष (psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरोन्मुख’ झाला असाल आणि म्हणाला असाल की, ”मला तुझा होऊन राहायचे आहे.” आणि ईश्वर “हो” असे म्हणाला असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा (central being) स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य माणसांमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरूक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा (inner being) म्हणाला असेल की, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे’’; तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

कर्म आराधना – ०७

‘ईश्वरी इच्छा’ आपल्याकडून कार्य करवून घेत आहे, हे आम्हाला कसे आणि केव्हा कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ‘ईश्वरी इच्छा’ ओळखणे अवघड नसते. ती सुस्पष्ट असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ‘ईश्वरी इच्छे’च्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर तुम्हाला अधिकच अस्वस्थ वाटू लागेल. तरीसुद्धा तुमच्या अस्वस्थतेचे कारण म्हणून तुम्ही काही भौतिक समर्थन करू पाहाल आणि त्या वाटेवरून तुम्ही तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करूनही, तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि थोडेसे थांबून, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळते आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतात. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशी अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबून त्या अस्वस्थतेचे कारण शोधू पाहता, तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा की, “हे जे काही चालले आहे, त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे?” शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो या साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो, असा शोध अंतिमत: तुम्हाला लागेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-09)

कर्म आराधना – ०६

प्रश्न : ईश्वराची ‘इच्छा’ काय आहे, हे आम्हाला कसे कळू शकेल?

श्रीमाताजी : व्यक्तीला ईश्वराची ‘इच्छा’ काय आहे हे कळत नाही, तर तिला ती जाणवते. आणि ती जाणवण्यासाठी व्यक्तीने तेवढ्याच उत्कटतेने, अगदी प्रामाणिकपणे तशी इच्छा बाळगली पाहिजे म्हणजे मग प्रत्येक अडथळा नाहीसा होऊन जातो. जोपर्यंत तुम्हाला पसंती-नापसंती आहे, इच्छा आहेत, आकर्षणं आहेत, आवडी-निवडी आहेत तोवर या गोष्टी तुमच्यापासून ‘सत्य’ दडवून ठेवतात. त्यामुळे, पहिली गोष्ट करायची ती अशी की, तुमच्या चेतनेच्या सर्व गतिविधी सुधारण्याचा, त्यांच्यावर शासन करण्याचा, प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व गतिविधी या जोवर ‘सत्या’ची परिपूर्ण आणि चिरस्थायी अभिव्यक्ती बनत नाहीत तोपर्यंत तरी ज्यांच्यात परिवर्तन घडविणे शक्यच नाही अशा सर्व गोष्टी काढून टाकायच्या.

आणि नुसती इच्छा बाळगणेही पुरेसे नसते कारण व्यक्ती बरेचदा तशी इच्छा बाळगण्याचेच विसरून जाते.

आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अभीप्सा, जी व्यक्तित्वामध्ये एखाद्या अग्निहोत्राप्रमाणे तेवत असते. ज्या ज्या वेळी तुमच्यामध्ये एखादी इच्छा, पसंती-नापसंती, एखादे आकर्षण डोके वर काढते तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचे या अग्नीमध्ये तुम्ही हवन केले पाहिजे. तुम्ही हे चिकाटीने करत राहिलात तर, तुमच्या सामान्य चेतनेमध्ये सत्य-चेतनेचा एक छोटासा किरण उदय पावू लागला असल्याचे तुमचे तुम्हाला दिसून येईल. सुरुवातीला तो किरण अगदी अस्पष्ट असेल; तो इच्छावासना, पसंतीनापसंती, आकर्षण-प्रतिकर्षण, आवड-निवड या साऱ्या कोलाहलापासून खूप मागे, दूर असेल. परंतु तुम्ही या साऱ्याच्या पलीकडे गेलेच पाहिजे आणि मग तेथे तुम्हाला अगदी स्थिर, निश्चल, जवळजवळ शांत अशी सत्य चेतना आढळून येईल.

सत्य चेतनेच्या संपर्कात जे कोणी असतात त्यांना, एकाच वेळी सर्व शक्यता दृष्टिक्षेपात येतात आणि आवश्यकता असेल तर ते सर्वात जास्त प्रतिकूल शक्यतासुद्धा जाणीवपूर्वक निवडतात. परंतु या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला बराच मोठा पल्ला गाठावाच लागतो

– श्रीमाताजी
(CWM 04 : 02-03)

कर्म आराधना – ०५

शक्ती मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्याची गरज नाही; तिच्या प्राप्तीची आकांक्षा बाळगता कामा नये. अथवा ती शक्ती प्राप्त झाल्याचा अहंकारदेखील असता कामा नये. व्यक्तीला एखादी शक्ती वा अनेक शक्ती प्राप्त झाल्या तरी, तिने त्या स्वतःच्या आहेत असे समजता कामा नये तर, त्या ‘ईश्वरी’ कार्यासाठी ‘ईश्वरा’ने दिलेल्या देणग्या आहेत, असे समजले पाहिजे. …(ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या गोष्टींचा) स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी किंवा स्वार्थासाठी दुरूपयोग होऊ नये; त्यांचा अभिमान, प्रौढी निर्माण होऊ नये, श्रेष्ठतेची भावना निर्माण होऊ नये, ईश्वराचे साधन (instrument) बनल्याचा कोणता दावा किंवा अहंकारदेखील होऊ नये; याची व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे. ईश्वराच्या सेवेसाठी सुपात्र बनेल अशा रीतीने प्रकृतीचे सहज, शुद्ध आंतरात्मिक साधन कसे बनता येईल याचीच केवळ व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)