ईश्वरी कृपा – ०३

“एखादी व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, तिला जर ईश्वरी कृपा सर्वत्र दिसू लागली तर, अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्व-शक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे, जीवन जगू लागेल. आणि असे जीवन जगणे हाच ईश्वरी कार्यातील सर्वोत्तम शक्य असा सहयोग ठरेल.”

(श्रीमाताजींचे वरील वचन त्यांनी स्वत: वाचून दाखविले आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण केले. ते असे -)

यातील पहिली अवस्था प्रत्यक्षात उतरविणे हे तितकेसे सोपे नाही. जीवनात जाणिवपूर्वक विकास, नित्य निरीक्षण आणि सतत आलेले अनुभव यांचा तो परिणाम असतो.

मी हे तुम्हाला या आधीही अनेक वेळा सांगितले आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितिमध्ये असता आणि काही विशिष्ट घटना घडतात, तेव्हा या घटना तुमच्या इच्छाआकांक्षांच्या किंवा तुम्हाला जे सर्वात चांगले आहे असे वाटत असते, त्याच्या बरेचदा विरोधात जाणाऱ्या असतात आणि मग बरेचदा तुम्हाला या साऱ्याचे वाईट वाटते आणि तुम्ही स्वतःच्याच मनाशी म्हणता, “जर ते तसे झाले असते तर किती बरे झाले असते, ते जर असे झाले असते तर किंवा ते जर तसे झाले असते तर…” अगदी लहानसहान आणि मोठ्या गोष्टींबाबतही असेच चाललेले असते. आणि मग वर्षांमागून वर्ष निघून जातात, घटना उलगडत जातात, तुमची प्रगती होत राहते, तुम्ही अधिक जागरूक होता, तुम्हाला गोष्टींचे आकलन अधिक चांगल्या रितीने होऊ लागते आणि मग जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते – सुरुवातीला तुम्हाला अचंबा वाटतो आणि नंतर त्याकडे तुम्ही हसत हसत पाहता – तेव्हा जी परिस्थिती तुम्हाला अगदी अनर्थकारक किंवा प्रतिकूल वाटली होती आज तीच परिस्थिती तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम गोष्ट ठरलेली असते; तुमची प्रगती होण्यासाठी जे घडून येणे आवश्यक होते आणि शक्य होते तेच घडून आलेले असते. आणि तुम्ही थोडे जरी समजूतदार असाल तर तुम्ही स्वतःलाच सांगता, “खरोखर, ‘ईश्वरी कृपा’ अगाध आहे.”

तर यासारख्या गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यात वारंवार घडतात तेव्हा तुम्हाला जाणवू लागते की, बाह्यरूपे फसवी असली आणि माणसाचा आंधळेपणा असला तरीदेखील, ‘ईश्वरी कृपा’ मात्र सर्वत्र कार्यरत असते, आणि त्यामुळे जग त्या क्षणाला ज्या अवस्थेत असते त्या परिस्थितिमध्ये जे सर्वोत्तम घडणे शक्य असते तेच त्या प्रत्येक क्षणी घडून येते. आपली दृष्टी मर्यादित असल्यामुळे किंबहुना, आपल्या पसंती-नापसंतीने आपण अंध झालेलो असल्याने, गोष्टी अशा अशा असतात, हे आपल्याला उमगत नाही.

व्यक्ती जेव्हा या गोष्टींकडे पाहू लागते तेव्हा ती एका अवर्णनीय अशा आश्चर्यकारक स्थितीमध्ये प्रवेश करते. कारण या बाह्य रूपांपाठीमागे असणाऱ्या अनंत, अद्भुत, सर्वशक्तिमान अशा ईश्वरी कृपेची तिला जाणीव होऊ लागते – ही ‘ईश्वरी कृपा’ सारे काही जाणते, ती साऱ्या गोष्टींचे संघटन करते, त्यांची व्यवस्था लावते आणि आपल्याला आवडो वा न आवडो, आपल्याला ती ज्ञात असो वा नसो, तरीसुद्धा ती आपल्याला परमश्रेष्ठ अशा ध्येयाकडे, ईश्वराशी ऐक्य या ध्येयाकडे, ईश्वराबद्दलची जाणीव आणि त्याच्याशी ऐक्य या ध्येयाकडे घेऊन जात असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 255-256)

ईश्वरी कृपा – ०२

‘ईश्वरी कृपे’वरील तुमचा विश्वास आणि श्रद्धा कितीही अगाध असली; प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक क्षणाला, जीवनातील प्रत्येक अवस्थेत ‘ईश्वरी कृपा’च कार्यरत आहे, हे पाहण्याची तुमची क्षमता कितीही महान असली तरी, तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची अद्भुत विशालता, त्या कार्यपूर्तीमधील बारकावा, त्यातील अचूकता समजून घेण्यात कधीच यशस्वी होणार नाही. जगातील परिस्थिती विचारात घेता, ईश्वरी साक्षात्काराप्रत चाललेली वाटचाल ही अधिक वेगवान, अधिक परिपूर्ण, शक्य तेवढी अधिक समग्र आणि सुसंवादी व्हावी या दृष्टीने, ईश्वरी कृपा कुठपर्यंत प्रत्येक गोष्ट करते, सर्व गोष्टींच्या पाठीमागे तीच कशी असते, सर्व गोष्टी ती कशा सुसंघटित करते, त्यांचे संयोजन कसे करते, हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही.

मात्र ज्या क्षणी तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या संपर्कात येता, तत्क्षणी अवकाशातील एकेक बिंदू, आणि काळातील प्रत्येक क्षण, तुम्हाला त्या ‘ईश्वरी कृपे’चे निरंतर चालणारे कार्य, ‘ईश्वरी कृपे’ची सातत्यपूर्ण मध्यस्थी (Intervention) नेत्रदीपक पद्धतीने दाखवून देत असतो.

आणि एकदा का तुम्हाला त्याचे दर्शन झाले की, मग तुमच्या लक्षात येते की, तुमची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग तुम्हाला कधीही भीती, अस्वस्थता, पश्चात्ताप किंवा संकोच वाटता कामा नये, किंवा अगदी दुःखभोगही जाणवता कामा नयेत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, जर तिला ‘ईश्वरी कृपा’ सर्वत्र दिसू लागली की, मग अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्वशक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे जीवन जगू लागेल.

आणि असे जीवन जगणे हाच ‘ईश्वरी कार्या’तील सर्वोत्तम शक्य असा सहयोग असेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 250)

ईश्वरी कृपा – ०१

संपूर्ण आविष्करणामध्ये, जग ज्या दुःखामध्ये, अंधकारामध्ये आणि ज्या मूर्खतेमध्ये पहुडले आहे त्यातून या जगाला बाहेर काढण्याचे काम ती अनंत ‘कृपा’ सातत्याने करत असते. अनंत काळापासून ही ‘ईश्वरी कृपा’ कार्यरत आहे, तिचे प्रयत्न अविरत चालू आहेत आणि असे असूनदेखील, अधिक महान, अधिक सत्य, अधिक सुंदर अशा गोष्टींच्या आवश्यकतेची जाणीव होण्यासाठी या जगाला हजारो वर्षे लागली !

आपल्या स्वतःच्याच अस्तित्वामध्ये आपल्याला विरोधाचा जो सामना करावा लागतो त्यावरून, ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याला या जगाचा किती प्रचंड विरोध होत असेल याचे अनुमान, प्रत्येकजण लावू शकतो.

आणि तेव्हाच मग ऊर्ध्वस्थित असलेल्या ‘प्रकाशा’प्रत आणि ‘शक्ती’प्रत आणि जे ‘सत्य’ स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्या ‘सत्या’प्रत, जर सर्व गोष्टी संपूर्णपणे अर्पण केल्या नाहीत, तर सगळ्या बाह्य गोष्टी, सगळ्या मानसिक रचना, सगळे भौतिक प्रयत्न हे व्यर्थ आहेत, फोल आहेत हे व्यक्तिला उमगते; तेव्हा अशी व्यक्ती निणार्यक प्रगती करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग ज्याच्यामध्येच सर्वकाही परिवर्तन करण्याची शक्ती आहे अशा, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्या ‘ईश्वरा’ला आपल्या अस्तित्वाचे परिपूर्ण, समग्र आणि उत्कट असे आत्मदान करणे, हाच व्यक्तिचा एकमेव खरा प्रभावी दृष्टिकोन असतो.

जेव्हा तुमच्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याप्रत तुम्ही खुले होता तेव्हा, जे जीवन खरोखरच जगण्याजोगे आहे, अशा उच्चतर जीवनाची तुम्हाला गोडी चाखायला मिळते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये त्या जीवनाप्रत उन्नत होण्याची, तेथवर जाऊन पोहोचण्याची इच्छा उदयाला येते, आणि मग ‘हे शक्य आहे’ असा विश्वास निर्माण होतो आणि अंतिमतः त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण होते आणि अगदी ध्येयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचा संकल्प उदयास येतो.

सर्वप्रथम व्यक्तिने जागे झाले पाहिजे, तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 419-420)

अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये असताना व्यक्तीला देवाची आठवण होते, अशी व्यक्ती देवाचा धावा करते, त्या परिस्थितीमधून सोडवावे म्हणून त्याची प्रार्थना करते, ‘ईश्वरी कृपा’ व्हावी अशी तिला आस असते. आणि कधीकधी ‘ईश्वरी कृपा’ घडूनही येते. पण ती केव्हा झाली, कशी झाली, कृपा झाली म्हणजे नेमके काय झाले, व्यक्तीने अशा वेळी काय करायला हवे, तिचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा कृपा व्हावी म्हणून काय करायला हवे, याची तिला जाण नसते. कृपा होणे म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे सारे काही होणे अशी व्यक्तीची समजूत असते, त्यामध्ये कितपत तथ्य आहे, या साऱ्याचा मागोवा श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांच्या आधारे घेण्याचा आपण उद्यापासून प्रयत्न करणार आहोत.

तसेच एकंदर विश्वसंचालनामध्ये ‘ईश्वरी कृपे’चे कार्य कसे चालते, तेही आपण येथे समजावून घेणार आहोत. सामान्य जीवन ज्या कर्मसिद्धान्ताच्या नियमानुसार चालल्यासारखे दिसते, त्या सिद्धान्ताच्या वर ‘ईश्वरी कृपा’ असते, आणि तिच्यामध्ये गतकर्मांच्या बंधनांचा निरास करण्याची क्षमता असते, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या वचनांच्या आधारे, ‘ईश्वरी कृपा’ म्हणजे नेमके काय ते आपण समजावून घेऊ. उद्यापासून ‘ईश्वरी कृपा’ ही मालिका सुरु करत आहोत. धन्यवाद…

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक