आध्यात्मिकता २०

आपल्यामध्ये असलेल्या चिरंतन आत्म्याचा साक्षात्कार आपल्याला झाला आहे किंवा नाही हा प्रश्न व्यक्ती जोपर्यंत स्वतःला विचारत राहते; जोपर्यंत व्यक्तीच्या मनात काही शंका असते किंवा काही द्विधा मनस्थिती असते त्यातूनच हे सिद्ध होते की, अजूनपर्यंत ‘खरा’ संपर्क झालेला नाही. कारण जेव्हा ही घटना घडून येते, तेव्हा ती तिच्यासोबत अशी एक अवर्णनीय गोष्ट घेऊन येते, जी इतकी नूतन आणि इतकी खात्रीदायक असते की, शंकाकुशंका, प्रश्न यांना जागाच शिल्लक राहत नाही. तो खरोखरच एक नवजन्म असतो, ‘नवजन्म’ या शब्दाचा जो खराखुरा अर्थ आहे, अगदी त्या अर्थाने तो नवीन जन्म असतो.

तुम्ही एक नवीनच व्यक्ती बनता, आणि तुमचा मार्ग कोणताही असला किंवा नंतर त्या मार्गावर कोणत्याही अडचणी जरी आल्या तरी ती नवजन्माची जाणीव तुम्हाला कधीच सोडून जात नाही. ही गोष्ट इतर अनेक अनुभवांसारखी नसते, म्हणजे इतर अनुभव येतात आणि नंतर मागे पडतात, पडद्याआड जातात, त्यांची एक प्रकारची धूसर स्मृती तुमच्या मनात रेंगाळत राहते, ती स्मृती धरून ठेवणेसुद्धा काहीसे कठीण असते, त्याची आठवण कालांतराने अस्पष्ट, धूसर, अधिक धूसर होत जाते, मात्र हा अनुभव तसा नसतो.

तुम्ही एक नवीनच व्यक्ती बनलेले असता, आणि काहीही झाले तरी निश्चितपणे तुम्ही ती नवीन व्यक्ती असता. आणि मनाच्या सर्व अक्षमता, प्राणाच्या सर्व अडचणी, शरीराचे जडत्व या सर्वांनादेखील ही नवीन अवस्था बदलणे अशक्य असते. या नवीन अवस्थेमुळे चेतनेच्या जीवनामध्ये एक निर्णायक क्षण येतो. या साक्षात्कारापूर्वीची व्यक्ती आणि साक्षात्कारानंतरची व्यक्ती ही आता एकसारखीच असत नाही. …त्याचे खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतिक्रमण (reversal) झालेले असते, ते प्रतिक्रमण असे असते की, ज्यामध्ये परतून मागे फिरता येत नाही.

आणि म्हणूनच जेव्हा लोकं मला सांगतात, “माझा माझ्या आत्म्याशी संपर्क झाला आहे की नाही हे जाणून घ्यायला मला आवडेल, ” तेव्हा मी त्यांना सांगते, “ज्याअर्थी तुम्ही हा प्रश्न विचारत आहात त्याअर्थी हे उघड आहे की, अजूनपर्यंत तुमचा तुमच्या आत्म्याशी संपर्क झालेला नाही. तुम्हाला अन्य कोणी उत्तर देण्याची आवश्यकता नसते, ते उत्तर तुमचे तुम्हीच स्वतःला द्यायचे असते.” जेव्हा ही गोष्ट घडून येते, तेव्हा त्याव्यतिरिक्त अन्य काही शिल्लक नसते. सारे काही संपलेले असते.

आणि आपण आत्ता त्याबद्दल बोलत आहोत म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून देते; श्रीअरविंदांनी काय सांगितले आहे, त्यांनी पुन्हापुन्हा जे सांगितले आहे, लिहिले आहे, पुन्हापुन्हा ठाशीव पद्धतीने जे सांगितले आहे त्याची मी आठवण करून देते. त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या योगाचा, पूर्णयोगाचा प्रारंभ या अनुभवानंतरच होऊ शकतो, त्या आधी नाही… त्यामुळे हा अनुभव येण्यापूर्वी, अतिमानस काय आहे हे आता आपल्याला कळायला लागले आहे. त्याच्यासंबंधी काही कल्पना तयार करता येत आहेत किंवा कोणत्याही प्रकारे, मग ते कितीही अल्पसे का होईना पण तुम्हाला त्याचे मूल्यमापन करता येत आहे अशा प्रकारच्या कोणत्याही भ्रामक कल्पनांना खतपाणी घालू नका.

म्हणून, या मार्गावर प्रगत होण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर प्रथमतः या नवजन्माच्या मार्गावर अतिशय विनम्रपणे तुम्ही तुमची पहिलीवहिली पावले टाकली पाहिजेत आणि तुम्हाला अतिमानसिक अनुभव येऊ शकतात या भ्रांतकल्पनांचा परिपोष करण्यापूर्वी, तो नवजन्म प्रत्यक्षात उतरविला पाहिजे…

तुम्हाला दिलासा देण्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की, तुम्ही या पृथ्वीवर आत्ता जीवन जगत आहात, या वस्तुस्थितीमुळेच, भलेही तुम्ही त्याबद्दल सचेत असाल किंवा नसाल, तुम्हाला हवे असो किंवा नसो, आता या पृथ्वीच्या वातावरणात प्रसृत होऊ लागलेले, नूतन अतिमानसिक द्रव्य तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासागणिक ग्रहण करत आहात. आणि ते द्रव्य तुमच्यामध्ये काही गोष्टींची तयारी करत आहे, आणि तुम्ही निर्णायक पाऊल उचलताक्षणीच, ते द्रव्य अचानकपणे आविष्कृत होईल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 336-337]

आध्यात्मिकता १९

‘आध्यात्मिकता’ आंतरिक अस्तित्वाला मुक्त करते, प्रकाशित करते; मनापेक्षा उच्चतर असणाऱ्या गोष्टीशी संपर्क करण्यासाठी ती मनाला साहाय्य करते; एवढेच नव्हे तर ती, मनाची मनापासून सुटका करून घेण्यासाठीसुद्धा साहाय्य करते. आंतरिक प्रभावाद्वारे ती व्यक्तींच्या बाह्यवर्ती प्रकृतीचे शुद्धीकरण आणि उन्नयन करू शकते परंतु जोपर्यंत तिला मानवी समूहामध्ये मन या साधनाद्वारे कार्य करावे लागते, तोपर्यंत ती पृथ्वीवरील जीवनावर फक्त प्रभाव टाकू शकते; परंतु ती त्या जीवनाचे रूपांतरण करू शकत नाही.

आणि त्यामुळेच आध्यात्मिक मनामध्ये, या प्रभावावरच अल्पसंतुष्ट राहण्याची तसेच मुख्यतः इतरत्र कोठेतरी, पारलौकिकामध्ये परिपूर्ती शोधण्याची किंवा बाह्य जीवनातील सारे प्रयत्न पूर्णपणे सोडून देण्याची आणि फक्त स्वतःच्या आध्यात्मिक मुक्तीवर किंवा सिद्धीवर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती आढळते. (आणि म्हणूनच,) अज्ञानाद्वारे निर्माण झालेल्या प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतर करण्यासाठी मनापेक्षा अधिक उच्चतर असणाऱ्या साधनभूत क्षमतेची आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 918-919]

आध्यात्मिकता १८

जे साधक परिपूर्णतेपर्यंत किंवा त्या जवळपाससुद्धा पोहोचलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातले आणि वागण्यातले अंतर, त्यांचे विपरीत वर्तन तुम्ही पाहता आणि आध्यात्मिक अनुभव वगैरे असे काही नसते किंवा त्यात काही अर्थ नसतो असे तुम्ही म्हणता; परंतु त्या साधकांचे वर्तन हे तुमच्या म्हणण्यासाठी पुरावा कसा काय ठरू शकतो? एखाद्या माणसाला जेव्हा कधी कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक अनुभव येतो किंवा साक्षात्कार होतो तेव्हा लगेचच त्या क्षणी तो माणूस एक निर्दोष किंवा दुर्बलता-विरहित असा परिपूर्ण मनुष्य बनला पाहिजे, असे तुम्ही लिहिले आहे. हे म्हणजे एक अशी अपेक्षा करण्यासारखे आहे की, ज्या अपेक्षेचे समाधान करणे अशक्य आहे आणि अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे, ‘आध्यात्मिक जीवन हा एकाएकी घडून येणारा, अवर्णनीय असा चमत्कार नसून, आध्यात्मिक जीवन म्हणजे एक प्रकारचा विकास आहे.’ या तथ्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखादा साधक हा आधीपासूनच सिद्ध-योगी आहे असे समजून त्याचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही. प्रदीर्घ मार्गावरील जेमतेम पाव टक्के किंवा त्याहूनही कमी अंतर जे चालून गेले आहेत, त्यांच्याबाबतीत तर असे मूल्यमापन करताच कामा नये….

इतकेच काय पण, अगदी महान योगीसुद्धा पूर्णत्वप्राप्तीचा दावा करत नाहीत, आणि ते तसे अगदी परिपूर्णतया निर्दोष नसल्यामुळे, त्यांची ‘आध्यात्मिकता’ मिथ्या आहे किंवा तिचा या जगाला काही उपयोगच नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय आध्यात्मिक माणसं ही अनेक प्रकारची असतात. त्यांच्यापैकी काही जण त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभवांवरच समाधानी असतात आणि बाह्य जीवनातील पूर्णत्व किंवा प्रगती यांच्यासाठी प्रयत्नशील नसतात. काहीजण संत असतात, तर काही जणांना संतत्वाचा ध्यास नसतो. अन्य काही जण वैश्विक चेतनेमध्ये, ‘सर्वव्यापी ईश्वरा’च्या संपर्कात किंवा त्याच्याशी सायुज्य पावून जीवन जगण्यामध्ये आणि स्वत:च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शक्तींना क्रीडा करू देण्यामध्ये समाधानी असतात, म्हणजेच ते ‘परमहंस’ स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणे असतात.

…कोणत्यातरी एका काटेकोर व्याख्येमध्ये बसावावी किंवा एखाद्या ठरावीक बंदिस्त मानसिक नियमामध्ये बांधून ठेवावी अशी ‘आध्यात्मिक जीवन’ ही काही एक वस्तू नाही, तर ‘आध्यात्मिक जीवन’ हे उत्क्रांतीचे एक विशाल क्षेत्र आहे, ‘आध्यात्मिक जीवन’ म्हणजे असे एक विशाल साम्राज्य असते, की त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अन्य सर्व साम्राज्यांहूनही अधिक विशाल असण्याची क्षमता त्याच्या ठायी असते; ज्यामध्ये शेकडो प्रांत असतात, हजारो प्रकार असतात, स्तर असतात, रूपं असतात, मार्ग असतात, आध्यात्मिक आदर्शांमध्ये विभिन्नता असते, आध्यात्मिक उपलब्धीच्या विविध श्रेणी असतात.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 656-657]

आध्यात्मिकता १७

…तुम्ही जेव्हा ‘ईश्वरा’कडे येता तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व मानसिक संकल्पना टाकून दिल्या पाहिजेत; परंतु तसे करण्याऐवजी, उलट, तुम्ही तुमच्या संकल्पना ‘ईश्वरा’वर लादू पाहता आणि ‘ईश्वरा’ने त्याप्रमाणे वागावे असे तुम्हाला वाटते. ‘योगी’ व्यक्तीचा खरा दृष्टिकोन एकच असतो आणि तो म्हणजे, अशा व्यक्तीने घडणसुलभ (plastic) असले पाहिजे आणि जी काही ‘ईश्वरी आज्ञा’ असेल, तिचे पालन करण्यास सज्ज असले पाहिजे; त्याला कोणतीच गोष्ट अत्यावश्यक वाटता कामा नये, तसेच त्याला कोणत्या गोष्टीचे ओझेही वाटता कामा नये.

ज्यांना ‘आध्यात्मिक जीवन’ जगायची इच्छा असते बहुधा त्यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांच्यापाशी जे जे काही आहे त्याचा त्याग करायचा हीच असते; परंतु, ‘ईश्वरार्पणा’च्या इच्छेने नव्हे तर, त्यांना ओझ्यापासून सुटका हवी असते, म्हणून ते तसे करतात. ज्या लोकांपाशी संपत्ती असते आणि ज्या गोष्टींमुळे त्यांना ऐशोआराम मिळतो, आनंद मिळतो अशा गोष्टी ज्यांच्या सभोवार असतात अशा व्यक्ती जेव्हा ‘ईश्वरा’कडे वळतात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टींपासून दूर पळण्याची असते, किंवा, ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांना, ”या गोष्टींच्या बंधनातून सुटका करून घ्यायची असते.” पण ही गोष्ट चुकीची आहे.

ज्या गोष्टी तुमच्या असतात, त्या ‘तुमच्या’ आहेत असे तुम्ही मानता कामा नये, कारण त्या ‘ईश्वरा’च्या असतात. तुम्ही त्यांचा उपभोग घ्यावा असे ‘ईश्वरा’ला वाटत असेल तर, त्यांचा उपयोग तुम्ही करावा; परंतु दुसऱ्याच क्षणी हसतमुखाने त्यांचा त्याग करण्यासाठीही तुम्ही सज्ज असले पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 54-55]

आध्यात्मिकता १६

 

एक सार्वत्रिक अंधश्रद्धा येथे विचारात घेऊ. ‘संन्यासवाद’ आणि ‘आध्यात्मिकता’ या दोन्ही गोष्टी एकच आहेत, अशी कल्पना जगभरात प्रचलित आहे. तुम्ही एखाद्याचे वर्णन, तो आध्यात्मिक पुरुष आहे किंवा ती आध्यात्मिक स्त्री आहे असे केलेत की, लगेच लोक असा विचार करू लागतात की, तो काही अन्नग्रहण करत नसेल, किंवा तो दिवसभर निश्चलपणे बसून राहत असेल; तो खूप गरीब असून एखाद्या झोपडीत राहत असेल, त्याने सर्वस्वाचा त्याग केला असेल आणि तो स्वत:साठी म्हणून जवळ काही बाळगत नसेल. तुम्ही जेव्हा एखाद्या आध्यात्मिक माणसाबद्दल बोलू लागता तेव्हा, शंभरापैकी नव्व्याणव जणांच्या मनात ताबडतोब अशा प्रकारचे चित्र उभे राहते; गरिबी आणि जे जे सुखावह किंवा आरामदायी आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग या गोष्टी म्हणजे व्यक्तीच्या ‘आध्यात्मिकते’चा जणू पुरावाच असतो, असे लोकांना वाटते. (परंतु) या मानसिक कल्पना असतात.

आध्यात्मिक ‘सत्य’ जाणून घेण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी आपण स्वतंत्र असावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा मानसिक कल्पनांपासून मुक्त असले पाहिजे, त्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. कारण तुम्ही अतिशय प्रामाणिक आस घेऊन आध्यात्मिक जीवनाकडे वळलेले असता, तुम्हाला ‘ईश्वर’ भेटावा, तुमच्या चेतनेमध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा, अशी तुमची इच्छा असते आणि मग काय होते?

(कधीकधी) तुम्ही अशा एका ठिकाणी येऊन पोहोचता की, जिथे कोणती एखादी झोपडी नाहीये. अशा एका ‘ईश्वर’समान व्यक्तीला भेटता, की जी सुखकर जीवन जगत आहे, मोकळेपणाने अन्नसेवन करत आहे, जिच्या अवतीभोवती सौंदर्यपूर्ण किंवा चैनीच्या वस्तू आहेत, तिच्याजवळ जे आहे ते ती गरिबांना देत नाही, तर लोक तिला जे देऊ करत आहेत ते ती स्वीकारत आहे आणि त्याचा उपभोग घेत आहे. दृढमूल झालेल्या तुमच्या मानसिक धारणांनुसार तुम्ही जेव्हा या साऱ्याकडे पाहता तेव्हा तुम्ही भांबावून जाता आणि म्हणता, “हे काय ? मला तर वाटले होते की, मी तर एका आध्यात्मिक व्यक्तीला भेटायला चाललो आहे!”

(‘संन्यासवाद’ आणि ‘आध्यात्मिकता’ या दोन्ही गोष्टी एकच) ही चुकीची संकल्पना मोडून काढली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे. एकदा का ही चुकीची संकल्पना मनातून निघून गेली की मग, तुम्हाला तुमच्या संकुचित संन्यासवादी नियमापेक्षा अधिक उच्चतर असे काहीतरी गवसेल; व्यक्ती ज्यामुळे मुक्त होईल अशा प्रकारचा एक पूर्ण खुलेपणा तुम्हाला गवसेल. (तेव्हा मग) तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त होणार असेल तर, तुम्ही ती स्वीकारता आणि तुम्हाला तीच गोष्ट सोडण्यास सांगण्यात आली तर, तितक्याच समत्वाने तुम्ही ती सोडूनही देता. गोष्टी येतात आणि तुम्ही त्या स्वीकारता; गोष्टी जातात आणि तुम्ही त्या जाऊ देता. स्वीकारताना किंवा सोडून देताना, समत्वाचे तेच स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर झळकत असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी [CWM 03 : 53-54]

आध्यात्मिकता १५

आत्म-नियमनाच्या सर्व साधनापद्धती (उदा. आहार परिमित असावा इत्यादी गोष्टी) या जर केवळ नैतिक गुणांचे पालन करायचे म्हणून आचरणात आणल्या गेल्या तर, त्यामधून आध्यात्मिक स्थिती (spiritual state) प्राप्त होईलच असे नाही. त्या जर ‘आध्यात्मिक तपस्या’ म्हणून आचरणात आणल्या गेल्या तरच त्यांचे – किमान त्यातील बहुतांशी साधनापद्धतींचे साहाय्य होऊ शकते. एखादा मनुष्य अगदी अल्प आहार घेत असेल म्हणून तो आध्यात्मिक असलाच पाहिजे असे नाही – परंतु त्याचे मित-आहार घेणे हे जर त्याने, अन्नाविषयीच्या हावरटपासून सुटका करून घेण्यासाठी, आत्म-प्रभुत्वाचे (self-mastery) एक साधन म्हणून उपयोगात आणले तर, ते त्याला साहाय्यकारी ठरते.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 429]

आध्यात्मिकता १४

अध्यात्म-साधनेसाठी ‘प्रामाणिकपणा’ ही अगदी अत्यावश्यक गोष्ट असते आणि कुटिलता हा त्यामधील कायमचा अडथळा असतो. ‘सात्त्विक वृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि सज्ज असते आणि राजसिक वृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून गेलेली असते,’ असे मानले जाते.

त्याच वेळी हेही खरे आहे की, ‘आध्यात्मिकता’ ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कोणती गोष्ट आवश्यक असेलच तर ती म्हणजे खरी ऊर्ध्वमुख अभीप्सा! आणि ही अभीप्सा सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक वृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्त्विक वृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक वृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ‘ईश्वरी विशुद्धता’, ‘प्रकाश’ आणि ‘प्रेम’ यांच्याकडे वळू शकते.

अर्थात, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून त्या कनिष्ठ प्रकृतीला हद्दपार करेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गच्युत होण्याची देखील (to fall from the path) शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटलेली असते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि ईश्वर-भक्तांमध्ये रूपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई (चैतन्य महाप्रभुंचे शिष्य), बिल्वमंगल आणि त्यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ‘ईश्वरा’च्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात; मग त्या माणसाने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असोत किंवा कितीही चुका केलेल्या असोत.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर असणारी अनुक्रमे तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ‘आत्म्या’च्या उच्चतेकडे जाताना, ती दोन्हीही चांगली भाजून निघतात.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

आध्यात्मिकता १३

‘नैतिकता’ जीवनाच्या विविधतेच्या आणि आत्मस्वातंत्र्याच्या विरोधी असणारे असे एक कृत्रिम जीवनमान उचलून धरते. ती मानसिक, ठरीव, मर्यादित असे काहीतरी तयार करते आणि सर्वांनी त्याबरहुकूम वागावे अशी अपेक्षा बाळगते. सर्वांनी समानच गुण आणि समानच आदर्श प्रकृती आत्मसात करावी, त्यासाठीच सर्वांनी धडपडावे असे तिला वाटते. नैतिकता ही काही दैवी नाही किंवा तिच्यामध्ये ‘ईश्वरीय’ असेदेखील काही नाही; ती मानवी असते, माणसासाठी असते. नैतिकता ही चांगल्या आणि वाईटामध्ये निश्चित असा भेद आहे असे समजून, तोच मूलभूत घटक आहे असे मानून चालते. पण ही एक स्वैर, यादृच्छिक (arbitrary) कल्पना आहे. ती सापेक्ष अशा काही गोष्टी घेते आणि त्या निरपवाद आहेत असे समजून दुसऱ्यांवर लादू पाहते; हे चांगले आणि हे वाईट याबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. नैतिकतेची संकल्पना पुढे जाऊन असेही सांगते की, काही वासना चांगल्या असतात आणि काही वासना वाईट असतात. आणि त्यातील चांगल्या स्वीकाराव्यात आणि वाईट नाकाराव्यात असेही ही नैतिक संकल्पना सांगते.

पण आध्यात्मिक जीवनाची मात्र अशी मागणी असते की, वासना, कामना (desire) मग त्या कोणत्याही प्रकारच्या असोत तुम्ही त्या अव्हेरल्याच पाहिजेत, नाकारल्याच पाहिजेत. जी स्पंदने, ज्या गतीविधी तुम्हाला ‘ईश्वरा’पासून दूर घेऊन जातात अशी सर्व स्पंदने, अशा सर्व गतीविधी तुम्ही दूर सारल्याच पाहिजेत, असा नियम असतो. इच्छावासना वाईट आहेत म्हणून तुम्ही त्या नाकारल्या पाहिजेत असे नव्हे, – कारण त्या इतरांसाठी वा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्याही ठरू शकतात, – पण वासना म्हणजे असे आवेग वा शक्ती असतात, ज्या प्रकाशहीन आणि अज्ञानी असल्याने, ‘दिव्यत्वा’कडे चालू असलेल्या तुमच्या वाटचालीमध्ये अडसर बनून उभ्या ठाकतात. सर्व प्रकारच्या इच्छावासना, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या याच वर्णनामध्ये बसतात कारण, वासना या मुळातच अप्रकाशमान अशा प्राणिक अस्तित्वाकडून आणि त्याच्या अज्ञानातून उदय पावतात.

दुसरी गोष्ट अशी की, ज्यांच्यामुळे तुम्ही ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये येऊ शकाल अशा सर्व गतीविधी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत. त्या चांगल्या आहेत म्हणून, तुम्ही त्या स्वीकाराव्यात असे नव्हे तर, त्या तुम्हाला ‘ईश्वरा’कडे घेऊन जातात म्हणून, तुम्ही त्या स्वीकारल्या पाहिजेत. जे काही तुम्हाला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाते त्याचा स्वीकार करा आणि जे त्यापासून तुम्हाला दूर नेते त्या सगळ्या गोष्टींना नकार द्या. पण अमुक अमुक या गोष्टी चांगल्या आहेत किंवा तमुक गोष्टी वाईट आहेत असे म्हणू नका आणि तुमचा दृष्टिकोन इतरांवर लादण्याचा प्रयत्नही करू नका. कारण ज्या गोष्टीला तुम्ही वाईट असे संबोधता, नेमकी तीच गोष्ट तुमच्या शेजाऱ्यासाठी, की जो ‘दिव्य जीवना’ची अनुभूती यावी म्हणून प्रयत्नशील नाही, त्याच्यासाठी चांगलीही असू शकेल.

– श्रीमाताजी [CWM 03 : 118-119]

आध्यात्मिकता १२

आध्यात्मिकता आणि नैतिकता यामध्ये खूप फरक आहे, पण लोक नेहमी त्या दोन्हीमध्ये गल्लत करत असतात. दिव्य चेतनेशी एकत्व पावण्याच्या दिशेने विकसित होत राहावे आणि परिणामतः आपल्यामध्ये जे काही आहे त्याचे शुद्धीकरण व्हावे, त्याची तीव्रता वाढीस लागावी, त्याचे उदात्तीकरण व्हावे आणि त्यामध्ये परिपूर्णता यावी यासाठी आध्यात्मिक जीवन, ‘योग’जीवन असते. आध्यात्मिक जीवन हे, ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्याची शक्ती आपल्याला प्रदान करते. आध्यात्मिक जीवनाद्वारे व्यक्तिमत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांचा परमोत्कर्ष साधला जातो आणि त्यातून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्तम अभिव्यक्ती घडून येते; कारण हा ‘ईश्वरी’ योजनेचा एक भाग असतो.

याउलट, नैतिकता ही मानसिक रचनेच्या आधारे प्रगत होते आणि काय चांगले आहे आणि काय चांगले नाही यासंबंधीच्या काही ठरावीक सिद्धांताद्वारे ती एक आदर्श साचा तयार करते आणि त्या आदर्श साच्यामध्ये बसण्यासाठी प्रत्येकाला ते भाग पाडते. हा नैतिक आदर्श त्याच्या विविध घटकांनुसार किंवा समग्रतया वेगवेगळा असू शकतो, तो स्थळकाळानुसार वेगवेगळा असू शकतो. आणि असे असूनसुद्धा आपण एकमेवाद्वितीय आहोत, आपण निरपवाद आहोत असा दावा तो आदर्श साचा करत असतो; बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला तो त्यामध्ये शिरकाव करू देत नाही, एवढेच काय पण आपल्या स्वतःमधील विभिन्नतासुद्धा तो मान्य करत नाही. सर्वांनी त्या एकमेवाद्वितीय आदर्श साच्यामध्येच बसणे आवश्यक असते, प्रत्येकजण हा असा एकसमान आणि निर्दोषरित्या सारखाच असला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असते. कारण नैतिकता ही अशा प्रकारे काटेकोर, कृत्रिम स्वरूपाची असते आणि ती तत्त्वतःसुद्धा आणि तिची कार्यप्रणालीसुद्धा आध्यात्मिक जीवनाच्या उलट असते.

आध्यात्मिक जीवन हे सर्वांमध्ये असलेले एकतत्त्व प्रकट करते आणि त्याचबरोबर ते अनंत विविधताही प्रकट करत असते; आध्यात्मिक जीवन एकत्वामधील विविधतेसाठी आणि त्या विविधतेतील पूर्णत्वासाठी कार्यरत असते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 117-118]

आध्यात्मिकता ११

मानसिक विचार, नैतिक प्रयास, उत्तम चारित्र्य, जनहित, आत्म-त्याग, आत्म-परित्याग, परोपकार, मानवाची किंवा मनुष्यमात्राची सेवा या गोष्टींना पाश्चात्य लोक आध्यात्मिक अभीप्सेचे किंवा आध्यात्मिक सिद्धीचे शिखर मानतात. यासंबंधी लिहून झाल्यावर श्रीअरविंद या पत्रामध्ये पुढे लिहितात…..

(वर उल्लेख केलेल्या गोष्टी) म्हणजे पृथ्वीवरील उपलब्धींचा जर अखेरचा शब्द असता, तर अन्य कोणत्या गोष्टींची आवश्यकताच भासली नसती. आत्म्याचा किंवा स्वतःचा अगदी जवळून आणि सुस्पष्टपणे घेतलेला शोध, प्राणाच्या पाठीमागे आणि मनाच्या वर असणाऱ्या गोष्टींसाठी झटून केलेले प्रयत्न, ‘चिरंतना’विषयी किंवा ‘अनंता’विषयी असलेली ओढ, बुद्धिच्या, चारित्र्याच्या आणि मानवतेच्या गतकालीन जीवनध्येयांच्या संकुचित साच्यांमुळे मर्यादित न झालेली, चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशालतेसाठी असलेली भूक, ‘ईश्वरा’च्या किंवा विशुद्ध आनंदाच्या ऐक्यासाठी असलेली तृष्णा, मानसिक व प्राणिक मूल्यांशी जखडल्या न गेलेल्या आध्यात्मिक अस्तित्वाचे सौंदर्य या साऱ्या गोष्टींना येथे स्थान नसल्यामुळे आणि त्यांची येथे आवश्यकतादेखील नसल्यामुळे, त्या अनावश्यक स्वप्न म्हणून बाद कराव्या लागल्या असत्या. परंतु असे असूनही, या गोष्टींची नुसती स्वप्नंच पाहिली गेली आहेत, अथवा नुसता त्यांचा ध्यासच घेतला गेला आहे असे नाही, तर मर्त्य, मानवी देहामध्ये जन्म घेतलेले जीव तेथवर जाऊन पोहोचले आहेत, त्या गोष्टींचा पडताळा त्यांनी घेतला आहे. तेथे ‘आध्यात्मिकता’ असते.

मानवी मानसिक, नैतिक, सौंदर्यात्मक, प्राणिक साच्यांच्या पलीकडे जाण्यासाठी, ते साचे मोडणे आणि (चिरंतनाविषयीची ओढ इ. गोष्टी, ज्यांचा वर उल्लेख झाला) त्या गोष्टी ज्या चेतनेचे मूलद्रव्य आहेत, हे अनुभव ज्या चेतनेच्या दृष्टीने अगदी सहज-स्वाभाविक आहेत अशा चेतनेमध्ये प्रवेश करणे हा ‘आध्यात्मिकते’चा गाभा आहे. त्यापेक्षा निम्नतर अशी कोणतीही गोष्ट, किंवा उपरोक्त गोष्टींपेक्षा निम्नतर अशा कोणत्याही गोष्टीचा ध्यास किंवा अगदीच काही नाही तरी, त्यांचा झालेला आंशिक साक्षात्कार या गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिकता’ नव्हे. यांपैकी कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार, त्याच्या अनेक पैलूंपैकी, किमान एका पैलूचा तरी अनुभव, ज्याला आला आहे तो मनुष्य ‘आध्यात्मिक’ असतो; या गोष्टींचा ध्यास घेऊन, त्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो ‘आध्यात्मिक साधक’ असतो.

अन्य गोष्टी बौद्धिक, नैतिक दृष्टीने कितीही उदात्त असल्या, सौंदर्यदृष्ट्या अतिशय सुंदर आणि सुसंवादी असल्या, प्राणिकदृष्ट्या वैभवसंपन्न, महान आणि शक्तिशाली असल्या किंवा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असल्या तरी या सर्व गोष्टी म्हणजे मार्गावरील एक मौलिक उपलब्धी आहे एवढेच म्हणता येईल, या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे, कारण येथे अजूनही व्यक्तीने मनाची ‘सीमारेषा’ ओलांडून एका नव्या साम्राज्यात प्रवेश केलेला नसतो. [‘आध्यात्मिकता’ मालिकेमधील ‘मानवी परिपूर्णत्व आणि आध्यात्मिकता’ हा भाग येथे संपला.]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 424-425]