आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८)

(१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या इच्छेनुसार तीन महिने आश्रमात राहण्याची परवानगी एका पत्राद्वारे कळवली. मात्र त्याच पत्रात त्यांनी त्याला त्याच्या वरील विचारातील फोलपण दाखवून दिले. बुद्धीच्या आधारे नव्हे, तर तिच्या अतीत होऊन, मनाच्या पूर्ण शांत, निर्विचार अवस्थेत उच्चतर चेतनेचे अवतरण झाले आणि माझे आध्यात्मिकीकरण झाले, असे त्यांनी त्याला लिहिले आहे. त्या साधकाच्या निमित्ताने, ‘पूर्णयोगा’ची साधना कोण करू शकतो यावर श्रीअरविंद यांनी प्रकाश टाकला आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)

….मानवी प्रकृती आज जशी आहे तशा त्या प्रकृतीचे पूर्णत्व हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व नाही, तर व्यक्तीच्या सर्व घटकांचे आंतरिक चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आणि नंतर त्या घटकांवर कार्य करणाऱ्या उच्चतर चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतरण (psychic and spiritual transformation) करणे, त्या घटकांच्या साऱ्या जुन्या गतिविधी टाकून देणे किंवा त्यांचे त्या उच्चतर चेतनेने जणू स्वतःचीच प्रतिमा असावी अशा पद्धतीने परिवर्तन घडविणे आणि अशा प्रकारे कनिष्ठ प्रकृतीचे उच्चतर प्रकृतीमध्ये रूपांतरण करणे, हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व आहे.

….ही सावकाश चालणारी आणि अवघड प्रक्रिया आहे; मार्ग लांबचा आहे आणि अगदी आवश्यक अशा पायाभूत गोष्टी सुस्थिर करणे हे सुद्धा खूप कठीण आहे. विद्यमान असलेली जुनी प्रकृती विरोध करत राहते आणि अडथळे निर्माण करत राहते आणि एका पाठोपाठ एक अडचणी येत राहतात आणि त्यांच्यावर मात केली जात नाही तोवर त्या पुन्हापुन्हा येत राहतात. आणि म्हणूनच, (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून वाटचाल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, व्यक्तीने खात्री करून घेतली पाहिजे की, आपल्याला ज्या मार्गाची हाक आली आहे तो मार्ग हाच आहे का?

– श्रीअरविंद (CWSA 35 : 585-586)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०७)

(काव्य, ग्रंथ-वाचन, सामाजिक संपर्क इत्यादी प्रत्येक गोष्टींचे निश्चितपणे काही महत्त्व असते पण साधकाचा मुख्य भर साधनेवर असला पाहिजे आणि त्याला पूरक ठरतील अशा इतर सर्व गोष्टी असल्या पाहिजेत… हे श्रीअरविंद एका साधकाला सांगत आहेत. ते सांगत असताना ‘साधना म्हणजे काय’ हे त्यांनी स्पष्ट केले आहे.)

साधना हीच मुख्य गोष्ट असली पाहिजे आणि साधना म्हणजे प्रकृतीचे शुद्धीकरण, आत्म-निवेदन (Consecration), चैत्य पुरुष, अंतर्मन, प्राण यांचे खुले होणे (Opening), आणि ‘ईश्वरा’शी संपर्क आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव, सर्व गोष्टींमध्ये ‘ईश्वरा’ची प्रचिती; साधना म्हणजे समर्पण, भक्ती, चेतनेचे विश्वचेतनेमध्ये विस्तृतीकरण, सर्वांभूती एकाच ‘आत्म्या’च्या अस्तित्वाचा अनुभव, प्रकृतीचे आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतर.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 78)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०६)

 

(मनुष्याने) मानवजातीला उपयुक्त ठरावे ही पाश्चात्त्यांकडून उसनी घेतलेली संकल्पना आहे आणि त्यामुळे झालेला हा जुनाच गोंधळ आहे. हे स्पष्टच आहे की, मानवजातीला ‘उपयुक्त’ ठरण्यासाठी ‘योगा’ची आवश्यकता नाही. जो कोणी मानवी जीवन जगत असतो तो या ना त्या प्रकारे मानवजातीला उपयुक्तच ठरत असतो.

 

‘योग’ हा ईश्वराभिमुख असतो, मनुष्याभिमुख नाही. ‘दिव्य अतिमानसिक चेतना’ आणि ‘शक्ती’ जर खाली या जडभौतिक जगात आणता आली आणि प्रस्थापित करता आली तर साहजिकच त्याचा अर्थ असा होईल की, त्यामुळे मानवजात आणि तिच्या जीवनासहित, पृथ्वीकरता मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून येईल मात्र मानवजातीवरील हा प्रभाव म्हणजे त्या परिवर्तनाचा केवळ एक परिणाम असेल; ते साधनेचे उद्दिष्ट असू शकणार नाही. ‘दिव्य चेतने’मध्ये निवास करणे आणि त्या चेतनेचे जीवनात आविष्करण करणे हेच साधनेचे उद्दिष्ट असले पाहिजे.

 

– श्रीअरविंद (CWSA 28 : 441-442)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०४)

उत्तरार्ध

आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ‘ईश्वरी शक्ती’ आणि ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच आपल्या चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी ‘आत्म’रूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा उपयोग केला जात आहे – हे आपल्याला जाणवेल. आपल्यामध्ये जेव्हा ‘ईश्वरी उपस्थिती’ सातत्याने असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो.

एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक अनुभूतीमध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो; किंवा ‘ईश्वरा’शी सायुज्य व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी, तसेच ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात जीवलग व मुक्त बहर येण्याऐवजी, अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. मनाला लागलेल्या वळणाची ही चूक आहे आणि त्या बाजूलाच आजच्या मनाचा विशेष कल आहे. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून (म्हणजे ‘ईश्वराचा शोध’ घेणे या गोष्टीवरून) आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा किरकोळ गोष्टी जवळ करण्यापेक्षा, ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारामधून प्राप्त होऊ शकतात अशा ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ या गोष्टी मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक बरे!

आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचेदेखील दिव्यत्वात रूपांतर (divinisation) करणे हा, आम्ही जी ‘दिव्य योजना’ पाहत आहोत तिचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वास जाऊ शकतो; (भौतिक जीवनाचे दिव्यत्वात रूपांतर) ही अशी एक गोष्ट आहे की जी मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर ती अंतरंगातून बाह्य दिशेने विकसित होत जाते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 05-06)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०३)

पूर्वार्ध

वास्तविक, आध्यात्मिक ‘सत्या’साठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीचे, उपासनेचे आद्य कारण ‘ईश्वरा’चा शोध हेच आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे.

आणि एकदा का ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग ‘त्या’चे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर ‘दिव्य चेतने’मध्ये करणे; अनंत ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘प्रेम’, ‘सामर्थ्य’, ‘परमानंद’ यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ‘ईश्वर’च होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे होय. (हे उद्दिष्ट असू शकते.) पण, ‘मानवतेसाठी कार्य’ करणे किंवा भौतिक स्तरावर ‘एकतेचे तत्त्व’ प्रत्यक्ष कृतीत आणणे या गोष्टी म्हणजे ‘दिव्य सत्या’चा मनाने चुकीच्या पद्धतीने केलेला अनुवाद आहे – या गोष्टी आध्यात्मिक उपासनेचे पहिले खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत.

आधी आपण आपला ‘आत्मा’ शोधला पाहिजे, ‘ईश्वर’ शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला ‘आत्मा’ किंवा ‘ईश्वर’ आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय आहे ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपल्या कृती या, ‘ईश्वरा’चा शोध घेण्याची साधने ठरू शकतात किंवा त्या शोधासाठी साहाय्यक ठरू शकतात पण त्यांचे अन्य कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये.

जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो, किंवा आपल्यामध्ये ‘ईश्वरा’चे आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपल्या कृती, आपली कर्मं ही खरेतर, त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच समरस झालेली असली पाहिजेत. पण त्याआधीच (आत्म्याचा किंवा ईश्वराचा शोध लागण्यापूर्वीच), आपले जीवन कसे असले पाहिजे, आपले कार्य काय असले पाहिजे हे आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे ठरविणे म्हणजे आपल्या आंतरिक आध्यात्मिक ‘सत्या’च्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 05)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०२)

जगातील प्रत्येक गोष्टीकडून माणसाचा नेहमीच अपेक्षाभंग होतो, हा जीवनाकडून मिळणारा धडा आहे – पण मनुष्य जर पूर्णतया ‘ईश्वरा’कडे वळला तर ‘ईश्वर’च एक असा आहे की, ज्याच्याकडून त्याचा कधीच अपेक्षाभंग होत नाही. तुमच्यामध्ये काहीतरी वाईट आहे म्हणून तुमच्यावर संकटे येऊन कोसळतात असे नाही तर, सगळ्याच माणसांना अपेक्षाभंगाचा धक्का बसत असतो कारण ज्या गोष्टी चिरस्थायी नसतात (अशाश्वत असतात) त्यांच्याविषयीच्या कामना (desires) ते बाळगून असतात. आणि मग ते त्या गोष्टी गमावून तरी बसतात किंवा अगदी जरी त्या गोष्टी त्यांना मिळाल्या तरी त्या गोष्टींपासून त्यांच्या पदरी निराशाच पडते, त्या गोष्टी त्यांचे समाधान करू शकत नाहीत.

‘ईश्वराभिमुख होणे’ हेच जीवनातील एकमेव सत्य आहे.

श्रीअरविंद (CWSA 31 : 625)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०१)

सामान्य माणसाचे बहुतांशी जीवन हे बाह्यवर्ती जाणिवेमध्येच व्यतीत होत असते. पण कधीतरी जीवनात असेही क्षण येतात की जेव्हा तो अंतर्मुख होतो. तो ज्याला देव, ईश्वर, परमेश्वर इत्यादी नावांनी संबोधतो त्याचा अतीव उत्कटतेने, तळमळीने, आर्ततेने धावा करतो. ज्या प्रसंगाच्या कात्रीत सापडल्यामुळे त्याने त्याचा धावा केलेला असतो, ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो प्रसंग पार पडतो आणि तो माणूस पुन्हा पहिल्याप्रमाणेच संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये गरागरा फिरत राहतो. त्याच्या जीवनातून ईश्वर पुन्हा दूरस्थ होतो.

असेच वारंवार, कदाचित जन्मानुजन्मे होत राहते. आणि या संसारी जीवनाचा, आजूबाजूच्या मंडळींचा, जीवनव्यवहाराचा अनुभव घेऊन पूर्ण होताहोताच त्याला या जीवनाचे अधिक काही महान, अधिक काही गहन प्रयोजन असले पाहिजे, असे आतून जाणवू लागते. त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्याला वाटू लागते. माणूस म्हणून जन्माला आलेलो आपण, आपणही किड्यामुंगीसारखे जीवन जगून एक दिवस निघून जायचे का? आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपले काही कर्तव्य आहे का ? लाभलेल्या जीवनाचा आपण कशा प्रकारे विनियोग करायचा आहे, आपल्याकडून माणूस म्हणून नेमके काय अपेक्षित आहे? हे व यासारखे प्रश्न मनात डोकावू लागतात.

आणि मग कधीतरी ‘ईश्वरीकृपे’ने त्या जिवाची ‘आत्मशोधा’ला सुरुवात होते. त्या शोध – प्रवासामध्ये विविध तीर्थस्थाने, मठ, मंदिर, आश्रम इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या जातात. संत-सत्पुरुष, बुवा, बाबा, महाराज म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळालेली असते, त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याशी चर्चा करून, आपले प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या आत्मशोधाची तहान कशानेच भागत नाही.

आणि मग त्या वाटचालीने श्रांतक्लांत झालेला तो जीव थकूनभागून एका झाडाखाली विसाव्याला बसावा आणि जवळून झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा नाद त्याच्या कानी पडावा तसे काहीसे होते. जवळच असलेल्या पाण्याच्या नादाच्या दिशेने तो जातो, त्या प्रवाहामधून ओंजळभर पाणी घेतो आणि त्या शीतल पाण्याने त्याची तहान भागते. तसेच काहीसे आत्मशोधाच्या या प्रवासात होत असावे.

श्रीअरविंदरूपी महासागर त्या शीतल पाण्याच्या प्रवाहासारखाच पत्ररूपाने अखंडपणे प्रवाहित होत राहिला होता. प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची मानसिक ठेवण वेगळी, प्रत्येकाच्या जीवनाची धाटणी वेगळी. पण येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाची तहान शमविण्याचे सामर्थ्य श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. त्यातील काही निवडक पत्रे उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर…’ या मालिकेमध्ये आपण विचारात घेणार आहोत.

संपादक,
अभीप्सा मराठी मासिक