ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, “वेळ आली आहे.” माझ्या दोन्ही हातांनी मी एक भला मोठा सुवर्ण हातोडा उचलला आणि जोरात त्या दरवाजावर मारला आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”

ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात, “या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”

…यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला :

“हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला.
ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे;
एक नूतन विश्व जन्माला आले आहे.
ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”

– आधार : (Beyond Man by Georges Van Vrekhem : 317-318)

पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये श्रीमाताजी पाँँडिचेरी येथे राहात होत्या, तेव्हाची गोष्ट त्या कथन करत आहेत.. “मी तेव्हा ड्युप्लेक्स स्ट्रीटवर राहत असे आणि समोरच्या बाजूला गेस्ट हाऊसमध्ये श्रीअरविंदांची खोली होती. श्रीअरविंदांच्या खोलीकडे तोंड करून, सकाळच्या वेळी, मी ध्यानाला बसत असे. अशीच एकदा मी माझ्या खोलीत बसून ध्यान करत होते, पण माझे डोळे मिटलेले नव्हते.

माझ्या खोलीत काली प्रवेश करत असलेली मला दिसली, तेव्हा मी तिला विचारले, “तुला काय हवे आहे?”

ती अगदी रौद्ररूपात नृत्य करत होती. ती मला म्हणाली, “मी पॅरिस घेतले आहे; आणि आता लवकरच पॅरिसचा विनाश होईल.”

तेव्हा आमच्यापर्यंत युद्धाच्या बातम्या पोहोचत नसत. मी तेव्हा ध्यानातच, अगदी शांतपणे, पण खंबीरपणे तिला म्हटले, ”नाही, पॅरिस घेता येणार नाही, पॅरिस वाचेल.” तेव्हा तिने वेडीवाकडी तोंडं केली पण ती निघून गेली.

आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तार मिळाली; त्यात लिहिले होते, जर्मन सैन्य पॅरिसच्या दिशेने कूच करत होते, पण पॅरिसचे रक्षण करण्यास तेथे कोणीच नव्हते, काही किलोमीटर ते पुढे गेले असते तर, आख्खे पॅरिस त्यांना हस्तगत करता आले असते. परंतु रस्ते मोकळे आहेत हे पाहिल्यावर तसेच, सैन्याला विरोध करण्यासाठी कोणीच नाही हे लक्षात आल्यावर, त्यांची अशी खात्रीच पटली की, काहीतरी घातपात दिसतो आहे, काहीतरी व्यूहरचनेचा हा भाग दिसतोय…असे वाटून त्यांनी पाठ फिरवली आणि आल्या पावली जर्मन सैन्य चालू पडले. आणि जेव्हा फ्रेंच सैन्याच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्या सैन्याचा पाठलाग केला आणि मग निर्णायक लढाई झाली. त्यांना रोखण्यात आले होते.

हो, निश्चितच, हा त्याचाच परिणाम होता….कारण, जर त्यांना ह्याप्रकारे रोखले गेले नसते तर, भलतेच काहीतरी विपरित घडले असते..”

– श्रीमाताजी

(CWM 06 : 68-69)

श्रीमाताजी : मी जेव्हा जपानहून परत येत होते तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.

पाँडिचेरीमध्ये मला ह्याच्या अगदी बरोबर उलट अनुभवसुद्धा आलेला आहे. अनेक वर्षांनंतर मी जेव्हा प्रथमच मोटरकारने बाहेर पडले होते, तेव्हाचा हा अनुभव आहे. मी त्या तलावाच्या पलीकडे थोडीशीच गेले असेन, अचानक मला वातावरणातील बदल जाणवला. इथे जी समृद्धी, ऊर्जा, प्रकाश, शक्ती होती ती अचानक सर्वच्या सर्व कमी कमी होत गेली आणि नंतर तर ती नाहीशीच झाली होती. मी तेव्हा मानसिक किंवा प्राणिक चेतनेमध्ये नव्हते तर, मी तेव्हा पूर्णपणे भौतिक चेतनेमध्ये होते. जे कोणी शारीरिक चेतनेबाबत संवेदनशील असतात त्यांना हा फरक खूप स्पष्टपणे जाणवतो. आणि मी तुम्हाला खात्री देते की, ज्याला आपण आश्रम असे म्हणतो तेथे शक्तीचे जे संघनीकरण झालेले आहे, तसे संघनीकरण शहरात किंवा परिघवर्ती गावांमध्येसुद्धा कोठेही नाहीये.

– श्रीमाताजी

तुम्हाला आठवते का, ती प्रचंड वादळाची रात्र ? विजांचा, ढगांचा मोठाच गडगडाट चालू होता, पावसाच्या माऱ्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. मला वाटले की, श्रीअरविंदांच्या खोलीत जावे आणि खिडक्या बंद करण्यास त्यांना मदत करावी. मी दार उघडून आत गेले तेव्हा पाहते तो काय? श्रीअरविंद अगदी शांतपणे त्यांच्या टेबलावर काहीतरी लिहीत बसले होते. तिथे त्या खोलीमध्ये एवढी सघन शांती होती की, बाहेर एवढे वादळ घोंघावत आहे याची कोणी कल्पनाही करू शकले नसते.

– श्रीमाताजी

मांजरीचे एक छोटेसे पिल्लू होते. मांजरीने त्याला तोंडात धरलेले होते. पण अचानक त्या पिल्लाने तिच्या तोंडातून बाहेर उडी मारली आणि ते पिल्लू विंचवाबरोबर खेळू लागले. पिल्लाने त्या प्राण्यासोबत खेळण्याला तिचा विरोध होता; पण त्याने तिचे काही ऐकले नाही. आणि मग विंचवाने त्याच्या स्वभावाप्रमाणे मांजरीच्या त्या पिल्लाला दंश केला. ते किंचाळले, ओरडू लागले.

ते धावतपळत आईकडे आले आणि त्याने तिला त्या विंचवाविषयी सर्वकाही सांगितले. तेव्हा मांजरीने विचारले, ”मग तू मला सोडून का पळालास?”

विरोधी शक्ती ह्या विंचवाप्रमाणे असतात. त्या खरोखरच अनिष्ट असतात. जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीत किंवा त्यांचे ऐकले नाहीत तर, त्या विरोधी शक्तींचा नाश करता येणे शक्य असते. जेव्हा विरोधी शक्ती चुकीच्या सूचना मांडत असतात तेव्हा माणसांनी सातत्याने त्यांना नकार द्यावयास हवा. नाहीतर मग या विरोधी शक्ती सर्वाचाच विनाश घडवून आणतील…

ह्या विरोधी शक्ती राग, नावड, असंख्य इच्छावासना आणि त्यासारख्या अनेक वायफळ गोष्टींच्या माध्यमातून, माणसांच्या मेंदूपर्यंत कशा जाऊन पोहोचतात ते मला माहीत आहे. सर्वप्रथम, राग पायांना पकडतो, मग हळूहळू तो वर नाभीपर्यंत जाऊन पोहोचतो, तेथून हृदयापर्यंत आणि सरतेशेवटी मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यातून माणसांचे अतोनात नुकसान होते. एकदा का राग मेंदूपर्यंत गेला की मग, माणसाला स्वत:वर ताबा ठेवणे कठीण होऊन बसते. म्हणून तो आत येण्यापासूनच त्याला रोखले पाहिजे. म्हणजे मग सोपे होते आणि त्यावर मातही करता येते.

– श्रीमाताजी
(Mother you said so : 11.01.63)

एखादी चूक घडली आणि त्याची प्रांजळ कबुली गुरुपाशी दिली तर, ती चूक पुन्हा न करण्याचा तुमचा निर्धार हा फक्त तुमचाच राहात नाही कारण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, ईश्वरी व्यवस्थाच तुम्हास अनुकूल अशा पद्धतीने कार्यकारी होते.

मी प्रथम पाँडिचेरी येथे श्रीअरविंदांना भेटले तेव्हाचा हा प्रसंग आहे. मी गाढ ध्यानावस्थेत होते, अतिमानसातील गोष्टी मी पाहात होते. त्या गोष्टी जशा असावयास हव्यात तशाच होत्या, पण काही कारणाने त्या आविष्कृत होत नव्हत्या. जे काही मी पाहिले, ते मी श्रीअरविंदांना सांगितले आणि विचारले त्या गोष्टी आविष्कृत होतील का? ते फक्त एवढेच म्हणाले, ‘हो.” आणि त्याक्षणी मला असे दिसले की, अतिमानसाने या पृथ्वीला स्पर्श केला आहे आणि ते प्रत्यक्षीभूत होण्यास प्रारंभ झाला आहे. जे सत्य आहे ते वास्तवात उतरविण्याची ताकद काय असते, ह्याचा पहिला अनुभव मला येथे पाहावयास मिळाला.

तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे येऊन असे म्हणाल की, “मला या मिथ्यत्वापासून सुटका करून घ्यावयाची आहे” आणि जर तुम्हाला ‘हो’ असे उत्तर मिळाले तर, तुमच्यामध्येही ते सत्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तीच शक्ती कार्यकारी होईल.

– श्रीमाताजी

श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, ”माताजी, तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन तुमचा चैत्य पुरुष करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?”

श्रीमाताजी म्हणाल्या, ”ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मिस्टर मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. मी जरी थिऑन ह्यांना ओळखत नव्हते तरीही, ते मात्र मला ओळखत होते, ह्याचे मला आश्चर्य वाटले. थिऑन हे गूढवादाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी मला त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले.

पुढे मग मी गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या गावी अल्जेरियामध्ये थ्लेमसेन येथे गेले. तेव्हा मी २७-२८ वर्षांची होते आणि आयुष्यात प्रथमच एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करत होते.

मी तेथे पोहोचले तेव्हा, मार्क थिऑन मला न्यायला आले होते. अॅटलास पर्वतराजींच्या उतरंडीवर त्यांचे घर होते. त्यांची मोठी इस्टेट होती. त्यामध्ये शेकडो वर्षांपूर्वीची ऑलिव्हची, अंजीरांची झाडे होती. त्या सगळ्या वृक्षराजींमधून आम्ही वर वर चाललो होतो. त्यांचे घर खूप दूरवर, उंचावर होते. एका टप्प्यावर आल्यावर दूरवर निर्देश करत त्यांनी मला लाल रंगाचे एक घर दाखविले आणि म्हणाले ते माझे घर ! त्या घराच्या लाल रंगावरून काही गमतीदार किस्सा पण त्यांनी मला ऐकविला.

मी शांतपणेच चालत होते. आणि मध्येच ते एकदम थांबले आणि माझ्याकडे गर्रकन वळून म्हणाले, “आता तू माझ्या ताब्यात आहेस, तुला माझी भीती नाही वाटत?” मी ताबडतोब त्यांना उत्तर दिले की, ”माझा चैत्य पुरुष माझ्या जीवनाचे नियमन करतो, मी कोणालाच घाबरत नाही.” श्रीमाताजी पुढे सांगू लागल्या, ”हे उत्तर ऐकल्यावर, ते थक्कच झाले. खरोखर, थ्लेमसेनला जाण्यापूर्वी मला चैत्य जाणिवेची (Psychic Consciousness) प्राप्ती झालेली होती.” त्यामधूनच ती निर्भयता आलेली होती.

आधारित : Conversation with a Disciple Vol 13 : April 15, 1972
& Mother or The Divine Materialism : Pg 159-160

*

 

अतिमानस चेतनेचे आविष्करण घडवून आणण्याची प्रक्रिया अधिक त्वरेने व्हावे ह्यासाठी श्रीमाताजींवर आश्रमाचा सर्व कार्यभार सोपवून श्रीअरविंद एकांतवासामध्ये निघून गेले. श्रीअरविंदांनी काही मोजक्या लोकांना बोलावून सांगितले की, आता येथून पुढे लोकांना मार्गदर्शन करणे, मदत करणे हे सगळे काम श्रीमाताजी बघतील आणि त्यांच्या माध्यमातूनच लोक श्रीअरविंदांशी संपर्क ठेवू शकतील. त्यानंतर लगेचच, अचानकपणे गोष्टींना वैशिष्ट्यूपर्ण आकार प्राप्त झाला : एक अतिशय प्रकाशमय निर्मिती, तिच्या अगदी बारीकसारीक तपशीलानिशी तयार झाली; तेव्हा ईश्वरीय अस्तित्वांशी संपर्क प्रस्थापित होऊ लागले, अनेक अदभुत अनुभव आले; अतिशय विलक्षण असा अनुभव होता तो. त्या सुमारास घडलेल्या एका घटनेविषयी श्रीमाताजी सांगत आहेत. एके दिवशी मी नेहमीप्रमाणेच, काय घडत आहे ते सांगण्यासाठी श्रीअरविंदांकडे गेले. आणि कदाचित जे घडले होते त्याविषयी मी जरा जास्तच उत्साहाने सांगू लागले.

तेव्हा श्री अरविंदांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, “हो. ही अधिमानस निर्मिती आहे. खूप चांगल्या रीतीने तुम्ही कार्य केले आहे. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध होऊ शकाल: असे अनेक चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल; तुम्ही या पृथ्वीवरील सर्व घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…. पुढे ते हसतच म्हणाले, “ते एक फार मोठे यश असेल. पण ही ‘अधिमानसिक’ निर्मिती आहे. आणि आपल्याला पाहिजे असलेले यश ते हे नव्हे; आपल्याला ह्या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची प्रस्थापना करावयाची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी आत्ताचे मिळालेले हे यश कसे त्यागावयाचे हे समजायला हवे.”

त्यांनी असे सांगितल्यावर, माझ्या आंतरिक जाणिवेमुळे मला ते लगेच समजले. आणि अवघ्या काही तासांतच ती अधिमानसिक निर्मिती निघून गेली. आणि त्या क्षणानंतर आम्ही पुन्हा एका नव्या पायावर निर्मिती करण्यासाठी कंबर कसली.

– आधार : (Stories told by the Mother ll : 119-120) *

१९१६ ते १९१९ या काळात मीरा अल्फांसा (श्रीमाताजी) जपानमध्ये वास्तव्यास होत्या. त्या काळातील त्यांची जिवश्चकंठश्च मैत्रीण कोबायाशी यांनी श्रीमाताजींविषयी सांगितलेल्या आठवणी.

जपानी भाषा शिकण्यासाठी आणि आमच्यातील एक होऊन जाण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या; पण त्यांच्या मोहक आणि नावीन्यपूर्ण वागणुकीतून आम्हालाच कितीतरी शिकायला मिळाले. मोठी गोड मैत्रीण होती ती. फार हुशार, अत्यंत तल्लख, उत्तम कलावंत, तिच्या बोटांवर कला नाचत होती. माझे रंगीत चित्र तिने काढले होते; अजूनही ते मी माझ्याजवळ जपून ठेवले आहे. आम्ही दोघी मनोहर निसर्गदृश्य टिपण्यासाठी आणि अधिक नीलिम आकाश न्याहाळण्यासाठी उत्सुक असायचो. बुद्धाची जन्मभूमी असलेल्या प्राचीन देशातील एका गुरूंना (श्रीअरविंद) ती पूजनीय मानत होती. तिचा दृढ विश्वास होता की, उद्याच्या जगाला तेच सत्यमंत्र देणार आहेत. त्यांच्याबद्दल जेव्हा ती माझ्याशी बोलत असे तेव्हा तिच्या डोळ्यांत नवीन आनंद आणि आश्चर्य तरळत असलेले मला दिसे…

नारा येथील मंदिराच्या छपरावरून खाली लोंबत असलेली व्हिस्टेरिया वेलीची सुंदर फुले तिला फार आवडत असत. आम्ही त्या फुलांना ‘हुजी’ म्हणतो. ती त्या फुलांशी एकरूप होई. तिने स्वत:साठी एक जपानी नाव निवडले होते – हुजीको. आणि माझे नाव न्योबूको कोबायाशी.

(The Mother’s Light : 82)

(०१ जानेवारी १९६९ रोजी अतिमानस चेतनेचे पृथ्वीवर आविष्करण झाले; त्याचा प्रारंभच एक प्रकारे १९५६ साली घडलेल्या खालील प्रसंगामध्ये झाला होता. त्या दिवशी अतिमानस चेतनेने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.)

ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ मधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, ‘वेळ आली आहे’.माझ्या दोन्ही हातांनी मी एक भली मोठी सुवर्ण हातोडी उचलली आणि जोरात त्या दरवाजावर मारली आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”

ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात.”या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”

यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला : “हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला. ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे; एक नूतन विश्व जन्माला आले आहे. ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”

– आधार :

(Beyond Man by Georges Van Vrekhem:317-318)

*