पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग-चेतनेमध्ये भलेही तुमचा नुकताच प्रवेश झालेला असला तरी पण, एकदा का तो प्रवेश झाला की, सर्व काही करता येणे शक्य आहे, हे तुमच्या लक्षात येते. सुरुवात करणेच महत्त्वाचे असते. दिव्य शक्ती आणि दिव्य ऊर्जा तेथे असल्या की, अगदी प्रारंभसुद्धा पुरेसा असतो.

वास्तविक, यश हे बाह्य प्रकृतीच्या क्षमतेवर अवलंबून नसते तर, ते आंतरिक पुरुषावर (inner being) अवलंबून असते आणि आंतरिक पुरुषाला सर्व काही शक्य असते. मात्र व्यक्तीला आंतरिक पुरुषाशी संपर्क साधला आला पाहिजे आणि तिने बाह्य दृष्टिकोन व चेतना ही अंतरंगातून बदलली पाहिजे; हेच साधनेचे कार्य असते. प्रामाणिकपणा, अभीप्सा आणि सहनशीलता यामधून ते निश्चितपणे साधते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 31-32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०४

पूर्णयोगाची साधना करण्याची कोणाचीच योग्यता नसते, (असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा) त्याचा अर्थ असा आहे की, कोणीही फक्त स्वत:च्या एकट्याच्या क्षमतेवर ही साधना करू शकत नाही. प्रश्न आहे तो, ती दिव्यशक्ती पूर्णत: प्राप्त करून घेण्यासाठी स्वत:ला घडविण्याचा!

ही साधना व्यक्ती केवळ स्वबळावर करू शकत नाही. जर व्यक्तीची सहमती व अभीप्सा असेल तर ती दिव्य शक्तीच ही साधना करून घेऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०२

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक दुस्तर आहे. आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची क्षमता, इच्छाशक्ती आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीदेखील ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे निःस्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे अशा व्यक्तींसाठीच पूर्णयोग आहे.

*

(योगमार्गासाठी एखाद्या व्यक्तीची) तयारी असणे, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल, तर या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०१

प्रास्ताविक

“जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्तीवरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता येणे हा पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला धडा आहे,” हा विचार आपण काल जाणून घेतला. पूर्णयोगाची साधना करायची असेल तर, राग, लोभादी विकारांपासून, तसेच निराशा, मिथ्यत्व इत्यादी गोष्टींपासून साधकाने स्वतःची सुटका करून घेणे अपेक्षित असते.

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये एका बाजूने उपरोक्त गोष्टींना नकार देणे अपेक्षित असते, तर दुसऱ्या बाजूने काही गुणांचा अंगीकार करणे तितकेच आवश्यक असते. अभीप्सा, श्रद्धा, सहनशीलता, प्रयत्नसातत्य किंवा चिकाटी, प्रामाणिकपणा, व्यापकता, समत्व, खुलेपणा, समर्पण यांसारख्या गोष्टी म्हणजे पूर्णयोगातील परवलीचे शब्द आहेत. आपल्याला हे सर्वच शब्द ऐकून, वाचून माहीत असतात खरे; पण त्या शब्दांचा आवाका किती मोठा आहे, त्या एकेका शब्दामध्ये केवढा गहन अर्थ सामावलेला आहे, याची आपल्याला क्वचितच जाण असते.

श्रीअरविंदांनी साधकांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रोत्तरांच्या माध्यमातून त्या शब्दांचा, किंबहुना पूर्णयोगातील या संज्ञांचा गर्भितार्थ अलगदपणे आपल्या हाती येतो. तो अर्थ आपल्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यासाठी ‘अभीप्सा मासिका‌’तर्फे उद्यापासून एक नवीन मालिका सुरू करत आहोत. ‘पूर्णयोगाचे अधिष्ठान‌’ असणारे हे सारे गुण कमीअधिक प्रमाणात अंगीकारण्याचा प्रयत्न एक साधक म्हणून आपण करू शकलो तर त्या आधारावर पूर्णयोगाची भलीमोठी इमारत उभारता येणे शक्य होईल.

वाचक नेहमीप्रमाणेच ‘पूर्णयोगाचे अधिष्ठान‌’ या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

धन्यवाद!

संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधनेची मुळाक्षरे – ३४

प्रश्न : पूर्णयोग म्हणजे काय?

श्रीअरविंद : संपूर्ण ‘ईश्वरी’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’-साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा हा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे तर, येथील जीवनाचे संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे, आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तीच परिपूर्णता आहे, कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याखेरीज उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाचे, प्रकृतीचे तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित आत्मदान, उन्मुखता असणे, आणि त्या ईश्वराकडे पूर्णत्वाने वळणे अंतर्भूत आहे. आपले मन, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि अंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन आणि अवचेतन घटकदेखील अशा प्रकारे देऊ केले पाहिजेत; हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्ये सहभागी झालेच पाहिजे. हे ‘पूर्णयोगा’चे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 358)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३५

…या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) कोणताही मंत्र दिला जात नाही. अंतरंगातून श्रीमाताजींप्रत चेतना खुली होणे ही खरी दीक्षा होय आणि मन व प्राण यांच्यातील अस्वस्थता घालवून दिल्याने आणि केवळ अभीप्सेद्वारे ही दीक्षा प्राप्त होऊ शकते.

*

पूर्णयोगाच्या या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर श्रीमाताजींचे नाम किंवा श्रीअरविंदांचे व श्रीमाताजींचे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता ह्या दोन्ही पद्धती यामध्ये चालू शकतात; त्यांचे प्रत्येकाचे स्वत:चे असे परिणाम असतात. हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (Psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयामध्ये त्यांची उपस्थिती आणि प्रकृतीमध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडवून आणतो. मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या अतीत असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326)

*

श्रीअरविंद : श्रीमाताजींकडे जो जो कोणी वळला आहे तो माझा योग आचरत आहे. व्यक्ती पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे. विशेषतः स्वतःच्या प्रयत्नांनिशी व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते असे समजणे ही चूक आहे. कोणताच मनुष्य तसे करू शकत नाही. व्यक्तीने काय करायला हवे, तर स्वतःला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यायला हवे आणि सेवेद्वारे, भक्तिद्वारे, अभीप्सेद्वारे स्वतःला त्यांच्याप्रत खुले केले पाहिजे; तेव्हा मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तिद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील म्हणजे मग साधना घडेल. महान पूर्णयोगी बनण्याची आकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाप्रत मी कोठवर आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. श्रीमाताजींना समर्पित होणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी या श्रीमाताजीच निश्चित करतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणतात.

(Champaklal Speaks : 334-335)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३४

(पूर्णयोगामध्ये कोणतीही एकच एक पद्धत अवलंबण्यात येत नाही. प्रत्येकाची त्याच्या त्याच्या प्रकृतीशी मिळतीजुळती अशी स्वतंत्र पद्धत असते, हे या योगाचे एक प्रकारे वेगळेपण आहे. पूर्णयोगाचे हे वैशिष्ट्य श्रीअरविंद यांच्या खालील पत्रांमधून अधोरेखित होते.)

योगाचे किंबहुना विश्व-बदलविणाऱ्या आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणाऱ्या योगाचे परिपूर्ण तंत्र कोणते? एखादा हुक किंवा गळ टाकून माणसाला पकडले आणि एखाद्या पुलीद्वारे निर्वाणामध्ये किंवा स्वर्गामध्ये वर ओढून घेतले अशा प्रकारचे काही हे तंत्र नाही. विश्व-परिवर्तन करणाऱ्या योगाचे तंत्र हे, विश्वाप्रमाणेच विविधरूपी, वळणावळणाचे, सहनशील, सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. जर त्या तंत्राला सर्व अडीअडचणी किंवा शक्यता हाताळता आल्या नाहीत किंवा त्या तंत्राला, प्रत्येक आवश्यक घटकाला काळजीपूर्वकपणे हाताळता आले नाही तर, त्याला यश मिळण्याची शक्यता असेल का? आणि प्रत्येकालाच समजू शकेल अशा प्रकारचे एखादे परिपूर्ण तंत्र असे करू शकेल काय? (काव्यशास्त्रामधील) एखाद्या ठरावीक वृत्तामध्ये, थोडेफार फेरफार करून, एखादी छोटीशी कविता लिहिण्यासारखे हे नाही. तुम्ही जर ही कवितेची उपमा तशीच पुढे चालवली तर, विश्व-परिवर्तनाचे तंत्र म्हणजे महाभारताचेच महाभारत लिहिण्यासारखे आहे.

*

या योगामध्ये आत्म-निवेदनाचे आणि आत्म-दानाचे सार्वत्रिक तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्मनिवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष’ चा मार्ग हा ‘क्ष’ साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे एक कठोर मानसिक यंत्रसामग्रीच ठरला असता, तो एक जिवंत शक्ती बनला नसता.

*

योगमार्ग ही एक जिवंत गोष्ट असली पाहिजे, तो एखादा मानसिक सिद्धान्त नाही किंवा आवश्यक सर्व विभिन्नतांच्या विरोधात जिला चिकटून राहावी अशी, योग म्हणजे कोणतीही एकच एक अशी पद्धती नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 294), (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)