‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १४

योगमार्ग अनेक आहेत, आध्यात्मिक साधना अनेक आहेत, मुक्ती आणि पूर्णत्वाप्रत घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे ईश्वराभिमुख असणारे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र ध्येय आहे, त्या ‘एकमेवाद्वितीय सत्या’बाबतचे प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन आहेत, प्रत्येकाच्या स्वतंत्र पद्धती आहेत, प्रत्येकास साहाय्यभूत असे त्यांचे तत्त्वज्ञान आणि साधनापद्धती आहे. पूर्णयोग (Integral Yoga) या साऱ्या पद्धतींचे सारग्रहण करतो आणि त्यांच्या ध्येयांच्या, पद्धतींच्या, दृष्टिकोनांच्या एकीकरणाप्रत (तपशीलांच्या नव्हे, तर साराच्या एकीकरणाप्रत) पोहोचण्याचा प्रयत्न करतो; ‘सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि साधना’ म्हणजे पूर्णयोग.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 356)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १३

मानवाने आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती दिली तरी हे अवघे विश्व बदलून जाईल परंतु मानवाची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही या उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मानवाला स्वत:च्या अपूर्णतेविषयीच प्रेम असते.

आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण तेच त्यांच्या पूर्ण दशेमध्ये त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत. केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामधून स्वर्ग-गमनासाठी कित्येक आत्मे तयार होतात पण ही पृथ्वी मात्र जशी आहे तिथे व तशीच राहते. कोणतीही तडजोड हा मुक्तीचा मार्ग असू शकत नाही.

विश्वाला तीन प्रकारच्या क्रांती ज्ञात आहेत. भौतिक क्रांतीचे ठाशीव परिणाम दिसून येतात; नैतिक आणि बौद्धिक क्रांतीची फळे ही अधिक समृद्ध असतात आणि त्या क्रांतीचे क्षेत्रदेखील अनंतपटीने व्यापक असते; परंतु आध्यात्मिक क्रांतीमध्ये महान बीजे दडलेली असतात.

हा तिहेरी बदल या परस्परांचा सुयोग्य संयोग घडवू शकला तर निर्दोष कार्य आकारास येऊ शकते; परंतु मानवजातीचे शरीर आणि मन हे, जोरकस असणारा आध्यात्मिक प्रवाह परिपूर्ण रीतीने धारण करू शकत नाहीत; त्यातील बहुतांश विखरून जातो, बाकी जे शिल्लक असते ते दूषित होऊन जाते. आपल्या या भूमितून पुष्कळशा अध्यात्म-बीजांमधून थोडासातरी परिणाम साध्य व्हावा म्हणून असंख्य बौद्धिक आणि शारीरिक सुधारणांची आवश्यकता आहे.

…आज आपण या विश्वामध्ये जे बदल पाहत आहोत ते त्यांच्या आदर्शाच्या आणि प्रयोजनाच्या बाबतीत बौद्धिक, नैतिक, आणि भौतिक आहेत. आध्यात्मिक क्रांती आपली वेळ येण्याची वाट पाहात थांबली आहे आणि तोपर्यंत तिच्या केवळ लाटाच इथे-तिथे प्रस्फुटित होत आहेत. इतरांना जोवर ह्याचा बोध होत नाही तोपर्यंत त्या क्रांतीचे आकलन होणार नाही आणि तोपर्यंत सद्यस्थितीतील घडामोडींची सर्व स्पष्टीकरणे आणि मानवाच्या भवितव्याविषयीची सर्व भाकिते ह्या गोष्टी फोल आहेत. कारण त्या आध्यात्मिक क्रांतीचे स्वरूप, तिचे सामर्थ्य, तिच्या घडामोडी याद्वारेच आपल्या मानवतेचे पुढील चक्र निर्धारित व्हावयाचे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 210-211)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १२

ईश्वर स्वत:बरोबर परिपूर्ण स्थिरता आणि शांती घेऊन येत असतो. हे खरे आहे की, भक्तांचा एक विशिष्ट असा वर्ग स्वत:चे एक वेगळेच चित्र निर्माण करतो; ते उड्या मारतात, रडतात, हसतात, गातात. त्यांचे म्हणणे असे असते की, ह्या साऱ्या गोष्टी ते भक्तिच्या आवेशात करत असतात. पण वास्तविक ही मंडळी दिव्यत्वामध्ये वास करत नसतात तर ते बहुतांश प्रमाणात प्राणिक जगतामध्ये जगत असतात….

तुमच्यापाशी सशक्त देह आणि सुदृढ स्नायू असले पाहिजेत. तुमच्या बाह्य अस्तित्वामध्येदेखील समत्वाचा भक्कम पाया असलाच पाहिजे. तुमच्यापाशी जर असा भक्कम पाया असेल तर, तुम्ही अंतरंगामध्ये भावनांचे विश्व सामावून घेऊ शकाल आणि तरीही तुम्ही कोणताही आक्रोश करणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावावेग व्यक्त करू शकत नाही, परंतु तुम्ही तो सुंदर रीतीने, सुसंवादी पद्धतीने व्यक्त करू शकता. रडणे, आरडाओरडा करणे किंवा नाचणे-उडणे या नेहमीच दुर्बलतेच्या खुणा असतात; मग ही दुर्बलता प्राणिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक प्रकृतीची असेल; पण स्तर कोणताही असला तरी सर्वच स्तरावर या कृती म्हणजे स्व-संतुष्टतेच्या कृती असतात. जी व्यक्ती नाचते, उड्या मारते, आरडाओरडा करते त्या व्यक्तीला असे वाटत असते की, तिचा हा आवेग काहीतरी असामान्य आहे. अशावेळी खरेतर त्या व्यक्तीची प्राणिक प्रकृती त्यामध्ये आनंद घेत असते.

जर तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुमचे नाहीतर तुमचे तुकडे तुकडे होऊन जातील. काही लोकांनी असे विचारले, ”ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे उत्तर, ”अजून तुम्ही तयार नाही,” हे आहे. सद्वस्तुच्या अवतरणाचा एखादा अल्पसा थेंब जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आरडाओरडा करायला लावत असेल तर, जर संपूर्ण सद्वस्तुच खाली अवतरली तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे देह, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नाही त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचा अर्थ असा की, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका तर, शांती आणि स्थिरता धारण करून वाट पाहा.” याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. परंतु ज्यांच्याकडे असा आवश्यक पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही उलट सांगतो की, अभीप्सा बाळगा आणि खेचून घ्या. कारण अशा व्यक्तीच ते ग्रहण करू शकतील आणि तरीही ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या त्या शक्तींमुळे त्या विचलित होणार नाहीत.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 10-11)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ११

ईश्वरी इच्छा आपल्याकडून केव्हा कार्य करवून घेत आहे, हे आपल्याला कसे कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ईश्वरी इच्छा ओळखणे अवघड नसते. ती निर्विवाद असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ईश्वरी इच्छेच्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही जर अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर मग तुम्ही खूपच अस्वस्थ होता. तुमच्या अस्वस्थतेसाठी तुम्ही काही भौतिक कारणे देऊ पाहाल आणि त्या मार्गावर तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः तुम्ही सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत राहता आणि तरीही तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि तुम्ही थांबलात व तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळेल आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतील. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशीही अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबता आणि त्या अस्वस्थतेचे कारण शोधू लागता तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा, हे जे काही चालले आहे त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे ? शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो.

…एखादी गोष्ट ईश्वराकडून आलेली आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकते. तुम्हाला मोकळे वाटते, तुम्ही स्वस्थ असता, तुम्ही शांत असता. पण जेव्हा काहीतरी स्वत:हून तुमच्या समोर येते आणि तुम्ही त्यावर झडप घालता आणि ओरडता, “हां, शेवटी मला जे हवे होते ते मला मिळालेच,” तेव्हा तुम्ही नक्की ओळखले पाहिजे की, हे ईश्वराकडून आलेले नाही. समत्व-वृत्ती ही ईश्वराशी एकत्व आणि सायुज्यता साधण्याची एक अत्यावश्यक अट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-10)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १०

तुम्हाला योगाची प्रत्यक्ष हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येकाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवरील जय तसेच जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला ठेवणे आणि अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न आणि निद्रा, तहान आणि भूक इ. वर विजय मिळविण्याचाही प्रयत्न करू शकते. परंतु जगाशी, जीवनाशी काहीही कर्तव्य नाही किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे अटकाव करणे या गोष्टी माझ्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत. दिव्य सत्याचा प्रकाश, सामर्थ्य, आनंद आणि त्यांची गतिशील निश्चितता जीवनामध्ये खाली उतरवून, त्यायोगे हे जीवन रूपांतरित करणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी योग नसून, हा दिव्य जीवनाचा योग आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०९

(महत्त्वाकांक्षा आणि अप्रामाणिकपणा या धोक्यांचा विचार आपण काल केला, आता आणखी एक धोका विचारात घेऊ.)

आणखी एक धोका असतो. तो धोका लैंगिक आवेगांबाबत असतो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये योग तुम्हाला अगदी उघडावागडा करतो आणि तुमच्यामध्ये सुप्त असलेले सारे आवेग आणि इच्छावासना बाहेर काढतो. कोणत्याही गोष्टी लपवायच्या नाहीत किंवा तशाच बाजूला सोडून द्यायच्या नाहीत हे तुम्ही शिकायला हवे. तुम्ही त्यांना सामोरे गेले पाहिजे आणि जिंकले पाहिजे आणि त्यांची पुनर्घडण केली पाहिजे.

योगाचा पहिला परिणाम असा होतो की, मानसिक नियंत्रण सुटते आणि सुप्तपणे पडून असलेल्या साऱ्या वासना अचानकपणे मोकाट सुटतात आणि त्या वर उफाळून येतात आणि व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावर त्या आक्रमण करतात. जोपर्यंत मानसिक नियंत्रणाची जागा ईश्वरी नियंत्रणाने घेतली जात नाही तोपर्यंत एक संक्रमणकाळ असतो की, जेव्हा तुमची प्रामाणिकता आणि तुमचे समर्पण यांचा कस लागतो. लोक लैंगिक आवेगासारख्या आवेगांची खूप जास्त प्रमाणात दखल घेतात आणि सहसा त्यामुळेच या आवेगांना बळ मिळते. लोक त्या आवेगांचा खूप जोरदार प्रतिकार करतात आणि जबरदस्तीने त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाबून ठेवतात. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार कराल आणि म्हणाल, ”मला ही गोष्ट नको आहे, मला ही गोष्ट नको आहे,” तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही त्याने बांधले जाता. तुम्ही काय केले पाहिजे ? तर ती गोष्ट शक्यतो तुमच्यापासून दूर ठेवा, तुमचा त्या गोष्टीशी असलेला संबंध तोडा, तिची शक्य तेवढी कमीत कमी दखल घ्या आणि जरी तुमच्या मनात त्या गोष्टीचा विचार आलाच तरीही नि:संग राहा आणि त्यांच्याबाबत निश्चिंत राहा.

योगाच्या दबावामुळे जे आवेग आणि इच्छावासना पृष्ठभागावर येतील, त्या जणू काही तुम्हाला परक्या आहेत किंवा त्या बाह्य जगाशी संबंधित आहेत असे समजून, अनासक्त वृत्तीने आणि शांत चित्ताने त्यांना सामोरे जा. त्या ईश्वरार्पण केल्या पाहिजेत म्हणजे मग ईश्वर त्यांना आपल्या हाती घेईल आणि त्यांच्यात रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०७

व्यक्ती त्या ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते किंवा नाही यावरच पूर्णयोगामध्ये सारे काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल, आणि कितीही अडथळे आले तरी, उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याची धीरयुक्त इच्छा असेल तर, कोणत्या ना कोणत्या प्रकारे खुलेपण निश्चित येते. यासाठी जास्त वेळ लागेल की कमी ते मन, हृदय आणि शरीराची तयारी असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून असते. आणि म्हणून आवश्यक तो धीर व्यक्तीकडे नसेल तर, आरंभीच्या अडचणीमुळेच व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल अशी शक्यता असते. एकाग्र होणे, शक्यतो हृदयकेंद्रावर एकाग्र होणे आणि श्रीमाताजींनी अस्तित्वाचा स्वीकार करावा, म्हणून श्रीमाताजींच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तीद्वारे चेतनेमध्ये परिवर्तन घडून येणे, याव्यतिरिक्त या योगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. व्यक्ती मस्तककेंद्रावर किंवा भ्रूमध्यामध्येही एकाग्रता करू शकते परंतु बऱ्याच जणांसाठी येथील खुलेपण अधिक अवघड असते. जेव्हा मन निश्चल होते आणि जेव्हा एकाग्रता दृढ होते आणि जेव्हा अभीप्सा उत्कट होते, तेव्हा तेथे अनुभूतीचा प्रारंभ होतो. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम शीघ्र गतीने प्राप्त होण्याची शक्यता अधिक. इतर बाबींसाठी व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क आणि श्रीमाताजींच्या शक्तीप्रत व त्यांच्या उपस्थितीप्रत ग्रहणशीलता प्रस्थापित करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 107)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते दिव्य अस्तित्व अवतरते. जोपर्यंत तुमच्याकडे ही चेतना असत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या सर्वच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जे कोणते रूप येते वा जे तुम्हाला अगदी सहजसोपे, स्वाभाविक वाटते ते तुम्ही अवलंबावे. दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करा (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करा आणि तेथे त्यांना आवाहन करा. तुम्ही यांपैकी कोणतीही एक गोष्ट करू शकता किंवा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी करू शकता – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: प्रथम एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल (quiet) करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा निश्चल मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही अधीर बनता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; तुमची चेतना सिद्ध होईपर्यंत तुम्हाला प्रयत्न चालू ठेवावे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५

चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या योगाचे ध्येय आहे. दुसरे ध्येय म्हणजे योगिक चेतना विकसित करणे – म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, विश्व-पुरुषाविषयी आणि वैश्विक शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि अधिमानसापर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ईश्वराशी एकत्व पावून राहणे. तिसरे ध्येय असे की, अधिमानसाच्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेच्या (supramental consciousness) माध्यमातून, विश्वातीत ईश्वराच्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 20)