आपल्या मोक्षाची पूर्वअट
(सन १९१०)
खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्षता आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. आपल्यामध्ये पारतंत्र्यातून सुटका करून घेण्याची इच्छा असू शकते, पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परम मोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा आपल्याकडे अभाव असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, आपण त्यांचा अवलंब हा आपल्या कार्यफलाच्या तीव्र आसक्तीला चिकटून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईत जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, (स्वतःला बंधमुक्त करण्याच्या) अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, पूर्वी कधीही ज्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले नव्हते त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. येथेच साधनेची आवश्यकता असते.
ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ ‘शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकच आहे. आपण जर त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सोपा होतो.
इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ईश्वरी इच्छा असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थी, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने असे म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला म्हणू शकता, ये आणि तुम्ही तसे म्हटल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे श्रद्धा या शब्दाचा अर्थ, खरंतर, परिपूर्ण श्रद्धेसहित ईश्वरी संकल्प असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला ज्ञात असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असते आणि ईश्वरी संकल्प काय आहेत हे ती जाणते. आणि तिला हे ज्ञात असते की, ईश्वराची जी इच्छा आहे तसेच घडणे आवश्यक असते. अंध असलेली श्रद्धा नव्हे पण आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणणारी श्रद्धा ही सर्वज्ञ बनू शकते.
इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि ती स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह, तात्पुरत्या किंवा चिरस्थायी स्वरूपात त्या सर्वांना प्रदान करू शकते. एखाद्या एकांतवासात राहणाऱ्या माणसाने निःस्वार्थी आणि निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यास, त्याचा विचार हा राष्ट्राचा विचार बनू शकतो. एका वीराची इच्छा ही लाखो भ्याड लोकांच्या हृदयामध्ये धैर्य निर्माण करू शकते.
हीच साधना आपण सिद्धीस नेली पाहिजे. आपल्या मोक्षाची ही पूर्वअट आहे. आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित अपरिपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हालविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते साध्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वराच्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.
– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)
- आपल्या मोक्षाची पूर्वअट - October 24, 2026
- भारत-माता - October 23, 2026
- राष्ट्रीय पुनरुज्जीवन - October 22, 2026






