चैत्य पुरुष आणि मन, प्राण व शरीर यातील संबंध

 

(आंतरात्मिक भक्तीचे स्वरूप प्राणिक व मानसिक भक्तीपेक्षा कसे भिन्न असते ते आपण पाहिले. आज त्याचा उत्तरार्ध…)

चैत्य पुरुष (psychic being) जर पृष्ठभागावर आलेला असेल आणि मानसिक किंवा प्राणिक अस्तित्व त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जर त्याला आढळले तर त्याला खेद होतो. विशुद्धतेस धक्का बसल्यामुळे त्याला हा खेद झालेला असतो. जेव्हा मन स्वतःच्या खेळामध्ये मग्न असते किंवा प्राणिक अस्तित्व हे प्राणिक आवेगांबरोबर वाहवत जात असते तेव्हा चैत्य पुरुष म्हणतो, “या गोष्टी मला नको आहेत.” “मी येथे कशासाठी आहे?” “या असल्या गोष्टींसाठी मी येथे आलेलो नाहीये. मी येथे सत्यासाठी आलो आहे.”

आंतरात्मिक खिन्नता ही मानसिक असमाधान किंवा प्राणिक दुःख किंवा शारीरिक नैराश्य यांच्याहून भिन्न असते. आंतरात्मिक अस्तित्व जर सक्षम असेल तर, मानसिक व प्राणिक अस्तित्वाला ते स्वतःची जाणीव करून देते आणि त्यांना परिवर्तन करण्यास भाग पाडते. परंतु ते जर दुर्बल असेल तर, मन व प्राणादी इतर घटक त्याचा फायदा घेतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात. मात्र काही उदाहरणांबाबत असे आढळते की, ते आंतरात्मिक अस्तित्व पृष्ठभागावर येते आणि मानसिक व प्राणिक अस्तित्वाची घडी विस्कटून टाकते; त्यांच्या सर्व प्रस्थापित रचना, त्यांच्या सवयी मोडून टाकते आणि एका नवीन व दिव्य व्यवस्थेसाठी त्यांच्यावर दबाव टाकते. पण मानसिक किंवा प्राणिक अस्तित्व हे आंतरात्मिक अस्तित्वाहून अधिक बलवान असेल तर, आंतरात्मिक अस्तित्वाचा प्रभाव अधूनमधूनच पडतो आणि मग ते हळूच पाठीमागे सरकते. अशावेळी त्याचा आक्रोश म्हणजे अरण्यरुदन ठरते आणि मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वं स्वतःच्या चक्रामध्ये गोलगोल फिरत राहतात.

सरतेशेवटी मात्र, चैत्य पुरुष या वरकरणी गोष्टींमुळे स्वतःची फसवणूक करून घेण्यास नकार देतो. तो आता खोटेपणाच्या फशी पडत नाही. मिथ्यत्वाद्वारे दबले जाण्यास तो आता नकार देतो; त्याचबरोबर तो सत्याची अतिशयोक्तीपण करत नाही. उदाहरणार्थ, त्याच्या अवतीभोवतीचा प्रत्येक जण जरी “ईश्वर अस्तित्वात नाही,” असे त्याला सांगत असला तरी चैत्य पुरुष त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतो. तो म्हणतो, “सत्य काय आहे ते मला माहीत आहे,” “मला माहीत आहे कारण मला त्याची जाण आहे.” आणि त्याला वरकरणी दृश्यांच्या पाठीमागे असलेल्या गोष्टीची जाण असल्यामुळे आता बाह्य दृश्यांमुळे त्याची फसवणूक होऊ शकत नाही. पाठीमागच्या शक्तीची त्याला चटकन जाणीव होते.

तुमच्यामध्ये चैत्य पुरुष जेव्हा जागृत झालेला असतो तेव्हा, भावनिक अस्तित्वामधील साऱ्या हीणकस गोष्टी तो फेकून देतो आणि तो त्यास भावविवशतेपासून किंवा अतिभावनाशीलतेच्या कनिष्ठ खेळापासून मुक्त करतो. मात्र त्यामुळे त्याच्यामध्ये मनाची शुष्कता येत नाही किंवा प्राणिक भावभावनांचा अतिरेक निर्माण होत नाही. तो प्रत्येक भावनेस यथोचित न्याय देतो.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 380-381)

श्रीअरविंद