भारताचे पुनरुत्थान – ०१

भारताचे पुनरुत्थान – ०१

नमस्कार वाचकहो,

जग एका नव्या भारताचा उदय होताना पाहत आहे. हा उदय केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर अखिल पृथ्वीच्या आणि मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु भारताला त्याचे नियत कार्य करता यावे यासाठी भारताने प्रथम स्वतःचा पुनर्शेाध घेतला पाहिजे. भारताने स्वतःच्या भव्योदात्त आत्म्यामध्ये खोलवर बुडी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या अक्षय ज्ञानस्रोतामधून पुन्हा एकदा सामर्थ्य प्राप्त करून घेतले पाहिजे. तसे केले तरच भारत स्वतःला आणि या जगाला पुनरुज्जीवित करू शकेल.

ब्रिटिश काळामध्येदेखील नेमकी हीच आवश्यकता निर्माण झाली होती. त्या काळी, इ. स. १९०६ ते १९०८ च्या दरम्यान श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम्’ या वृत्तपत्रातून जे लेखन केले त्याद्वारे, संपूर्ण भारतवर्षामध्ये ‘स्वराज्या’बद्दल एक नवचैतन्य निर्माण झाले. भारतीयांची अस्मिता जागृत करणारे, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागविणारे ते लिखाण आजही तितकेच परिणामकारक आहे.

‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ, बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ’ असे म्हटले जाते. तेव्हा आपल्या दिव्य वारशाचे स्मरण करून, पुन्हा एकदा तेच राष्ट्रप्रेम जागविण्याची आवश्यकता आहे, तोच सुवर्णकाळ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होण्याची आवश्यकता आहे. कारण, आज खरोखरच जग अनेक गोष्टींसाठी मोठ्या अपेक्षेने, आशेने भारताकडे पाहत आहे हे आपल्याला पदोपदी दिसून येत आहे. अशा वेळी जगाला देण्यासारखे नेमके आपल्याकडे काय आहे, याचा पुनर्शोध आधी आपण घेतला पाहिजे, म्हणजे मग भारत विश्व-गुरु होण्याच्या दृष्टीने पावलं टाकू शकेल.

हे केवळ स्मरण-रंजन नाही, तर आपल्यामध्ये राष्ट्रप्रेम जागविणारे हे शक्तिवर्धक द्रव्य (टॉनिक) आहे, या भूमिकेतून  ‘भारताचे पुनरुत्थान’ या मालिकेकडे पाहिल्यास खरोखरच राष्ट्रासाठी काही कार्य करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये जागी होईल असा विश्वास वाटतो.

या मालिकेमध्ये सुरुवातीला आपण, ‘वंदेमातरम्’ हा मंत्र व या मंत्राचे उद्गाते ऋषी श्री. बंकिमचंद्र चटर्जी यांच्याविषयी श्री. अरविंद घोष यांनी काढलेले गौरवोद्गार समजावून घेऊ; नंतर ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा अल्प-परिचय करून घेऊ व त्यानंतर त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेले श्री. अरविंद घोष लिखित काही अग्रलेख विचारात घेऊ. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी श्री. अरविंद घोष यांनी लिहिलेले हे अग्रलेख आजही किती विचार-प्रवर्तक आहेत, हे जाणून मन थक्क होते.

धन्यवाद.
डॉ. केतकी मोडक
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक