कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता
कर्म आराधना – ३९
कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पणाचा भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला एखादी व्यक्ती जर कर्म करत असताना त्यामध्ये श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची त्या व्यक्तीला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती ते कार्य करत आहे, ते कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, कृती करत असताना पार्श्वभूमीवर एक प्रकारची प्रेमाची किंवा भक्तीची भावना असू शकते, जे प्रेम वा जी भक्ती ही त्या कर्माची मुळातील प्रेरक शक्ती होती. ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि काळोख्या कालावधींनंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उगवू शकते. सर्व साधना अशीच असते आणि म्हणूनच या काळोख्या क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर मूळ आच (urge) तेथे आहे आणि हे काळोखे क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच त्या व्यक्तीला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 242]
- चैत्य पुरुष खुला होणे - September 12, 2026
- शांती आणि शक्तीचे अवतरण - September 3, 2026
- शांतीचे अवतरण - September 2, 2026







