मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०३
पहिली पद्धत तर्काला आवाहन करणारी आहे. असे म्हणता येईल की, जगाची जी सद्यकालीन स्थिती आहे त्यामध्ये मृत्यू अपरिहार्य आहे; देहाने जन्म घेतला आहे तर अगदी अनिवार्यपणे तो एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे आणि प्रत्येक वेळी बघा, जेव्हा मृत्यू येणे आवश्यक असतो तेव्हाच तो येतो; मृत्युची घटिका कोणी त्वरेने घडवूनही आणू शकत नाही किंवा दूरही लोटू शकत नाही. जो मृत्युची याचना करतो त्याला तो प्राप्त करून घेण्यासाठी कदाचित खूप काळ वाट पाहावी लागू शकते आणि ज्या व्यक्तीला त्याची भीती वाटते अशा व्यक्तीने कितीही काळजी घेतली तरी त्याच्यावर मृत्यू अचानकपणे येऊन घाला घालू शकतो. त्यामुळे मृत्युची वेळ ही अत्यंत कठोरपणे निश्चित केलेली असते असे दिसते. फक्त त्याला काही मोजक्या व्यक्तींचा अपवाद असतो पण अशा व्यक्तींकडे असणाऱ्या शक्ती सर्वसामान्य मानवजातीमध्ये सहसा आढळत नाहीत. जी गोष्ट आपण टाळू शकत नाही त्याची भीती बाळगणे हे निरर्थक आहे, हे तर्कबुद्धी आपल्याला शिकविते. तेव्हा काय घडणार आहे याची चिंता करत न बसता, मृत्युची संकल्पना स्वीकारून, प्रत्येक तासागणिक, प्रत्येक दिवशी आपल्याला करण्याजोगे सर्वोत्तम असे जे जे काही आहे ते शांतपणे करत राहणे, हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे. ज्यांना तर्काच्या नियमांना धरून कर्म करण्याची सवय आहे अशा बुद्धिनिष्ठ व्यक्तींच्या बाबतीत ही प्रक्रिया अतिशय प्रभावी ठरते; ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि त्या भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 83)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२५ - January 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२४ - January 16, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२३ - January 15, 2025